28 January 2020

News Flash

प्रेम द्या!

गेल्या काही वर्षांपासून माझ्या छातीत वेगवेगळ्या तीव्रतेच्या कळा जाणवतात.

(संग्रहित छायाचित्र)

कोणावर तरी प्रेम करणं हा खरोखर सुंदर अनुभव आहे, कारण यात तुम्ही सम्राट असता. प्रेम मिळणं हा एक छोटा अनुभव आहे, हा याचकाचा अनुभव आहे. याचक होऊ नका. प्रेम द्यायला शिका आणि मग बघा ज्या लोकांनी तुमच्याकडे साधं बघितलं नव्हतं, तुमचा विचारही केला नव्हता, ते तुमच्यावर प्रेम करू लागतील..

गेल्या काही वर्षांपासून माझ्या छातीत वेगवेगळ्या तीव्रतेच्या कळा जाणवतात. मला कोणाबद्दल तरी प्रेम वाटते किंवा मी विरघळल्यासारखा होतो तेव्हा ही कळ नाहीशी होते..

ही वेदना शारीरिक नाही; ती नक्कीच तुमच्या शिथिल होत जाण्याशी निगडित आहे, पूर्ण विरघळून जाण्याशी किंवा स्वत:ला पूर्णपणे विसरून जाण्याशी निगडित आहे. या क्षणांत ती नाहीशी होत असेल, तर ती शारीरिक नक्कीच नाही. तुम्हाला आणखी प्रेम करायला शिकावं लागेल. ही काही तुमची एकटय़ाची समस्या नाही; तीव्रता वेगवेगळी असेल पण ही प्रत्येकाची समस्या आहे.

प्रत्येकाला आपल्यावर कोणीतरी

प्रेम करायला हवं आहे; ही सुरुवातच चुकीची आहे.

हे सुरू होतं, कारण एक छोटं मूल प्रेम करू शकत नाही, काही सांगू शकत नाही, काही करू शकत नाही, काही देऊ  शकत नाही; त्याला फक्त मिळू शकतं. छोटय़ा मुलाचा प्रेमाचा अनुभव ते मिळण्याचा असतो, आईकडून प्रेम मिळण्याचा, बाबांकडून प्रेम मिळण्याचा, भावंडांकडून प्रेम मिळण्याचा, पाहुण्यांकडून प्रेम मिळण्याचा, अनोळखी माणसांकडूनही प्रेम मिळण्याचा- पण यात फक्त प्रेम मिळतं. म्हणूनच हा पहिला अनुभव नकळत त्याच्या आत खोलवर जाऊन बसतो- त्याला वाटतं की प्रेम हे मिळालंच पाहिजे.

पण इथेच समस्या निर्माण होते. कारण प्रत्येक जण कधीतरी मूल असतो आणि प्रत्येकामध्ये प्रेम मिळवण्याची तीच उत्कट इच्छा असते; कोणीच वेगळ्या पद्धतीने जन्मलेला नाही. तेव्हा सगळे मागत राहतात, ‘‘आम्हाला प्रेम द्या’’ आणि ते द्यायला कोणीच नसतं, कारण समोरचा माणूसही याच पद्धतीने वाढलेला असतो. लहानपणी प्रेमाबद्दल जे काही होतं ते मनात कायमस्वरुपी प्रस्थापित व्हायला नको याबद्दल प्रत्येकाने दक्ष राहायला हवं.

‘‘मला प्रेम द्या’’ असं म्हणण्याऐवजी तुम्ही प्रेम द्यायला लागा. प्रेम मिळण्याबद्दल विसरून जा, केवळ द्या- आणि मी तुम्हाला हमी देतो, तुम्हाला खूप प्रेम मिळेल. पण तुम्ही प्रेम मिळण्याचा विचारच करायला नको. अगदी अप्रत्यक्षपणेही ते मिळतंय की नाही हे बघू नका. कारण तो प्रेम देण्यातला मोठा व्यत्यय ठरेल. तुम्ही फक्त देत राहा, कारण प्रेम देणं जेवढं सुंदर आहे, तेवढं महान प्रेम मिळणं नाही. हे एक गुपीत आहे.

कोणावर तरी प्रेम करणं हा खरोखर सुंदर अनुभव आहे, कारण यात तुम्ही सम्राट असता. प्रेम मिळणं हा एक छोटा अनुभव आहे, हा याचकाचा अनुभव आहे. याचक होऊ नका. निदान प्रेमाच्या बाबतीत तरी सम्राट व्हा, कारण हा तुमच्यातला एक अक्षय्य गुण आहे. तुम्ही तुम्हाला हवं तेवढं देत राहू शकता. ते संपेल अशी चिंता करू नका. असं अजिबात होणार नाही की, एक दिवस अचानक तुम्हाला जाणवलं, ‘‘अरे देवा! माझ्याकडे तर आणखी प्रेमच उरलं नाही द्यायला.’’

प्रेम संख्येत मोजण्यासारखं नाही; तो एक गुण आहे आणि त्याचा गुणधर्म असा आहे की ते दिल्याने वाढतं आणि स्वत:कडे धरून ठेवलं की मरून जातं. तुम्ही प्रेम देण्यात कंजुषी कराल, तर ते मरूनच जाईल. तेव्हा याबाबत उधळेपणा केलेलाच बरा. ते कोणावर करावं याचा ताण घेऊ नका- ही कल्पना कंजूष मनाचीच आहे : मी फक्त ठरावीक गुण असलेल्या ठरावीक व्यक्तींवरच प्रेम करेन, हे म्हणणंच चुकीचं आहे.  तुमच्याजवळ किती अमाप आहे हेच तुम्हाला समजत नाही.. तुम्ही एक पाण्याने भरलेले मेघ आहात. हा मेघ कुठे बरसावं असा विचार कधीच करत नाही- खडकांवर, उद्यानांवर, महासागरावर कुठेही बरसतो. त्याला काहीच फरक पडत नाही. त्याला फक्त मोकळं व्हायचं असतं. आणि हे मोकळं होणं ही खूप मोठी स्वस्थता असते.

तेव्हा पहिलं गुपीत आहे : प्रेम मागू नका आणि कोणी ते तुमच्याकडे मागण्याची वाट बघत बसू नका. ते केवळ देत राहा!

तुमचं प्रेम कोणालाही द्या, अगदी अनोळखी माणसालाही. तुम्हाला कोणाला फार मौल्यवान द्यायचंय असं काही नाही, फक्त मदतीचा एक हात पुरेसा आहे. दिवसाच्या २४ तासांत तुम्ही जे काही करता, ते प्रेमाने करा, तुमच्या हृदयातील वेदना नाहीशी होईल आणि तुम्ही इतके प्रेमळ वागाल, तर लोकही तुमच्यावर प्रेम करतीलच. हा निसर्गाचा नियम आहे. खरं तर तुम्ही देता त्यापेक्षा अधिक तुम्हाला मिळतं.

प्रेम द्यायला शिका आणि मग बघा ज्या लोकांनी तुमच्याकडे साधं बघितलं नव्हतं, तुमचा विचारही केला नव्हता, ते तुमच्यावर प्रेम करू लागतील. तुमची समस्या म्हणजे तुमचं हृदय प्रेमाने भरलेलं आहे पण तुम्ही कंजूष आहात; म्हणूनच ते प्रेम हृदयावरचा भार झालं आहे. या प्रेमाने हृदय फुलवण्याऐवजी तुम्ही ते बंदिस्त करून ठेवलं आहे, म्हणूनच कधीतरी एका क्षणी तुम्हाला प्रेमाचं भरतं आलेलं असताना नाहीसं झाल्यासारखं वाटतं. पण एक क्षण का? प्रत्येक क्षण का नाही?  हे प्रेम सजीवांपुरतं मर्यादितही नाही. तुम्ही खुर्चीला प्रेमाने स्पर्श करू शकता. प्रेम तुमच्यावर अवलंबून आहेत, तुम्ही ते ज्यावर करता, त्या वस्तूवर नाही. मग तुम्हाला अत्यंत मुक्त वाटेल.तुमचं स्वत्व नाहीसं होईल- हे स्वत्व म्हणजे एक ओझंच होतं- ते संपूर्णात विरघळून जाईल.

डिसीज या शब्दाचा शब्दश: अर्थ बघायला गेलं तर हा एक डिस-इजच आहे पण सामान्यत: आपण जो म्हणतो तसा आजार नव्हे. त्यामुळे कोणताही डॉक्टर तुम्हाला मदत करू शकणार नाही. ही तुमच्या हृदयाची ताणलेली अवस्था आहे, ज्या अवस्थेला अधिकाधिक द्यावंसं वाटतं. कदाचित तुमच्या हृदयात अन्य लोकांच्या तुलनेत अधिक प्रेम आहे, कदाचित तुम्ही अधिक सुदैवी आहात आणि तुमच्या कंजूषपणामुळे तुम्ही या सुदैवातून दु:खाला जन्म देत आहात. हे प्रेम वाटून टाका, ते कोणाला देत आहात याचा विचार करू नका.

फक्त प्रेम द्या आणि बघा किती शांती लाभेल ते. हेच तुमचं ध्यान होऊन जाईल. व्यक्ती ध्यानाकडे विविध दिशांनी येऊन पोहोचते; कदाचित ही तुमची दिशा असेल.

ओशो, बियॉण्ड सायकोलॉजी, टॉक #४१

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

First Published on August 4, 2018 2:11 am

Web Title: article taken from oshos book
Next Stories
1 व्यक्तिमत्त्व विषारी आणि पोषक
2 अनुकंपा
3 अंत:स्थ संपदा हाच स्वर्ग
Just Now!
X