Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मुंडे यांच्या विजयासाठी शिवसेना जिल्हाप्रमुखांचे साकडे
बीड, ६ एप्रिल/वार्ताहर

 

जिल्ह्य़ाचे भूमीपुत्र आमदार गोपीनाथ मुंडे यांना सर्व संतांचे आशीर्वाद आहेत. नऊ नाथांनी अध्यात्मातून जनतेचा उद्धार केला. त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणातून सर्व जनतेची सेवा केली. अशा नेत्याच्या विजयासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी येवलवाडी येथे जालिंदर नाथास महाआरती करून साकडे घातले आहे.
लोकसभा बीड मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे अधिकृत उमेदवार गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ चालू असलेल्या गाव भेटी दौऱ्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी येवलवाडी येथे भेट दिली. या वेळी बोलताना बाळासाहेब पिंगळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी संतांच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे यांनादेखील सर्व संतांचे आशीर्वाद आहेत. आघाडी शासनाने मात्र संतांची अवहेलना केली. आळंदी-देहू यासारख्या तीर्थक्षेत्री दारूसारखे प्रकल्प उभारून अध्यात्मातून पावन झालेल्या, सर्व हिंदू जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या परिसरास दूषित करण्याचा प्रयत्न केला. या वेळी वारकरी जेलमध्ये गेले; परंतु प्रकल्प होऊ दिला नाही अशी वागणूक हे सरकार संतांना देत आहे.
जिल्ह्य़ात संतश्रेष्ठ भगवानबाबा, वामनभाऊ, भीमसिंह महाराज यांनी अध्यात्मातून अठरा पगड जातींच्या लोकांमध्ये चांगल्या विचारांची क्रांती केली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले. या परिसरात चालू असलेल्या अनिष्ठ रुढी, परंपरा, अंधश्रद्धा बंद केल्या. मतदारांचे आशीर्वादसुद्धा मुंडे साहेबांनाच मिळतील अशी जालिंदरनाथ चरणी पिंगळे यांनी प्रार्थना केली. तसेच जिल्ह्य़ात युतीचा भगवा फडकविण्यासाठी सर्वानी जालिंदरनाथाला साकडे घालावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले. या वेळी उपजिल्हाप्रमुख भारत जगताप, भारत जाधव, अरुण भोसले, संजय सानप आदी उपस्थित होते.