Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

नाटककार महेश एलकुंचवार यांना प्रतिष्ठेचा नागभूषण सन्मान
नागपूर, २४ जून / प्रतिनिधी

 

भारतीय नाटय़सृष्टीवर सर्जनशील लेखनाची छाप उमटवणारे नामवंत नाटककार आणि प्रतिभावंत साहित्यिक महेश एलकुंचवार यांना प्रतिष्ठेचा नागभूषण सन्मान जाहीर झाला आहे. नागपूर शहराच्या स्थापनेला ३०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्थापन करण्यात आलेल्या नागभूषण अ‍ॅवॉर्ड फाऊंडेशनच्या वतीने वैदर्भीय गुणवंताला हा सन्मान प्रदान करण्यात येतो. या सन्मानाचे हे सातवे वर्ष असून १ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह आणि शाल श्रीफळ असे या नागभूषण सन्मानाचे स्वरूप आहे.
त्रिधारा या नाटय़ प्रकाराने मराठी नाटकाला जागतिक पातळीवर एक वेगळा आयाम मिळवून देणारे प्रयोगशील नाटककार म्हणून महेश एलकुंचवार परिचित आहेत. वाडा चिरेबंदी, भग्न तळ्याकाठी, युगांत, गाबरे यासारख्या प्रसिद्ध नाटकाचे लेखन करून क्रांती घडवून आणणाऱ्या महेश एलकुंचवार यांचे नाव या पुरस्कासाठी सर्वानुमते ठरवण्यात आले. नागभूषण अ‍ॅवॉर्ड फाऊंडेशनचे सचिव गिरीश गांधी यांनी आज येथे् एका पत्रपरिषदेत या सन्मानाची घोषणा केली. राज्य सरकारने १९८७ मध्ये ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाला उत्कृष्ट नाटक म्हणून सन्मानित केले. ‘आत्मकथा’ या त्यांच्या नाटकाला १९८९ मध्ये अखिल भारतीय नाटय़ परिषदेतर्फे पुरस्कार मिळाला. सवरेत्कृष्ट साहित्यासाठी दिला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ‘युगांत’ या नाटकाला देण्यात आला. १९९४ मध्ये संगीत नाटक अकादमीचा २००३ मध्ये अत्यंत मानाचा असा ‘सरस्वती सन्मान’, २००४ मध्ये साहित्य अकादमीचा व २००८ मध्ये पु.ल देशपांडे यांच्या नावाने देण्यात येणारा ‘पुलोत्सव सन्मान’ त्यांना मिळाला. रुद्रवर्षां, वासनाकांड, पार्टी, वाडा चिरेबंदी, भग्न तळ्याकाठी, गाबरे, सुलतान (एकांकिका संग्रह) ही एलकुंचवारांची गाजलेली नाटके आहेत. आत्मकथा, पार्टी, प्रतिबिंब, रक्तपुष्प, वाडा चिरेबंदी या नाटकांचे हिंदी भाषेत तर ,यातील काही नाटकांचे बंगाली भाषेतही अनुवाद झाले आहेत. १९६८ मध्ये ‘रुद्रवर्षां’ या त्यांच्या पहिल्या नाटकाचा प्रयोग धनवटे रंगमंदिरमध्ये सादर करण्यात आला होता. ‘मौनराग’ या त्यांच्या ललित लेखसंग्रहाने मराठी ललित लेखनाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आणि प्रतिभावंत साहित्यिक म्हणून महेश एलकुंचवार यांना मान्यता मिळाली. पत्रकार बाळ कुळकर्णी, नाटय़कलावंत किशोर आयलवार व कवी लोकनाथ यशवंत या निवड समितीने एलकुंचवार यांची या सन्मानासाठी निवड केली आहे.
या वर्षीपासून युवा नागभूषण पुरस्कार
वेगवेगळ्या क्षेत्रात युवकांची कामगिरी बघता फाऊंडेशनच्या वतीने यावर्षीपासून युवा नागभूषण पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. विदर्भातील ज्या बालकाने किंवा युवकाने कोणत्याही क्षेत्रात भरीव कामगिरी केली असेल त्याला ५१ हजार रुपयांचा पुरस्कार देण्याचे फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी निश्चित केले आहे. या पुरस्कारासाठी वयाची मर्यादा नाही. मात्र, युवकाचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त असू नये, असेही गिरीश गांधी म्हणाले.