13 August 2020

News Flash

क्रोधाचे घोडे

जेव्हा जेव्हा तुमच्यात काही तरी उगवतं, तेव्हा तेव्हा ती शुद्ध ऊर्जेचा अनुभव घेण्याची मोठी संधी असते.

जेव्हा तुम्हाला राग येतो, तेव्हा तो काही तुमचा जीव घेत नाही. तुम्हाला यापूर्वी येऊन गेला होता, तोच हा क्रोध आहे. फक्त एक गोष्ट नव्याने करा- तुम्ही ती पूर्वी केलेली नाही. तुम्ही नेहमी त्या रागाशी भिडता, भांडता. या वेळी फक्त बघत राहा, जसा काही तो तुम्हाला आलेला राग नाहीच, दुसऱ्याच कोणाला आलेला राग आहे. आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल; तो राग काही क्षणांत नाहीसा होईल.

उत्कट भावनेच्या भरात मी स्वत:ला   भानावर कसा ठेवू? राग आला की माझ्यात हजारो जंगली घोडे धावताहेत असं काहीसं वाटतं! हा प्रश्न मला विचारला जातो. त्यावर उत्तर म्हणजे, राग ही खूप छोटी गोष्ट आहे. तुम्ही थोडं थांबलात आणि बघितलंत तर तुम्हाला ते ‘हजारो जंगली घोडे’ कुठेच दिसणार नाहीत. आणि हजारो घोडे कशाला हवेत एखादं छोटं गाढव दिसलं तुम्हाला ते पुरेसं होतं! केवळ बघत राहा आणि हे सगळं हळूहळू नाहीसं होईल. ते घोडे एका बाजूने आत शिरतील आणि दुसऱ्या बाजूने बाहेर जातील. तुम्हाला केवळ थोडासा संयम बाळगून त्या घोडय़ांवर स्वार होणं टाळायचं आहे. क्रोध, मत्सर, हेवा, हाव, ईष्र्या या आपल्या सगळ्या समस्या खूप छोटय़ा आहेत पण, आपला अहंकार त्यांना मोठा करतो, जेवढय़ा मोठय़ा त्या होऊ शकतील, तेवढं त्यांना फुगवतो. अहंकार दुसरं काही करूच शकत नाही; त्याचा क्रोध मोठाच असला पाहिजे. त्याच्या मोठय़ा क्रोधाने, मोठय़ा दु:खाने, मोठय़ा हावेने, मोठय़ा महत्त्वाकांक्षेनेच तर तो मोठा होतो.

पण तुम्ही म्हणजे तो अहंकार नाही आहात, तुम्ही तर केवळ बघत आहात त्याच्याकडे. फक्त बाजूला उभे राहा आणि ते हजारो घोडे जाताना बघा. त्यांना निघून जाण्यासाठी किती वेळ लागतो ते बघाच. ते जंगली घोडे जसे येतात, तसे निघून जातात. पण आपण एक छोटं गाढवही सोडत नाही; तात्काळ त्याच्यावर स्वार होतो! केवळ एक छोटी गोष्ट आणि आपण क्रोधाने पेटून उठतो. नंतर आपल्यालाच हसू येतं, किती मूर्ख होतो आपण.

जर तुम्ही त्यात न गुंतता नुसतं त्याच्याकडे तटस्थपणे बघू शकत असाल, म्हणजे चित्रपटगृहातल्या पडद्यावर किंवा टीव्हीवर सुरू असलेल्या एखाद्या दृश्याकडे बघाल तसं, तर बघत राहा. काही तरी तुमच्या समोरून जातंय; बघत राहा. तुम्ही काहीही करणं अपेक्षित नाहीये. ते थांबवण्यासाठी, दडपण्यासाठी, नाहीसं करण्यासाठी तलवार उपसण्याची काहीच गरज नाही. कारण, तुम्ही तलवार आणणार कुठून?- जिथून तुम्हाला राग येतो तेथूनच ना! हे सगळं काल्पनिक आहे.

केवळ बघत राहा आणि काहीही करू नका- जे चाललंय त्याच्या बाजूनेही काही करू नका आणि विरोधातही काही करू नका. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जे खूप मोठं वाटत होतं, ते एकदम छोटं होऊन जाईल. पण आपल्याला सवयच असते अतिशयोक्ती करण्याची.

एक छोटा मुलगा घरी पळत येतो आणि आईला सांगतो, ‘‘आई गं, एक भलामोठा सिंह मोठय़ाने गर्जना करत माझ्या मागे लागला होता. मलोन्मल माझ्या मागे धावत होता तो! पण मी कसाबसा निसटून आलो. बरेचदा तो खूप जवळ आला होता. तो माझ्यावर हल्ला चढवणारच इतक्यात मी त्याच्यापासून लांब धावलो.’’

आई त्या मुलाकडे बघते आणि म्हणते, ‘‘बाळा, हजार वेळा सांगते मी तुला, वाढवून चढवून सांगत जाऊ नकोस म्हणून! शहरात सिंह कुठून येणार आणि तो मलोन्मल कसा पळेल तुझ्यामागे? आणि आता कुठे आहे तो सिंह?’’

मुलगा दाराबाहेर बघत म्हणतो, ‘‘तो बघ तिकडे आहे. तो एक छोटा कुत्रा आहे- खूप छोटा! पण तो माझ्या मागे धावत होता ना तेव्हा मला तो सिंहासारखाच वाटला. आणि आई, तू एकीकडे मला सांगतेस वाढवून सांगू नकोस पण तूही तेच करते आहेस ना, तू तरी कुठे मला हजार वेळा सांगितलंस.’’

आपलं मन नेहमीच अतिशयोक्ती करत राहतं. तुम्हाला छोटय़ा समस्या असतात आणि अतिशयोक्ती करणं थांबवलंत तर तुम्हाला दिसेल की दारात उभा आहे तो फक्त एक छोटा, गरीब कुत्रा आहे. आणि मलोन्मल धावायची काही गरजच नाही; तुम्हाला एवढा धोका नक्कीच नाही..

जेव्हा तुम्हाला राग येतो, तेव्हा तो काही तुमचा जीव घेत नाही. त्याने तुमचा ताबा यापूर्वी किती तरी वेळा घेतला आहे आणि तुम्ही त्याच्या तावडीतून सुरक्षित सुटला आहात. तुम्हाला यापूर्वी येऊन गेला होता, तोच हा क्रोध आहे. फक्त एक गोष्ट नव्याने करा- तुम्ही ती पूर्वी केलेली नाही. तुम्ही नेहमी त्या रागाशी भिडता, भांडता. या वेळी फक्त बघत राहा, जसा काही तो तुम्हाला आलेला राग नाहीच, दुसऱ्याच कोणाला आलेला राग आहे. आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल; तो राग काही क्षणांत नाहीसा होईल.

आणि जेव्हा राग कोणत्याही संघर्ष शिवाय नाहीसा होतो, तेव्हा तो एक खूप सुंदर, शांत, प्रेमळ अशी स्थिती मागे ठेवतो. या रागामुळे जी ऊर्जा भांडणातून बाहेर पडली असती, ती तुमच्यातच राहते. शुद्ध ऊर्जेसारखा आनंद दुसरा नाही- विल्यम ब्लेक यांचे अवतरण देतोय. ‘एनर्जी इज डिलाइट’ – केवळ ऊर्जा, कोणतंही नाव नसलेली, विशेषण नसलेली ऊर्जा. पण तुम्ही या ऊर्जेला कधी शुद्ध राहूच देत नाही. तिच्यात कधी क्रोध मिसळता, कधी तिरस्कार, कधी प्रेम, कधी हाव तर कधी इच्छा मिसळता. तुम्ही ती ऊर्जा कधीच शुद्ध राहू देत नाही.

जेव्हा जेव्हा तुमच्यात काही तरी उगवतं, तेव्हा तेव्हा ती शुद्ध ऊर्जेचा अनुभव घेण्याची मोठी संधी असते. केवळ बघत राहा, गाढव निघून जाईल. ते थोडीशी धूळ उडवेल पण ती धूळही आपोआप खाली बसेल; तुम्हाला ती खाली बसवायची गरज नाही. तुम्ही फक्त वाट बघा. थांबून बघत राहा आणि लवकरच तुम्हाला जाणवेल की, तुमच्याभोवती शुद्ध ऊर्जेचं एक कडं तयार झालंय. ही ऊर्जा भांडणात, दडपण्यात किंवा चिडण्यात वापरली गेलेली नाही. आणि ऊर्जा म्हणजे खरोखर आनंद असतो. एकदा का तुम्हाला आनंदाचं रहस्य कळलं की, तुम्ही प्रत्येक भावनेतून आनंद घेऊ लागाल. तुमच्यात उमलणारी प्रत्येक भावना तुम्हाला मोठय़ा संधीसारखी भासेल.

फक्त बघत राहा आणि तुमच्या अस्तित्वावर आनंदाचा शिडकावा होईल. हळूहळू सगळ्या भावना नाहीशा होतील; त्या फारशा येणारच नाही. कारण, त्या काही आमंत्रण दिल्याखेरीज येत नाहीत. लक्ष ठेवणे, दक्ष राहणे, सावध राहणे, जागृत राहणे ही सगळी एकाच गोष्टीची वेगवेगळी नावं आहेत: बघत राहण्याची नावं आहेत. तोच तर कळीचा शब्द आहे.

ओशो, इन्व्हिटेशन, टॉक #४

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

www.osho.com

(सदर समाप्त)

 भाषांतर – सायली परांजपे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2018 3:09 am

Web Title: article from osho book osho world osho talks
Next Stories
1 तुमच्यामधलं तुमचं अस्तित्व
2 रागाला बाहेर काढा
3 पुन्हा एकदा मूल व्हा!
Just Now!
X