08 March 2021

News Flash

अस्तित्व: स्वत:च्या आतलं

अमेरिकन माणसाला प्रचंड नैराश्य येतं पण तो जसा परत जाऊ लागतो, तसा तो विचार करू लागतो,

प्रतिनिधिक छायाचित्र

मी एका अमेरिकी साधकाबद्दल ऐकलं आहे. तो अतिश्रीमंत होता. आपल्याजवळ सगळं काही आहे याच गोष्टीला तो विटून गेला होता. तुमच्याकडे जेवढं जास्त येत जातं, तेवढंच याने आपलं समाधान होत नाहीये ही जाणीवही तीव्र होत जाते. गरीब माणसाची मानसिक अवस्था नेहमी तुलनेने चांगली असते. कारण उद्या आपल्याकडे चांगलं घर असेल, चांगली नोकरी असेल, अधिक पगार असेल, चांगली गाडी असेल अशी आशा तो करत राहू शकतो. त्याच्या आसपास लक्षावधी आशा असतात. त्या कधीच पूर्ण होणार नसतात आणि त्या पूर्ण होणार नसतात हेच चांगलं असतं. अतिश्रीमंत माणूस फारसं विचित्र परिस्थितीत अडकलेला असतो त्याच्या सगळ्या आशा पूर्ण झालेल्या असतात आणि ओंजळी मात्र रिकाम्या असतात; त्याला काहीच गवसलेलं नसतं. आयुष्याने त्याला मूर्ख बनवलेलं असतं. त्या सगळ्या आशा म्हणजे केवळ मृगजळ होतं हे स्पष्ट झालेलं असतं.

मग तो अमेरिकी माणूस एखाद्या ज्ञानी माणसाचा शोध घेऊ लागतो, असा माणूस जो त्याला खऱ्या, अंतिम, पूर्ण सत्य शोधण्याचा मार्ग दाखवेल. तो जगभर फिरू लागतो, थकून जातो. मग तो या भूमीत येतो. त्याला कोणीतरी सांगतं की, ‘‘सपाट पठारावर तुम्हाला असा ज्ञानी माणूस सापडणार नाही, तुम्हाला हिमालयात जावं लागेल. आम्ही असं ऐकलंय की तिथे एक वृद्ध माणूस आहे, तो कोणत्या युगातला आहे, किती वर्षांचा आहे हे कोणालाही माहीत नाही. तुम्ही त्याला शोधू शकलात तर कदाचित तुमचा शोध पूर्ण होईल.’’

अमेरिकी माणूस हट्टी असतो, निश्चयी असतो. प्रवास खूप खडतर, कठीण असतो पण तो प्रवास करून जातो. त्याचे कपडे फाटतात, पण कसाबसा पोहोचतो. अमेरिकन माणूस बघतो की तो वृद्ध माणूस एका झाडाखाली बसलाय, त्याच्या भोवती बर्फ साचलाय. तो माणूस इतका थकलेला असतो की त्याला चालताही येत नसतं. तो अक्षरश: रांगत त्या वृद्धापर्यंत पोहोचतो, त्याच्या पायाशी पडतो आणि म्हणतो, ‘‘अखेर मी तुम्हाला शोधून काढलं. सगळे सांगत होते इथे पोहोचणं खूप कठीण आहे म्हणून. मी विचार केला होता त्याहूनही कठीण होतं हे. पण देव दयाळू आहे. आता मला सांगा, मला शांती, आनंद, ज्ञान कसं मिळेल.’’

वृद्ध माणूस त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, ‘‘आधी मुद्दय़ाचं बोलतो. तुझ्याकडे काही अमेरिकेचे सिगरेट्स आहेत का?’’ हा काय प्रश्न आहे यावर त्या माणसाचा विश्वासच बसत नाही. अर्थात त्या वृद्धाशी वाद घालणं योग्य ठरलं नसतं. उगाच तो चिडला तर काय.

तो म्हणतो, ‘‘हो.’’ मग तो उरलेल्या थोडय़ा सिगरेट्स आणि लायटर काढतो. वृद्ध माणूस त्या घेतो आणि एक सिगरेट ओढू लागतो. तो थकलेला माणूस त्याच्याकडे बघतच राहतो- हे काय चाललंय? शेवटी तो म्हणतो, ‘‘आता माझं काय?’’

वृद्ध म्हणतो, ‘‘थांब, मला आधी सिगरेट संपवू दे, कारण मी वाट बघत होतो कोण सिगरेट आणतंय याची. खूप वर्षांपासून वाट बघत होतो.’’ तो अमेरिकी माणूस म्हणतो, ‘‘मी मरतोय, थकलोय आणि तुम्ही माझ्याच समोर माझीच सिगरेट ओढताय. मी तुम्हाला ज्ञानी समजत होतो.’’

वृद्ध मनुष्य म्हणतो, ‘‘ठीक आहे ना मग. मी ज्ञानी आहेच, पण ज्ञानी माणसं सिगरेट ओढू शकत नाहीत असं कुठे आहे. तुला कोणी सांगितलं हे?’’

तो म्हणतो, ‘‘मला त्याबद्दल बोलायचं नाही. तुम्ही मला फक्त मी विचारलंय त्याचं उत्तर द्या. कारण, आयुष्य खूप छोटं आहे आणि मीही खूप थकलोय. आता मी काय करायला हवं ते सांगा.’’

वृद्ध माणूस म्हणतो, ‘‘आता तू घरी जा, चांगली विश्रांती घे आणि परत ये. आणि पुढल्या वेळी येताना सिगार आणायला विसरू नकोस. कारण त्याशिवाय मी कोणालाही कधीच सत्य सांगत नाही.’’

तो माणूस अचंबित होतो: ‘‘मी हे असं कधी ऐकलंच नाहीये.. मी सगळे धर्मग्रंथ वाचले आहेत, उत्तमोत्तम उपदेश ऐकले आहेत- पण सत्य शोधण्याबद्दल काही सांगण्यापूर्वी सिगरेट लागते हे मी कधीही ऐकलेलं नाही.’’

वृद्ध माणूस म्हणतो, ‘‘प्रत्येक ज्ञानी मनुष्य वेगळा असतो; ही माझी अट आहे. आता सगळं तुझ्यावर अवलंबून आहे- तुला परत यावंसं वाटलं नाही, तर येऊ नकोस. कारण, मी बऱ्याच जणांना पाठवलं आहे आणि ते येत असतील. तुला काय वाटलं मी इथे कसा जगत असेन? स्वत:च्या शोधात इथे येणारा तू एकटाच मूर्ख नाहीयेस. यापूर्वीही बरेच येऊन गेले आणि पुढेही येत राहतील. माझी साधी अट आहे, सिगार घेऊन ये.’’

अमेरिकन माणूस म्हणतो, ‘‘ठीक आहे, मी घरी जातो आणि मी जिवंत राहिलो, तर सिगार घेऊन येईन. पण तुम्ही त्यानंतर आणखी काही अट घालणार नाही असं वचन मला द्या.’’

वृद्ध माणूस म्हणतो, ‘‘ज्ञानी लोक कोणालाही कसलंही वचन देत नाहीत, हे तू लक्षात घे. कारण उद्या कोणी पाहिलाय? माझा विचार बदलेल कदाचित. मी तुझा सिगारही नाकारेन. तू तुझ्या परीने सर्वोत्तम प्रयत्न कर, मी माझ्या परीने करतो आणि मग बघू काय होतं ते. पण आत्ता तू चालता हो. तू आणलेल्या सिगरेट्स बऱ्याच आहेत, मला त्यांचा आनंद लुटू दे.’’

अमेरिकन माणसाला प्रचंड नैराश्य येतं पण तो जसा परत जाऊ लागतो, तसा तो विचार करू लागतो, ‘त्यांच्या संदेशातच कदाचित काहीतरी आहे. ते म्हणाले, घरी जा आणि चांगली विश्रांती घे. कदाचित ते रूपकात बोलत असतील. घर कुठे आहे? खरे घर आपल्या आतच आहे हे त्याने पुस्तकांमध्ये वाचले होतेच. आणि घर कसे शोधायचे? आपली मन:स्थिती अगदी मुक्त, शांत करा, मग तुम्हाला घर सापडेल.’

अमेरिकन माणूस म्हणतो, ‘‘अरे, त्यांनी मला इतकं काही सांगितलं आणि मी तर त्यांचे आभारही नाही मानले. आता मी त्यांच्यासाठी सिगरेट घेऊन येईन. बाकी काही नाही, फक्त कृतज्ञता म्हणून.’’

मला ही गोष्ट खूपच आवडते. तो अमेरिकन माणूस परत गेला की नाही हे मला माहीत नाही; त्याने घर आणि विश्रांती यातून जो काही अर्थ लावला तोच त्या वृद्ध माणसाला अभिप्रेत होता की नाही हेही स्पष्ट कळत नाही. पण परिस्थिती काहीही असो, अमेरिकन माणसाला संदेश मिळाला. तो परत गेला. शांतपणे विसावला आणि मग त्याने प्रथम प्रयत्न केला तो स्वत:च्या आतल्या अस्तित्वामध्ये-घरात प्रवेश करण्याचा. कारण तुम्ही ज्या इमारतीत राहता, तिच्या चार भिंती हे तुमचं घर कधीच नसतं.

ओशो, द न्यू डॉन, टॉक #२३सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 1:01 am

Web Title: article from book osho the new dawn
Next Stories
1 ज्ञान म्हणजे ‘पाहणं’
2 श्वास: एका नवीन मितीकडे नेणारं द्वार
3 संयमन
Just Now!
X