News Flash

तुमच्यामधलं तुमचं अस्तित्व

दोन शब्द लक्षात घ्या : एक आहे क्रिया म्हणजे अ‍ॅक्शन आणि दुसरा क्रियाकलाप म्हणजे अ‍ॅक्टिव्हिटी.

तणावमुक्त कसं व्हायचं याबद्दल सांगणारी किती तरी पुस्तकं दर महिन्याला लिहिली जाताहेत आणि तरीही तणावमुक्तीबद्दलचं पुस्तक वाचून ताणातून मोकळी झालेली एकही व्यक्ती मी बघितलेली नाही! ती व्यक्ती तशीच व्यग्र राहते, कारण ही पुस्तकं व्यक्तीच्या सतत व्यग्र आयुष्याला स्पर्शच करीत नाहीत. क्रियाशील राहण्याचा तिचा ध्यास तसाच असतो आणि आतला गोंधळ तसाच राहतो. तुम्हाला ताणातून मुक्त करू शकेल असं कोणतंही पुस्तक नाही- तुम्ही स्वत:च्या आतमधलं अस्तित्व वाचलं तरच ते शक्य होईल

‘‘क्रियाकलाप अर्थात अ‍ॅक्टिव्हिटीचं स्वरूप आणि त्यातले छुपे प्रवाह समजून घेतल्याशिवाय शिथिल होणं किंवा तणावातून मुक्त होणं शक्यच नाही. तुम्हाला शिथिल व्हायचं असेल तर ते तुमच्या क्रियाकलापाचं निरीक्षण केल्याशिवाय, त्याच्याकडे बघितल्याशिवाय, तो समजून घेतल्याशिवाय, त्याचं स्वरूप जाणून घेतल्याशिवाय शक्यच नाही, कारण क्रियाकलाप किंवा क्रियांचा समूह ही काही साधी घटना नाही.

अनेक लोकांना मोकळं व्हायचं असतं पण ते स्वत:ला शिथिल करूच शकत नाहीत. शिथिल होणं हे फुलण्यासारखं असतं. तुम्ही त्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. तुम्हाला हे संपूर्ण इंद्रियगोचर समजून घेतलं पाहिजे- तुम्ही इतके क्रियाशील का आहात, या क्रियाकलापात इतके गुंतलेले का आहात, त्याचा इतका ध्यास का घेतला आहे तुम्ही?

दोन शब्द लक्षात घ्या : एक आहे क्रिया म्हणजे अ‍ॅक्शन आणि दुसरा क्रियाकलाप म्हणजे अ‍ॅक्टिव्हिटी. क्रिया म्हणजे क्रियाकलाप नव्हे. या दोहोंचं स्वरूप पूर्णपणे विरुद्ध आहे. परिस्थितीची मागणी असते, तेव्हा क्रिया केली जाते, तुम्ही कृती करता, तुम्ही या मागणीला प्रतिसाद देता. क्रियाकलापाचा परिस्थितीशी संबंध नसतो, तो प्रतिसाद नसतो; तुम्ही इतके अस्वस्थ असता, की तुम्ही क्रियाशील होण्यासाठी परिस्थितीचं कारण पुढे करता.

क्रिया नेहमी शांत मनातून उमटते- ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. क्रियाकलाप बाहेर येतो तो अस्वस्थ मनातून आणि ही सर्वात कुरूप गोष्ट आहे. जास्तीत जास्त क्रिया करा आणि क्रियाकलाप त्यातून आपोआप घडू द्या. तुमच्यात हे रूपांतर हळूहळू घडत जाईल. यासाठी वेळ लागेल, थोडी मशागतही आवश्यक आहे, पण घाई कुठे आहे?

आता शिथिल होणं म्हणजे काय हे तुम्ही समजू शकाल. याचा अर्थ तुमच्यात क्रियाकलापाची आच न उरणं. शिथिल होणं म्हणजे मेलेल्या माणसारखं पडून राहणं नाही आणि तुम्ही मृतवत पडून राहूही शकत नाही; तुम्ही तसं ढोंग करू शकता केवळ. तुम्ही मृतवत कसे पडून राहू शकाल? तुम्ही तर जिवंत आहात; तुम्ही केवळ ढोंग करू शकता. जेव्हा कोणत्याही क्रियाकलापाची आच उरत नाही, तेव्हा तुम्ही शिथिल होऊ शकता; तुमची ऊर्जा तुमच्याजवळच राहते, तिचं कुठेच स्थलांतर होत नाही. जर परिस्थितीने मागणी केली, तर तुम्ही क्रिया कराल, झालं, तुम्ही क्रिया करण्यासाठी सबबींच्या शोधात राहणार नाही. तुम्ही स्वत:सोबत आरामात असाल. असं स्वत:सोबत आरामात राहणं म्हणजे शिथिलीकरण.

शिथिलीकरण हे कधीही केवळ शरीराचं नसतं किंवा केवळ मनाचं नसतं, ते तुमच्या संपूर्ण अस्तित्वाचं असतं. तुम्ही क्रियाकलापात खूपच बुडालेले आहात; अर्थातच थकलेले, सैरभैर झालेले, आतून सुकलेले, गोठलेले आहात. तुमच्यातली जीवनऊर्जा पुढे सरकतच नाहीये. नुसते अडथळे, अडथळे आणि अडथळेच आहेत. तुम्ही जे काही करता ते वेडेपणातूनच करताहात. साहजिकच तुम्हाला या तणावातून मुक्त होण्याची गरज जाणवतेय. म्हणूनच तणावमुक्त कसं व्हायचं याबद्दल सांगणारी किती तरी पुस्तकं दर महिन्याला लिहिली जाताहेत आणि तरीही तणावमुक्तीबद्दलचं पुस्तक वाचून ताणातून मोकळी झालेली एकही व्यक्ती मी बघितलेली नाही! ती व्यक्ती तशीच व्यग्र राहते, कारण ही पुस्तकं तिच्या क्रियाकलापाने भरलेल्या आयुष्याला स्पर्शच करीत नाहीत. क्रियाशील राहण्याचा तिचा ध्यास तसाच असतो, आजार तसाच असतो आणि ती व्यक्ती तणावातून मुक्त झाल्याचं सोंग आणत जमिनीवर पहुडते. आतला गोंधळ तसाच राहतो, उद्रेकासाठी तयार ज्वालामुखीसारखा आणि ती व्यक्ती स्वत:ला सैल सोडण्याचा प्रयत्न करीत असते, त्या पुस्तकातल्या सूचनांचं पालन करत असते : तणावातून मुक्ती कशी मिळवायची.

तुम्हाला ताणातून मुक्त करू शकेल असं कोणतंही पुस्तक नाही- तुम्ही स्वत:च्या आतमधलं अस्तित्व वाचलं तरच ते शक्य होईल आणि मग त्या परिस्थितीत स्वत:ला शिथिल करणं ही गरज राहतच नाही. शिथिल होणं म्हणजे कशाची तरी अनुपस्थिती, क्रियाकलापाची अनुपस्थिती, क्रियेची नव्हे.

काहीच करू नका! कोणत्याही योगासनाची गरज नाही, शरीर आक्रसण्याची किंवा पसरण्याची गरज नाही. ‘काहीच करू नका!’; केवळ क्रियाकलापाची अनुपस्थितीची गरजेची आहे. ती कशी साधता येईल? ती समजुतीतून येईल.

समजून घेणं हीच एकमेव शिस्त आहे. तुमच्या क्रियाकलापाला समजून घ्या आणि अचानक तो क्रियाकलाप सुरू असताना, तुम्हाला काही तरी जाणवेल, क्रियाकलाप थांबून जाईल. तुम्ही हे का करीत आहात हे तुम्हाला उमगलं, तर ते थांबेल आणि या थांबण्याचाच अर्थ आहे तिलोप.

शिथिल होणं म्हणजे हा क्षण पुरेसा आहे, त्याहूनही अधिक आहे, तो मागितला जाऊ शकतो त्याहून किंवा त्याची अपेक्षा केली जाऊ शकते त्याहून अधिक आहे. काहीच मागण्याची गरज नाही, तो आवश्यकतेहून अधिक आहे, तुम्ही इच्छा करून शकता त्याहून अधिक आहे. मग तुमची ऊर्जा कुठेही वाहून जाणार नाही. त्या ऊर्जेचा एक शांत डोह तयार होईल. तुमच्या स्वत:च्या ऊर्जेतच तुम्ही विरघळून जाल. तो क्षण असेल शिथिल होण्याचा. हे शिथिल होणं केवळ शरीराचं किंवा मनाचं नसतं, ते संपूर्ण अस्तिवाचं शिथिल होणं असतं. म्हणून तर बुद्ध म्हणायचे- ‘इच्छा सोडा’, कारण जोवर इच्छा आहे, तोवर तुम्ही मुक्त होऊ शकत नाही.

शिथिल होणं म्हणजे काही आसन नव्हे; तर ते तुमच्यातल्या ऊर्जेचं परिवर्तन.’’

ओशो, तंत्र: द सुप्रीम अंडरस्टॅण्डिंग, टॉक #४

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 2:10 am

Web Title: article from book tantra the supreme understanding by osho
Next Stories
1 रागाला बाहेर काढा
2 पुन्हा एकदा मूल व्हा!
3 जिवंत राहा
Just Now!
X