News Flash

संयमन

तुम्ही त्याच्यावर राग काढता, तो तुमच्यावर काढतो आणि तुम्ही एकमेकांचे शत्रू होता.

प्रतिनिधिक छायाचित्र

राग हीदेखील अत्यंत जिवंत गोष्ट आहे, कारण ती संरक्षक शक्ती आहे. काही क्षण असे असतात की ज्यात तुम्हाला राग आलाच पाहिजे. नाहीतर तुम्हाला कणाच असणार नाही. राग सुंदर आहे. पण सुंदर गोष्टी कुरूप बनू शकतात. ते तुमच्यावर अवलंबून आहे. रागाचं रूपांतर दुसऱ्या गोष्टीत केलं तर त्याची अनुकंपा होऊ शकते.

माणूस खूप काही दडपून ठेवून अस्वस्थ का असतो? कारण समाज तुम्हाला संयमन करायला शिकवतो, त्याचे दुसऱ्या कुठल्या गोष्टीत रूपांतर करायला शिकवत नाही. रूपांतराचा मार्ग पूर्णपणे निराळा आहे. पहिली गोष्ट म्हणजे यात नियंत्रण अजिबात नाही, त्याच्या बरोबर उलटं असं काहीतरी आहे.

पहिली गोष्ट : संयमनात तुम्ही स्वत:ला दडपून टाकता, दुसऱ्या कशात जर त्याचे रुपांतर केले तर तुम्ही व्यक्त होता.

पण इथे ‘दुसरं कोणीतरी’ पूर्णपणे संदर्भहीन आहे.  पुढल्या वेळी तुम्हाला राग आला की जा आणि घराभोवती पळत पळत सात फेऱ्या मारा, त्यानंतर एका झाडाखाली बसा आणि बघा राग निघून गेला असेल. तुम्ही तो दाबून टाकला नाही, तुम्ही त्याच्यावर नियंत्रण मिळवलं नाही, तुम्ही तो कोणावर काढलाही नाही- कारण तुम्ही तो दुसऱ्या कोणावर तरी काढता तेव्हा एक साखळी निर्माण होते- तो दुसराही तुमच्याइतकाच मूर्ख आहे, तुमच्याइतकाच अजाण आहे. तुम्ही एखाद्या संयमी माणसावर तो काढलात तर काही समस्या येणार नाही; तो तुम्हाला मोकळं व्हायला, राग बाहेर काढायला, विरेचनाच्या प्रक्रियेतून जायला मदतच करेल, पण दुसरा तुमच्याइतकाच अजाण असेल, तर तोही प्रतिक्रिया व्यक्त करेल. तो तुमच्यावर आणखी रागावेल. तुमच्या भावना जितक्या दडपलेल्या आहेत, तितक्याच त्याच्याही भावना दडपलेल्या आहेत. मग तिथे एक साखळी तयार होते : तुम्ही त्याच्यावर राग काढता, तो तुमच्यावर काढतो आणि तुम्ही एकमेकांचे शत्रू होता.

राग कोणावरही काढू नका. राग येणं म्हणजे उलटीची भावना होते तसंच आहे. तुम्ही कोणाच्या अंगावर उलटी करत नाही. तुम्ही बाथरूममध्ये जाता आणि उलटी करता! त्याने तुमचं संपूर्ण शरीर स्वच्छ होतं- रागालाही उलटीची गरज असते. तुम्ही उलटी दाबून ठेवली, तर त्याचे परिणाम घातक होतात आणि तुम्ही ती बाहेर टाकता तेव्हा तुम्हाला ताजंतवानं वाटतं, हलकं वाटतं, ओझं उतरल्यासारखं वाटतं, चांगलं वाटतं, निरोगी वाटतं. तुम्ही घेतलेल्या अन्नात काहीतरी चुकीचं होतं आणि शरीराने ते नाकारलं. त्याला जबरदस्तीने आत दाबून ठेवू नका.

क्रोध ही केवळ मानसिक उलटी आहे. तुम्ही काहीतरी चुकीचं ग्रहण केलंत आणि तुमच्या संपूर्ण मनाला ते बाहेर ओकून टाकायचं आहे. मात्र, ते दुसऱ्या कोणावर तरी ओकण्याची गरज नाही. लोक राग दुसऱ्यावर काढतात, म्हणूनच समाज त्यांना संयमनाचा सल्ला देतो.  राग दुसऱ्या कोणावर तरी काढण्याची गरजच नाही. तुम्ही बाथरूममध्ये जाऊ शकता, तुम्ही लांब चालायला जाऊ शकता- याचा अर्थ काहीतरी तुमच्या आत आहे आणि तुम्हाला वेगाने हालचाली करून ते मुक्त करायचं आहे. थोडं पळून या, तुम्हाला मोकळं वाटेल, किंवा एक उशी घ्या आणि तिला मारा, त्या उशीशी भांडा, तुमचे दात आणि हात मोकळे होत नाहीत तोवर तिला मारा, चावा. पाच मिनिटांच्या विरेचनाने तुम्हाला हलकं वाटेल. रागही शांत होईल.

रागाच्या रूपांतरातली पहिली गोष्ट म्हणजे क्रोध व्यक्त करायचा आहे, पण तो कोणावरही व्यक्त करायचा नाही, कारण तो तुम्ही कोणावर तरी काढलात, तर तुम्ही तो पूर्णपणे बाहेर काढूच शकत नाही. तुम्हाला ठार मारायला आवडेल, पण ते शक्य नाही; तुम्हाला चावायला आवडेल, पण ते शक्य नाही. मात्र, हे तुम्ही उशीसोबत करू शकता. उशी प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, उशी कोणत्याही न्यायालयात जाणार नाही आणि उशीला तुमच्याबद्दल शत्रुत्वही वाटणार नाही, उशी कधी काहीच करत नाही.

लक्षात ठेवण्याची दुसरी गोष्ट : जागृत राहा

संयमनात जाणिवेची गरज नसते; तुम्ही ते रोबोसारखं यांत्रिक पद्धतीने करता. राग येतो तेव्हाही एक यंत्रणा असते- अचानक तुमचं शरीर आक्रसतं आणि बंद होऊन जातं. तुम्ही सावध असाल, तेव्हा कदाचित नियंत्रण इतकं सोपं नसेल.

समाज तुम्हाला कधीही सावध राहण्यास शिकवत नाही, कारण एखादी व्यक्ती जेव्हा सावध असते, तेव्हा ती पूर्णपणे खुली असते. तुम्हाला काही दडपून टाकायचं असेल, तर हा खुलेपणा त्यात अडचणी आणतो. खुलेपणामुळे दडपलेले बाहेर येऊ  शकेल. स्वत:मध्ये कसं बंद होऊन जायचं, स्वत:ला स्वत:मध्ये कसं कैद करायचं- बाहेर जाण्यासाठी छोटी खिडकीशी कशी ठेवायची नाही हे समाज तुम्हाला शिकवतो.

पण लक्षात ठेवा : जेव्हा काही बाहेर जात नाही, तेव्हा काही आतही येत नाही. राग बाहेर पडू शकत नाही, तेव्हा तुम्ही बंद होऊन जाता. तुम्ही एखाद्या सुंदर खडकाला स्पर्श करता, पण तुमच्या आत काहीच शिरत नाही; तुम्ही एखाद्या फुलाकडे बघता, पण आत काहीच शिरत नाही; तुमची दृष्टी मेलेली आहे, बंद आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीचं चुंबन घेता, तरीही तुमच्या आत काहीच शिरत नाही, कारण तुम्ही बंद आहात. तुम्ही एक संवेदनहीन आयुष्य जगत आहात.

संवेदनशीलता जागरूकतेसोबतच वाढते

नियंत्रणामुळे तुम्ही निरस आणि मृतवत होत जाता- हा संयमन यंत्रणेचा भागच आहे: तुम्ही निरस आणि मृतवत असाल, तर तुमच्यावर कशाचाच परिणाम होणार नाही, तुमचं शरीर एखाद्या किल्ल्यासारखं होऊन जातं, भक्कम संरक्षण असलेल्या किल्ल्यासारखं. तुम्ही आता कशानेही हलत नाही, ना अपमानाने, ना प्रेमाने. पण या संयमनासाठी मोठी किंमत मोजावी लागते, अनावश्यक किंमत; हा संपूर्ण आयुष्याचा प्रयास होऊन जातो; स्वत:वर नियंत्रण कसं ठेवावं- आणि मग मरायचं! हा संयमनाचा प्रयत्न तुमची सगळी ऊर्जा खर्च करतो, आणि शेवटी तर तुम्हाला मरण येतंच. त्यापूर्वीचं संपूर्ण आयुष्य निरस आणि मृतप्राय झालेलं असतं; तुम्ही कसंतरी ते ओढून नेता.

राग हीदेखील अत्यंत जिवंत गोष्ट आहे, कारण ती संरक्षक शक्ती आहे. जर एखादं मूल रागावूच शकलं नाही, तर ते जगूच शकणार नाही. काही क्षण असे असतात की ज्यात तुम्हाला राग आलाच पाहिजे. लहान मुलाला त्याचं अस्तित्व दाखवून द्यावंच लागेल, त्याला काही क्षण स्वत:साठी उभं राहावंच लागेल; नाहीतर त्याला कणाच येणार नाही.  राग सुंदर आहे; सेक्स सुंदर आहे. पण सुंदर गोष्टी कुरूप बनू शकतात. ते तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही त्यांचा निषेध केलात, तर त्या कुरूप होतील; तुम्ही त्यांचं वेगळ्या गोष्टीत रूपांतर केलं, तर त्या दैवी होतील. रागाचं रूपांतर केलं तर त्याची अनुकंपा होऊ  शकते- कारण दोहोंतली ऊर्जा समान आहे. बुद्ध खूप कनवाळू आहेत: ही त्यांची अनुकंपा कुठून आली? ही क्रोधातलीच ऊर्जा आहे; आता ती क्रोधात संचार करत नाही, त्या ऊर्जेचं रूपांतर अनुकंपेत झालं आहे.

आणि प्रेम कुठून येतं? जी ऊर्जा सेक्समध्ये होती, तीच रूपांतरित होऊन तिचं प्रेम झालं आहे. तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही नैसर्गिक वैशिष्टय़ांची निर्भर्त्सना केली तर त्या विषारी होतात, तुम्हाला नष्ट करतात, त्या विध्वंसक आणि आत्मघातकी होतात. तुम्ही त्याचं रूपांतर केलं, तर त्या दैवी होतात, त्या दैवी शक्ती होतात. त्याचं अमृत होतं; तुम्हाला अमरत्वाकडे नेणारं अमृत. पण त्यासाठी आवश्यक आहे ते विधायक रूपांतर.

ओशो, अ‍ॅण्ड द फ्लॉवर्स शॉवर्ड, टॉक #३

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 1:01 am

Web Title: article from book osho and the flowers showered
Next Stories
1 योग्य निद्रा
2 व्यक्तिमत्त्व म्हणजे संपूर्णत्व!
3 अस्तित्व
Just Now!
X