प्रिय ओशो,

तुम्ही मला व्यक्तिश: ओळखत नाही, तरीसुद्धा हे सगळं कसं घडतंय? हे कसं शक्य आहे?

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

उत्तर :  मी व्यक्तिश: कोणालाच ओळखत नाही, पण प्रत्येकातलं मर्म मी जाणतो, प्रत्येकाला आध्यात्मिकदृष्टय़ा ओळखतो. व्यक्तिमत्त्व हे मुळात खोटं आहे. हा मुखवटा आहे : तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचा व्यवसाय, तुमचा फोटो- पासपोर्ट आकाराचा फोटो- तुमची आयडेंटिटी कार्ड्स सगळं काही. तुमचं व्यक्तिमत्त्व नेमकं कशापासून तयार झालं आहे?- फक्त या गोष्टींपासून. तुम्ही या जगात येता, तेव्हा पाटी अगदी कोरी असते- खूपच स्वच्छ, अगदी नितळ. हाच तुमचा अर्क आहे. पण हे तर सगळ्यांच्या बाबतीत आहे. त्यामुळे मी तुम्हाला व्यक्तिश: ओळखतो की नाही हा प्रश्नच नाही.

ज्या दिवशी मला स्वत:ची ओळख पटली, त्या दिवसापासून मी तुलाही ओळखू लागलो.

तुझ्या मनातला गोंधळ, तुझी समस्या मला समजू शकते: तुला वाटतं, हे कसं शक्य आहे? कारण लोकांना वाटतं, मी एखाद्याला व्यक्तिश: ओळखत नाही, तर मी त्याला मदत कशी करू शकणार? वास्तव याच्या बरोबर उलट आहे. मी तुला आध्यात्मिकदृष्टय़ा ओळखू शकत नाही, तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही आणि तुला स्वत:ची आध्यात्मिक ओळख तर कधी होतच नाही. तू स्वत:ला ओळखतोस ते चेहऱ्याने. हा चेहरा म्हणजे तुझा आरसा तुला दाखवतो तो. तू कधी आरसेघरात गेला आहेस का? काही आरशांमध्ये तुम्ही खांबासारखे लांबलचक दिसता; काही आरशांमध्ये पिग्मींसारखे छोटे; काही आरशांमध्ये तर स्वत:चे चेहरे बघून घाबरून जायला होतं. पण तुझ्या बाथरूममध्ये लावलेला आरसाच योग्य आहे याची खात्री आहे तुला? आणि अमुक एक आरसा योग्य हे तरी कोणी ठरवलं? पण तू स्वत:कडे बघू शकशील असं तेवढं एकच माध्यम आहे.

मुल्ला नसरुद्दीनची एक सुंदर कथा आहे :

तो एकदा तीर्थाटनासाठी काबाला- मुस्लिमांच्या पवित्र स्थळी गेला होता.  सगळ्या धर्मशाळा, सगळी हॉटेल्स भरून गेली होती. एका हॉटेलच्या व्यवस्थापकाच्या हातापाया पडत तो म्हणाला, ‘‘तुम्ही काहीही करा.. पण  हॉटेलमध्ये कुठे तरी जागा असेल. मी खूप थकलो आहे. मी कित्येक मैल वाळवंट तुडवत आलो आहे. माझ्यावर दया करा!’’

व्यवस्थापक म्हणाला, ‘‘मी तुमची समजू शकतो, पण  फक्त एकच खोली मी तुम्हाला गुपचूप देऊ शकेन. त्या खोलीत झोपलेला माणूस एवढय़ा जोरात घोरतोय की त्याच्या काहीच लक्षात येणार नाही. तुम्ही हळूच जा आणि झोपा. किमान उद्या सकाळपर्यंत तो मनुष्य काही उठायचा नाही. ’’

मुल्ला आत गेला. तो माणूस घोरत होता. मुल्ला त्याचे बूट, टोपी, कोट सगळं तसंच ठेवून निजला. बूट, टोपी, कोटासकट झोपणं साहजिकच खूप कठीण होतं. त्यात सौदी अरेबियातला उन्हाळा. आणि एक घोरणारा माणूस शेजारी. सगळं काही काढून झोपायला गेलं तरी त्याच्या घोरण्याच्या आवाजामुळे तेही कठीण होतं. मुल्ला सारखा या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. त्याच्या या चुळबुळीमुळे तो माणूस जागा झाला. आणि त्याला बूट, टोपी, कोटासकट झोपलेला मुल्ला दिसला.त्याला राहवलं नाही.

त्याने विचारले, ‘‘तू माझ्या खोलीत न विचारता का घुसला आहेस. पण आता मध्यरात्री तू जाणार तरी कुठे? आणि तू बूट आणि टोपीसकट का झोपला आहेस?’’

मुल्ला नसरुद्दीन म्हणाला, ‘‘एक अडचण आहे. मी माझे बूट, माझी टोपी, माझा कोट सगळं काढलं- म्हणजे खरं तर मला कपडे काढूनच झोपायची सवय आहे. पण जर मी हे सगळं काढून झोपलो, तर तुम्हीही माझ्याशेजारी कपडे काढून झोपलेले आहात. हीच अडचण आहे.’’

‘‘यात काय अडचण आहे? मी बिनकपडय़ांनी झोपलो आहे, तू पण झोप.’’

मुल्ला म्हणाला, ‘‘तुम्हाला समजत नाहीये. सकाळी उठल्यानंतर कोण कोण आहे, हे मला कसं समजणार? माझी ओळख विसरू नये म्हणून मी माझी टोपी, माझे बूट, माझा कोट या सगळ्यांसकट झोपत होतो. ते सगळं असेल तर माझी खात्री पटेल की मीच मुल्ला नसरुद्दीन आहे आणि बाजूला झोपलेला माणूस कोणीतरी दुसरा आहे. पण दोघांनीही कपडे काढलेले असतील तर..’’

तो माणूस म्हणाला, ‘‘मी तुला काहीतरी युक्ती सुचवतो, कारण असा तूही झोपू शकणार नाहीस आणि मीही झोपू शकणार नाही.’’ एकीकडे त्या माणसाला वाटत होतं की, काय विचित्र माणूस आहे हा. कपडे काढले की आपली ओळख हरवेल असं याला वाटतंय. तो म्हणाला, ‘‘इथे एक बाहुली आहे  ती मी तुझ्या पायाला बांधतो. मग तू शांतपणे झोप. सकाळी उठलास की तुला कळेल, ही बाहुली तुझ्या पायाला बांधलेली आहे, म्हणजे तूच मुल्ला नसरुद्दीन आहे.’’ मुल्ला म्हणाला, ‘‘मी खरंच तुमचा आभारी आहे.’’ त्याने सगळे कपडे काढले, त्या माणसाने कोपऱ्यातून ती बाहुली आणून मुल्लाच्या पायाला बांधली. तो मनातल्या मनात हसत होता, म्हणत होता, ‘‘आतापर्यंत अशा माणसाला कधीच भेटलो नव्हतो.’’ मग मध्येच त्याच्या डोक्यात एक कल्पना आली.. मुल्ला घोरू लागला, तेव्हा त्याने ती बाहुली त्याच्या पायातून काढली आणि स्वत:च्या पायाला बांधली. मग तो झोपून गेला. सकाळी उठून मुल्लाने आपल्या पायाकडे पाहिलं आणि तो बिछान्यातून उडी मारून बाहेर आला नि ओरडू लागला, ‘‘एक गोष्ट नक्की आहे की, तो माणूस मुल्ला नसरुद्दीन आहे. अडचण अशी आहे की मी कोण आहे? कोणी सांगेल? कोणी मला ओळखू शकेल? व्यवस्थापक कुठे आहेत? त्यांनी मला काल रात्री पाहिलं आहे, कदाचित ते मला ओळखतील.’’

कळलं का गोष्टीचं तात्पर्य, तुमची व्यक्तिमत्त्वं ही तुमच्या पायाला बांधलेल्या बाहुल्यांसारखी आहेत. मला तुमच्या व्यक्तिगत आयुष्यांबद्दल, व्यक्तिमत्त्वांबद्दल जाणून घेण्याची गरज नाही; तुमच्याशी व्यक्तिश: ओळख करून घेण्याचीही गरज नाही; तुमचं मर्म मी जाणतो. स्वत:ला ओळखण्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना ओळखतो. माझ्या स्वत:च्या समस्या दूर करतानाच मला तुमच्या समस्या कळतात आणि त्या कशा दूर करायच्या याचे उपायही कळतात.

मला ज्या दिवशी स्वत:ची ओळख पटली, त्या दिवशी लक्षात आलं की मी पापीही आहे आणि संतही आहे. मला निद्रावस्थेत कोण आहे हेही माहीत आहे आणि कोण जागृत आहे हेही माहीत आहे. तेव्हा त्यात समस्या अशी काहीच नाही. तू इथे माझं ऐकत असशील.. मी काय सांगतोय ते सगळं ऐकत असशील, तर आपलं व्यक्तिमत्त्व सोडून दे, अहंकार गळून पडू दे. नम्र हो आणि खुल्या दृष्टीने बघ. शांत हो, सावध आणि जागरूक राहा आणि मग तुझ्याबाबत चमत्कार घडल्याशिवाय राहणारच नाहीत.

आणि लक्षात ठेव : हे चमत्कार माझ्यामुळे घडणार नाहीत. ते तुझ्यामुळेच घडतील. तुला माझ्याबद्दल कृतज्ञता वाटण्याचीही काहीच आवश्यकता नाही. तुझी कृतज्ञता पोहोचली पाहिजे त्या संपूर्ण अस्तित्वापर्यंत. मी असाच एक अनोळखी माणूस होतो, तुला वाटेत भेटलो, आपण थोडं बोललो, थोडय़ा गप्पा मारल्या.  त्या झाल्या आणि मग तू तुझ्या वाटेने गेलास आणि मी माझ्या स्वत:च्या.

तुम्हाला व्यक्तिश: जाणून घेण्याची मला काहीच आवश्यकता नाही, तुम्हालाही मला व्यक्तिश: ओळखण्याची काहीच गरज नाही. आवश्यकता आहे ती माझ्या अस्तित्वात आणि तुझ्या अस्तित्वात  मर्माचा एक पूल बांधला जाण्याची. शांततेत हे आपोआपच घडून येतं.

भाषांतर – सायली परांजपे

(ओशो -‘द रेझर्स एज्’ या पुस्तकातून साभार, सौजन्य -ओशो टाइम्स  इंटरनॅशनल /ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन)