28 January 2020

News Flash

दु:खांशी मैत्री करा

तुम्हाला दु:खी वाटतंय का? त्या दु:खाशी मैत्री  करा. दु:खालाही अस्तित्व असतं. त्याच्यावर प्रेम करा.

(संग्रहित छायाचित्र)

तुम्हाला दु:खी वाटतंय का? त्या दु:खाशी मैत्री  करा. दु:खालाही अस्तित्व असतं. त्याच्यावर प्रेम करा. दु:ख सुंदर असतं! खरंतर दु:खच तुम्हाला खोली देतं. दु:खाची सोबत करा, मग ते तुम्हाला अगदी आतल्या गाभ्यापर्यंत घेऊन जाईल. तुम्ही त्या दु:खावर स्वार होऊ शकता. तुम्हाला तुमच्या अस्तित्वाबद्दल पूर्वी कधीच माहीत नव्हत्या अशा काही नवीन गोष्टी कळून घेता येतील. तुम्हीच तुम्हाला नव्याने सापडाल.

मनात कुठेतरी, कसलीशी भीती असते. ती मला आक्रसून टाकते, दु:खी करते, उतावीळ करते, संतप्त करते आणि निराश वाटायला भाग पाडते. हे सगळं इतक्या सूक्ष्म पातळीवर होत असतं की मला त्याचा म्हणावा असा स्पर्शही होत नाही. मी याकडे अधिक स्पष्टपणे कसा बघू शकेन? असा अनेकांचा प्रश्न असतो.

खरं सांगायचं तर दु:ख, उतावळेपणा, क्रोध, निराशा, चिंता, मनस्ताप, खेद या सगळ्या भावनांबाबत एकच समस्या असते, ती म्हणजे तुम्हाला या भावनांपासून सुटका हवी असते, पण हाच अडथळा आहे. तुम्हाला या भावना सोबत घेऊनच जगावं लागतं. त्याला कोणताही पर्याय नाही. तुम्ही निसटून जाऊ शकत नाही. आयुष्याशी एकरूप झालेल्या अनेक घटना, प्रसंग येतच असतात. ती आयुष्यातली आव्हानं आहेत. त्यांना स्वीकारा.

या भावना म्हणजे वेगळ्या रूपात मिळालेली वरदाने आहेत. तुम्ही त्यांच्यापासून दूर पळायचा प्रयत्न केलात, तुम्हाला त्यांच्यापासून सुटका करून घ्यावीशी वाटली तर समस्या निर्माण होतात. कारण, जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीपासून सुटका हवी असते, तेव्हा तुम्ही या गोष्टीकडे थेट बघत नाही. मग अशी गोष्ट तुमच्यापासून स्वत:ला लपवू लागते, कारण, तुम्ही तिची निंदा करता; मग ती तुमच्यात अजाणतेपणी खूप खोल जाऊन बसते, तुमच्या अस्तित्वाच्या सर्वात काळोख्या कोपऱ्यात जाऊन बसते. तुम्ही शोधूही शकणार नाही अशा ठिकाणी जाऊन बसते. तुमच्या अस्तित्वाच्या तळघरात ती गोष्ट लपून बसते. आणि अर्थातच ती जेवढी अधिक खोल जाते, तेवढा जास्त त्रास देतो- कारण अशा परिस्थितीत ही गोष्ट तुमच्या अस्तित्वाच्या अज्ञात कोपऱ्यातून आपले काम सुरू करते आणि तुम्ही पुरते असहाय होऊन जाता.

त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात ठेवा: कधीच काही दडपू नका. जे काही असेल ते असू द्या. ते स्वीकारा आणि समोर येऊ द्या. खरं तर नुसतं ‘दडपू नका’ म्हणणंही पुरेसं नाही. मी तर म्हणेन ‘त्याच्याशी मैत्री  करा.’ तुम्हाला दु:खी वाटतंय का? त्या दु:खाशी मैत्री  करा. त्याच्याकडे अनुकंपेने बघा. दु:खालाही अस्तित्व असतं. त्याला तुमच्याजवळ येऊ द्या, छातीशी कवटाळा, त्याच्यासोबत बसा, त्याचा हात धरा. मैत्री ने वागा. त्याच्यावर प्रेम करा. दु:ख सुंदर असतं! त्यात चुकीचं असं काहीच नाही. दु:खी असणं चुकीचं आहे हे कोणी सांगितलं तुम्हाला? खरंतर दु:खच तुम्हाला अनुभवांची खोली देतं. विचारांची प्रगल्भता देते. हास्य उथळ असतं; आनंद तुमच्या त्वचेमध्ये शिरेल एवढाच खोल जाऊ शकतो. दु:ख मात्र प्रत्येक हाडापर्यंत जातं, हाडाच्या मगजातही शिरतं. दु:खाइतकं खोलवर दुसरं काहीच पोहोचू शकत नाही. पण तेच तुम्हाला आयुष्यातल्या आनंदाचा अर्थही समजून देतं.  दु:ख माणसाला अनुभव देतं, शिकवतं.

तेव्हा काळजी करू नका. दु:खाची सोबत करा, मग ते तुम्हाला अगदी आतल्या गाभ्यापर्यंत घेऊन जाईल. तुम्ही त्या दु:खावर स्वार होऊ शकता. तुम्हाला तुमच्या अस्तित्वाबद्दल पूर्वी कधीच माहीत नव्हत्या अशा काही नवीन गोष्टी कळून घेता येतील. या गोष्टी केवळ दु:खी मन:स्थितीतच उघड होऊ शकतात. तुम्ही आनंदी असताना त्या कधीच कळणार नाहीत. काळोख तर चांगलाच असतो, नुसता चांगलाच नाही तर दैवी असतो. अस्तित्वाचा काही केवळ दिवस नसतो, रात्रही असतेच. मी या दृष्टिकोनाला

धार्मिक म्हणतो.

जी व्यक्ती दु:खात संयम राखू शकते,  दु:खातही विवेकी रहाते. तिला एका सकाळी अचानक लक्षात येतं की कुठल्यातरी अज्ञात स्रोतातून आनंदाचा झरा वाहू लागला आहे. हा अज्ञात स्रोत ईश्वरी आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने दु:ख भोगलं असेल तर तुम्ही हा आनंद प्राप्त केला आहे; तुम्ही निराशा, हताशा, दु:ख, खंत यांचा नरक खऱ्या अर्थाने जगला असाल, तर आता तुम्ही स्वर्ग प्राप्त केला आहे. तुम्ही त्यासाठी किंमत मोजली आहे. आणि त्यानंतर मिळणारा आनंद अलौकिक असतो.

आयुष्याला तोंड द्या. आयुष्याचा सामना करा. कठीण क्षण येणारच आहेत, पण एक दिवस तुमच्या लक्षात येईल की या कठीण क्षणांचा तुम्ही सामना केलात म्हणून तुम्हाला त्यातून बळ मिळालं. ते कठीण क्षण तुम्हाला बळ देण्यासाठीच आले होते. तुम्ही जेव्हा त्या क्षणांमधून जात असता, तेव्हा ते खूप खडतर वाटतात, पण नंतर तुम्ही मागे वळून त्या क्षणांकडे बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या क्षणांनी तुमचं अस्तित्व अधिक दृढ केलं आहे. ते क्षण आले नसते, तर तुम्ही इतके एकाग्र झाला नसतात, एवढे ठाम उभे राहू शकला नसतात.  एवढे कणखर बनले नसता.

जगभरातले प्राचीन धर्म दडपून टाकण्यावर आधारित होते; भविष्यकाळातील नवा धर्म हा व्यक्तिकरणाचा असेल. आणि मी हाच नवा धर्म शिकवतो. व्यक्त होणं हा तुमच्या आयुष्यातला सर्वात मूलभूत नियम करून टाका. तुम्हाला त्यामुळे सहन करावं लागलं, तर सहन करा. तुम्ही कधीही काहीही गमावणार नाही. या सहन करण्यामुळे तुमची आयुष्याचा आनंद लुटण्याची क्षमता वाढत जाईल, आयुष्याचा हर्षोत्सव साजरा करण्याचं सामर्थ्य वाढत जाईल.

ओशो, द आर्ट ऑफ डाइंग, टॉक #१

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

First Published on November 17, 2018 3:13 am

Web Title: article from osho book osho the art of dying
Next Stories
1 कसं वागायचं सत्य की असत्य?
2 रागाचं मानसशास्त्र
3 निशब्द व्हा!
Just Now!
X