24 January 2019

News Flash

जखमा उरातल्या..

एक जुनी कल्पना आहे, लोक ती आणखी सहजपणे स्वीकारतात.

लोक कायम त्यांच्या दु:खांबद्दल, संकटांबद्दल, संघर्षांबद्दल बोलत राहतात. तुम्ही कोणाला त्याच्या आनंदी क्षणांबद्दल बोलताना ऐकलंय? त्याच्या नाचण्या-गाण्याबद्दल? त्याच्या शांतीबद्दल आणि हर्षांबद्दल? नाही, या गोष्टींबद्दल कोणीच बोलत नाही. लोक त्यांच्या दु:खांबद्दल बोलत राहतात आणि  नकळतपणे दु:खाचा एक नमुना दुसऱ्याला देत असतात.

प्रत्येक जण दुसऱ्याच्या जखमा वाहत असतो. पहिली गोष्ट म्हणजे, तुम्ही राहत आहात एका आजारी समाजात, जिथे लोक चिडलेले आहेत, तिरस्काराने भरलेले आहेत, दुसऱ्यांना दुखावण्यात आनंद मानणारे आहेत. हा झाला वरवरचा स्तर. हा समजायला सोपा आहे. मात्र, यात काही सूक्ष्म स्तरही आहेत. तथाकथित साधू, जे तुमच्यात अपराधीपणाची भावना निर्माण करत आहेत. तुम्ही पापी आहात, असं तुम्हाला सांगत आहेत. ते तुम्हाला सांगतात त्या कल्पना तुमच्याभोवती अधिकच दु:ख निर्माण करतात.

एक जुनी कल्पना आहे, लोक ती आणखी सहजपणे स्वीकारतात. जगात सगळे हेच म्हणत राहतात, ‘आपण पापात राहत आहोत.’ पण हे दु:खाचं आयुष्य तुम्ही स्वत:साठी निवडलं आहे, हे जाहीरपणे सांगणारा मी एकटाच आहे; ही तुमची निवड आहे. तुम्ही लगोलग हे दु:ख सोडून देऊ शकता आणि आनंदाने, वरदान मिळाल्याप्रमाणे नाचू शकता; पण प्रत्येक जण आपल्या दु:खाशी एकरूप होऊन जातो. या दु:खातून एक प्रकारची ऊब मिळत राहते म्हणून तुम्ही त्याला कुरवाळत बसता, पण ते केवळ तुमच्या आयुष्याचा नरक करून टाकतं. अर्थात, तुमच्या या नरकाला सगळ्यांचा पाठिंबा असतो. तुम्ही दु:खी असाल, तर सगळ्यांना तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते. तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? तुम्ही जेव्हा दु:खी असता, तेव्हा तुम्हाला सहानुभूती दाखवणारे तुमचं दु:ख गोंजारत असतात. तुम्ही आनंदाने नाचत असता, तेव्हा कोणी तरी येतं का सहानुभूती दाखवायला? जेव्हा तुम्ही आनंदात असता, तेव्हा लोकांना मत्सर वाटतो, सहानुभूती नव्हे.

मला वाटतं, आयुष्याचा संपूर्ण पायाच बदलून टाकायला हवा. लोकांनी सहानुभूती केवळ आनंदच्या क्षणांना, हषरेत्सव सुरू असताना व्यक्त करावी, कारण सहानुभूती व्यक्त केल्याने या भावना वाढीला लागतात. लोकांचा आनंद वाढीला लावा, त्यांचं दु:ख कशाला वाढवता? ते दु:खी असतील तेव्हा अनुकंपा दाखवा. मात्र, हे दु:ख तुम्हीच निवडलंय हे स्पष्ट सांगा.

थोडं खोलात जाऊन बघितल्याशिवाय याबद्दलची चर्चा पूर्णत्वाला जाणार नाही.

पौर्वात्य धर्मामध्ये उदयाला आलेली पुनर्जन्माची संकल्पना बघू. आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, एका आयुष्यातून दुसऱ्या आयुष्यात प्रवेश करतो, अशी ही कल्पना आहे. ज्यू, ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्मात ही संकल्पना अस्तित्वातच नाही. मात्र, आता मनोविकारतज्ज्ञांनाही सापडलेल्या तथ्यांनुसार ही संकल्पना सत्य वाटू लागली आहे. लोकांना त्यांची गतआयुष्यं आठवू शकतात; एकंदर पुनर्जन्माच्या कल्पनेला आधार मिळू लागला आहे.

मात्र, मी तुम्हाला सांगतो की, पुनर्जन्माची संपूर्ण कल्पनाच चुकीची आहे. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा तो संपूर्णाचा भाग होतो, मग तो पापी असो की पुण्यवान, पण तरीही त्याच्याकडे मन, स्मृती नावाचं काही तरी असतं. एक विचारांचा गठ्ठा किंवा विचारांच्या लाटा म्हणून स्मृतीचं स्पष्टीकरण देणारं ज्ञान पूर्वी अस्तित्वात नव्हतं, पण आता ते सोपं झालंय आणि म्हणूनच, अनेक मुद्दय़ांबाबत, मला गौतम बुद्ध त्यांच्या काळाच्या खूप पुढे होते असं वाटतं. त्यांनी तसे संकेतही दिले होते, पण ते त्यासाठी पुरावे देऊ शकले नाहीत; तेव्हा ते उपलब्धच नव्हते. ते म्हणाले आहेत की, जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा तिची स्मृती एका नवीन उदरात प्रवेश करते- आत्म्यात नव्हे. आता आपल्या लक्षात येईल की, जेव्हा एखादी व्यक्ती मरते, तेव्हा तिच्या स्मृती वातावरणात सर्वत्र पसरतात आणि ती व्यक्ती दु:खी असेल, तर तिची दु:खं एखादं ठिकाण शोधतात; ती कोणाच्या तरी स्मृतीमध्ये प्रवेश करतात. एक तर ती सर्व दु:खं एकाच उदरात प्रवेश करतात- या परिस्थितीत एखाद्याला भूतकाळ आठवतो, पण तो त्याचा भूतकाळ नसतो; दुसऱ्याच कोणाचं तरी मन त्याच्याकडे आलेलं असतं वारशाप्रमाणे.

बहुतेकांना असं काहीच आठवत नाही, कारण त्यांच्या उदरात स्मृतींच्या संपूर्ण गठ्ठय़ाने प्रवेश केलेला नसतो, एखाद्याच्या स्मृतीचा वारसा संपूर्णपणे त्यांच्यात येत नाही. त्यांच्या स्मृतीमध्ये दु:खाचे काही तुकडे शिरतात. या पृथ्वीवर मृत्यू आलेले सर्व जण कोणत्या तरी दु:खात मरण पावलेले आहेत. खूप कमी लोकांनी आनंदाने प्राण सोडले आहेत. खूप कमी लोक मनाची शून्य जाणीव ठेवून मरण पावले. असे लोक एकही खूण मागे ठेवत नाहीत. ते त्यांच्या स्मृतींचं ओझं बाकीच्यांवर टाकत नाहीत. ते केवळ नाहीसे होतात विश्वामध्ये. त्यांना मनही नसतं आणि स्मृतीही नसतात. ते सगळं त्यांनी आधीच ध्यानात विरघळवून टाकलेलं असतं. ते खुणा ठेवत नाहीत. म्हणूनच आत्मज्ञान प्राप्त झालेल्या अवस्थेत कोणीही जन्म घेत नाही.

पण आत्मज्ञानापासून दूर असलेले लोक त्यांच्या खुणा विखुरत राहतात. प्रत्येक मृत्यूसोबत, सगळ्या प्रकारची दु:खं आजूबाजूला पसरत राहतात. पैशाकडे पैसा आकर्षित होतो, त्याचप्रमाणे दु:खंही दु:खांना आकर्षित करतात. तुम्ही दु:खी असाल, तर दु:खं मैलोन्मैल प्रवास करून तुमच्यापर्यंत पोहोचतील- कारण तुम्ही त्यांच्यासाठी योग्य वाहन आहात आणि हे अदृश्य इंद्रियगोचर आहे, रेडिओ लहरींसारखं. ते तुमच्या अवतीभोवतीच असेल; पण तुम्हाला ऐकू येणार नाही. एकदा का ते ग्रहण करण्यासाठी आवश्यक ते उपकरण तुमच्याजवळ आलं की, ते लगेच उपलब्ध होईल. म्हणजे तुमच्याकडे रेडिओ नव्हता, तेव्हाही लहरी तुमच्याभोवती होत्याच.

पुन्हा जन्म होत नाही, पण दु:खं पुन्हा जन्म घेतात. लक्षावधी लोकांच्या जखमा तुमच्या अवतीभोवती फिरत असतात, आणखी कोणी दु:खी व्हायला तयार आहे का हे शोधत असतात. आनंदी लोक अर्थातच काही खुणा ठेवत नाहीत. जागृतावस्थेला पोहोचलेला माणूस, पक्ष्याने आकाशात कोणताही मार्ग तयार न करता उडावं, तसा मृत्यूला कवटाळतो. आकाश रिकामंच राहतं. आनंदाचा प्रवास कोणत्याही खुणा न सोडता होतो. म्हणूनच बुद्धांचे वारस तुम्हाला दिसत नाहीत; ते केवळ नाहीसे होतात आणि सर्व प्रकारचे मूर्ख आणि मठ्ठ लोक मात्र त्यांच्या स्मृतींमधून पुन:पुन्हा जन्म घेतात आणि त्यांची दाटी वाढतच जाते. आज, कदाचित, याचा विचार करण्याची, हे समजून घेऊन यावर उपाय शोधण्याची वेळ आली आहे. अन्यथा, ही दाटी एवढी वाढेल की तुम्हाला जगता येणार नाही, तुम्हाला हसता येणार नाही.

तुमच्या स्वत:च्या जाणिवेला कोणतीही जखम नाही. तुमच्या स्वत:च्या जाणिवेला दु:ख काय आहे हे माहीत नाही.

तुमची स्वत:ची जाणीव निष्पाप आहे, अत्यंत आनंदी आहे. या तुमच्या शुद्ध जाणिवेच्या संपर्कात तुम्हाला आणण्यासाठी, मनापासून तुम्हाला दूर नेण्याचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. तुमची सगळी दु:खं, सगळ्या जखमा केवळ मनात असतात आणि तुम्ही जागरूकनसाल, तर हे मन या जखमा कशा तयार करतं हेही तुम्हाला कळणार नाही.

या दु:खाच्या आकृतिबंधातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याकडे तटस्थपणे बघण्याचा. कारण, तटस्थ झाल्याशिवाय कोणीही मनाच्या कचाटय़ातून स्वत:ची सुटका करून घेऊ शकलेलं नाही. फक्त तटस्थ होऊन बघत राहा आणि एक दिवस अचानक तुम्ही स्वत:च्या दु:खांना हसू लागाल. तुमची ही सगळी दु:खं इतकी उथळ असतात- आणि मुळात ती सगळी उसनी घेतलेली असतात.

आणि प्रत्येक जण त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला त्याची दु:खं देत राहतो. लोक कायम त्यांच्या दु:खांबद्दल, संकटांबद्दल, संघर्षांबद्दल बोलत राहतात. तुम्ही कोणाला त्याच्या आनंदी क्षणांबद्दल बोलताना ऐकलंय? त्याच्या नाचण्या-गाण्याबद्दल? त्याच्या शांतीबद्दल आणि हर्षांबद्दल? नाही, या गोष्टींबद्दल कोणीच बोलत नाही. लोक त्यांच्या दु:खांबद्दल बोलत राहतात आणि तुम्ही जेव्हा एखाद्याला तुमच्या दु:खाबद्दल सांगता, तेव्हा नकळतपणे तुम्ही दु:खाचा एक नमुना त्याला देत असता. त्या व्यक्तीला वाटतं की, ती केवळ तुमचं ऐकत आहे, पण तीसुद्धा दु:खाच्या लहरी स्वत:मध्ये पकडत असते.

तुम्ही दुसऱ्यांच्या जखमा वाहता, असं जेव्हा मी म्हणालो, तेव्हा त्याचा अर्थ तुमच्या स्वत:च्या जाणिवेला कोणतीही जखम नसते. प्रत्येक जण दक्ष, ध्यानमग्न झाला तर जगात जखमा उरणारच नाहीत. त्या नाहीशाच होतील. त्यांना कुठेही निवारा मिळणार नाही. हे शक्य आहे. हे माझ्यासाठी शक्य आहे, तर सर्वासाठी शक्य आहे.

तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी जखमा इतक्या सहज कशा स्वीकारता? कारण तुम्हालाही जखमा असतातच. जखमांची, दु:खांची, भोगांची भाषा तुम्हाला समजते.

झेन मॅनिफेस्टो #५ मधील सारांश/ ओशो टाइम्स इंटरनॅशनल/ सौजन्य ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन/ www.osho.com

First Published on April 14, 2018 12:19 am

Web Title: osho philosophy part 13