रागाचं मानसशास्त्र म्हणजे तुम्हाला काही तरी हवं होतं आणि कोणी तरी ते मिळवण्यात तुम्हाला प्रतिबंध केला. कोणी तरी अडथळा होऊन आलं, तुमचा मार्ग कोंडून टाकला. तुमची संपूर्ण ऊर्जा काही तरी प्राप्त करणार होती आणि कोणी तरी तुमची ऊर्जाच दाबून टाकली. तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं नाही.

आता ही वैफल्यग्रस्त ऊर्जा रागाचं रूप घेते. तुमची इच्छा पूर्ण करण्याची शक्यता नष्ट करणाऱ्या व्यक्तीबद्दल राग निर्माण होतो. तुम्ही रागाचा प्रतिबंध करू शकत नाही, कारण, तो कशासोबत तरी निर्माण झालेला आहे. मात्र, हे बाय-प्रॉडक्ट अस्तित्वातच येणार नाही यासाठी तुम्ही काही करू शकता. आयुष्यात एकच गोष्ट लक्षात ठेवा : कशाचीही इच्छा इतक्या तीव्रतेने करू नका की तो तुमच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न होऊन जाईल. थोडे खेळकर राहा.

cabinet deputy secretary mrunmai joshi guidance for upsc
माझीस्पर्धा परीक्षा :अभ्यास करावा नेटका…
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

इच्छाच करू नका, असं मी म्हणत नाहीये, कारण त्यामुळे तुमच्यातलं काही तरी दाबून टाकलं जाईल. मी म्हणतोय, इच्छा बाळगा पण तुमची इच्छा खेळकर असू द्या. जर तुमची इच्छा पूर्ण झाली तर चांगलंच आहे. जर ती पूर्ण झाली नाही, तर कदाचित ती वेळ योग्य नव्हती; आपण पुढल्या वेळी बघू. खेळाडूंच्या कलेपासून काही तरी शिका.

आपण इच्छेशी इतके तादात्म्य पावतो की, जेव्हा पूर्ण होत नाही किंवा तिच्या मार्गात अडथळे येतात, तेव्हा आपल्यातल्या ऊर्जेची आग होऊन जाते; आणि ती आपल्यालाच जाळते. आणि या जवळपास वेडेपणाच्या स्थितीत तुम्ही काहीही करू शकता. त्याचा तुम्हाला नंतर पश्चात्ताप होतो. यातून घटनांची एक मालिका तयार होऊ शकते आणि त्यात तुमची सगळी ऊर्जा गुंतून जाते. म्हणूनच हजारो वर्षे सगळे म्हणत आले आहेत की- इच्छा करू नका. पण असे म्हणणे अमानुष आहे. ‘निरिच्छ व्हा’ असे सांगणारे लोकही तुम्हाला एक प्रेरणा, इच्छा देतात; जर तुम्ही निरिच्छ झालात, तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. हीदेखील एक इच्छाच झाली.

तुम्ही एखाद्या मोठय़ा इच्छेसाठी छोटी इच्छा दाबता आणि ती इच्छा करणारे तुम्हीच होतात हे विसरून जाता. तुम्ही तर केवळ उद्दिष्ट बदलले आहे. मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांची संख्या खूप नाहीये हे तर नक्की. तेव्हा तुम्हाला फारशी स्पर्धा नसेल. खरे तर, तुम्ही मोक्षाच्या दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करताय हे कळले तर लोकांना आनंद होईल- आयुष्यातला एक स्पर्धक कमी झाला. पण तुमचा विचार केलात, तर काहीच बदललेले नाही. आणि तुमच्या मोक्षप्राप्तीच्या इच्छेत काही अडथळा आला, तर क्रोध पुन्हा उफाळून येईलच. आणि हा राग खूप मोठा असेल, कारण इच्छा खूप मोठी आहे. राग नेहमीच इच्छेच्या प्रमाणात निर्माण होतो.

एका जंगलात तीन प्रार्थनास्थळे एकमेकांपासून अगदी जवळ होती. एक दिवस तिन्ही धर्मगुरू रस्त्यात एकमेकांना भेटले. ते सगळे वेगवेगळ्या खेडय़ांतून परत त्यांच्या प्रार्थनास्थळांकडे निघाले होते; प्रत्येकाचे प्रार्थनास्थळ वेगळे होते. ते थकलेले होते. ते झाडाखाली बसले आणि वेळ घालवण्यासाठी काही तरी बोलू लागले.

एक म्हणाला, ‘‘एक गोष्ट तुम्हाला स्वीकारावीच लागेल. विद्वत्ता आणि अध्ययनाच्या बाबतीत आमचे प्रार्थनास्थळ सर्वोत्तम आहे.’’ दुसरे धर्मगुरू म्हणाले, ‘‘मी सहमत आहे. तुमचे लोक खूप विद्वान आहेत पण साधेपणा, शिस्त, आध्यात्मिक शिक्षण यांच्याबाबतीत तुम्ही आमच्या जवळपासही फिरकू शकत नाही. आणि लक्षात घ्या, सत्याच्या आकलनात तुम्हाला विद्वत्तेचा उपयोग होणार नाही. यासाठी हवी ती आध्यात्मिक शिस्त आणि त्याबाबतीत आम्हीच सर्वोत्तम आहोत.’’

तिसरे धर्मगुरू म्हणाले, ‘‘तुमचे दोघांचेही बरोबर आहे. पहिले प्रार्थनास्थळ अध्ययन, विद्वत्तेमध्ये सर्वोत्तम आहे. दुसरे आध्यात्मिक शिस्त, साधेपणा, व्रत यांसाठी सर्वोत्तम आहे. पण नम्रता, अहंकाराचा स्पर्शही नसणे याबाबत आम्ही सर्वात पुढे आहोत.’’

नम्रता, अहंकारापासून मुक्ती.. शक्य आहे, पण हा मनुष्य काय म्हणाला हे त्याचे त्यालाही कळलेले नाही : ‘‘नम्रता आणि अहंकारापासून मुक्ती याबाबत आम्ही सर्वात पुढे आहोत. नम्रपणाचाही अहंकार होऊ शकतो. अहंकारापासून सुटकेची भावना तुम्हाला अहंकाराच्या मार्गावर नेऊ शकते. येथे प्रत्येकाने खूप दक्ष राहिले पाहिजे. तुम्ही राग दाबून टाकू नका. तुम्ही तो कोणत्याही मार्गाने नियंत्रितही करू नका. कारण, असे केलेत तर तो तुम्हालाच जाळत जाईल, तुम्हाला नष्ट करून टाकेल. मी काय म्हणतोय : तुम्हाला मुळापाशी गेले पाहिजे. हे मूळ म्हणजे नेहमी कोणती तरी इच्छा असते. तिच्या मार्गात अडथळे निर्माण झालेले असतात आणि त्या वैफल्यातून क्रोध निर्माण झालेला असतो. इच्छांना फार गांभीर्याने घेऊ नका. काहीच फार गांभीर्याने घेऊ नका.

मी जुनद या एका सुफी द्रष्टय़ाबद्दल ऐकले आहे. तो दररोज संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये जीवनाचे आभार मानायचा. जीवन दाखवत असलेल्या अनुकंपेबद्दल, प्रेमाबद्दल, काळजीबद्दल. एकदा ते सगळे तीन दिवस प्रवास करीत होते. तिन्ही दिवस ते ज्या खेडय़ांवरून गेले, तिथल्या लोकांच्या मनात जुनदबद्दल फार राग होता, कारण, त्याची शिकवण मोहम्मदांच्या शिकवणीशी जुळणारी नाही असे त्यांना वाटत होते. त्याची शिकवण त्याची स्वत:ची वाटायची आणि त्यांच्या मते तो लोकांना कलुषित करत होता.

म्हणून तीन खेडय़ांतून त्यांना अक्ता किंवा पाणीही मिळाले नाही. तिसऱ्या दिवशी त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. त्याचे शिष्य विचार करत होते, ‘‘आता बघू प्रार्थनेत काय होते ते. तुझी आमच्यावर अनुकंपा आहे; तुझे प्रेम आहे. तुला आमची काळजी आहे आणि त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत,’’ असे हे आज कसं म्हणू शकतील जीवनाला ते बघूच.

पण जेव्हा प्रार्थनेची वेळ झाली, तेव्हा जुनदने नेहमीसारखीच प्रार्थना केली. प्रार्थना झाल्यावर अनुयायी म्हणाले, ‘‘हे अति झाले. तीन दिवस आपण तहान-भुकेने व्याकूळ आहोत आणि तरीही तुम्ही जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहात.’’

जुनद म्हणाला, ‘‘माझी प्रार्थना कोणत्याही अटीवर अवलंबून नाही. या गोष्टी सामान्य आहेत. मला जेवायला मिळतंय की नाही याचा भार मला जीवनावर टाकायचा नाही. ती एवढय़ा मोठय़ा विश्वातली खूप छोटी गोष्ट आहे. मला पाणी मिळाले नाही. अगदी मी मेलो तरी त्याने काही फरक पडत नाही. माझी प्रार्थना तीच राहील. कारण या अफाट विश्वात जुनद जिवंत आहे की मेला याने काहीच फरक पडत नाही.’’

मी काहीच गांभीर्याने घेऊ नका म्हणतो, त्याचा अर्थ हाच आहे. स्वत:लाही फार गांभीर्याने घेऊ नका. आणि मग तुम्हाला दिसेल की क्रोध येतच नाहीये. रागाची शक्यताच उरलेली नाही.  स्वत:विषयी सहजतेने विचार करायला लागा. विशेष काहीच नाही; तुम्ही विजेते होण्यासाठीच जन्माला आला आहात असा विचार करू नका, तुम्ही प्रत्येक परिस्थितीत यशस्वी ठराल असा विचार करू नका. हे जग खूप मोठे आहे आणि आपण खूप छोटे आहोत.

एकदा का हे तुमच्या अस्तित्वात पक्कं बसलं की सगळे काही स्वीकारार्ह होऊन जाते. राग नाहीसा होतो आणि तो नाहीसा झाला की आणखी एक सुखद आश्चर्याचा धक्का बसेल. क्रोधाने निघून जाताना अनुकंपा, प्रेम आणि मत्रीची अमाप ऊर्जा मागे ठेवली आहे.

ओशो, द सोअर्ड अ‍ॅण्ड द लोटस, टॉक #९

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

http://www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे