तुमची समस्या सोडवणं म्हणजे बौद्धिककदृष्टय़ा तुमचं समाधान करेल असं काहीतरी उत्तर देणं; आणि तुमची समस्या नाहीशी करणं म्हणजे मुळात समस्या अशी काही गोष्ट नाहीच याची जाणीव तुम्हाला करून देणं. समस्या या मुळात आपली स्वत:ची निर्मिती असते आणि त्यामुळे त्यावर उपाय शोधण्याची काही गरजच नसते. ज्ञानाचा स्पर्श झालेल्या जागरूकतेला उत्तर नसतं. तिचं सौंदर्य म्हणजे तिच्यात प्रश्नच नसतात.

तिचे सगळे प्रश्न विरघळून गेलेले असतात, नाहीसे झालेले असतात. लोक याच्या उलट विचार करतात. त्यांना वाटतं की ज्ञानी माणूस म्हणजे त्याच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असलीच पाहिजेत. प्रत्यक्षात त्याच्याकडे कोणतंच उत्तर नसतं. मुळात त्याला प्रश्नच पडत नाही. आणि प्रश्न पडले नाहीत, तर उत्तराचा संबंध येतो कुठे?

Sameer Wankhede on aryan Khan arrest
आर्यन खानच्या अटकेनंतर जातीवरून केलं लक्ष्य, भ्रष्टाचाराचे झालेले आरोप; समीर वानखेडे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा संबंध…”
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
Declaration of self-reliance and policy of import dependence
घोषणा आत्मनिर्भतेच्या आणि धोरण आयातनिर्भरतेचे
Science Day is Not just to celebrate but to practice it
विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…

गेटर्य़ुड स्टाइन नावाची एक महान कवयित्री अखेरच्या घटका मोजत होती तेव्हा तिच्या अवतीभवती मित्रमंडळी जमलेली होती. तिने अचानक डोळे उघडून विचारलं, ‘‘उत्तर काय आहे?’’ कोणीतरी म्हणालं, ‘‘पण आम्हाला प्रश्नच माहीत नाही, तर उत्तर कसं माहीत असेल?’’ तिने पुन्हा एकदा डोळे उघडले आणि ती म्हणाली, ‘‘ठीक आहे, मग प्रश्न काय आहे?’’ आणि तिने अखेरचा श्वास घेतला. हे तिचे शेवटचे शब्द मोठे विचित्र आहेत. कवी, चित्रकार, नर्तक, गायक यांचे अखेरचे शब्द बघणं फार सुंदर अनुभव आहे. ते खूपच अर्थपूर्ण असतात.

प्रथम तिने विचारलं, ‘‘उत्तर काय आहे?’’.. जसं काही प्रश्न वेगवेगळ्या माणसांसाठी वेगळा असूच शकत नाही. प्रश्न तोच असला पाहिजे सर्वासाठी; तो स्पष्ट करून सांगण्याची गरजच नाही. आणि ती घाईत होती, त्यामुळे पद्धतशीर मार्गाने जाण्याऐवजी म्हणजे आधी प्रश्न विचारून मग उत्तर ऐकण्याऐवजी तिने सरळ विचारलं, ‘‘उत्तर काय आहे?’’ पण लोकांना हे समजत नाही. प्रत्येक माणूस एकाच परिस्थितीत आहे, त्यामुळे एकच प्रश्न सर्वाचा असू शकतो हे त्यांना कळतच नाही. म्हणूनच एका मूर्खाने विचारलं, ‘‘पण प्रश्नच माहीत नसेल तर आम्ही उत्तर कसं देणार?’’हा प्रश्न तर्कशुद्ध वाटतो पण तो तसा नाही, तो अगदी वेडगळ प्रश्न आहे आणि तोही मृत्यूशय्येवरच्या व्यक्तीला विचारलेला.. तरीही त्या बिचाऱ्या बाईने पुन्हा एकदा डोळे उघडले. ती म्हणाली, ‘‘ठीक आहे, मग प्रश्न काय आहे?’’ आणि सगळं शांत झालं. कोणालाही प्रश्न माहीत नाही, कोणालाही उत्तर माहीत नाही. खरं म्हणजे प्रश्नही अस्तित्वात नाही आणि उत्तरही अस्तित्वात नाही; हा केवळ गोंधळात जगण्याचा, मनाच्या गोंधळात जगण्याचा मार्ग आहे. मग तिथे लक्षावधी प्रश्न असतात आणि त्यांची लक्षावधी उत्तरं असतात. प्रत्येक उत्तर आपल्यासोबत आणखी शेकडो प्रश्न घेऊन येतं आणि याला कुठे अंतच राहत नाही.

गेटर्य़ुड स्टाइन अखेरच्या घटका मोजत होत्या तेव्हा मी तिथे असतो तर म्हणालो असतो, ‘‘ही प्रश्न- उत्तरांचा विचार करण्याची वेळ नाही. लक्षात ठेवा प्रत्यक्षात प्रश्नही नसतात आणि उत्तरंही नसतात. अस्तित्व प्रश्न आणि उत्तरांबद्दल पूर्ण मौन राखून असतं. हा काही तत्त्वज्ञानाचा वर्ग नाही. कोणत्याही प्रश्नाशिवाय आणि उत्तराशिवाय जगाचा निरोप घ्या. केवळ मूकपणे, जागृतावस्थेत आणि शांतपणे जगाचा निरोप घ्या.’’

ओशो, द पाथ ऑफ द मिस्टिक, टॉक #४३

शब्दांपलीकडची किल्ली

आतली शांतता- ही शांतता इतकी खोल असते की तुमच्या अस्तित्वात कोणती कंपनंही नसतात; तुम्ही असता पण कोणत्याही लाटा नसतात; तुम्ही एक लाटा नसलेला तलाव आहात, एक लाटही उसळत नाही; संपूर्ण अस्तित्व शांत, स्तब्ध आहे; केंद्रस्थानी पूर्ण मौन आहे- आणि त्या भोवतालच्या परिसरात आनंद आहे, हास्य आहे. आणि केवळ शांतताच असं हसू शकते, कारण शांततेला वैश्विक आनंद समजू शकतो.

तेव्हा आता तुमचं आयुष्य म्हणजे एक आवश्यक असा आनंदोत्सव होऊन गेलं आहे; प्रत्येक नातं उत्सवी झालं आहे, तुम्ही जे काही करता ते, तुमचा प्रत्येक क्षण महोत्सवासारखा झाला आहे. तुम्ही खाता तेव्हा खाणं उत्सवासारखं होतं; तुम्ही आंघोळ करता, तेव्हा ही आंघोळ उत्सव होऊन जाते; तुम्ही बोलता आणि ते बोलणं म्हणजेही उत्सव होतो; नाती आनंदोत्सवासारखी होतात. तुमचं बाहेरचं आयुष्य उत्सवासारखं होऊन जातं, त्यात दु:ख उरतच नाही. शांततेसोबत दु:ख राहील तरी कसं? पण सहसा तुम्ही उलट विचार करता, तुम्हाला वाटतं की तुम्ही शांत आहात म्हणजे तुम्ही दु:खी आहात. तुम्ही शांत असाल, तर हे दु:ख कसं टाळावं असा विचार तुम्ही सहसा करत राहता. मी तुम्हाला सांगतो, शांतता आणि दु:ख या दोन गोष्टी एका ठिकाणी राहूच शकत नाहीत. काहीतरी चुकतंय, तुमचा रस्ता चुकला आहे, तुम्ही भरकटला आहात. खऱ्या शांततेचा पुरावा केवळ आनंदोत्सवच देऊ शकतो.

आता खरी शांतता आणि खोटी शांतता यात काय फरक आहे? खोटी शांतता लादलेली असते; ती प्रयत्नांनी साध्य केलेली असते. ती उत्स्फूर्त नसते. ती तुम्ही घडवून आणलेली असते. तुम्ही शांत बसलेले असता आणि आत क्षोभ खळबळत असतो. तुम्ही ती खळबळ दाबून टाकता पण मग तुम्हाला हसता येत नाही. तुम्ही दु:खी होत जातात, कारण हास्य धोक्याचं आहे- तुम्ही हसलात, तर शांततेचा भंग होईल आणि हसायचं असेल तर तुम्ही काही दडवून ठेवू शकत नाही. हास्य आणि दडपणूक परस्परविरोधी आहेत. तुम्हाला काही दडपून टाकायचं असेल, तर तुम्ही हसता कामा नये; हसलात तर सगळं खरं बाहेर येईल. हास्यातून खरं बाहेर येईल आणि खोटं विरघळून जाईल.

तेव्हा जेव्हा तुम्हाला एखादा संत दु:खी दिसेल, तेव्हा समजा की त्याची शांतता खोटी आहे, तो आनंद लुटू शकत नाही, कारण त्याला भीती वाटतेय. तो हसला तर सर्व बिंग फुटेल, त्याने दडपून टाकलेलं बाहेर येईल, तो ते दडपू शकणार नाही. लहान मुलांचं बघा. घरी पाहुणे आले असताना तुम्ही मुलांना सांगता, ‘हसू नका!’- ती काय करतात? ती ओठ मिटून टाकतात, त्यांचे श्वासही रोखून धरतात, कारण त्यांनी श्वास रोखले नाहीत, तर हसू फुटेल. ते कठीण होईल. ती इतरत्र कुठेच बघत नाहीत, कारण त्यांनी दुसरीकडे बघितलं तर ती विसरून जातील. मग ती डोळे मिटतात किंवा अर्धवट बंद करतात आणि श्वास रोखून धरतात.

ओशो, अ बर्ड ऑन द विंग, टॉक#१०

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

http://www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे