Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९


लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर. चंद्र आणि मंगळावरील विवरांचा अभ्यास करण्यासाठी ते उपयोगी ठरते आहे. लोणार सरोवराचे महत्त्वच न कळल्याने तेथे येणारे प्रवासी अनेक रीतीने त्याच्या ऱ्हासाला कारण ठरत आहेत. तसेच सरोवराचे जतन करायचे म्हणजे नेमके काय केले पाहिजे, तेच न कळल्याने शासनयंत्रणाही आपापल्या परीने लोणार
 

सरोवर उद्ध्वस्त करण्यात हातभार लावत आहे. लोणार सरोवराचे जतन आणि संरक्षण यासाठी आता ठोस प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यावर प्रकाश टाकणारा लेख-
अवकाशात अनेक आकाशगंगा, तारे, ग्रह, उपग्रह, लघुग्रह, अशनी, कणांच्या स्वरूपातील उल्का इ. वस्तू सातत्याने गतिमान असतात. कधीतरी ते एकमेकांच्या मार्गात येतात आणि त्यांची टक्कर घडून येते. त्या टकरीचा परिणाम त्या वस्तूंचं वस्तुमान, आकार, घडण, वेग व दिशा इ. बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो. अवकाशात फिरणाऱ्या कणांच्या स्वरूपातील उल्का, अशनी वा तत्सम वस्तू पृथ्वीच्या जवळपास आल्यावर पृथ्वीकडे आकर्षित होतात आणि पृथ्वीच्या वातावरणात शिरेपर्यंत त्यांचा वेग सुमारे २५ ते ६० कि.मी. प्रति सेकंद एवढा प्रचंड होतो. उल्का/ अशनी लहान असल्यास प्रचंड वेगामुळे पृथ्वीच्या वातावरणाशी त्याचे घर्षण होऊन मोठी ऊर्जा निर्माण होते. त्या ऊर्जेमुळे ती उल्का/ अशनी जळतो आणि आपल्याला उल्कापाताचे दृश्य दिसते. जेवढी उल्का मोठी, तेवढा जास्त वेळ हे उल्कापाताचे दृश्य आपल्याला दिसते आणि शेवटी राख पृथ्वीवर पडते.
अशनी थोडा मोठा असल्यास तो पूर्ण न जळता काही प्रमाणात त्याचा न जळालेला अंश व त्याची राख पृथ्वीवर पडते. ज्या वेळी अशनीच्या न जळालेल्या भागाची पृथ्वीशी टक्कर होते, त्या वेळी त्याच्या गतिजन्य ऊर्जेचे क्षणात उष्णतेत आणि अन्य प्रकारच्या ऊर्जेत रूपांतर होते. ही ऊर्जा काही शे टन हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या बरोबरीची असते. मुक्त होणाऱ्या या गतिजन्य ऊर्जेमुळे निर्माण होणारी उष्णता आणि अन्य ऊर्जा फारच मोठी असते. परिणामी ज्या ठिकाणी लघुग्रह आदळेल, त्या ठिकाणी मोठा खळगा- विवर (crater) पडणारच. अशा कुठल्याही अतिवेगवान मोठय़ा आकाराच्या व वस्तुमानाच्या वस्तूने आघात केल्यावर ग्रह व उपग्रहांवर पडणाऱ्या खळग्याला Impact crater (आघाती विवर) असे म्हटले जाते. ते साधारण वर्तुळाकार व वाडग्याच्या आकाराचे (Bowl Shaped) असते. त्याची कडा उंचावलेली असते. आघात जास्त मोठा असल्यास एकापेक्षा जास्त वर्तुळाकार कडा तयार होतात. जवळपास ३८० कोटी वर्षांपूर्वी सूर्यमालेतील ग्रह व उपग्रहांवर शेकडो कि.मी. व्यासांची आणि एकापेक्षा जास्त कडा असलेली प्रचंड आघाती विवरे निर्माण होण्याच्या घटना वारंवार घडत असत. ज्या ग्रह व उपग्रहांवर भौगोलिक बदल घडणे काही दशलक्ष वर्षांपूर्वीच थांबलेले आहे, अशा ग्रह/ उपग्रहांवर (उदा. मंगळ, चंद्र इ.) अशी आघाती विवरे स्पष्ट दिसतात.
काही टन वजनाच्या अशनी पृथ्वीवर आदळण्याची घटना सरासरी शंभर वर्षांतून एकदा, तर फूटबॉलच्या आकाराच्या अशनी वर्षांतून बऱ्याच वेळा पृथ्वीवर आदळतात. तुलनेने लहान अशनींची संख्या जास्त आहे. याचा अर्थ पृथ्वीवर निर्माण झालेल्या आघाती विवरांची संख्या जास्त असायला हवी होती; परंतु पृथ्वीवर होणाऱ्या भूखंडांच्या हालचाली, ज्वालामुखींच्या उद्रेकाने होणारे भूकंप, वादळी वारे, जमिनीची धूप व माती एका ठिकाणावरून वाहून जाऊन दुसरीकडे साचणे, इ. कारणांमुळे बरीचशी विवरे पुसली गेली. उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियात ज्या ठिकाणी भूखंड त्यातल्या त्यात स्थिर आहेत, अशा ठिकाणी विमाने आणि उपग्रहांच्या मदतीने जास्तीत जास्त आघाती विवरांचा शोध घेतला गेला आहे.
१९२० साली अमेरिकेतल्या अ‍ॅरिझोना प्रांतात प्रथम अशा आघाती विवराचा शोध तेथे काम करणाऱ्या कामगारांना लागला. त्यांना या ठिकाणी आघाती लघुग्रहाचे अवशेष सापडले. या विवराला ‘बॅरिंजर’ विवर असे नाव आहे. या विवराचा व्यास १.१८६ कि.मी. असून ते साधारणपणे ५० हजार वर्षांंपूर्वीचे असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. आतापर्यंत अशी १७० आघाती विवरे शोधली गेली आहेत, ज्यांचा व्यास काही मीटरपासून ३०० कि.मी.पर्यंत असून, त्यांचे वय दोन अब्ज वर्षे ते काही हजार वर्षे आहे. काही विवरे समुद्रतळाशीही आहेत.
जेव्हा बाहेरील लघुग्रह एखाद्या ग्रह वा उपग्रहाशी टक्कर घेतो, त्यावेळी प्रचंड दाब व उष्णता निर्माण होते. अशा वेळी लघुग्रह पूर्णपणे किंवा अंशत: वितळतो आणि ज्या खडकावर तो आदळतो, त्या खडकालाही वितळवतो आणि त्यात मिसळतो. हजारो वर्षांनंतर बाहेरून आलेल्या लघुग्रहाचे अंश कदाचित नाहीसे होतील, परंतु ज्या खडकावर तो आदळतो, त्या खडकात झालेला रासायनिक बदल आपल्याला सहज ओळखता येतो. लघुग्रह आदळत असताना निर्माण होणाऱ्या प्रचंड दाबाचा आणि उष्णतेचा परिणाम म्हणून आघाती स्थळात बरेच बदल घडून येतात. ज्या भूभागावर लघुग्रह आदळतो, तेथे प्रचंड दाब आणि उष्णतेमुळे काचसदृश पदार्थ Maskelnite निर्माण होतात आणि जवळपासच्या परिसरात विखुरतात. प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगानुसार असे काचसदृश पदार्थ फक्त अशा घटनांमधूनच तयार होऊ शकतात.
लघुग्रहाच्या आघातानंतर होणाऱ्या बदलानुसार आघाती विवरांचे रचनात्मकदृष्टय़ा दोन प्रकार घडतात. एक साधे विवर (simple crater) आणि गुंतागुंतीचे विवर (complex crater). साधी विवरे सहसा लहान आकाराची असतात. मोठय़ा विवरांमध्ये आधी सरळसोट असलेल्या विवराच्या भिंती गुरुत्वाकर्षणामुळे आतल्या बाजूला कोसळून मध्ये उंचवटा किंवा एक रिंगसदृश उंचवटा तयार होतो. ही गुंतागुंतीची रचना ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर अवलंबून असते. जेवढे गुरुत्वाकर्षण जास्त, तेवढा विवराचा व्यास कमी आणि रचना जास्त अवघड/गुंतागुंतीची होत जाते. पृथ्वीवर दोन ते पाच कि.मी. व्यासांच्या विवरांमध्ये अशी रचना आढळून येते. अर्थातच विवराची रचना खडकाच्या प्रकारावरही अवलंबून असते. पृथ्वीच्या जडणघडणीचा इतिहास चांगला समजण्यासाठी आघाती विवरांचा अभ्यास हा फारच मोलाचा ठरतो. कारण अशाच एका लघुग्रहाच्या पृथ्वीशी झालेल्या टकरीतून मोठय़ा प्रमाणावर निर्माण झालेल्या उष्णता, धूळ, भूकंपने इ.मुळे या आधी पृथ्वीवरील जीवसृष्टी डायनासोरसह मोठय़ा प्रमाणावर नष्ट झालेली आहे.
मुंबईपासून ५५० कि.मी., औरंगाबादपासून १६० कि.मी. आणि बुलढाण्यापासून १४० कि.मी. अंतरावर लोणार सरोवर असून ते बुलढाणा जिल्ह्य़ात येते. साधारणपणे ५०-५५ हजार वर्षांपूर्वी अंदाजे ६० मीटर लांब आणि काही दशलक्ष टन वजनाच्या लघुग्रहाने पृथ्वीला दिलेल्या टकरीत ६ ते ७ दशलक्ष टन अणुबॉम्बच्या ऊर्जेएवढी ऊर्जा निर्माण झाली. परिणामी १.८३ कि.मी. व्यासाचे आणि जवळपास १५० मीटर खोलीचे विवर तयार झाले. या विवराचे वैशिष्टय़ म्हणजे बसाल्ट खडकात (अग्निजन्य) निर्माण झालेले हे जगातील सर्वात मोठे आघाती विवर (Impact crater) होय. या विवरातील पाणी वर्षभर खारटच असते. या पाण्याचा सामू (P H) पूर्वी १४ होता, आता तो ९.५ ते १०च्या जवळपास आढळतो. त्या पाण्यात जवळपास ११/१२ विविध प्रकारचे क्षार आढळतात. लोणार येथील सरोवर (विवर) हे एकेकाळी ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झाले असावे, असा समज होता. ‘नासा’सह जगातील बऱ्याच संशोधन संस्थांनी लोणार सरोवराचा आतापर्यंत अभ्यास केलेला आहे आणि भविष्यातही करतील, कारण हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर असून चंद्र आणि मंगळावरील विवरांचा अभ्यास करण्यासाठी ते उपयोगी ठरते आहे.
१८२३ साली सी. जी. अलेक्झांडर या इंग्रज अधिकाऱ्याने लोणार सरोवराचा प्रथम अभ्यास केला. त्यानंतर लोणार सरोवर उपेक्षितच राहिले. १९६५च्या दरम्यान एका वृत्तपत्रीय लेखातून लोकांना थोडीफार माहिती मिळाली. १९७२च्या दरम्यान Smithsonian Institute, Washington DC तसेच GSI, ASI आणि आय.आय.टी. खरगपूर, नासा इ. संस्थांनी केलेल्या संशोधनाअंती लोणार सरोवर हे आघाती विवर असल्याचे सिद्ध केले आणि खऱ्या अर्थाने जगाला लोणार सरोवर परिचित झाले. तेव्हापासून आतापर्यंत असंख्य देशी-विदेशी संस्था आणि व्यक्तींनी संशोधन केलेले आहे.
सरोवरात तसेच गावाच्या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची असंख्य मंदिरे असून त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. विवरात असलेली घनदाट झाडी, मंदिरे इ.मुळे लोणार सरोवराशी आणि परिसराशी वनविभाग, GSI, ASI, लोणार नगर परिषदसारख्या शासकीय संस्थांचा संबंध येतो.
लोणार सरोवरात जमा होणाऱ्या पाण्याचे मुख्यत: तीन स्रोत आहेत- नैसर्गिक पावसाचे पाणी आहे त्या स्थितीत जतन करणे आवश्यक आहे. Ejecta Blanket परिसरात कुठल्याही प्रकारचे बांधकाम केल्यास, माती काढल्यास संशोधनाचे निष्कर्ष चुकू शकतात. लोणार सरोवराच्या काठावर Ejecta Blanket कुठवर पसरलेले आहे, ते शोधून काढून त्या भागात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या त्या ठिकाणी सांडपाणी अडविणे, इमारतींचे बांधकाम करणे, बाजार भरवणे, धार्मिक विधी करणे, तसेच संपूर्ण सरोवर सर्व बाजूंनी फिरून बघता यावे यासाठी डांबरी रस्ता बांधणे, मातीचे खोदकाम करून ती माती अन्य कारणांसाठी वापरणे इ. बऱ्याच बाबी आढळतात. लोणार सरोवराचे महत्त्वच न कळल्याने तसेच सरोवराचे जतन करायचे म्हणजे नेमके काय केले पाहिजे, तेच न कळल्याने शासनयंत्रणाही आपापल्या परीने लोणार सरोवर उद्ध्वस्त करण्यात हातभार लावत आहे.
विवरात सरोवराच्या काठावर कमळजादेवीचे पुरातन मंदिर असून दर वर्षी नवरात्रीत फार मोठी यात्रा भरते. दीड ते पावणेदोन लाख भाविक यात्रेनिमित्त सरोवरात उतरतात. गेल्या वर्षांपर्यंत यात्रेतील दुकाने विवरातच लावली जात होती. परंतु गेल्या वर्षांपासून वनखात्याच्या प्रयत्नाने आणि गावकऱ्यांच्या मदतीने सर्व दुकाने वर लावली जातात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण कमी होणार आहे. तसेच भाविकांनी टाकलेला कचरा शाळाचे महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच लोणार मित्रमंडळाच्या मदतीने गोळा करून विवर परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न वनविभाग करते. यासाठी वनविभागाला धन्यवाद द्यायला हवेत. शक्य झाल्यास Ejecta Blanket च्या बाहेर यात्रा भरवावी आणि भाविकांना फक्त दर्शनासाठी विवरात प्रवेश द्यावा.
या आणि अशा प्रकारच्या सरोवर उद्ध्वस्त करणाऱ्या घटना होऊ नयेत, यासाठी आतापर्यंत बऱ्याच व्यक्ती आणि संस्थांनी प्रयत्न केलेत. त्यांच्या प्रयत्नांना फारच थोडे यश आलेले आहे. लोणार सरोवर जतन करण्यासाठी नेमके काम व्हायला हवे. यासाठी मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग आणि जालना विभागाने येत्या ऑक्टोबरमध्ये लोणार येथेच एक चर्चासत्र आयोजित करण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून ज्या व्यक्ती/संस्थांनी या विषयावर आधी काम केलेले आहे, अशा संस्थांच्या प्रतिनिधींचे छोटे दिवसभराचे चर्चासत्र मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभागातर्फे डॉ. ह. शा. भानुशाली यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच १२ एप्रिल रोजी आयोजित केले होते. या चर्चासत्राचे अनौपचारिक उद्घाटन ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांनी केले. लोणार सरोवर वाचविण्याच्या या मोहिमेत ‘लोकसत्ता’ही आपणा सर्वाबरोबर असेल, असे आश्वासन त्यांनी या वेळी बोलताना दिले.
चर्चासत्राला आलेल्या प्रतिनिधींनी दिवसभरातील चर्चेतून केलेल्या काही उपयुक्त सूचना-
* सर्व प्रकारचा मानवी हस्तक्षेप कमीत कमी कसा होईल, या दृष्टीने सरकारने कार्यवाही करावी. * गावच्या सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते अन्यत्र वळवावे. सरोवरात ते सांडपाणी जाता कामा नये. * गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, जेणेकरून गावकऱ्यांना धारेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार नाही, तसेच धारेवर साबणाचा वापर पूर्णपणे बंद करावा जेणेकरून पाणी प्रदूषण टळेल. * येणाऱ्या पर्यटकांना आघाती विवरांची तसेच पुरातन मंदिरांची माहिती देण्यासाठी कायमस्वरूपी प्रदर्शन असावे तसेच मार्गदर्शक नेमावेत. त्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे. * विवरात उतरण्यासाठी शक्यतो एक किंवा दोन ठिकाणी वाटा असाव्यात. अन्य वाटा बंद कराव्यात, जेणे करून विवरात उतरणाऱ्यांवर नियंत्रण ठेवता येईल. * विवरातील वनात होणारी लाकूडतोड, चोरटी शिकार बंद व्हावी. * एका वेळी किती पर्यटक विवरात उतरावेत, यावर बंधन असावे तसेच सर्व पर्यटकांची नोंद व्हावी. * विवरात असलेल्या मंदिराच्या दगडांची तसेच अशनीच्या आघाताने झालेले बदल दर्शविणारे खडक कुणीही चोरून नेऊ शकणार नाही, यासाठी योग्य ती काळजी घेतली जावी. * ज्या पर्यटकांना विवरात उतरता येणार नाही, अशा सर्वाना वरूनच शक्तिशाली दुर्बिणीच्या सहाय्याने विवर दर्शनाची व्यवस्था व्हावी. * कुठल्याही संदर्भात निर्णय घेताना विवर उद्ध्वस्त होणार नाही, यासाठी समन्वयाची नितांत गरज आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास येणाऱ्या पर्यटकांच्या सोईसाठी नगरपरिषद Ejecta Blanket वरच स्वतंत्र संडास/ मुतारीची व्यवस्था करणार असल्याचे समजते. म्हणजे पुन्हा हेतू चांगला असला तरीही विवर परिसर उद्ध्वस्त होण्यास भर पडणार आहे. असे होता कामा नये. * वरील कारणासाठीच विवर काठावर (Ejecta Blanket वर) असलेल्या बांधकामांची आधी रीतसर नोंद केली जावी. शासकीय/ निमशासकीय इमारतींमधील कार्यालये अन्यत्र हलविली जावीत आणि याच इमारतींमधून पर्यटकांसाठी प्रदर्शनी, संडास/ मुतारी वा तत्सम अन्य सुविधा निर्माण केल्या जाव्यात. स्वतंत्र बांधकाम होऊ नये. तसेच आतापर्यंत जे काही बांधकाम झालेले आहे त्यापुढे नवीन बांधकाम होणार नाही, याची काळजी घेतली जावी. * देशभरातील तसेच लोणार आणि परिसरातील नागरिकांमध्ये लोणार सरोवरासंदर्भात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत. * शाळा, महाविद्यालय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या लोणार दर्शन सहली आयोजित केल्या जाव्यात.
वरील चर्चासत्रात लोणार येथील सुधाकर बुगदाणे हे निवृत्त मुख्याध्यापक उपस्थित होते. आतापर्यंत आलेल्या बहुतेक सर्व संस्था आणि व्यक्तींनी लोणार सरोवराच्या संशोधनासाठी सरांची मदत झालेली आहे. कॅ. सुरेंद्र सुर्वे, डॉ. संजीव नलावडे, डॉ. क्षमा खोब्रागडे, गोविंद खेकाळे, प्रदीप भावठाणकर, डॉ. देशपांडे (जालना), अभिजीत घोरपडे, अ. पां. देशपांडे, (कार्यवाहक मराठी विज्ञान परिषद) राजेंद्र धोंगडे (वन अधिकारी) तसेच ठाणे विभागाचे कार्यकर्ते अरविंद पालकर, दा. दि. दाबके, नंदकुमार रेगे, सूर्यकांत देशमुख, दीपक आठलेकर इ. उपस्थित होते.
मराठी विज्ञान परिषदेचा ठाणे विभाग आणि जालना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षी २, ३ व ४ ऑक्टोबर रोजी लोणार येथेच मोठय़ा चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या चर्चासत्रात इच्छुकांनी अवश्य सहभागी व्हावे.
प्रा. ना. द. मांडगे