Leading International Marathi News Daily
शुक्रवार , २४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

संत वाङ्मयाचे चिंतन हे जीवनाचे अधिष्ठान- चैतन्य महाराज
नाशिक / प्रतिनिधी

संत वाङ्मयाचे चिंतन हे मानवी जीवनाचे अधिष्ठान असून जीवनाच्या प्रत्येक अंगाला त्याने स्पर्श

 

केला आहे, असे प्रतिपादन ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक चैतन्य महाराज देगलूरकर यांनी येथे केले. किरणदेवी सारडा सत्कार्य निधीतर्फे आयोजित गुरूवर्य मामासाहेब दांडेकर ज्ञानेश्वरी लेखी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ परशुराम साईखेडकर नाटय़मंदीरात देगलूरकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सप्तशताब्दी वर्ष व मामासाहेब दांडेकर यांची जन्मशताब्दी असा संगम साधून किरणदेवी सारडा सत्कार्य निधीतर्फे गुरूवर्य मामासाहेब दांडेकर ज्ञानेश्वरी लेखी स्पर्धेचे राज्यस्तरावर बारा वर्षांपासून आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये यश संपादित केलेल्या यशस्वी स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बालकांवर ज्ञानेश्वरीचे संस्कार करण्यापूर्वी त्यांच्या पालकांवर आधी संस्कार करण्याची गरज आहे. ज्ञानेश्वरीवर लेखी स्पर्धा घ्यावी लागते, हा संस्कारशून्य आई-वडिलांचा पराभव आहे. वृद्धाश्रम निर्माण होणे हा संत वाङ्मयाचा अपमान आहे, असेही देगलूरकर म्हणाले.अध्यात्माच्या मर्यादित व्याख्या संत वाङ्मयाने बदलून टाकल्या आहेत. केवळ देव देव किंवा जप जाप म्हणजे परमार्थ नव्हे तर सोबत असलेल्या प्रत्येकाला किमान समाधानाकडे घेऊन जाणे म्हणजे परमार्थ होय. परमात्म्याचे चिंतन महत्वाचे असते. ज्ञानेश्वरी हा केवळ अध्यात्मिक ग्रंथ नसून त्याला मर्यादा नाहीत. त्यासारखा ग्रंथ जगात दुसरा कोणताही नाही, असेही देगलूरकर म्हणाले. ज्ञानेश्वरी ही जीवनाची परिपूर्णता ठरते. मानवी जीवनातील सर्व संकटांवर संत वाङ्मयात उत्तरे आढळतात, ही वस्तुस्थिती आहे, असेही त्यांनी नमूद केले. ज्ञानेश्वरी हा रामायण व महाभारताचा सुंदर समन्वय आहे. मानवी स्वभावाचे समग्र दर्शन त्यात घडते. ज्ञानेश्वरी व्यक्ती व सृष्टीचे कल्याण करते. ज्ञानेश्वरांनी व्यापक दृष्टांत दिले असून त्यांनी राजकारण नव्हे तर राजधर्म सांगितला आहे. व्यवहारातील सामान्य गोष्टींपासून श्रेष्ठ विचारांपर्यंत सर्वाना ज्ञानेश्वरीत स्पर्श केलेला आढळतो, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी किसनलाल सारडा यांनी हिंदू धर्मातील सर्वसमावेशक भारतीय तत्वज्ञान सर्वाना सामावून घेणारे असल्याचे सांगितले. वारकरी संप्रदाय कमालीचा सहनशील असून अलीकडच्या काळात घडलेल्या बहिष्काराच्या घटना विसंगत आहेत असेही ते म्हणाले.
सूत्रसंचालन ऋषीकेश आयाचित यांनी केले. प्रतिष्ठानतर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेची त्यांनी माहिती दिली. बस्तीरामजी सारडा सद्गुरू गंगेश्वरानंद प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या पुजारी अभ्यासक्रमातील गुणवंतांना पारितोषिक वितरण चैतन्य महाराजांच्या हस्ते करण्यात आले. शिल्पा पंडित यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.