24 November 2020

News Flash

जाणीव नावाची मासोळी

तुम्ही म्हणजे मन नाही, पण तुम्ही मनाशी इतकं तादात्म्य पावता की तुम्हाला वाटत राहातं तुम्ही त्यातच आहात!

मला सारखी भीती वाटते, चिंता वाटते की माझं काहीतरी वाईट होईल.

एक मूलभूत बाब समजून घेतली पाहिजे. तुम्ही म्हणजे मन नाही- मनाची तेजस्वी बाजूही नाही किंवा अंधारी बाजूही नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीच्या सुंदर भागाशी तादात्म्य पावत असाल, तर त्या गोष्टीच्या कुरूप भागापासून स्वत:ला दूर ठेवणंही अशक्य आहे. तुम्हाला ती गोष्ट एकतर संपूर्ण मिळेल किंवा संपूर्ण दूर फेकावी लागेल, तुम्ही तिचे भाग करू शकत नाही.

मानवाला सतावणाऱ्या सगळ्या चिंतांचं मूळ हेच आहे. त्याला सुंदर, तेजस्वी निवडायचं असतं; त्याला काळा ढग बाजूला ठेवून नुसती त्याची रुपेरी किनार हवी असते. पण काळ्या ढगावाचून रुपेरी किनारीला काही अस्तित्वच नाही, हे त्याला कळत नसतं. काळ्या ढगाची पाश्र्वभूमी नसेल तर रुपेरी किनार दिसणारच नाही.

निवड म्हणजेच चिंता.

निवड करण्यातूनच सगळी संकट उभी राहतात. मन असतं आणि त्याला काळोखी आणि प्रकाशमान अशा दोन्ही बाजू असतात- मग काय झालं? तुम्हाला काय फरक पडतो? तुम्ही त्याची चिंता का करावी?

तुम्ही ज्या क्षणाला निवडणं थांबवता, सगळ्या चिंता नाहीशा होतात. एक उदात्त स्वीकार निर्माण होतो. तो सांगतो की मन असंच असायला हवं, हाच तर मनाचा स्वभाव आहे- आणि ती तुमची समस्या नाही, कारण तुम्ही म्हणजे मन नव्हे. जर तुम्ही म्हणजे तुमचं मन असता, तर मग काहीच समस्या आली नसती. मग निवड कोणी केली असती आणि पुढे जाण्याचा विचार कोणी केला असता? आणि कोणी स्वीकारण्याचा किंवा स्वीकार समजून घेण्याचा प्रयत्न केला असता?

तुम्ही बाजूला होता, पूर्णपणे अलग.

तुम्ही फक्त एक साक्षीदार होता. दुसरं काही नाही. सध्या तुम्ही असे निरीक्षक आहात, जो जे आनंददायी भासेल त्याच्याशी तादात्म्य पावतो आणि या आनंदाच्या पाठीमागे काहीतरी अप्रिय सावलीसारखे दबा धरून आहे हे विसरतो. आनंददायी भागाचा तुम्ही आनंद लुटता. दुसरा ध्रुव समोर आला की समस्या येते- मग तुम्ही मोडून पडता.

पण या संपूर्ण संकटाला आमंत्रण तुम्हीच तर दिलं. केवळ साक्षीदार होणं सोडून तुम्ही तादात्म्य पावलात.  हे खरं पतन आहे- साक्षीदाराच्या भूमिकेतून बाहेर पडून कशाशी तरी तादात्म्य पावणं आणि यात साक्षीदार असणं हरवून बसणं.

एकदा प्रयत्न करून बघा : मनाला काय वाटेल ते होऊ द्या. लक्षात ठेवा, तुम्ही म्हणजे मन नाही. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तुम्ही जसजसे तटस्थ होत जाता, तसतसं मनाचं वर्चस्व कमी होत जातं. कारण, त्याला शक्ती मिळते ती तुमच्या तादात्म्यीकरणातूनच; ते तुमचं रक्त शोषतं. पण जेव्हा तुम्ही तटस्थ आणि दूर उभे राहता, तेव्हा या मनाचं वर्चस्व कमी होत जातं. तुम्ही ज्या दिवशी मनापासून पूर्णपणे वेगळे व्हाल, मग ते एका क्षणापुरतं का असेना, तुम्हाला साक्षात्कार होईल; मन पूर्णपणे नाहीसं होईल; ते उरणारच नाही. जिथे ते पूर्ण भरात होतं, ते सतत-दिवसरात्र, झोपेत, जागेपणी होतं- ते आता अचानक तिथे नाहीये. तुम्ही भोवताली बघा, तुम्हाला रितेपणा जाणवेल, तिथे काहीच नसेल.

आणि मनासोबत ‘स्व’ही नाहीसा होतो. आता तिथे फक्त जाणीव हाच गुणधर्म उरतो, त्यात ‘मी’ नाही. तिथे केवळ एक अस्तित्वाची जाणीव आहे. अर्थात कोणाचं तरी अस्तित्व आहे हे तुम्हाला ज्या क्षणी कळतं, त्या क्षणी ते वैश्विक होऊन जातं.

मनासोबत स्व नाहीसा होतो आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या आणि त्रासदायकही असलेल्या आणखीही बऱ्याच गोष्टी नाहीशा होतात. जे गुंते सोडवायचा तुम्ही प्रयत्न करत होतात आणि ते अधिकाधिक गुंतत होते; सगळ्याच समस्या होत्या, चिंता होती आणि त्यातून बाहेर येण्याचा मार्गच दिसत नव्हता. मी तुम्हाला मासोळीची गोष्ट सांगतो. तिचा संबंध मनाशी आणि तुमच्या अस्तित्वाशी आहे.

गुरू शिष्याला एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ध्यान करायला सांगतात : एक छोटी मासोळी एका बाटलीत टाकून, तिला अन्न दिलं जातं. ती मासोळी वाढत जाते आणि संपूर्ण बाटली भरून जाईल एवढी मोठी होते. आता ती खूप मोठी आहे, बाटलीच्या तोंडावाटे बाहेर येऊ शकत नाही आणि काम असं आहे की तुम्हाला बाटली न फोडता आणि त्या मासोळीच्या जिवाला धक्का न लावता तिला बाटलीच्या बाहेर काढायचं आहे.

हे मनाला गोंधळात टाकणारं आहे.

तुम्ही काय करू शकता? मासोळी तर खूपच मोठी आहे, बाटली फोडल्याशिवाय तुम्ही तिला बाहेर काढू शकत नाही पण बाटली फोडण्याची तर तुम्हाला परवानगी नाही. तुम्ही ती मासोळी मारून तिला बाहेर काढू शकता पण त्याचीही तुम्हाला परवानगी नाही. शिष्य दिवसरात्र ध्यान करतो, सगळ्या मार्गाचा विचार करतो- पण मार्ग सापडतच नाही. शिष्य विचार करून थकून जातो आणि अचानक त्याला साक्षात्कार होतो की गुरूंना बाटली आणि मासोळीत रस असण्याचं काहीच कारण नाही; ही दुसऱ्याच कशाची तरी प्रतीकं असली पाहिजेत. बाटली म्हणजे मन आहे आणि तुम्ही ती मासोळी आहात.. आणि यावर उपाय म्हणजे तटस्थ राहाणं. मग उपाय शक्य आहे. तुम्ही म्हणजे मन नाही, पण तुम्ही मनाशी इतकं तादात्म्य पावता की तुम्हाला वाटत राहातं तुम्ही त्यातच आहात!

शिष्य गुरूंकडे जातो आणि सांगतो की मासोळी बाहेर आहे. गुरू म्हणतात, ‘‘तुझ्या लक्षात आलं म्हणजे. तिला बाहेरच ठेव. ती मुळी कधी आत नव्हतीच.’’

जाणीव ही मासोळी आहे आणि ती मनाच्या बाटलीत मुळी नाहीच. पण तुम्हाला वाटतं की ती बाटलीत आहे आणि तुम्ही ती बाहेर कशी काढायची हे सगळ्यांना विचारत राहाता. तुम्हाला मदत करणारे मूर्खही असतात, ते ती बाहेर काढण्याची तंत्रं सांगतात. मी त्यांना मूर्ख म्हणतोय, कारण, त्यांना या सगळ्याचा अर्थच समजलेला नसतो. मासोळी बाहेरच आहे, ती आत कधीच नव्हती, त्यामुळे ती बाहेर काढण्याचा प्रश्नच येत नाही. मन म्हणजे तुमच्यासमोरील विचारांची मेंदूच्या पटलावर सुरू असलेली मालिका आहे. तुम्ही निरीक्षक आहात. पण तुम्ही त्यातल्या आमिषांशी अर्थात सुंदर गोष्टींशी तादात्म्य पावू लागता. आणि एकदा का तुम्ही सुंदर गोष्टींच्या सापळ्यात अडकलात की कुरूप गोष्टींच्या सापळ्यात अडकण्यावाचून दुसरा पर्यायच उरत नाही. कारण मनाच्या अस्तित्वासाठी द्वैत अपरिहार्य असतं. जाणीव अद्वैत आहे, तर मन द्वैत आहे. तेव्हा फक्त बघत राहा. थोडे मागे जा आणि बघत राहा. तुमच्यात आणि तुमच्या मनात अंतर ठेवा. चांगलं, सुंदर, चविष्ट, तुम्ही जवळून ज्याचा आनंद लुटू इच्छिता अशा गोष्टी असतो किंवा कुरूप गोष्टी, दोहोंपासून शक्य तेवढय़ा अंतरावर राहा. तुम्ही एखादा चित्रपट बघता तसं त्याकडे बघा.

तादात्म्यीकरण हे तुमच्या दु:खाचं मूळ आहे. कारण प्रत्येक तादात्म्यीकरण हे मनासोबत केलेलं तादात्म्यीकरण असतं. थोडं मागे व्हा, मनाला बाजूने जाऊ दे. आणि लवकरच तुम्हाला दिसेल की मुळात काही समस्याच नाहीये- मासोळी बाटलीबाहेर पडली आहे. तुम्हाला बाटलीही तोडण्याची गरज नाही वा मासोळी मारण्याचीही गरज नाही.

ओशो, अ‍ॅण्ड द फ्लॉवर्स शॉवर्ड, टॉक #3

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2018 1:27 am

Web Title: article from book and the flowers showered by osho
Next Stories
1 अस्तित्व: स्वत:च्या आतलं
2 ज्ञान म्हणजे ‘पाहणं’
3 श्वास: एका नवीन मितीकडे नेणारं द्वार
Just Now!
X