माळशिरसमधील ‘त्या’ दोन्ही समाधी शिवरायांच्या कन्या व जावयाच्या
डॉ. लता अकलूजकर यांचा दावा
सोलापूर, १२ मे/ एजाजहुसेन मुजावर
माळशिरस येथील भग्नावस्थेत व अवशेष रूपाने शिल्लक असलेल्या दोन समाधी छत्रपती
शिवाजी महाराजांच्या कन्या सखुबाई आणि जावई महादजी निंबाळकर यांच्या असल्याचा प्राथमिक निष्कर्ष ज्येष्ठ इतिहास संशोधिका प्रा. डॉ. लता अकलूजकर यांनी काढला आहे. याबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे. या दोन्ही समाधींची उपेक्षा थांबवून चांगल्या प्रकारे देखभाल होण्यासाठी आणि मराठय़ांचा इतिहास जतन करण्यासाठी इतिहासप्रेमींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात दै. ‘लोकसत्ता’ ने यापूर्वी प्रकाश टाकून पाठपुरावा केला होता. त्यानंतर इतिहास संशोधकांचे लक्ष गेल्यानंतर त्यातून दोन्ही समाधी कोणाच्या, याबाबत प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. तथापि, आणखी संशोधन झाल्यास मराठय़ांच्या इतिहासावर नवा प्रकाश पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
सतराव्या शतकात छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्र धर्माचे रक्षण केले. तसेच मुस्लिम सत्तेशी धैर्याने आणि धाडसाने टक्करही दिली. छत्रपतींच्या राजकीय आयुष्याची संगतवार माहिती साधनांमधून उपलब्ध आहे. मात्र त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर साधनांअभावी पाहिजे तेवढा प्रकाश पडलेला नाही. अशाच खासगी गोष्टींपैकी छत्रपतींची मुलगी सखुबाई व जावई महादजी निंबाळकर यांच्या सोलापूर जिल्ह्य़ातील माळशिरस या तालुक्याच्या गावी असलेल्या स्मारकावर पुरेसा प्रकाश पडलेला नाही. छत्रपतींना सईबाई यांच्यापासून झालेल्या सखुबाई या मुलीचा विवाह १६५५ सालच्या दरम्यान फलटणचे सरदार बजाजी निंबाळकर यांचा मुलगा महादजी यांच्याबरोबर झाला होता. बजाजी निंबाळकर हे विजापूरच्या आदिलशाहीचे निष्ठावंत सेवक होते. आपली बहीण सईबाईचा विवाह त्यांनी छत्रपतींशी लावून दिला होता. तद्पश्चातही निंबाळकर हे आदिलशाहीच्या दरबारी चाकरी करायचे. १६४८ साली आदिलशहाने शहाजीराजांना कैद करून छत्रपतींवर फतेहखान व फरादखानास पाठविले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत फलटणचे निंबाळकरही स्वराज्यावर चालून आले होते. अफझलखानाच्या स्वारीच्या वेळेसही निंबाळकर हे फारसे मराठय़ांच्या बाजूने नव्हते, असे दिसते. तरीही महाराजांनी खानाच्या सैन्यातील नाईकजी पांढरे यांच्या मार्फत बजाजींना सोडविण्याचे काम केले होते. खानाने बजाजींकडून ६० हजार होन म्हणजे दोन लाख १० हजार रुपये दंड घेतला होता असा उल्लेख आहे. त्यावेळी बजाजींचा मुलगा महादजी व पत्नी सावित्रीने मलवडीचे सावकार जयचंदजी भाई व बबनभाई यांच्याकडून फलटणची देशमुखी गहाण ठेऊन व्याजाच्या पंचोत्री दराने रक्कम उभी केली होती. एवढे करूनही अफझलखान थांबला नाही तर त्याने बजाजीसारख्या तोलदार पुरुषास बाटविले होते. तेव्हा छत्रपतींनी त्यांना शुध्द करून घेतले आणि त्यांचा मुलगा महादजी यास आपली मुलगी सखुबाई दिली. बजाजीस शुध्द करून घेतल्यानंतर हा विवाह झाला होता. सखुबाईस वाल्हे गाव इनाम दिले होते. २७ ऑक्टोबर १६८२ रोजीचा हा उल्लेख ९१ कलमी बखरीत मिळतो.
महाराजांचे हे मेव्हणे बजाजी १६८२ साली मरण पावले. महादजी निंबाळकर हा सुध्दा मोघलांचीच चाकरी करीत होता. त्यास बादरा चारधारा येथे ठाणेदारी दिली होती. त्यास चार हजार जात व तीन हजार स्वारांची मनसब होती. दिलेरखानाकडे शंभूराजे गेल्यानंतर महादजीने त्यांना, ‘तू इकडे का आलास?’ असे विचारले होते. म्हणून संतापाने दिलेरखानाने महादजीस काही दिवस अटकेत ठेवले होते. १६६६ साली छत्रपती शिवराय आग्ऱ्याहून सुटून आल्यानंतर महादजीने आदिलशाहीच्या बाजूने पुण्याजवळ बराच धुमाकूळ घातला होता. तेव्हा मोघलांतर्फे बाबाजी भोसले या सरदाराने महादजीचा पराभव करून त्याचा झेंडा तोडा, १५० घोडे आणि बाण इत्यादी युध्द साहित्य पकडले होते. आदिलशाहीच्या नाशानंतर औरंगजेबाकडे त्याने चाकरी केल्याची माहिती इतिहासात मिळते.
महादजी निंबाळकर व पत्नी सखुबाईची समाधी माळशिरसमध्ये आज मोठी पडझड झाल्याच्या अवस्थेत दिसते. महादजीचा मृत्यू १६७९ मध्ये झाल्याचे बाळशास्त्री हरिदास यांनी म्हटलेले असले तरी महादजी १६८६ नंतरही जिवंत होता, हे औरंगजेबाकडील त्याच्या चाकरीच्या कार्यकालावरून दिसून येते. त्याचा मृत्यू अकलूज येथील मोघल-मराठे संघर्षांत १६८९ च्या आसपास झाला असावा, असे अनुमान बांधता येतो. कारण शंभूराजांच्या हत्येनंतर हा संघर्ष अधिक तीव्र बनला होता आणि ठिकठिकाणी युध्द आघाडय़ा सुरू झाल्या होत्या. महादजींचे कलेवर माळशिरस येथे ओढय़ाच्या काठी पडले होते. त्याच्यावरील अंत्यसंस्काराच्या वेळी पत्नी सखुबाई सती गेली होती. म्हणून याच ठिकाणी दोघांच्या समाधी आजही अस्तित्वात असल्या तरी त्या भग्नावस्थेत अखेरची घटका मोजत आहेत.
या ठिकाणी दोन मराठेकालीन बांधणीच्या लहान इमारती असून एका इमारतीवर घुमटाकृती बांधकाम दिसते. तर शेजारी एक लहान चौकोनी इमारत असून समोर दगडी तुळशी वृंदावन दिसते. या इमारतींच्या शेजारीच एका दगडी शिळेवर कोरलेल्या स्त्री-पुरुषाच्या दोन मानवी आकृती भग्नावस्थेत पडलेल्या आहेत. पती-पत्नीचे अग्निसंस्कार व सती जाणे यानंतर अशा पध्दतीची शिल्पे तयार केली जातात. अशीच स्त्री-पुरुषाची एका शिळेवरील लहान शिल्पे माळशिरसच्या मारुती मंदिरात पाहावयास मिळतात. या सर्व पुराव्याच्या आधारे या दोन्ही समाधी महादजी निंबाळकर व सखुबाई निंबाळकर यांच्या असाव्यात, असे अनुमान काढता येते.
यावर प्रा. डॉ. लता अकलूजकर या अधिक संशोधन करीत आहेत. त्यासाठी समाजाच्या विविध घटकांकडून सहयोग मिळाल्यास मराठेशाहीविषयी विशेषत: मराठय़ांच्या खासगी जीवनाशी संबंधित आणखी नवीन माहिती उजेडात येऊ शकेल, असा विश्वास प्रा. डॉ. अकलूजकर यांनी व्यक्त केला. त्यासाठी इतिहास संशोधक व इतिहासप्रेमींनी पुढे येण्याची गरज आहे. |