03 August 2020

News Flash

अनुकंपा

प्रेम हा लैंगिक भावना आणि अनुकंपेची भावना या दोहोंतला मध्यममार्ग आहे.  

प्रतिनिधिक छायाचित्र

उपचारात्मक असं काही असेल तर ती केवळ अनुकंपा आहे, कारण माणसात जे जे विकार असतात ते ते केवळ प्रेमाच्या अभावामुळे असतात. माणसाच्या आयुष्यात जे काही चुकीचं असतं, ते कुठे ना कुठे तरी प्रेमाशी निगडित असतं. त्याच्यात प्रेम करण्याची क्षमता नसते किंवा त्याच्यात प्रेम स्वीकारण्याची क्षमता नसते. तो त्याचं अस्तित्व वाटून घेऊ शकत नाही. तेच दु:ख असतं. त्यामुळेच आतमध्ये सगळ्या प्रकारचे गंड निर्माण होतात.

या आतल्या जखमा कितीतरी वाटांनी वर येतात. त्यांच्या शारीरिक व्याधी होतात, त्या मानसिक आजारांचं रूप घेतात- पण हा प्रेमाचा अभाव माणूस खोलवर सहन करत राहतो. यावेळी अनुकंपा ही उपचारांसारखी ठरते. अनुकंपा म्हणजे काय? तर अनुकंपा हा प्रेमाचं सर्वात शुद्ध रूप आहे. लैंगिक संबंध हे झालं प्रेमाचं सर्वात खालच्या पातळीवरचं स्वरूप, तर अनुकंपा म्हणजे प्रेमाचं सर्वोच्च स्वरूप. लैंगिक संबंधांमध्ये संपर्क हा मुळात शारीरिक असतो, तर अनुकंपेच्या भावनेत तो मुळात आध्यात्मिक स्वरूपाचा असतो. प्रेमामध्ये अनुकंपा आणि लैंगिक भावना या दोहोंचं मिश्रण असतं. प्रेम हा लैंगिक भावना आणि अनुकंपेची भावना या दोहोंतला मध्यममार्ग आहे.

तुम्ही अनुकंपेच्या भावनेला प्रार्थना किंवा भक्ती म्हणू शकता. तुम्ही अनुकंपेला ध्यानधारणाही म्हणू शकता. ऊर्जेचं सर्वोच्च स्वरूप म्हणजे अनुकंपा. अनुकंपेसाठी असलेला इंग्रजी शब्द फार सुंदर आहे- कम्पॅशन. या शब्दाचा अर्धा भाग केला तर तो आहे पॅशन. पॅशन किंवा उत्कटतेची भावना इतकी शुद्ध केली की त्यात उत्कटता अशी राहिलीच नाही. ती झाली अनुकंपा.

अनुकंपेच्या भावनेत तुम्ही केवळ देता. प्रेमात तुम्ही कृतज्ञ असता, कारण कोणीतरी तुम्हाला काही दिलेलं असतं. अनुकंपेत तुम्ही कृतज्ञ असता, कारण कोणीतरी तुमच्याकडून काहीतरी स्वीकारलेलं असतं; तुम्ही कृतज्ञ असता, कारण समोरच्याने तुम्हाला नाकारलं नाही. तुम्ही देण्यासाठी खूप ऊर्जा घेऊन आला होतात, तुम्ही वाटून घेण्यासाठी खूप फुलं घेऊन आला होतात आणि समोरच्याने तुम्हाला ते देण्याची परवानगी दिली, ते ग्रहण करण्याची क्षमता त्याच्यात होती. समोरच्याकडे ग्रहण करण्याची क्षमता होती म्हणून तुमच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे.

अनुकंपा हे प्रेमाचं सर्वोच्च स्वरूप आहे. आयुष्यातली सर्वात मोठी यातना होते ती तुम्ही काही व्यक्त करू शकत नाही तेव्हा, तुम्ही संवाद साधू शकत नाही तेव्हा, तुम्ही काही वाटून घेऊ  शकत नाही तेव्हा. ज्या माणसाकडे वाटून घेण्यासारखं काहीच नाही किंवा ज्याची वाटून घेण्याची क्षमताच नाहीशी झाली आहे, तो सर्वात दरिद्री माणूस. आपल्याकडे जे आहे ते वाटून घेण्याची कला ज्याच्याकडे नाही, तो सर्वात गरीब माणूस.

लैंगिक भावनेने प्रेरित माणूस हा खूपच दरिद्री असतो. प्रेमाने प्रेरित माणूस तुलनेने श्रीमंत म्हणावा लागेल. तर अनुकंपेने प्रेरित माणूस हा सर्वात समृद्ध. तो जगातल्या सर्वोच्च स्थानावर असतो. त्याला कोणतेही निर्बंध नाहीत, कोणतीही मर्यादा नाही. तो केवळ देतो आणि आपल्या मार्गाने पुढे जातो. तो तुम्ही त्याचे आभार मानण्याचीही वाट बघत थांबत नाही. अमाप प्रेमाने तो त्याच्याजवळची ऊर्जा वाटून घेत राहतो.

मी उपचारात्मक म्हणतो ते याच गोष्टीला.

तुमच्यात अनुकंपा जागी होत नाही, तोपर्यंत तुम्ही योग्य रीतीने जगत आहात असं मला वाटत नाही किंवा तुम्ही जगलाच नाहीत तोपर्यंत. अनुकंपा म्हणजे फुलत जाणं. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीत अनुकंपा जागी होते, लक्षावधी लोक त्या अनुकंपेच्या उपचाराने बरे होतात. अनुकंपा जागी झालेल्या माणसाच्या सहवासात जे येतात, ते सगळे बरे होतात. अनुकंपा उपाचारात्मक आहे.

ओशो, ए सडन क्लॅश ऑफ थंडर, टॉक #८

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2018 1:01 am

Web Title: article by osho from book a sudden clash of thunder
Next Stories
1 अंत:स्थ संपदा हाच स्वर्ग
2 स्वत:ला समजून घेणं..
3 चांगला की वाईट?
Just Now!
X