केवळ एखाद्या प्रेमळ व्यक्तीलाच- जी व्यक्ती पूर्वीपासून प्रेमळ आहे तिलाच- योग्य जोडीदार मिळू शकतो. हे माझं निरीक्षण आहे, तुम्ही दु:खी असाल तर तुम्हाला कुणीतरी दु:खी व्यक्तीच सापडेल. दु:खी व्यक्ती अन्य दु:खी व्यक्तींकडे आकर्षित होतात. आणि हे बरंच आहे. हे नैसर्गिकही आहे. दु:खी लोक आनंदी लोकांकडे आकर्षित होत नाहीत हे चांगलंच आहे. कारण, तसं झालं तर ते आनंदी लोकांचा आनंद नष्ट करून टाकतील. त्यामुळे जे होतं आहे ते योग्यच आहे. केवळ आनंदी व्यक्तीच आनंदी व्यक्तींकडे आकर्षित होतात.

समान गुणधर्माचे लोक एकमेकांकडे आकर्षित होतात. बुद्धिमान लोक बुद्घिवंतांकडेच आकर्षिले जातात आणि मूर्ख लोक मुर्खाकडेच खेचले जातात. तुम्ही तुमच्यासारखीच मन:स्थिती असलेल्या लोकांना भेटता. तेव्हा एक गोष्ट सर्वप्रथम लक्षात ठेवा – दु:खातून निर्माण झालेलं नातं हे कटूच असतं. त्यामुळे अगोदर आनंदी व्हा, प्रसन्न राहा, आजूबाजूच्या गोष्टी साजऱ्या करायला शिका आणि मग तुम्हाला आणखी एक आत्मा असाच आनंद साजरा करताना दिसेल. आनंदाने नाचणारे हे दोन  आत्मे भेटतील आणि त्यातून एक महान नृत्य साकार होईल.

एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी नात्याचा मार्ग कधीही शोधू नका. नाही. याचा अर्थ तुम्ही चुकीच्या दिशेने जात आहात. यात दुसरी व्यक्ती साधन म्हणून वापरली जाईल आणि ती व्यक्तीही तुम्हाला साधन म्हणून वापरेल. आणि एक साधन म्हणून वापरलं जाणं कोणालाही नको असतं! प्रत्येक व्यक्ती स्वत:मध्ये संपूर्ण असते. तिला साधन म्हणून वापरणं मुळात अनैतिक आहे.

प्रथम एकटं कसं राहायचं ते शिका. ध्यान हा एकटं राहण्याचा मार्ग आहे. जर तुम्ही एकटे असताना आनंदी होऊ शकत असाल, तर याचा अर्थ तुम्हाला आनंदी होण्यातलं गुपित उमगलं आहे. आता तुम्ही आनंदी मनाने एकत्र येऊ शकता. तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमच्याकडे वाटून घेण्याजोगं, देण्याजोगं असं काहीतरी असतं आणि तुम्ही जेव्हा देता, तेव्हा तुम्हाला काहीतरी प्राप्त होतं; याच्या उलटा प्रवास होऊ नाही शकत. हे देणं-घेणं सुरू झालं की मग कोणावर तरी प्रेम करणं ही गरज निर्माण होते.

कोणीतरी आपल्यावर प्रेम करावं ही गरज सामान्यपणे लोकांमध्ये आढळते. मात्र, ही गरज मुळात चुकीची आहे. ही बालिश गरज आहे; तुम्ही पुरेसे परिपक्व नसाल तर तुम्हाला अशी गरज वाटते. हा लहान मुलासारखा दृष्टिकोन आहे. लहान मूल जन्माला येतं. अर्थातच, ते आईवर प्रेम करू शकत नाही; त्याला प्रेम म्हणजे काय हे माहीत नाही, आई म्हणजे काय हे माहीत नाही, बाबा म्हणजे काय हे माहीत नाही. ते पूर्णपणे असाहाय्य आहे. त्याचं अस्तित्व अजून एकत्र आलेलं नाही; अजून ते एकसंध झालेलं नाही; ते जुळून आलेलं नाही. ते मूल म्हणजे एक संभाव्यता आहे. आईला त्याच्यावर प्रेम करावं लागतं, वडिलांना त्याच्यावर प्रेम करावं लागतं, सगळ्या कुटुंबाला त्या बाळावर प्रेमाचा वर्षांव करावा लागतो. आता ते एक गोष्ट शिकतं: ती म्हणजे प्रत्येकाने त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. त्यानेही सर्वावर प्रेम केलं पाहिजे हे मात्र ते काही शिकत नाही. पुढे हे मूल मोठं होत जाईल आणि प्रत्येकाने आपल्यावर प्रेम केलं पाहिजे, याच वृत्तीला ते चिकटून राहिलं, तर संपूर्ण आयुष्य त्याला त्याचा त्रास होत राहील. ते शरीराने वाढेल पण त्याचं मन मात्र अपरिपक्व राहून जाईल.

जिला दुसरी गरज कळते, ती व्यक्तीच खरी परिपक्व. ती गरज म्हणजे मी कोणावर तरी प्रेम केलं पाहिजे. आपल्यावर कोणीतरी प्रेम करावं ही गरज बालिश, अपरिपक्व आहे. कोणावर तरी प्रेम करण्याची गरज म्हणजेच परिपक्वता. आणि जेव्हा तुम्ही कोणावर तरी प्रेम करायला तयार असता, तेव्हा त्यातून एक सुंदर नातं निर्माण होतं. अन्यथा ते होत नाही.

‘‘नात्यातल्या दोन व्यक्ती एकमेकांसाठी वाईट आहेत असं शक्य आहे का?’’ हो, हेच तर घडतंय जगभर. चांगलं असणं खूप कठीण आहे. मुळात तुम्ही स्वत:साठीही चांगले नसाल, तर मग तुम्ही दुसऱ्या कोणासाठी तरी चांगले कसे असू शकाल?

तुम्ही तर स्वत:वरही प्रेम करत नाही- मग तुम्ही आणखी कोणावर प्रेम कसे करणार? स्वत:वर प्रेम करा, स्वत:शी चांगले वागा.

तुमचे तथाकथित धार्मिक साधूसंत तुम्हाला शिकवत आलेत की स्वत:वर प्रेम कधीच करू नका, स्वत:शी चांगले वागू नका. स्वत:शी कठोरपणेच वागा! दुसऱ्यांसोबत कोमल वागा आणि स्वत:शी मात्र कठोर वागा, असं शिकवत आलेत ते तुम्हाला. हे विचित्रच आहे.

मी तुम्हाला सांगतो की, पहिली आणि सर्वात अगोदरची गोष्ट म्हणजे स्वत:शी प्रेमाने वागा. कठोर वागू नका; हळूवार वागा. स्वत:ची काळजी घ्या. स्वत:ला माफ करण्यास शिका- पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा. सात वेळा, सत्त्याहत्तर वेळा, सातशे सत्त्याहत्तर वेळा, सात हजार सातशे सत्त्याहत्तर वेळा. स्वत:ला क्षमा करायला शिका. कठोर होऊ नका; स्वत:चा तिरस्कार करू नका. मग तुम्ही फुलाल.

आणि त्या फुलण्यातून तुम्ही आणखी काही फुलांना आकर्षित करून घ्याल. हे नैसर्गिक आहे. दगड दगडांना आकर्षून घेतात; तर फुलं फुलांना आकर्षून घेतात. फुलण्यातून जे नातं तयार होतं त्यात डौल असतो, सौंदर्य असतं, आशीर्वाद असतो. तुम्हाला असं नातं सापडलं, तर तुमचं ते नातं एक कायमस्वरूपी प्रार्थना होऊन जाईल, तुमचं प्रेम म्हणजे अत्यानंद असेल, आणि या प्रेमाच्या माध्यमातून तुम्हाला कळेल देव म्हणजे काय ते.

ओशो, एक्स्टसी: द फरगॉटन लँग्वेज, टॉक #२

सौजन्य: ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन

www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे