Leading International Marathi News Daily

सोमवार , २२ जून २००९

(सविस्तर वृत्त)

प्रश्नमाणिक प्रयत्न आणि आशयघनता रसिक स्वीकारतातच
आयुष्यावर बोलू काही ५००
संदीप खरे,पुणे, २१ जून / प्रतिनिधी

प्रश्नमाणिक प्रयत्न आणि आशयघनता असलेला कार्यक्रम रसिक स्वीकारतातच, असे प्रतिपादन तरुण कवी संदीप खरे यांनी केले. ‘आयुष्यावर बोलू काही’ या कवितांच्या कार्यक्रमाने पाचशे प्रयोगाचा टप्पा गाठला (२३ जून) आहे. या पाश्र्वभूमीवर त्याच्याशी बोलताना तो म्हणाला, या

 

कार्यक्रमाच्या निमित्ताने लिहिलेलं वेगळं गीत आम्ही सादर करणार आहोत.
संगीतकार सलील कुलकर्णी आणि कवी संदीप खरे यांनी २००३ मध्ये म्हणजे सहा वर्षापूर्वी ऑगस्ट महिन्यात पुण्यात ‘आयुष्यावर बोलू काही’चा प्रयोग केला. त्या प्रवासाबद्दल सांगताना संदीप म्हणाला, सुरुवातीला आम्ही एक वेगळा प्रयोग म्हणून हा कार्यक्रम केला. आम्हाला दोघांनाही त्यामध्ये गंमत वाटत होती. सुरुवातीच्या २५-३० प्रयोगांनंतरच हा कार्यक्रम स्वीकारला जातोय याची जाणीव झाली. एस. एम. जोशी सभागृह, भरत, बालगंधर्व असे टप्पे पार करत शंभरावा प्रयोग नाही. थेट गणेश कला क्रीडा मंच येथे केला. हाऊसफुल असा तो कार्यक्रम या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा होता. दरवेळी कार्यक्रम संपताना इतक्या गाण्यांच्या फर्माइश अपुऱ्या राहिल्याचे जाणवे, त्यामुळे आम्ही सहा तासांचा कार्यक्रम केला. केवळ कवितांचा कार्यक्रम सहा तास स्वीकारला जाईल की नाही याबाबत साशंकता होती पण रसिकांनी हा प्रयोगही स्वीकारला. त्यानंतर ‘आयुष्यावर बोलू काही’च्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर म्हणजे २५० वा, ३०० वा प्रयोग अशा टप्प्यावर असे सहा तासांचे कार्यक्रम केले. ४९९ वा प्रयोगही आम्ही सहा तासांचा केला होता.
एका आजीबाईंनी तुमच्या कार्यक्रमामुळे आमच्या घरातील तरुण मुले मराठी कविता आवर्जून वाचू लागली, अशी प्रतिक्रिया नोंदवली होती. ही प्रतिक्रिया आमच्या दृष्टीने संस्मरणीय अशी आहे. संदीप खरे याने आवर्जून सांगितले.
परदेशातील कार्यक्रमांविषयी सांगताना संदीप म्हणाला, पुण्या-मुंबईसारखाच उत्तम प्रेक्षक तेथे असतो. आमच्या सीडी, कवितांची पुस्तके त्यांनी वाचलेली असतात. त्यामुळे तेथेही उत्तम दाद मिळते. संदीप आणि सलील मधील उत्तम समन्वयाबद्दल विचारल्यावर संदीप सांगतो, कोणत्याही गीतकार आणि संगीतकाराकडून एखादे गीत सादर होताना दोघांची प्रतिभा यात दिसली पाहिजे. कवीने दिलेल्या गीताला केवळ चाल लावून ती संगीतकाराने सादर केली असे होता कामा नये. संगीतकाराने त्या गाण्याचे सादरीकरण करताना त्याला ते गाणे कसे भावले तसे सादर केले पाहिजे.
संगीतकाराकडून त्या कवितेचे सादरीकरण कवितेचा आशय पुढे नेणारे असले पाहिजे. सलील आणि माझ्यात असाच उत्तम समन्वय आहे. आम्ही ज्या साधेपणाने, प्रश्नमाणिकपणाने जो प्रयत्न करतो त्यामुळेच या कार्यक्रमाने हा टप्पा गाठला आहे.
आमच्या या कार्यक्रमात दरवेळी नवीन नवीन गाणी समाविष्ट होत असतात. त्यामुळे पहिल्या कार्यक्रमातील १० ते १२ कविता आता कायम आहेत. नवनवीन कवितांची यात भर पडत असल्याने या कार्यक्रमाचा प्रत्येक प्रयोग वेगळाच असतो. या कार्यक्रमात या वेळी आम्ही बेला शेंडे हिने गायलेला जो ‘हृदयामधील गाणी’ हा नवा अल्बम येतोय त्यातील काही गाणी ती सादर करणार आहे. सुनील बर्वे देखील सहभागी होतोय असे त्याने सांगितले. केवळ कवितांवर आधारित या कार्यक्रमाचे सर्वात मोठे यश म्हणजे तरुण पिढी अशा कार्यक्रमांकडे वळली. ज्याप्रमाणे चंद्रशेखर गोखले यांचा ‘मी माझा’ हा काव्यसंग्रह तरुणांमध्ये तुफान लोकप्रिय झाला होता. तसाच निव्वळ कवितांचा हा कार्यक्रम तरुणांकडून उचलला गेला. अवघ्या सहा वर्षात त्यामुळेच पाचशेवा कार्यक्रम होत आहे.
विविध चित्रपट, सिरियल यामध्ये हे दोघेही कलावंत बिझी आहेत. केवळ देशातच नाही परदेशातही या कार्यक्रमाचे मोठय़ा संख्येने प्रयोग झाले.
एकटय़ा अमेरिकेतच ३१ शहरांमध्ये हा कार्यक्रम झाला. इंग्लंड, सिंगापूर, थायलंड, दुबई, कुवेत, कतार आदी दहा देशांमध्ये हा कार्यक्रम सादर झाला आहे. आजच्या तरुण पिढीला साहित्याची आवड नाही, कविता कोणी ऐकत नाही हे सारे समज या कार्यक्रमाचे खोटे ठरविले आहेत.