News Flash

व्यक्तिमत्त्व म्हणजे संपूर्णत्व!

बुद्धीचा समतोल प्रेमाने साधला पाहिजे आणि प्रेमाचा तोल राखण्यासाठी बुद्धीचा उपयोग केला पाहिजे.

व्यक्तिमत्त्व म्हणजे संपूर्णत्व आहे; त्याचे भाग करताच येत नाहीत. खरं तर संपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणजे एक फुलणारी ऊर्जा आहे. ही ऊर्जा तर्काच्या मार्गाने वापरली जाते तेव्हा तिची बुद्धी होते आणि ती तर्काच्या मार्गाने न नेता भावनेच्या वाटेने नेली, तर तिचं हृदय होतं. या दोन स्वतंत्र बाबी असल्या; तरीही हे एकाच ऊर्जेचं दोन निराळ्या वाहिन्यांतून वाहणं आहे.

माझ्यासारखे लोक बुद्धीचा खूप वापर करतात, इतका की आम्ही आयुष्याकडे केवळ बुद्धीच्या दृष्टिकोनातूनच बघू लागतो आणि पर्यायाने आयुष्याकडे बघण्याच्या अन्य मार्गावर फुलीच मारून टाकतो. यामुळे आयुष्य कंटाळवाणं आणि निरस होत जातं, त्याची चमकच हरवून जाते.

मात्र, खरी समस्या बुद्धिमत्तेचा अतिवापर करणं ही नाहीच आहे, खरी समस्या आहे ती म्हणजे भावनांचा वापर न करणं. आपल्या नागरीकरणामध्ये भावनेला पूर्णपणे मोडीतच काढण्यात आलंय, त्यामुळे मग समतोल हरवतो आणि एकांगी व्यक्तिमत्त्व विकसित होतं. भावनांचाही उपयोग केला, तर असा असमतोल होणार नाही.

भावना आणि बुद्धीचा समतोल योग्य प्रमाणात राखला गेला पाहिजे; नाही तर संपूर्ण व्यक्तिमत्त्व आजारी होऊन जातं. हे केवळ एकच पाय वापरण्यासारखं आहे. तुम्ही भले तो पाय वापरत राहाल, पण तो तुम्हाला कुठेच घेऊन जाणार नाही. तुम्ही थकून तेवढे जाल. दुसरा पायही वापरलाच पाहिजे. भावना आणि बुद्धी दोन पंखांसारख्या आहेत: केवळ एकीचाच वापर झाला, तर त्याची परिणती केवळ वैफल्यात होईल. हे दोन्ही पंख एकाचवेळी, समतोल आणि सौहार्दाने वापरल्यामुळे, मिळतात ती वरदानं, मग कधीच प्राप्त होणार नाहीत.

बुद्धीचा अतिवापर होतोय अशी भीती कधीच बाळगू नका. तुम्ही बुद्धीचा वापर करता तेव्हा तुमच्या आत कधी स्पर्श होतो का? केवळ तुमच्या क्षमता उद्दिपित होतात. बुद्धीचं काम करत आहात याचा अर्थ तुमची बुद्धिमत्ता उपयोगात आणली जात आहे असं नाही. बुद्धीचं काम केवळ वरवरचं असतं. त्याचा तुमच्या आतमध्ये स्पर्श होत नाही, कशालाच आव्हान दिलं जात नाही. यातून कंटाळा निर्माण होतो; कोणत्याही आनंदाशिवाय करण्याचं काम निर्माण होतं. तुमच्या व्यक्तित्वाला आव्हान दिलं जातं आणि तुम्हाला या आव्हानाला प्रतिसाद म्हणून स्वत:ला सिद्ध करावं लागतं, तेव्हाच त्यातून आनंद निर्माण होतो. बुद्धी किंवा भावना दोघींनाही आव्हान मिळालं की त्या व्यक्तीला काहीतरी वरदान देऊन जातात.

एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा केवळ एक भाग काम करत असतो आणि दुसरा मृतवत झालेला असतो, तेव्हा तिला स्किझोफ्रेनिया झाला आहे, असं म्हणतात. अशा परिस्थितीत काम करू शकणारा भागही नीट काम करणार नाही, कारण त्याच्यावर जास्तीचा भार आहे. व्यक्तिमत्त्व म्हणजे संपूर्णत्व आहे; त्याचे भाग करताच येत नाहीत. खरं तर संपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणजे एक फुलणारी ऊर्जा आहे. ही ऊर्जा तर्काच्या मार्गाने वापरली जाते तेव्हा तिची बुद्धी होते आणि ती तर्काच्या मार्गाने न नेता भावनेच्या वाटेने नेली, तर तिचं हृदय होतं. या दोन स्वतंत्र बाबी झाल्या; तरीही हे एकाच ऊर्जेचं दोन निराळ्या वाहिन्यांतून वाहणं आहे.

जर केवळ हृदय असेल, बुद्धी नसेलच तर तुम्ही कधीच आरामात राहू शकणार नाही. आरामात राहणं म्हणजे काय तर तुमच्यातल्या त्याच ऊर्जेला एका वेगळ्या वाहिनीद्वारे वाहू देणं. आरामात राहणं म्हणजे काहीच काम करणं असं मुळीच नाही. आराम म्हणजे वेगळ्या अंगाने काम करणं. त्यामुळे मग ताण आलेल्या अंगाला विश्रांती मिळते.

सतत बुद्धीच्या पाठीमागे जाणाऱ्या व्यक्तीलाही कधीच आराम मिळत नाही. तो त्याची ऊर्जा दुसऱ्या अंगाला वळवतच नाही, त्यामुळे त्याचं मन काही गरज नसताना एकाच दिशेने काम करत राहतं. त्यातून कंटाळा निर्माण होतो. अधिकाधिक विचार येत-जात राहतात; ऊर्जा विचलित होते व वाया जाते. तो याचा आनंद घेऊ शकत नाही, उलट अनावश्यक ताणामुळे तो निराश होतो, वैतागून जातो. अर्थात यात मनाची किंवा बुद्धीची काही चूक नाही. हे होतं ते पर्यायी मार्ग न पुरवल्यामुळे, दुसरं कोणतंच दार न उघडलं गेल्यामुळे. ऊर्जा तुमच्या आतच वर्तुळाच्या आकारात फिरत राहते.

ऊर्जा कधीच साचून राहू शकत नाही. ऊर्जेचा अर्थच मुळी जे साचलेलं नाही, प्रवाही आहे असं काहीतरी. आराम म्हणजे ऊर्जा निष्क्रिय राहणं किंवा निद्रिस्त राहणं नव्हे; शास्त्रीयदृष्टय़ा आराम म्हणजे ऊर्जा दुसऱ्या वाहिनीद्वारे, दुसऱ्या अंगाने वाहणं. ऊर्जेने दुसऱ्या दालनात प्रवेश करणं.

मात्र, दालन वेगळं असलं तरी तुम्ही पूर्वी होतात त्या दालनाच्या पूर्णपणे विरुद्ध नसेल, तर मनाला आराम मिळणारच नाही. उदाहरणार्थ, तुम्ही काही शास्त्रीय समस्येवर काम करत आहात तर कादंबरी वाचूनच तुम्हाला आराम मिळेल. हे काम वेगळं आहे: एखाद्या शास्त्रीय समस्येवर काम करणं म्हणजे खूप क्रियाशील राहणं- हा खूपच रांगडा मार्ग झाला. तर कादंबरी वाचण्यात तुम्ही प्रत्यक्ष काही करत नाही. हा झाला हळुवार मार्ग. तुमचं मन तेच असलं, तरी तुम्हाला विश्रांती मिळेल, कारण आता तुमच्या मनाच्या विरुद्ध ध्रुव उपयोगात आणला जातोय. तुम्ही कशाचंही उत्तर शोधत नाही आहात; तुम्ही सक्रिय नाही आहात; तुम्ही केवळ स्वीकार करत आहात, काहीतरी ग्रहण करत आहात. तुम्ही मनाचा विरुद्ध ध्रुव उपयोगात आणला आहे.

त्याचप्रमाणे आपण प्रेम करतो, तेव्हाही त्यात बुद्धी कुठेच येत नाही. त्याच्या पूर्णपणे विरुद्ध असं घडतं: तुमच्या व्यक्तिमत्त्वातला अतार्किक भाग तेव्हा काम करत असतो. बुद्धीचा समतोल प्रेमाने साधला पाहिजे आणि प्रेमाचा तोल राखण्यासाठी बुद्धीचा उपयोग केला पाहिजे. सामान्यपणे, असा समतोल कुठे दिसून येत नाही.

जर कोणी प्रेमात असेल आणि म्हणून बुद्धीच्या सगळ्या कामांकडे दुर्लक्ष करत असेल, तर यातूनही कंटाळाच जन्माला येईल. दिवसाचे २४ तास करत राहिलात, तर प्रेमाचाही ताण वाटू लागतो. एकदा का त्यातलं आव्हान संपलं की आनंदही हरवून जातो: त्यातली मजा निघून जाते आणि ते केवळ काम होऊन जातं. व्यक्तिमत्त्वाच्या भावनिक बाजूकडे दुर्लक्ष करणाऱ्या बुद्धिवंतासोबतही हेच होतं.

या दोन्ही भागांमध्ये, या दोन्ही टोकांमध्ये समतोल राखता आला पाहिजे, तेव्हाच एक एकात्मिक आणि वेगळे व्यक्तिमत्त्व असलेला मानव जन्माला येतो.

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 1:01 am

Web Title: article from osho book 2
Next Stories
1 अस्तित्व
2 रिक्तता..
3 प्रेम द्या!
Just Now!
X