28 January 2020

News Flash

ज्ञान म्हणजे ‘पाहणं’

स्वप्रेमाचा ते जेवढा निषेध करतात, तेवढा दुसऱ्या कशाचाही करत नाही.

प्रतिनिधिक छायाचित्र

भाषांतर – सायली परांजपे

प्रेम म्हणजे आत्म्याचं पोषण आहे. शरीरासाठी जसं अन्न लागतं, तसं आत्म्यासाठी प्रेम. अन्नाशिवाय शरीर अशक्त होतं, तसा प्रेमाशिवाय आत्मा अशक्त होतो. आणि कोणत्याच राजसंस्थेला, धर्मसंस्थेला किंवा हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यवस्थेला सशक्त आत्मा असलेले लोक नकोच असतात, कारण आध्यात्मिक ऊर्जेच्या व्यक्ती बंड करतातच.

प्रेम तुम्हाला बंडखोर शिकवतं, क्रांतिकारी करतं. प्रेम तुम्हाला उंच उडण्यासाठी पंख देतं. प्रेम तुम्हाला कोणत्याही गोष्टीकडे बघण्याची खोल दृष्टी देतं. त्यामुळे तुम्हाला कोणी फसवू शकत नाही, तुमचं शोषण करू शकत नाही, तुम्हाला दडपू शकत नाही. राजकारणी आणि धार्मिक नेते तर तुमचं शोषण करूनच जगतात. ते सगळे परोपजीवीच आहेत. तुम्हाला आध्यात्मिकदृष्टय़ा दुबळं करून टाकण्यासाठी त्यांना एक खात्रीशीर पद्धत सापडलेली आहे. ती म्हणजे तुम्हाला स्वत:वर प्रेम न करणं शिकवण्याची- कारण जर एखादी व्यक्ती स्वत:वर प्रेम करू शकत नसेल, तर ती दुसऱ्यावरही प्रेम करू शकत नाही. ही शिकवण फार फसवी आहे. ते म्हणतात, दुसऱ्यांवर प्रेम करा- कारण त्यांना माहीत असतं की तुम्ही स्वत:वर प्रेम करू शकला नाहीत, तर तुम्ही प्रेमच करू शकत नाही. पण तरीही ते सांगत राहतात, दुसऱ्यांवर प्रेम करा, मानवतेवर प्रेम करा, परमेश्वरावर प्रेम करा, निसर्गावर प्रेम करा, पत्नीवर प्रेम करा, पतीवर प्रेम करा, मुलांवर आणि आईवडिलांवरही करा, पण स्वत:वर प्रेम करू नका. कारण त्यांच्या मते तो स्वार्थीपणा आहे.

स्वप्रेमाचा ते जेवढा निषेध करतात, तेवढा दुसऱ्या कशाचाही करत नाही. आणि त्यांनी या शिकवणीला तर्कशुद्ध चेहरा दिला आहे. ते म्हणतात: तुम्ही स्वत:वर प्रेम केलंत तर तुम्ही अहंकारी व्हाल, हे खरं नाही.  प्रेमाला कोणत्याही कर्तव्याचा गंध नसतो. कर्तव्य हे ओझं आहे, औपचारिकता आहे. प्रेम हा आनंद आहे, वाटून घेणं आहे; ते अगदी सहज आहे. प्रेम करणाऱ्याला त्याने पुरेसं केलंय असं कधीच वाटत नाही; त्याला कायम वाटतं की आणखी करणं शक्य होतं. प्रेम करणाऱ्याला कधीच ‘मी दुसऱ्यावर उपकार करतोय’ असं वाटत नाही. उलट त्याचं प्रेम स्वीकारलं गेलं याबद्दल त्याला कृतज्ञ वाटतं. कर्तव्य बजावणाऱ्याला वाटतं, ‘मी कसा मोठा, आध्यात्मिक आणि असामान्य आहे. बघा, लोकांची सेवा करतोय!’ स्वत:वर प्रेम करणारा माणूस स्वत:चा आदरही करतो आणि स्वत:चा आदर करणारा माणूस दुसऱ्याचाही आदर करतो. स्वत:वर प्रेम करणारा माणूस त्या प्रेमाचा आनंद घेऊ लागतो, तो इतका सुखी होतो, की त्याच्यातलं प्रेम ओसंडून वाहू लागतं, ते इतरांपर्यंत पोहोचू लागतं. तुम्ही प्रेम जगत असाल, तर तुम्हाला ते वाटून घ्यावं लागेलच. तुम्ही काही कायम स्वत:वर प्रेम करत बसणार नाही. कारण, तुमच्या लक्षात येतं, एका माणसावर, म्हणजेच स्वत:वर प्रेम करणं इतकं आनंददायी आणि सुंदर आहे, तर हे प्रेम अनेकांसोबत वाटू घेतल्यावर केवढा मोठा आनंद मिळेल!

हे प्रेमाचे तरंग हळूहळू पुढे जात राहतात. तुम्ही दुसऱ्या लोकांवर प्रेम करू लागता; मग तुम्ही प्राणी, पक्षी, झाडं आणि खडकांवर प्रेम करू लागता. तुम्ही सगळं विश्व प्रेमाने भरून टाकू शकता. अवघं विश्व प्रेमाने भरून टाकण्यासाठी एक व्यक्ती पुरेशी आहे. एक छोटासा खडा तलावात तरंग उमटवण्यासाठी पुरेसा असतो, तसंच.

स्वत:वर प्रेम करणाऱ्या माणसासाठी ध्यानमग्न होणं सोपं असतं, कारण ध्यान म्हणजे स्वत:सोबत असणं. जर तुम्ही स्वत:चा तिरस्कार करत असाल, जो तुम्ही करताच, कारण तुम्हाला तसं शिकवलं गेलंय आणि तुम्ही त्याचं कसोशीने पालन करता- जर तुम्ही स्वत:चा तिरस्कार कराल, तर तुम्ही स्वत:सोबत राहू कसे शकाल? ध्यान म्हणजे स्वत:च्या एकटेपणातल्या सौंदर्याचा आनंद लुटणं आणि स्वत:चं अस्तित्व साजरं करणं. जगातला सर्वात मोठा चमत्कार म्हणजे तुम्ही आहात आणि मी आहे हा. या महान चमत्काराची द्वारं ध्यानामुळे खुली होतात. मात्र, केवळ स्वत:वर प्रेम करणारा माणूस ध्यान करू शकतो; नाहीतर तुम्ही सारखे स्वत:पासून निसटून जात राहता, स्वत:ला टाळत राहता. स्वत:च्या अंधारात कोणाला डोकावायचंय? तुम्ही म्हणजे एक नरक आहात, त्यात कोणाला प्रवेश करावासा वाटेल? तुम्हाला हे सगळं सुंदर फुलांनी झाकून ठेवावंसं वाटतं आणि तुम्ही यापासून दूर जाण्याचा प्रयत्न कायम करत राहता.

म्हणूनच, लोकांना सारखी सोबत हवी असते. ते स्वत:सोबत राहू शकत नाहीत; त्यांना दुसऱ्यांसोबत राहायचं असतं. ते एखाद्या चित्रपटगृहात जाऊन समोर चाललेलं निर्थक काहीतरी बघत राहतील. ते एखादी रहस्यमय कादंबरी वाचण्यात तासच्या तास वाया घालवतील. ते केवळ स्वत:ला गुंतवून ठेवण्यासाठी एकच वर्तमानपत्र पुन:पुन्हा वाचतील. ते वेळ घालवण्यासाठी पत्ते किंवा बुद्धिबळ खेळतील.. जसा काही त्यांच्याकडे अमाप वेळ आहे!

प्रेमाची सुरुवात तुमच्यापासून होते आणि मग ते पसरत जातं. ते स्वत:च्या इच्छेने पसरत जातं; त्यासाठी तुम्हाला काहीच करावं लागत नाही.  सॉक्रेटिस म्हणतो : ‘नो दायसेल्फ’, स्वत:ला जाणून घ्या. बुद्ध म्हणतात : स्वत:वर प्रेम करा आणि बुद्धांचं म्हणणं अधिक खरं आहे. कारण, जोवर तुम्ही स्वत:वर प्रेम करत नाही, तोवर तुम्ही स्वत:ला जाणून घेऊ शकणार नाही- ज्ञान खूप पुढच्या टप्प्यावर येतं, त्यासाठी पाश्र्वभूमी तयार करतं ते प्रेम. प्रेम ही स्वत:ला जाणून घेण्याची शक्यता आहे. प्रेम हा स्वत:ला जाणून घेण्याचा योग्य मार्ग आहे.

‘‘स्वत:वर प्रेम करा. तुमच्याभोवती प्रेमळ ऊर्जा निर्माण करा. तुमच्या शरीरावर आणि मनावरही प्रेम करा. प्रेम करणं म्हणजे काय : जे जसं आहे, तसा त्याचा स्वीकार करणं, काहीच दाबून टाकण्याचा प्रयत्न करू नका. आपण एखाद्या गोष्टीचा तिरस्कार करतो, तेव्हाच ती दडपून ठेवतो. आपण एखाद्या गोष्टीच्या विरोधात असतो, तेव्हाच ती दडपून ठेवतो. काहीच दाबून ठेवू नका, कारण तुम्ही दाबून ठेवलंत तर तुम्ही पाहणार कसे? आपण शत्रूच्या डोळ्यांत डोळे घालून बघू शकत नाही, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्या डोळ्यांत बघू शकतो. तुम्ही स्वत:वर प्रेम करत नसाल, तर स्वत:च्या डोळ्यात बघू शकणार नाही, स्वत:च्या चेहऱ्याकडे बघू शकणार नाही, स्वत:च्या वास्तवाकडे बघू शकणार नाही.

पाहणं म्हणजे ध्यान आहे. बुद्धांनी ध्यानाला ‘पाहणं’ हा शब्द दिला आहे. ते म्हणतात: जागृत राहा, सावध राहा, बेसावध राहू नका. झोपेत असल्यासारखं वागू नका. यंत्रासारखं काम करत राहू नका. लोक असंच काम करत राहतात.  पाहा- केवळ पाहा. काय पाहायचं आहे हे बुद्ध सांगत नाहीत- सगळं पाहा! तुमच्या चालण्याकडे पाहा, खाण्याकडे पाहा. आंघोळ करत असताना पाण्याकडे पाहा, थंड पाणी तुमच्या अंगावर पडतंय, त्या पाण्याचा स्पर्श, त्याचा थंडपणा, तुमच्या शरीरातून त्यामुळे जाणारी शिरशिरी- सगळं काही पाहा, ‘आज, उद्या, कायम’. एक क्षण असा येतो की तुम्ही तुमची निद्राही बघू शकता. ते अंतिम पाहणं असतं. शरीर झोपी जातं आणि पाहणारा तरीही जागा असतो, तो गाढ झोपलेल्या शरीराकडे शांतपणे बघत असतो. सध्या जे घडतंय ते याच्या पूर्णपणे उलट आहे: तुमचं शरीर जागं आहे आणि तुम्ही झोपेत आहात. मात्र, त्या परिस्थितीत तुम्ही जागे असाल आणि तुमचं शरीर झोपी जाईल. शरीराला विश्रांतीची गरज भासते, पण तुमच्या जाणिवेला झोपेची गरज नाही. हा सावधपणा आहे आणि तो त्याचा स्वभाव आहे.

तुमचं आत्मभान जसं वाढत जाईल, तसे तुम्हाला पंख येतील- मग तर अवघं आकाश तुमचं आहे. मनुष्य म्हणजे काय? तो तर पृथ्वी आणि आकाशाचं मिलन आहे, शरीर आणि आत्म्याचं मिलन आहे.

ओशो, द धम्मपदा: द वॉक ऑफ बुद्धा, खंड ५, टॉक #५

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

www.osho.com

First Published on September 22, 2018 1:01 am

Web Title: article from book the dhammapada the way of the buddha by osho
Next Stories
1 श्वास: एका नवीन मितीकडे नेणारं द्वार
2 संयमन
3 योग्य निद्रा
Just Now!
X