Leading International Marathi News Daily
शनिवार ४ एप्रिल २००९

रे!झीला, ह्यो बघ तरी कायता! टी.व्ही.वर आमच्या सिंधुदुर्गातले गाव दाखवतत! बघ, कसे आमचे गाव दिसतत ते! ..आणि तुम्ही उंडगे! हकडे-तकडे फिराक जातास..! बघ कशी हिरईगार माडाची झाडा डोलतत, रस्त्यावयली तांबडी माती, मातयेची आणि चिऱ्यांची घरा, घरांवयले नळेकौला.. गावातली एस.टी.ची बस बघ कशी उठावदार दिसता.
अहो, अण्णानू, तो टी.व्ही.तलो काय सांगता ता तरी ऐका, नायतर तुम्ही तरी त्या टी.व्ही.वर - तुमचा कीर्तान सांगाक जावा..!!
तुमका, आमच्यासारख्या म्हाताऱ्यांची कीर-कीरच होतली..!

 

अण्णानू, ईषय इलो म्हणान सांगतय..!
काय रे ता?
आमचा गावातला मातयेचा घर जुना झाला आसा, वासे-भेता दर दोन-चार वर्साक बदलूची लागतत, घरावयले नळे तुटतत- फुटतत, भिंतीका गिलावो काढूचो लागता आणि जमीन करून इश्येनान् सारवूची लागता..! ह्यो सगळा करतना, दादल्याचा आणि आयेचा घामटा निघत आसतला! तेव्हा, ता घर मोडून नया ‘स्लॅबचा’ घर बांधाया? गिरणीतना रिटायर्ड झाल्यावर तुमका थोडे पैसे मिळाले आसत ना..?!
रे! माझ्या झिला, चार पुस्तका काय शिकलस आणि तुका ह्यो सुचता? आज्या-पंज्यांनी बांधलेला घर मोडूया म्हणून सांगतस..?
अण्णानू तसा नाय.. आज वाडीत कोणाची ढोरा न्हायत, मगे जमीन सारवूक श्यान खैयना मिळतला? डोंगर ‘नायनपट’ होवक लागले, तर गेरू खैयाना मिळतलो? कुंभारांनी नळे तयार करुचाच सोडल्यांनी मगे नळे खय मिळतले? झाडापेडा कोण लावीत नाय, हत तीच तोडतत, मगे ‘वासे-भेता’ खयना मिळतली.. म्हणून म्हणतय, स्लॅबचा घर बांधाया..!!
रे! झिला, बराच तुझा डोक्या चलता! अरे, मलबार हिलवर २५ व्या मजल्यावर एका जैनान घरातल्यो सगळ्यो लादयो काढून.. माती घातल्यान आणि विकतचा श्यान आणून दर आठ-दहा दिवसांनी सारवता.. ह्यो तू पेपरात वाचलस?
अण्णानू! काय म्हणतास काय? अहो! तो खुळो आसतलो!
तो खुळो आणि तू शानो? असल्यो बातम्यो तुम्ही वाचूसाच नाय! ‘‘दिल्ली हायकोर्टान् विवाहितांका सार्वजनिक ठिकाणी ‘चुंबन’ घेवक परवानगी दिल्यान्’’ ती बातमी बरी मिटक्यो मारून चार-पाच वेळा वाचश्यात्..!

अरे! या नळ्यांच्या घरात उकडत नाय.. कितीता निंभार आसांदे! मातीच्यो भिंती, सारवलेली जमीन.. घरात शितळाय देता.. मे म्हयन्यातसुद्धा गार वाटता.. तुका काय? वासून स्लॅबचा घर बांधल्यान म्हणान तू नाचतस?
आणी काय रे! आमच्यो दोन म्हशी आसत त्येचा श्यान आमका पुरे..! तो कुंभारसुद्धा भेटलेलो तो म्हणता तुम्ही सांगशात तर ‘नळे’ बनवून देतय म्हणान्.. आणि गेरू कणकवलेत मिळता.. तेव्हा तू, ह्यो मिळत नाय- ता मिळत नाय असा सांगान.. घर पाडूचा नाव काढू नको..! अरे! झिला, मांजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींनी पणजीतल्या एका भाषणात सांगल्यांनी की- ‘‘कोकणातला सौंदर्य फक्त हिरव्यागार झाडाझुडपातच नाय तर, ‘तांबूस-लालसर’ ‘नळ्यांची आणि कौलांची’ घरा आसतना तेतूरच आसा.. ता सौंदर्य तसाच टिकवा’’.. बघ! ते माझ्या बायक सुचला.. आणि तुका खोटे गुण लागले आसत.. स्लॅबचा घर बांधाया म्हणून.. तुम्ही उंडगे ते उंडगे..!!
प्रमोद सावंत
लेखक संपर्क : ९७६९४२५५५१