पैशाचा संबंध तुमच्या अंतरंगांशी, तुमच्या मनाशी, तुमच्या वृत्तींशी आहे.  पैसा केवळ चलनी नोटांपुरता मर्यादित नाही; तसं असतं तर गोष्टी खूप सोप्या झाल्या असत्या.

पैसा हा एक संवेदनशील विषय आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की समृद्धी म्हणजे श्रीमंत असणं, संपत्ती असणं, भरपूर पैसा असणं आणि त्या पैशाचं प्रदर्शन करणं. त्यांना वाटतं की समृद्धी म्हणजे काहीतरी बाहेरची गोष्ट आहे. मात्र आता बऱ्याच जणांना समजू लागलंय की आतल्या श्रीमंतीशिवाय, बाहेरच्या श्रीमंतीला फारसा अर्थ नाही.

मला लोक विचारतात : ‘‘पैसा म्हणजे काय आणि बहुतेक लोक या पैशांबाबत कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रचंड अवघडलेले का असतात?’’

‘‘हा प्रश्न तसा नाजूकच आहे. कारण पैसा म्हणून जे आपल्याला दिसतं, तो पैसा नाहीये. पैशाची मुळं खूप खोल आहेत. पैसा म्हणजे बाहेर दिसणाऱ्या चलनी नोटा नव्हे. त्याचा संबंध तुमच्या अंतरंगांशी, तुमच्या मनाशी, तुमच्या वृत्तींशी आहे. पैसा म्हणजे तुम्हाला वस्तूंबद्दल वाटणारं प्रेम; पैसा म्हणजे तुमचं माणसांपासून दूर जाणं; पैसा म्हणजे तुम्हाला मृत्यूपासून दूर ठेवणारी सुरक्षितता; पैसा म्हणजे तुमचा आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आणि अशा हजारो गोष्टी. पैसा केवळ चलनी नोटांपुरता मर्यादित नाही; तसं असतं तर गोष्टी खूप सोप्या झाल्या असत्या.

‘‘पैसा म्हणजे तुमचं प्रेम आहे – वस्तूंबद्दलचं प्रेम, माणसांबद्दलचं नव्हे. वस्तूंबद्दल वाटणारं प्रेम सगळ्यात सोयीचं. कारण वस्तू निर्जीव असतात. तुम्ही त्या सहज मिळवू शकता. तुम्ही एक मोठं घर घेऊ शकता, राजवाडा घेऊ शकता- तुम्ही सर्वात मोठय़ा राजवाडय़ाची मालकीही मिळवू शकता- पण तुम्ही एका छोटय़ात छोटय़ा बाळाची मालकी नाही मिळवू शकत. छोटी मुलंही नकार देऊ शकतात, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढू शकतात. एक छोटं मूल, मग ते कितीही छोटं असू दे, त्याच्यावर मालकी मिळवू इच्छिणाऱ्या माणसासाठी घातक ठरू शकतं. ते बंडखोर होईल आणि बंड करेल पण ते कोणालाही स्वत:वर मालकी मिळवू देणार नाही.

जे लोक बाकीच्या लोकांवर प्रेम करू शकत नाही, ते पैशावर प्रेम करू लागतात. कारण पैसा म्हणजे सर्व काही मिळवण्याचं माध्यम. ‘‘तुमच्याजवळ जेवढा जास्त पैसा, तेवढय़ा जास्त वस्तू तुम्ही प्राप्त करू शकता आणि तेवढं जास्त तुम्ही लोकांना विसरून जाऊ शकता. तुमच्याकडे खूप वस्तू असतील पण त्यामुळे तुम्हाला संतोष प्राप्त होणार नाही. कारण खोल संतोष, समाधान तेव्हाच मिळतं, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता. पैसा काही बंड वगैरे करणार नाही पण तो प्रतिसादही देणार नाही. तीच तर अडचण आहे.

‘‘म्हणूनच कंजूष माणसं खूप कुरूप होऊन जातात. त्यांच्या प्रेमाला कधी कोणाचा प्रतिसादच मिळत नाही. तुमच्यावर प्रेमाचा वर्षांव झाला नाही, तर तुम्ही सुंदर कसे असू शकाल, तुमच्यावर फुलांप्रमाणे प्रेमाचा वर्षांव झाला नाही, तर तुम्ही कसले सुंदर? तुम्ही कुरूपच होऊन जाणार. तुम्ही बंद होऊन जाता. जो माणूस पैसा राखतो किंवा पैसा राखण्याचा प्रयत्न करतो, तो कंजूष असतो आणि त्याला लोकांची कायम भीती वाटत राहते. कारण लोक त्याच्या जवळ आले तर कदाचित ते त्याचा पैसा वाटून घेतील. त्याने एखाद्याला आपल्या जवळ येऊ दिलं, तर त्याच्यासोबत पैसा वाटून घ्यावा लागेलच.

‘‘जे लोक वस्तूंवर प्रेम करतात, ते वस्तूंसारखेच होत जातात- निर्जीव, बंद. त्यांच्यात कशामुळेच कंपनं निर्माण होत नाहीत, त्यांच्यातलं काहीच नृत्य करत नाही किंवा गाणंही गात नाही; त्यांच्या हृदयाचे ठोके तर चुकलेलेच असतात. ते एक यांत्रिक आयुष्य जगतात. ते फरफटले जातात, ओझं घेऊन जगतात. बऱ्याच गोष्टींचं ओझं त्यांच्यावर असतं. त्यांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसतं, कारण स्वातंत्र्य मिळतं ते प्रेमामुळे. तुम्ही तुमच्या प्रेमाला स्वातंत्र्य दिलं तर आणि तरच प्रेम तुम्हाला स्वातंत्र्य देतं.’’

‘‘ज्या लोकांना प्रेमाची भीती वाटते, त्यांना त्यांच्या पैशाबद्दल स्वामीत्वाची तीव्र भावना असते. प्रेम करणाऱ्यांमध्ये मालकी हक्काची भावनाच नसते, पैसा त्यांच्यासाठी फारसा महत्त्वाचा नसतो. तो असला तरी ठीक आहे, त्याचा वापर करता येईल. तो नसला तरी ठीकच आहे. कारण प्रेम हे असं राज्य आहे, जे कोणत्याही पैशाने विकत घेताच येत नाही. प्रेम हे खोल समाधान आहे. तुम्ही रस्त्यावरचे भिकारी असलात, तरी तुमच्या हृदयात प्रेम असेल तर तुम्ही गाणं म्हणू शकता. तुम्ही कोणावर तरी प्रेम केलं असेल आणि तुमच्यावरही कोणी प्रेम केलं असेल, तर प्रेम तुम्हाला मुकुट घालतं, राजा करतं. पैसा तुम्हाला केवळ कुरूप बनवतो.

मी पैशाच्या विरोधात नाही. मी असं अजिबात म्हणत नाही की, जा आणि सगळा पैसा फेकून द्या. कारण ते दुसरं टोक आहे. हीदेखील एका कोत्या मनाने केलेली अखेरची कृती आहे. ज्या माणसाने पैशामुळे खूप काही सहन केलं आहे, जो पैशाला चिकटून राहिला आणि त्याने कोणावरच प्रेम केलं नाही, कोणालाही जवळ येऊ  दिलं नाही, त्याला अखेरीस इतकं वैफल्य येतं की तो पैसा फेकून देतो, संन्यास घेतो आणि हिमालयात जातो. या माणसालाही काही समजलेलंच नाहीये. तुम्हाला समजलं, तर पैशाचा वापर होऊ शकतो. हे न समजणारे लोक एकतर कंजूष असतात- कारण ते पैशाचा वापरच करत नाहीत किंवा मग ते एकदम पैशाचा त्यागच करतात. हेही त्याच वृत्तीतून येतं. आता ते वापरण्याचा काही प्रश्नच येत नाही; ते सर्वत्याग करतात आणि निसटून जातात. पण ते पैसा वापरू शकत नाहीतच, कारण त्यांना तो वापरण्याचीच भीती वाटते.’’

ओशो, लिव्हिंग ताओ, टॉक #६

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन/ ओशो  टाइम्स इंटरनॅशनल / http://www.osho.com

 भाषांतर – सायली परांजपे