Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

सिंधू संस्कृतीच्या चिन्हांतील भाषेवर आंतरराष्ट्रीय मोहर!
रेश्मा जठार

सिंधू संस्कृतीच्या लिपीबाबतचे भारतीय अभ्यासकांचे संशोधन ‘सायन्स’ मासिकात प्रसिद्ध
२००४ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘कोलॅप्स ऑफ द
इंडस-स्क्रिप्ट थिसिस’ संशोधनाला दणदणीत प्रत्युत्तर
जवळजवळ साडेपाच हजार वर्षे सिंधू नदीच्या खोऱ्यात नांदलेल्या संस्कृतीभोवती असलेले

 

गूढरम्य आकर्षण आजही कायम असल्याचे एक कारण म्हणजे, या सिंधू संस्कृतीच्या लिपीचा अर्थ अद्याप आपल्याला लावता आलेला नाही. २००४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनाने तर ही निव्वळ चित्रे असून, त्यात धार्मिक, राजकिय चिन्हे आहेत; अर्थपूर्ण भाषा मात्र नाही, असा निष्कर्ष काढला होता. त्या संशोधनाला आव्हान देणारा निष्कर्ष भारतीय संशोधकांनी प्रसिद्ध केला आहे. सिंधू संस्कृतीच्या लिपीमध्ये निश्चित अशी भाषा असू शकते, असे सांगणारे संशोधन ‘टाटा मूलभूत संशोधन संस्था’ व ‘सेंटर फॉर एक्सेलन्स इन बेसिक सायन्सेस’ या संस्थांतील संशोधकांच्या चमूने प्रसिद्ध केले आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन’, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस, चेन्नई’ आणि ‘इंडस रिसर्च सेंटर’ या संस्थांतील संशोधकांचाही योगदान असलेले हे संशोधन २३ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘सायन्स’ या मासिकाने प्रकाशित केले आहे.
ख्रिस्तपूर्व ७००० ते १५०० या कालावधीत भारतीय उपखंडाच्या पश्चिम भागात नांदलेली सिंधू संस्कृती ही इजिप्शिअन आणि मेसापोटेमिअन संस्कृतीशी समकालीन संस्कृती. इजिप्शिअन व मेसापोटेमिअन संस्कृतीच्या लिपींचा अर्थ लावण्यात संशोधकांना यश आले आहे. या दोन प्राचीन संस्कृतींप्रमाणेच सिंधू संस्कृतीच्या लिपीचा अर्थ लावण्यासाठी शंभरावर प्रयत्न केले गेले आहेत. त्या यादीत १९७०च्या दशकात पद्मश्री ऐरावतम महादेवन यांनी केलेला प्रयत्न उल्लेखनीय ठरतो. याच महादेवन यांनी या चमूला संशोधनासाठी मोलाचे साहाय्य केले. चमूमध्ये प्रा. मयांक वाहिया, निशा यादव, हृषिकेश जोगळेकर, डॉ. रणोजय अधिकारी आणि डॉ. राजेश राव यांचा सहभाग आहे.
सिंधू खोऱ्याच्या उत्खननात सापडलेल्या लहान-मोठय़ा तीन-चार हजार अवशेषांवर ही लिपी कोरलेली आहे. त्यातील स्पष्ट, निरीक्षण करण्याजोग्या अवशेषांची संख्या जेमतेम दीड हजार इतकी आहे. एवढय़ाशा उपलब्ध माहितीवरून लिपीचा अर्थ लावणे, हे मोठे आव्हान आहे. हृषिकेश जोगळेकर यांनी ‘वृत्तान्त’ला दिलेल्या माहितीनुसार, संशोधकांनी सुरुवातीला लिपीचा कोणताही अर्थ गृहित न धरता केवळ संख्याशास्त्राच्या आधारे या लिपीचा अभ्यास सुरू केला. कोणत्याही भाषेच्या लिपीला एक निश्चित ‘पॅटर्न’ असतो. सिंधू संस्कृतीच्या लिपीमध्ये असा ‘पॅटर्न’ आहे का, त्याच्या चिन्हांमध्ये भाषेच्या नियमांशी साधम्र्य आढळते का, हे या चमूने तपासून पाहिले. त्यासाठी त्यांनी संगणक आणि माहितीशास्त्रातील संकल्पनांचाही आधार घेतला. त्यातून पुढे आलेल्या निरीक्षणांच्या आधारे, या लिपीतील चिन्हांमध्ये विशिष्ट रचना आढळत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे ही चिन्हे म्हणजे निव्वळ चित्रे नसून त्यामध्ये काहीतरी भाषा दडलेली असू शकते, असे मत या संशोधकांनी मांडले आहे. संशोधनाच्या पुढच्या टप्प्यात या लिपीतील व्याकरणाची रचना समजून घेण्याचा प्रयत्न हे संशोधक करणार आहेत. सिंधू संस्कृतीच्या लिपीचे गूढ उकलले; तर या संस्कृतीचा उदय, उत्कर्ष आणि ऱ्हास याविषयी आणखी माहिती उपलब्ध होऊ शकेल.