Leading International Marathi News Daily
शनिवार ४ एप्रिल २००९

जेव्हा आमचा फ्लॅट दुसऱ्यालाही विकला गेला..
१९८० च्या जूनमध्ये आम्ही मुंबई (बोरिवली)सोडून नागपूरला बदलीवर जायचा निर्णय घेतला. अर्थात त्याला घरीदारी खूप विरोध झाला. वेडबिड लागलंय की काय? कुठे त्या रखरखाटात चालला आहात? असे आरोपही झाले. पण आमचा दोघांचा विचार पक्का असल्यानं आम्ही जायचं ठरवलं. फक्त जायच्या आधी काही दिवस तिकडे जाऊन जरा गाव बघून आलो. नारळ, चिकू वगैरे गोष्टी मिळत नव्हत्या. समुद्राचे मासेही मिळत नव्हते. पण तरीही शेवटी जायचं ठरवलं. नागपूरचं मोकळेपण भावलं.
मध्यवस्तीत प्रथम भाडय़ाने जागा घेतली. काही कारणास्तव दोन महिन्यांतच ती बदलावी लागली. त्या काळच्या मानाने भाडंही जास्त होतं. त्यामुळे लवकरात लवकर आपण ओनरशिप फ्लॅट घेऊया हा विचार पक्का होता. त्या वेळी तेथे फ्लॅट

 

नुकतेच सुरू झालेले होते. बहुसंख्य लोकांचा कल स्वत:चं घर बांधायचं असाच आहे. पण आम्हाला ते शक्य नव्हतं. म्हणून ओळखीने एक फ्लॅट लक्ष्मीनगरला बुक केला. बिल्डर पण माझ्या आजोळचा निघाला. कोकणस्थ. म्हटलं चला.. थोडी ओळखही निघाली. दोन बेडरूमचा प्रशस्त फ्लॅट. शेजारही चांगला पाहून खूश झालो. बिल्डर म्हणाला, ‘‘नुकताच हा फ्लॅट ज्याने घेतला त्याला नको आहे, तुम्ही लकी आहात, तुम्हाला हा मी देतो.’’ तळमजल्याला चौघेजण राहायला आले होते. पहिल्या मजल्याचं काम दोन- तीन महिन्यांत होईल. ८२ च्या मेमध्ये मिस्टरांना ट्रेनिंगसाठी मुंबईला यावं लागलं. व राहत्या भाडय़ाच्या जागेचा मालक जागा खाली करण्यासाठी तगादा लावू लागला. नाहीतर भाडे दुप्पट द्या म्हणू लागला. ही गोष्ट परवडण्यासारखी नव्हती. म्हणून मी बिल्डरला विनंती केली, त्याने एक- दीड महिन्यात राहण्यायोग्य सोयी करून द्यायचं मान्य केलं. आमची अडचण विचारात घेतली. त्यामुळे लगेच जूनएण्डला आम्ही बांधकाम अर्धवट होते तरी शिफ्ट झालो. आतलं काम सवडीनं करून घ्यायचं असं ठरलं.
आम्ही राहायला आलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी एक मध्यम वयाचं जोडपं आलं. दार उघडल्यावर म्हणालं, ‘‘तुम्ही कोण? हा फ्लॅट आमचा आहे.’’ मी तर चक्कर येऊन पडायच्या स्थितीत, तरीही कसंबसं त्यांना आत घेतलं व सर्व सांगितलं की हा फ्लॅट आम्ही बिल्डरकडून विकत घेतला आहे. तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून खुलासा करून घ्या. हे ऐकल्यावर ते गृहस्थ म्हणाले, ‘‘बरं, मी भेटेन त्यांना. कदाचित आमचा दुसरा फ्लॅट असेल. आम्हीही त्यांना पूर्ण पैसे दिले आहेत. आम्हाला काही घाई नाही. विचारू सावकाश. आपलाच माणूस आहे.’’
ते गेल्यावर मी मिस्टरांना म्हटलं, ‘‘असे कसे हे लोक? एवढे ६८-७० हजार दिलेत व फ्लॅटबद्दल साधी चौकशी नाही, माहिती पण नाही. हा विश्वास की बेजबाबदारपणा!’’
नंतरचे दिवस म्हणजे वैऱ्यावरही येऊ नयेत असे भयंकर होते. नागपुरातला तो बांधकाम व्यवसायातला महाघोटाळा होता. कित्येक लोकांना या बिल्डरने फसवले होते. एकच फ्लॅट दोन-दोन, तीन-तीन जणांना विकला होता. त्याच्या चालू असलेल्या २/४ स्कीममध्ये त्याने हीच पॉलिसी वापरली होती. आता लोकांना हळूहळू यात गोलमाल असल्याचं जाणवू लागलं. सुस्तपणा जाऊन लोक जागे होऊ लागले. मग असंख्य तक्रारी, लोकांचं आमच्याकडेच बसणं (कारण हा बिल्डर आमच्याच मजल्यावर राहत होता. पण घरी भेटतच नसे. व त्याचे कुटुंबीय या लोकांशी बोलत नसत. आमचा संबंध नाही म्हणत.) पोलीस केस, जबान्या, चौकश्या व या सर्वाला साक्षी आम्ही! मध्यस्थामार्फत या फसलेल्या लोकांना समजावणं. अतिशय वाईट दिवस नव्हे महिने होते ते. त्यातच कुजबूज, नाबर मुंबईवाले म्हणून हुशार! आपला फ्लॅट बरोबर ताब्यात घेतला! एक-दोन वेळा मी ऐकून घेतलं व शेवटी म्हटलं की, तुम्ही एवढे हजारोंनी पैसे दिलेत. पण एका शब्दाने कधी चौकशी करावी वाटली नाही. कारण तुम्हाला नड नव्हती आम्हाला गरज होती म्हणून आम्ही त्याच्या मागावर होतो. तुमच्याकडे अगोदरच तुमची घरे होती. त्यामुळे तुम्ही गाफिल राहिलात व आपला माणूस म्हणून गप्प बसलात.’’
शेवटी चौकशी झाली. पोलीस केस झाली. बिल्डरला अटक झाली. खूप जणांनी त्याच्यावर केसेस टाकल्या. काही जणांनी आम्हालाही पार्टी केलं. तो बिल्डर नंतर तुरुंगातच बेवारस म्हणून मरण पावला. घरच्यांनी त्याच्याशी कायदेशिररीत्या आधीच संबंध तोडले होते. थोडंसं वाईट वाटलंच. पण आम्ही काय करू शकत होतो. दोन- चार र्वष गेल्यावर हे फसवणूक नाटय़ लोक विसरत चालले. मी मुंबईला परत आल्यावर दोन-तीन वेळा कोर्टात साक्ष द्यायला जाऊनही आले. असंख्य लोकांचे पैसे गेले. आपलं नशीब म्हणून लोक आता ते विसरूनही गेले. आम्हाला खूप मनस्ताप झाला. अशा या अर्धवट काम झालेल्या फ्लॅटची गाजलेली कथा. आमचं नशीब बलवत्तर म्हणून बाहेरून तेथे जाऊनही फ्लॅट नावावर तरी झाला होता. नाहीतर निष्कांचन अवस्थेत आम्हाला बाहेर पडावं लागलं असतं. असो. त्यानंतर खूप घरं बदलली. आता मात्र ठरवलं, घरानं आपल्याला बदलायचं तर बदलू दे, आपण मात्र स्वत:हून घर बदलायचं नाही!
- उमा नाबर, बोरिवली.