Leading International Marathi News Daily
शनिवार ४ एप्रिल २००९

‘बुक ऑफ नॉनसेन्स’ या सारख्या विनोदी साहित्याने आधीच परिचित असलेल्या एडवर्ड लियरला ‘द आऊल अ‍ॅण्ड पुसिकॅट’ या अभिजात वाङ्मयनिर्मितीमुळे अधिक लोकप्रियता लाभली. खरं म्हणजे लियरची मनापासून इच्छा होती उत्कृष्ट लँडस्केप पेंटर होण्याची. त्यासाठी तो जगभर हिंडला. त्या सर्व प्रवासाचे वर्णन त्याने सचित्र लिहून ठेवले. इ.सन १८७४ मध्ये तो इंग्रज गृहस्थ हिंदूुस्थानात आला. १५ व १६ फेब्रुवारी रोजी त्याने ताजमहालला भेट दिली. त्याने लिहिलेल्या ‘इंडियन जर्नल’ मधील हा उतारा-
आग्य्राचा किल्ला हा एक मोगल वास्तुशिल्पाचा सुंदर नमुना आहे. या किल्ल्याच्या बाजूने एका गचाळ बाजारातून वाट काढत

 

काढत आम्ही सर्व एका बंगल्यापाशी आलो. हा बंगला म्हणजे हॅरिसन टुरिस्ट हॉटेल. तिथे आत गेलो आणि ताजेतवाने झालो. थोडी पोटपूजा केली व ताजच्या दर्शनाला निघालो. यमुना नदी इतकी वळणावळणाने वाहते, की आधी वाटलं होतं ताजमहाल पलीकडच्या किनाऱ्यावर आहे.
ताजमहाल माझ्या अपेक्षेपेक्षा कित्येक पटीने अतिशय देखणी व परिपूर्ण अशी वास्तू आहे. तिची भव्यता व रंग मला फार फार भावले. याहून आणखी काही देखणे असेल असे वाटत नाही. नंतर किल्ल्यात गेलो. तिथल्या बुरुजावरून दिसणारी यमुना व तिच्या काठावरील ताजच्या दर्शनाने मी अगदी मंत्रमुग्ध झालो.
आज पुन्हा ताज पाहायला आलो. इथले सौंदर्य वर्णन करायला शब्द अपुरे आहेत. काय उद्यान आहे! कितीतरी झाडं नि फुलं आहेत. विविध तऱ्हेच्या सुंदर पेहेरावात आणि अलंकाराने नटलेल्या स्त्रिया तेथे दिसल्या; त्यांच्यात सामान्य परंतु नीटनेटक्या पोषाखातील देखील होत्या. दिसायला मात्र सुंदर. पांढऱ्या वेषातले व लाल, नारिंगी, जांभळ्या, पिवळ्या शाली पांघरलेले पुरुषदेखील इतस्तत: फिरत होते. सगळं कसं रंगीबेरंगी. या दिलखेचक देखाव्याच्या मध्यभागी हस्तीदंतासारखा शुभ्रवर्णी चकचकीत ताजमहाल. या सर्वाला उठाव देणारी गर्द हिरवी सायप्रसची झाडं व इतर पिवळट हिरव्या रंगाची झाडं. त्यावर विहार करणारे पोपटांचे थवे. आवाज करणारे सुतार आणि तांबट हे पक्षी. इथे मी मैनेचा नवा प्रकार पाहात होतो. माणसाळलेल्या अगणित खारी सैरावैरा धावत होत्या. जांभळ्या, गुलाबी बोगनवेली काही झाडांवर चढल्या होत्या. विस्तीर्ण पानांच्या केळी व अनोळखी फर्नस् दिसले. या उद्यानाचे वर्णन करणं अशक्य आहे. पलीकडच्या काठावर मोहक हिंदुस्थानी वातावरण. इथलीच दोन चार दृश्ये रंगवीन म्हणतो.
माझ्या मते या जगातल्या रहिवाशांचे दोनच वर्ग होऊ शकतात. एक ताज ज्यांनी बघितला आहे त्यांचा; दुसरा ज्यांनी बघितला नाही त्यांचा.
भा. द. साठे
लेखक संपर्क : ९३२३७५३०५८