28 January 2020

News Flash

कसं वागायचं सत्य की असत्य?

रागावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा तुम्हाला जसं वाटतंय तसं अकृत्रिम वागणं अधिक चांगलं.

(संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

अकृत्रिम आणि खरे राहण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत नाही. सत्यासाठी कधीच मोठी किंमत मोजावी लागत नाही, असत्यासाठी मात्र लागते. सुरुवातीला असत्य फायद्याचं आणि सत्य नुकसानकारक वाटतं. मात्र, दीर्घकाळाचा विचार केला तर सत्य नेहमीच जिंकतं आणि असत्याचा पराभव होतो.

रागावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा तुम्हाला जसं वाटतंय तसं अकृत्रिम वागणं अधिक चांगलं.

कोणी म्हणतं, पण असं वागून तर मी माझे सगळे मित्र गमावून बसेन.. आणि प्रामाणिक वागण्याची किंमत खूपच जास्त आहे.

ही किंमत जास्त नाही. तुम्ही खरं वागलात तर मोजावी लागणारी किंमत त्यावेळी तुम्हाला कदाचित खूप मोठी वाटेल; पण ती कधीच खूप मोठी नसते! दीर्घकाळाचा विचार केलात तर खरं वागणं कधीही फायद्याचंच ठरतं. राग दाबून ठेवलात तर सगळं काही नियंत्रणात आहे, छान चाललंय असं वरकरणी वाटेल; शेवटी मात्र तुम्हाला खूप खोलात जाऊन किंमत मोजावी लागेल. त्यावेळी खूप उशीर झालेला असेल. तुम्ही काहीच करू शकणार नाही. हे प्रत्येकाबाबत घडलेलं आहे, प्रत्येक आईने हे तिच्या अपत्याबाबत केलं आहे.

हे नियंत्रण सहज आलं होतं, असं तुम्हाला वाटतं का? आईने करून ठेवलेल्या गोष्टी धुऊन काढण्यात सगळे मनोविकारतज्ज्ञ गुंतले आहेत. मनोविकारतज्ज्ञांचा पेशाच मातांनी केलेलं स्वच्छ करणं हा झाला आहे. दुसरं काहीच नाही. सगळं एवढय़ाभोवतीच फिरत आहे. माता माझं ऐकतील तर मनोविकारतज्ज्ञांचा व्यवसाय बंद पडेल, उपाशी राहण्याची पाळी येईल त्यांच्यावर. हे खरोखर खूप महागडं आहे. वेडय़ांच्या दवाखान्यातले सगळे रुग्ण वेडे का झाले? तर बहुतांशींच्या आया त्यांच्यावर खूप नियंत्रण ठेवत होत्या.

कोणी म्हणतं, पुढे यातून काय होणार आहे हे मला कधीच कळत नाही! ते होऊ द्या ना! कोणाला माहीत असतं? आणि तुम्हाला आधीच का कळलं पाहिजे? जर तुम्हाला आधीपासून कळलं, तर ते खोटं असेल. जे काही निसर्गाच्या नियमाप्रमाणे होतं ते आधी कोणालाच माहीत नसतं. नैसर्गिक वागा आणि जे घडेल, ते घडू द्या.

तुम्ही स्वाभाविक, आहात तसे राहिलात तर तुमची मुलगी कधीच तुमच्या विरोधात जाणार नाही; कारण तिला ते समजेल. लहान मुलं फार समजूतदार असतात. तिला एकदा कळलं की तिचे आई-वडील कधीच कृत्रिम वागत नाहीत, ते खरे आहेत. मग ती निर्धास्त त्यांच्यावर अवलंबून राहते. तुम्ही जेव्हा रागावलेले दिसता, तेव्हा खरोखर रागावलेले असता; तुम्ही तिच्यावर प्रेम करताय. कारण तुम्हाला खरोखर तिच्याबद्दल प्रेम वाटतंय; तुम्ही दिसता तसेच आहात हे एकदा तिला कळलं की मग तुम्ही कोणीही असा त्याने फरक पडत नाही. तुम्ही रागावलेले असता तेव्हा तो राग सरळ व्यक्त करता हे पक्कं लक्षात आलं की मुलगी समजून घेते. ती तुम्हाला रागवल्याबद्दल माफही करू शकेल. पण तिला कळलं की तुम्ही आतून चिडला आहात आणि वरवर हसताय तर मात्र तुम्हाला माफ करणं तिच्यासाठी अशक्य होईल; कारण तुम्ही तिला फसवताय.

कधी कधी तुम्हाला राग येतो- सुदैवाने तुम्ही अजून महामानव झालेले नाही आहात! तुम्ही रागावू ‘शकता’ आणि यातून ती काय शिकेल? तिला ते तुमच्याकडून आपोआप शिकता आलं पाहिजे, म्हणजे मग ती बाहेर जाऊन तशीच वागेल. तुम्ही रागावलात तर ती राग या भावनेबद्दल शिकेल आणि त्याचा वापर करेल (दुसऱ्या कोणावरदेखील).. तिलाही कुठूनतरी रागाबद्दल शिकावंच लागेल ना. ती कसं शिकेल? मुलं अशीच शिकतात. तेव्हा रागवा आणि तिला रागावणं शिकू द्या, तिच्यावर प्रेम करा आणि तिला प्रेमाबद्दल शिकू द्या; तसंच नेहमी प्रामाणिक राहा आणि त्यातून ती प्रामाणिकपणाही शिकेल. तुम्ही एवढंच करू शकता; बाकी कशाची गरजही नाही. ताण घेऊ नका. तुम्हाला तिला पैसे द्यायचे नसतील, तर स्पष्ट सांगा तुम्हाला पैसे द्यायचे नाहीयेत म्हणून! आपण ढोंग करत राहतो. आपण म्हणतो आपल्याला द्यायचे आहेत पैसे पण ते तिच्यासाठीच चांगलं नाही वगैरे.

सरळ सांगा की तुम्ही कंजूष आहात आणि तुम्हाला तिला पैसे द्यायचे नाहीत! का द्यावे तुम्ही? नाही द्यावेसे वाटत तुम्हाला! पण तुम्ही काय करता? तुम्हाला पैसे तर सोडवत नाहीत पण तुम्ही असं दाखवता की तिला तुम्हाला खूप पैसे द्यावेसे वाटतात पण तुम्ही देऊ शकत नाही, कारण ते तिच्यासाठी चांगलं नाही; पैसे मिळाले की ती जाऊन आइसक्रीम खाईल वगैरे वगैरे. थेट बोला: सांगा की एवढे पैसे देणं तुम्हाला परवडत नाही, तुम्हाला खूप त्रास होईल ते पैसे हातातून गेले तर. तेवढे पैसे तुमच्या खिशातून गेले, तर तुम्हाला रात्रभर झोप लागणार नाही! स्पष्ट बोला, खरं बोला. ती समजून घेईल.

कृत्रिम वागू नका; सगळेजण तेच करताहेत, सगळीकडे तेच होतंय. तुमच्या मुलीला तुम्ही मनोरुग्ण होण्यापासून वाचवू शकत असाल, तर तेवढं पुरेसं आहे; तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं आहे. ती काही मानसशास्त्रीय समस्या घेऊन आली नाही, म्हणजे सगळं काही बरोबर आहे! तिच्यावर फार नियंत्रण ठेवायला गेलात, तर नक्कीच तिची मन:स्थिती बिघडेल!

केवळ अकृत्रिम आणि खरे राहा आणि मी तुम्हाला सांगतो, यासाठी मोठी किंमत मोजावी लागत नाही. सत्यासाठी कधीच मोठी किंमत मोजावी लागत नाही, असत्यासाठी मात्र लागते. सुरुवातीला असत्य फायद्याचं आणि सत्य नुकसानकारक वाटतं. मात्र, दीर्घकाळाचा विचार केला तर सत्य नेहमीच जिंकतं आणि असत्याचा पराभव होतो.

हे तुम्हाला कठीण वाटेल कारण असत्याची कास धरणं सोपं असतं. तुम्हाला त्याचं प्रशिक्षणही मिळालं असतं, तुमची आईच देते ते प्रशिक्षण आणि आता तुम्ही तुमच्या मुलीबाबतच तेच करत आहात. तसं करू नका. वेगळं वागा.

तुम्ही कुणाकुणावर नियंत्रण ठेवणार आहात? बरोबर काय आणि चूक काय याबद्दल तरी आपल्याला कुठे काय माहीत आहे? आपण फक्त कृत्रिमता दूर ठेवू शकतो आणि सगळं चांगलं होईल अशी आशा करू शकतो. बस. तेव्हा खरं वागा आणि स्वत:शी प्रामाणिक राहा.

ओशो, द झीरो एक्स्पिरिअन्स

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

First Published on November 10, 2018 1:01 am

Web Title: article from osho book the zero experience
Next Stories
1 रागाचं मानसशास्त्र
2 निशब्द व्हा!
3 आयुष्य म्हणजे तत्त्वज्ञानाचा वर्ग नाही!
Just Now!
X