21 March 2019

News Flash

वाढताना..

वृद्ध होणं म्हणजे वाढणं नव्हे. आपण वृद्ध होतो ते कालांतराने; वाढण्यासाठी एक क्षणही पुरतो.

भाषांतर – सायली परांजपे

वाढणं समजून घ्यायचं असेल, तर केवळ झाडाकडे बघा. झाड जसजसं वाढत जातं, तसतशी त्याची मुळं खोल खोल जातात. त्यातही एक समतोल आहे : झाड जेवढं उंच जातं, तेवढी मुळं खोल जातात. दीडशे फूट उंच झाडाची मुळं छोटी असूच शकत नाहीत; ती एवढय़ा महाकाय वृक्षाला आधार देऊच शकणार नाहीत. आयुष्यातही वाढणं म्हणजे स्वत:मध्ये खोल जाणं- तुमची मुळं तिथेच असतात.

वृद्ध होणं म्हणजे वाढणं नव्हे. आपण वृद्ध होतो ते कालांतराने; वाढण्यासाठी एक क्षणही पुरतो.

माणूस जन्माला येतो तो आयुष्य साध्य करण्यासाठी पण हे सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे. तो आयुष्य गमावूही शकतो. तो श्वासोच्छ्वास करत राहू शकतो, खाऊ शकतो, तो म्हातारा होऊ शकतो- पण हे सगळं म्हणजे आयुष्य नव्हे. हे तर हळूहळू मरत जाणं आहे- पाळण्यापासून ते सरणापर्यंत, सत्तर र्वष हळूहळू मरत जाणं. आणि तुमच्या आजूबाजूचे लाखो लोक अशा प्रकारे हळूहळू मरत असतात, म्हणून तुम्हीही त्यांचं अनुकरण करता. लहान मुलं त्यांच्या आजूबाजूला जे काही चालतं त्यापासून शिकतात; आणि आपल्या आजूबाजूला तर सगळे मेलेलेच असतात.

तेव्हा मला आयुष्य म्हणजे नेमकं काय अभिप्रेत आहे ते समजून घेऊ. आयुष्य म्हणजे केवळ म्हातारं होणं नव्हे; आयुष्य म्हणजे वाढणं. आणि या दोन निराळ्या गोष्टी आहेत. म्हातारे तर प्राणीही होतात, पण वाढणं हा मानवाचा विशेषाधिकार आहे. त्यातलेही खूप कमी या अधिकारावर दावा सांगतात.

वाढणं म्हणजे आयुष्याच्या तत्त्वात प्रत्येक क्षणाला अधिकाधिक खोल जाणं; वाढणं म्हणजे मृत्यूपासून दूर जाणं- मृत्यूकडे जाणं नव्हे. तुम्ही आयुष्यात जेवढे खोल जाल, तेवढं तुमच्यातलं अमरत्व तुम्हाला समजत जाईल. तुम्ही मृत्यूपासून दूर जात राहाल; आणि मग एका क्षणी तुम्हाला समजेल की मृत्यू म्हणजे दुसरं-तिसरं काहीच नाही, तर कपडे बदलणं किंवा घर बदलणं आहे- मरत काहीच नाही. काहीच मरू शकत नाही; मृत्यू हा एक सर्वात मोठा भ्रम आहे.

वाढणं समजून घ्यायचं असेल, तर केवळ झाडाकडे बघा. झाड जसजसं वाढत जातं, तसतशी त्याची मुळं खोल खोल जातात. त्यातही एक समतोल आहे. झाड जेवढं उंच जातं, तेवढी मुळं खोल जातात. दीडशे फूट उंच झाडाची मुळं छोटी असूच शकत नाहीत; ती एवढय़ा महाकाय वृक्षाला आधार देऊच शकणार नाहीत. आयुष्यातही वाढणं म्हणजे स्वत:मध्ये खोल जाणं- तुमची मुळं तिथेच असतात.

माझ्यासाठी आयुष्याचं पहिलं तत्त्व आहे ध्यान.

बाकी सगळं दुय्यम आहे. आणि बालपण हा सर्वोत्तम काळ आहे. तुम्ही जसजसे म्हातारे होता, तसतसे मृत्यूच्या जवळ जाता आणि ध्यानात शिरणं अधिकाधिक कठीण होत जातं. ध्यान म्हणजे तुमच्यातल्या अमरत्वात प्रवेश करणं, तुमच्यातल्या अनंतात प्रवेश करणं, तुमच्यातल्या देवत्वात प्रवेश करणं. लहान मूल ही सर्वात पात्र व्यक्ती असते. कारण तिच्यावर अद्याप ज्ञानाचं ओझं पडलेलं नसतं, धर्माचं ओझं पडलेलं नसतं, शिक्षणाचं ओझं पडलेलं नसतं, कोणत्याच प्रकारच्या कचऱ्याचं ओझं तिच्यावर पडलेलं नसतं. लहान मूल निरागस असतं. मात्र दुर्दैवाने या निरागसतेला अज्ञान समजलं जातं. अज्ञान आणि निरागसता यांच्यात साम्य आहे, पण या दोन्ही बाबी समान नाहीत. अज्ञान हीदेखील ज्ञान नसण्याची अवस्था आहे आणि निरागसताही ज्ञान नसण्याचीच अवस्था आहे. पण त्यात खूप मोठा फरक आहे, ज्याकडे संपूर्ण मानवतेने आत्तापर्यंत दुर्लक्ष केलं आहे. निरागसता म्हणजे ज्ञान नसणं आणि ज्ञानप्राप्तीची इच्छाही नसणं. निरागसता पूर्णपणे समाधानी, तृप्त असते. लहान मुलाला कोणतीही महत्त्वाकांक्षा नसते, कोणतीही इच्छा नसते. ते केवळ त्या क्षणात बुडालेलं असतं- एखादा पक्षी त्याचं लक्ष पूर्णपणे वेधून घेतो; सुंदर रंगांचं एक फुलपाखरू बघून त्याला मंतरल्यासारखं होतं; आकाशात इंद्रधनुष्य उमटतं आणि या इंद्रधनुष्याहून अधिक महत्त्वाचं, समृद्ध काही असू शकतं हे त्याला पटतच नाही. चांदण्यांनी भरलेली एक रात्र, चांदण्यांपलीकडे चांदण्या.. निरागसता समृद्ध आहे, संपूर्ण आहे, शुद्ध आहे.

अज्ञान दरिद्री असतं; भिकाऱ्याप्रमाणे वागतं- त्याला हेही हवं असतं, तेही हवं असतं, त्याला ज्ञानी व्हायचं असतं, मान मिळवायचा असतो, धनवान व्हायचं असतं; त्याला शक्तिवानही व्हायचं असतं. अज्ञानाची मार्गक्रमणा इच्छेच्या मार्गावरून सुरू असते. निरागसता म्हणजे कोणतीही इच्छा नसलेली अवस्था.

‘‘पण या दोन्ही अवस्था म्हणजे ज्ञानाचा अभाव असल्याने, आपला दोहोंच्या स्वरूपाबाबत गोंधळ होत राहतो. या दोन्ही अवस्था समान आहेत असं आपण गृहीत धरतो. आर्ट ऑफ लिव्हिंगमधील पहिली पायरी म्हणजे अज्ञान व निरागसता यांमध्ये फरक दाखवणारी रेषा निश्चित करणं. निरागसतेला आधार दिला पाहिजे, तिचं रक्षण केले पाहिजे- कारण लहान मुलाने त्याच्यासोबत हा सर्वात मोठा ठेवा आणलेला असतो. हा ठेवा साधूसंतांना मिळवण्यासाठी साधूंना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.

आयुष्य आपल्या हातून निसटून गेलं आहे हे तुम्हाला जेव्हा केव्हा लक्षात येईल, तेव्हा पहिलं तत्त्व म्हणजे निरागसता परत आणणे. तुमच्या ज्ञानाचा त्याग करा, तुमचे धर्मग्रंथ, तुमचं धर्मशास्त्र, तुमचं तत्त्वज्ञान सगळं काही विसरून जा. पुन्हा जन्म घ्या, निरागस व्हा. तुम्हाला जे काही माहीत आहे, जे काही तुम्ही उसनं घेतलं आहे, जे काही परंपरा, रूढींतून आलं आहे, जे काही तुम्हाला तुमच्या आई-वडिलांनी, शिक्षकांनी व विद्यापीठांनी शिकवलं आहे, ते सगळं तुमच्या मनातून काढून, मन स्वच्छ करून टाका. सुटका करून घ्या या सगळ्यापासून. पुन्हा एकदा साधे व्हा; पुन्हा एकदा मूल व्हा. आणि ही किमया ध्यानाने शक्य आहे.

ध्यानामुळे तुमच्यात संवेदनशीलता येते, जगाच्या प्रति एक आपलेपणाची भावना येते. हे सर्व जग आपलं आहे आणि आपण इथे परके नाही आहोत. आपण आपल्या अस्तित्वात अंगभूतपणे सामावलेले आहोत. आपण याचा भाग आहोत; आपण याच्या हृदयस्थानी आहोत.

सौजन्य -ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

www.osho.com

First Published on May 19, 2018 12:40 am

Web Title: osho philosophy part 17