Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रपतिभवनात सोलापूरच्या कलावंतांची अक्षयगाण्यांची रंगली स्वरमैफल!
सोलापूर, ५ मार्च/प्रतिनिधी

 

‘पहाटगाणी’ या आपल्या संगीत मैफलीने सोलापूरच्या रसिकांची मने जिंकणाऱ्या आणि अवघ्या महाराष्ट्रासह विविध भागात अनेक मैफली गाजविणाऱ्या ‘क्षितिज’ या संस्थेच्या कलावंतांनी आपली अक्षयगाण्यांची स्वरमैफल नवी दिल्लीत राष्ट्रपतिभवनात राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या समोर सादर केली.
मराठमोळी गाणी सादर करण्याच्या या स्वरमैफलीत सुविख्यात लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचा सहभाग महत्त्वाचा होता. राष्ट्रपतिभवनात राष्ट्रपतींसमोर मराठी सुगमगीतांचा कार्यक्रम सादर करणारी ‘क्षितिज’ ही सोलापूरचीच नव्हेतर महाराष्ट्रातील एकमेव वाद्यवृंद संस्था आहे.
गिरीश पंचवाडकर व शीतल देशपांडे यांचे सुरेल गायन, कौस्तुभ गोडबोले यांचे अभ्यासपूर्ण व ढंगदार पद्धतीचे निवेदन, सोबत अभय कुलकर्णी, शिरीष घाटे, अक्षय पंचवाडकर, जब्बार मुर्शद, धनंजय अांबेकर या वाद्यवृंदांची वैशिष्टय़पूर्ण साथ यामुळे राष्ट्रपतिभवनातील ही स्वरांची मैफल अतिशय दर्जेदार ठरली. गिरीश व शीतल यांनी गायलेल्या ‘कानडा राजा पंढरीचा’ या भक्तिगीतासाठी देवीसिंह शेखावत यांनी खास कौतुक केले.
या निमित्ताने ‘क्षितिज’ च्या कलावंतांची नुकतीच ध्वनिमुद्रित झालेली ‘अक्षयगाणी’ ही सीडी तसेच सोलापुरी चादर राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना भेट देण्यात आली. ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांनी सादर केलेल्या ‘ फड सांभाळ तुऱ्याला.’ आणि ‘कसं काय पाटील बरं हाय का.’ या ढंगदार लावण्यांनी मैफलीची सांगता झाली. या वेळी राष्ट्रपती भवनातील अनेक उच्चपदस्थ मराठी अधिकारी व निमंत्रित आवर्जून उपस्थित होते.