Leading International Marathi News Daily
शनिवार, ३० मे २००९
  निरीक्षकाचे कवडसे
  राजकारणात तिचे पाऊल पुढे पुढे
  पण बोलणर आहे! - चटक
  विज्ञानमयी
  गर्भसंस्कार विशेषांक
  प्रतिसाद
  पर्यावरणरक्षणात पुढाकार
  सूर्यशेगडीशी सोयरीक
  वाळवणी वैविध्य
  काळ सुखाचा - ‘मम्मा, चिंता म्हणजे काय?’’
  चिकन सूप... - पायरी-पायरीने वाटचाल
  'ती'चं मनोगत - स्त्री-जीवनातील वेदनांचं सोलीव दर्शन
  कवितेच्या वाटेवर... - रुक्मिन इचारते देवा जनीचं काय नातं?
  ललित - कुल्फी ते गोळा..
  बरीचशी धरतीची
  दिल से - नौतपा आणि फुहार

 

बरीचशी धरतीची
शांताबाईंचा ८०वा वाढदिवस होता. शांताबाईंच्या घरी त्यांच्या चाहत्यांची गर्दी जमली होती. त्यात मीही होते. गप्पांच्या दरम्यान शांताबाईंनी कविवर्य मर्ढेकरांच्या शब्दांचा मार्मिक वापर केला नि म्हटलं, ‘‘मी ऐंशी गोड हिवाळे अनुभवले आहेत!’’.. आता मात्र त्यांच्या चाहत्यांसाठी अनेक आठवणींची ऊबच मागे उरली आहे..
शांताबाई स. प. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या. स. प. महाविद्यालय आणि माटेमास्तर (श्री. म. माटे) यांच्याविषयी त्यांना जिव्हाळा होता. स. प. महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाच्या एका कार्यक्रमासाठी त्यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आणण्याच्या निमित्ताने माझी त्यांच्याशी ओळख झाली. ती ओळख खरं तर औपचारिक स्वरूपाची होती, पण शांताबाईंचं व्यक्तिमत्त्व इतकं अनौपचारिक होतं की, ती ओळख पुढेही टिकून राहिली. त्यानंतर उत्कर्ष प्रकाशनच्या ‘कविता विसाव्या शतकाची’ (२०००) या पुस्तकाच्या संपादनाच्या निमित्ताने आमच्या वारंवार भेटी होऊ लागल्या आणि

 

ओळखीचे रूपांतर आपुलकीच्या नात्यामध्ये झाले. त्यांना संपादकीय बैठकीसाठी आणण्या-नेण्याची जबाबदारी माझ्याकडे आल्यामुळे त्यांचा सहवास मला जास्त प्रमाणात मिळाला. माझ्यासाठी तो कामाचा आनंददायी ‘बोनस’ होता.
आमच्या संपादकीय बैठकीमध्ये शांताबाईंच्या अद्भुत अशा पाठांतरशक्तीचं दर्शन सर्वाना होत असे. जुन्या कवीच्या एखाद्या महत्त्वाच्या कवितेचा उल्लेख झाला की, त्या कवितेतल्या दोन-चार ओळी म्हणून दाखवल्याशिवाय शांताबाईंना चैनच पडत नसे. केवळ जुन्या पिढीतील कवींच्याच नव्हे, तर आजच्या पिढीतील कवींच्या कविताही त्यांना मुखोद्गत होत्या. कविता महाजन यांची ‘ओंजळ’ ही कविता मी शांताबाईंच्या तोंडूनच पहिल्यांदा ऐकली. आपल्याकडील मौखिक परंपरेचं सत्त्व शांताबाईंनी खऱ्या अर्थाने आत्मसात केलं होते.
कविवर्य माधव ज्युलियन आणि रविकिरण मंडळ यांच्या कवितांचा फार मोठा प्रभाव शांताबाईंवर त्यांच्या संवेदनक्षम वयात पडलेला होता. ‘या मंडळीभोवती एक सोनेरी गुलाबी धुसर वलय असल्यासारखं वाटे’, असं त्यांनी लिहून ठेवलं आहे. काव्य लोकाभिमुख करण्याची मंडळाची धडपड त्यांना पटली होती. शांताबाईंनी मंडळाची काव्यगायनाची पद्धती स्वीकारली नाही, पण मूळची काव्यपठण पंरपरा आणि त्या माध्यमातून कवितेचा लोकांशी जुळणारा संवाद त्यांना महत्त्वाचा वाटत राहिला. रविकिरण मंडळाची एक ठळक खूण म्हणजे मंडळाने लेखनात अनुस्वाराऐवजी केलेला परसवर्णाचा वापर! शांताबाई आपले नाव कधीही ‘शांता’ असे लिहीत नसत. त्या आपले नाव ‘शान्ता’ असेच लिहीत. रविकिरण मंडळाच्या प्रभावाची ही खूण त्यांच्या नावात जणू एकरूप झाली होती.
शांताबाईंची अनेक रूपं जशीच्या तशी आजही डोळ्यांसमोर येतात. पुस्तकांना कव्हरं घालण्यात शाळकरी मुलीच्या उत्साहाने रमलेल्या शांताबाई, चालताना वाटेत एखादं सुंदर फूल दिसल्यावर जवळ जाऊन त्याचं मन भरून कौतुक करणाऱ्या शांताबाई, वि. ल. बरवे (कवी आनंद) यांची ‘मुचकुंद दरी’ ही कादंबरी वाचायचीच राहिली, म्हणून खंत व्यक्त करणाऱ्या शांताबाई, एखाद्या भाबडय़ा रसिकाची गंमत सांगताना मिस्कीलपणे हसणाऱ्या शांताबाई, स्त्रीसुलभ चौकसपणानं साडीचा पोत पारखणाऱ्या शांताबाई, पं. हृदयनाथ मंगेशकरांची एखादी कठीण चाल पुन्हा ऐकण्यासाठी आपण ‘चाल कळली नाही’ असा अडाणीपणाचा आव कसा आणत असू, हे खटय़ाळपणे सांगणाऱ्या शांताबाई आणि मुख्य म्हणजे सदैव कवितेसह जगणाऱ्या शांताबाई!
शांताबाईंना चालायला त्रास व्हायचा. तेव्हा स्वत:च स्वत:ला हसत त्या पटकन म्हणायच्या, ‘‘अगं, रामदासांनी नाही का म्हटलं-
‘त्रिखंड हिंडलो आता, घराचा उंबरा मोठा’
तसं माझं झालं आहे!’’
स्वत:च्या सगळ्या भावभावनांना अनुरूप अशा ओळी त्यांच्यासाठी हात जोडून तयार असत. त्या सुमारास शांताबाई ‘स्मरणातल्या कविता’ हे सदर ‘अंतर्नाद’ मासिकासाठी लिहित होत्या. समुद्राची जशी अखंड गाज चालू असते, तशी त्यांच्या मनात कवितेची अखंड गाज चालू असे.’
खरं तर कवितेबाबत जुने-नवे असे कप्पेच त्यांच्या मनात नव्हते. जुन्यातलं जे अर्थपूर्ण होतं, ते त्यांनी आपलंसं केलं होतं आणि आपल्याला झेपेल तितकं नवीनही स्वीकारलं होतं. रविकिरण मंडळ, नवकाव्य, साठोत्तरी काव्य असे काव्याचे टप्पे त्यांनी पाहिले, अनुभवले आणि प्राध्यापक या नात्याने अभ्यासलेही. त्यांची वाङ्मयीन भूमिका लवचिक, सर्वसमावेशक अशीच राहिली. आपल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणातही त्यांनी ‘रसिकतेची साधना’ या विषयावर बोलताना हीच भूमिका मांडली.
शांताबाईंनी वरवर विरोधी वाटणाऱ्या अनेक गोष्टी एकत्र आणून दाखवल्या होत्या. त्यांनी जुन्या ढंगाची वृत्तबद्ध कविता लिहिली. गझल, सुनीत या प्रकारची कविता लिहिली आणि नव्या मुक्तशैलीतली कविताही लिहिली. सर्वाना सहज समजेल असं लिहिणं, हे फार अवघड असतं. ते काम तर त्यांनी आयुष्यभर केलं. कविता आणि गीत यांच्यात विरोधाची भिंत उभी करता येणार नाही, हे त्यांनी दाखवून दिलं. कुशाग्र बुद्धिमत्ता असूनही त्यांनी स्वत:ला ‘सर्वसामान्यांची लेखिका’ मानणं पसंत केलं. व्यावसायिक लेखक आणि कलावंत यातली दरी कमी केली. खूप नावलौकिक मिळूनही त्यांच्यातला साधेपणा गळून गेला नाही. त्यांची कविता अंतर्मुख आणि बहिर्मुख अशा दोन्ही टोकाचे अनुभव व्यक्त करत राहिली. वास्तविक त्या अनेकांशी स्नेहाचे नाते मनाने टिकवून होत्या, तरीही एकाकीपणाचा अनुभव त्यांच्या कवितेतून वजा झाला नाही. त्यांची गाणी लोकांना मोठय़ा प्रमाणावर एकीकडे रिझवत राहिली आणि तरीही ‘‘त्वचेमागील एकाकीपण कधी सरते काय?’’ असा जिव्हारी झोंबणारा प्रश्न त्या कवितेतून विचारत राहिल्या.
शांताबाईंना हे सारं साधलं, कारण त्यांचं व्यक्तिमत्त्व समृद्ध होतं. त्यांचा व्यासंग दांडगा होता. प्रसंगी ढोरमेहनत घेण्यात त्यांनी कमीपणा मानला नाही. त्यांचं निरीक्षण मार्मिक होतं. मनाची रसिक वृत्ती टवटवीत होती. स्मरणशक्ती लख्ख होती. त्यांच्याकडे अशी आंतरिक समृद्धी होती. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या शंभराहून अधिक आहे. अखेपर्यंत त्या लेखनात व्यग्र होत्या. भासाच्या ‘अविमारक’ या संस्कृत नाटकाचा त्या अनुवाद करीत होत्या. ते काम अपूर्ण राहिलं. त्या आधी त्यांनी ‘सुवर्णमुद्रा’ हे अवतरणं- विनोद इत्यादींच्या संकलनाचं पुस्तक प्रसिद्ध केलं होतं. तेव्हा असं आणखीही एक पुस्तक होईल. त्याचं नाव मी ‘नक्षत्रचित्र’ ठेवणार आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. तेही काम अपुरं राहिलं. ‘आपण एक मोठय़ा लेखिका आहोत’, हे दडपण त्यांच्यावर नसे. त्यामुळेच स्वतंत्र लेखन, संपादन, अनुवाद याबरोबरच काहीसं दुय्यम स्वरूपाचं संकलनाचं कामही त्या हौसेने अगदी रमतगमत करीत राहिल्या.
शांताबाईंजवळ माहितीचा खजिनाच असे. कसलीही पांडित्याची ऐट न बाळगता त्या तो खजिना खुला करीत असत. अनेक शब्दांच्या मूळ कथा ऐकवत. (‘ससेमिरा’ या शब्दामागे एक कथा आहे हे त्यांनीच गप्पांमध्ये सांगितलं.) त्यांचं साधं बोलणंही भाषेच्या नाना कळा उलगडून दाखवणारं असे. एकदा फोनवर बोलताना त्यांनी मला सांगितलं होतं.. ‘‘आपण ‘तळ्यात-मळ्यात’ म्हणतो ना, तसं गावाकडच्या बायका म्हणतात- ‘दही खाऊ की मही खाऊ?’ अगं मही म्हणजे लोणी- ‘मथित’वरून ‘मही’ हा शब्द तयार झाला आहे!’’
मी शांताबाईंना गमतीनं म्हणत असे, ‘‘शांताबाई, तुमच्याकडून जाताना खरंच बहुश्रुत व्हायला होतं!’’ खरं तर शांताबाईंवरही ‘ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी’सारखा एखादा ग्रंथ व्हायला हवा होता. त्यांच्याकडे माहितीचा भरपूर साठा होता. कारण कुतूहल हा त्यांचा स्थायिभाव होता. त्यांच्यातल्या कुतूहलामुळेच त्यांचं ललितलेखनही सहजसुंदर होत असे.
शांताबाईंनी विविध वाङ्मयप्रकार हाताळले. पण त्यांची मुख्य ओळख एक ‘कवयित्री’ अशीच राहील. सुरुवातीला वर्णनात रमणारी त्यांची कविता पुढे पुढे अंतर्मुख होत गेली. ‘गोंदण’, ‘जन्मजान्हवी’ हे त्यांचे संग्रह फार महत्त्वाचे आहेत. त्या म्हणत की, कविता ही ‘बहुरूपिणी’ आहे. शांताबाईंनी कवितेची अनेक रूपे आपलीशी केली. भावगीते, बालगीते, कोळीगीते, लावण्या, चित्रपटगीते- अशी तऱ्हेतऱ्हेची गीते लिहिली. त्यांची गाणी आबालवृद्धांच्या ओठी राहतील, अशी आहेत. त्याशिवाय चिनी कविता, जपानी हायकू, संस्कृत सुभाषिते यांचा अनुवादही त्यांनी केला. त्यांनी अनेक पिढय़ांवर सौंदर्यवादी जाणिवांचे संस्कार केले. आयुष्याच्या प्रवासात त्यांना कविता ही आपली ‘सखी’ वाटली. ‘किनारे मनाचे’ या संग्रहाच्या अर्पणपत्रिकेत त्यांनी म्हटलं आहे.
‘कविता या सुंदर आणि चैतन्यपूर्ण सखीला- तिनं मला सहवास, आनंद आणि सांत्वन दिलं.’’
शांताबाईंनी एका कवितेत म्हटलं आहे-
‘‘अशी ती सदाची, भरतीची, परतीची
काही आभाळाची, बरीचशी धरतीची’’
शांताबाईंना आभाळाची- स्वप्नांची- ओढ होती, हे खरं! पण त्याहीपेक्षा सहज साधेपणा आणि रसरशीत जीवनप्रेम ही मातीची वैशिष्टय़ं त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटली होती. त्यामुळे ‘बरीचशी धरतीची’ हे त्याचं वर्णन त्यांना शब्दश: लागू पडतं!
डॉ. नीलिमा गुंडी
neelima.gundi@gmail.com