निसर्गत: माणूस हा भावनोत्कटच आहे. अगदी सगळ्या भावनांबाबत तो अत्यंत उत्कट आहे. कोणीतरी एक प्रश्न विचारला – ‘‘जर लोक अगदी नैसर्गिक आणि खरं वागू लागले, स्मितहास्य बनावटच म्हणून त्यांनी ते सोडून दिलं आणि ते रस्त्यांवर किंचाळत आरडाओरडा करत फिरू लागले, तर काय होईल जगाचं?’’

असं झालं तर जगात बऱ्याच गोष्टी घडतील. पहिली गोष्ट म्हणजे युद्ध होणारच नाहीत. जगात मग कुठेच व्हिएतनाम किंवा इस्रायल नसेल. कारण, लोक खरं वागायला लागले, तर कोणाला ठार मारावं, हजारोंचं शिरकाण करावं इतका राग त्यांच्या मनात साचूनच राहणार नाही. लोक नैसर्गिक स्वभावानुसार वागू लागले तर जगात बराच बदल घडेल. तुम्हाला वाटतं तेवढा आरडाओरडा काही ते करणार नाहीत. कारण आता त्यांना ओरडण्याची परवानगी आहे- पण ओरडून ओरडून किती ओरडतील ते आणि किती काळापर्यंत? जर लोकांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं, तर आरडाओरडी, शिवीगाळ, निषेध, भांडणं या सगळ्या गोष्टी जगातून नाहीशाच होऊ लागतील.

हे खरं तर एक दुष्टचक्र आहे. म्हणजे हे असं आहे की तुम्ही एका माणसाला उपाशी ठेवलंय आणि तुम्ही त्याला फ्रिजच्या जवळपासही जाऊ देत नाही आहात. तुम्ही म्हणता की त्याला खाण्याची परवानगी आम्ही दिली तर तो खूप खाईल. आधी तुम्ही त्याला उपाशी ठेवलं आहे आणि आता तुम्हाला अशी भीती वाटते की खाण्याचं स्वातंत्र्य मिळालं तर तो खूप खाईल आणि आजारीच पडेल. म्हणून तुम्ही त्याला फ्रिजजवळही जाऊ देत नाही आहात. त्याने त्याच्या वाटय़ाला येईल तसं राहावं- तुम्ही त्याला जे द्याल, त्यावर त्याने उदरनिर्वाह करावा. आता तो कल्पनांच्या जगात शिरतो, तो स्वप्न बघू लागतो: काय करावं? या फ्रिजपर्यंत कसं पोहोचावं? आणखी कसं खावं? त्याच्या सगळ्या कल्पना खाण्याभोवती फिरू लागतात. स्वप्नही त्याला खाण्याचीच पडू लागतात. तुम्हाला भूक लागलेली असेल, तुम्हाला उपाशी ठेवलेलं असेल तर उपाशी ठेवणाऱ्याच्या मनात भीती निर्माण होते. आता जर तुम्हाला रस्त्यावर मोकळं सोडलं, तर तुम्ही एखाद्या रेस्टोरंटमध्ये शिराल, त्याच्या मालकाला माराल किंवा आणखी काही कराल. मात्र, तुमचं पोट भरलेलं असेल तर तुम्ही असं काहीच करणार नाही, कोणीच असं काही करणार नाही. हेच घडत आलंय. गेल्या हजारो वर्षांपासून तुम्हाला दडपून टाकलं गेलंय, तुम्हाला जास्तीतजास्त कृत्रिम करून टाकलं गेलंय. त्यामुळे आता भीती निर्माण झाली आहे. प्रश्न विचारणाऱ्याचं बरोबर आहे. आता जर लोक नैसर्गिक वागू लागले, तर किंचाळायला लागतील, ओरडायला लागतील, त्यांना आत्तापर्यंत कायम कराव्याशा वाटत होत्या पण त्या करायची मोकळीक त्यांना नव्हती, त्या सगळ्या गोष्टी ते करू लागतील. सगळं जग वेडं होऊन जाईल.

हो, पहिली काही र्वष संपूर्ण जग वेडं होईल. पण हा वेडेपणा उपचारासारखा आहे, त्याची आपल्याला खूप मदत होणार आहे.

त्यानंतर मात्र कोणीच वेडं होणार नाही. न्यूरोसिस नाहीसा होईल, सायकोसिस नाहीसा होईल, युद्धं नाहीशी होतील, राजकारण्यांना काही अर्थ उरणार नाही. राष्ट्रं, सुरक्षा यंत्रणा, लष्कर या सगळ्याला काही संदर्भच उरणार नाही, या सगळ्या गोष्टींची गरजच उरणार नाही. म्हणून तर राजकारण्यांना आणि धार्मिक नेत्यांना लोकांना दडपून ठेवण्यात एवढा रस असतो. कारण त्यांचं अस्तित्वच दडपशाहीवर अवलंबून आहे. युद्धं नाहीशी झालेली जनरल्सना आवडणार नाही, लष्करातल्या बाकीच्या लोकांनाही आवडणार नाही. जर व्हिएतनामसारखं काही नसेल, तर त्यांच्या आयुष्याचं प्रयोजनच हरपल्यासारखं होईल. राष्ट्र ही संकल्पनाच मोडीत निघाली, तर पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष असले काय नसले काय? त्याला काहीच अर्थ उरत नाही.

लोक नैसर्गिक स्वरूपात असतील, तर सरकारलाही काहीच संदर्भ उरणार नाही. सरकारी यंत्रणांची गरज कमीतकमी भासेल मग. अर्थातच यात कितीतरी लोकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. आणि त्यांना वाटणारी भीती योग्य, तर्कशुद्ध आहे. कारण, त्यांनी शतकानुशतकं लोकांना दडपून ठेवलं आहे आणि आता त्यांचा स्फोट होईल अशी भीती त्यांना वाटतेय. हो, पहिली काही र्वष म्हणजे साधारण एका पिढीचा कालखंड खूप मोठाले स्फोट होतीलच. मग या गोष्टी हळूहळू नाहीशा होऊ लागतील.

बटर्रण्ड रसेल यांनी लिहिलंय की ते लहान असताना खुर्चीचे पायही कापडात गुंडाळून ठेवण्याची पद्धत होती. कारण पाय म्हणजे लैंगिक भावना चाळवणारं काहीतरी. ते म्हणतात, ‘मी कधीच कोणा स्त्रीचे पाय बघितलेले नव्हते.’ पोशाख एवढा लांब असायचा की पाय कोणाला दिसणारच नाहीत आणि रसेल म्हणतात, त्या दिवसांत लोकांची कल्पनाशक्ती घुटमळत असायची ती पायांभोवती, ते स्वप्नं बघायचे तीही पायांची. पाय स्वप्नात बघितले तरी लोक रोमांचित व्हायचे. त्यात अत्यानंदाची भावना असायची. आता पाय कोणाच्या ध्यानीमनीही नसतात. एकदा का तुम्ही पुरुषाला किंवा स्त्रीला विवस्त्र बघितलं की तुम्हाला नग्नतेबद्दल वाटणारी काळजी, पडणारी स्वप्नं थांबून जातात. स्वप्न बदलतात.

जग अधिक नैसर्गिक स्वरूपात राहिले पाहिजे. मग चिंता, भीती, काळजी सगळं काही कमी होऊन जाईल. मात्र, एका पिढाचा कालखंड प्रचंड स्फोटक असेल- एकदा तो सरला की सगळं काही स्थिरस्थावर होईल. हा धोका आपण पत्करला पाहिजे. कारण, मानवता वाचवण्यासाठी हा धोका पत्करणं एवढा एकच मार्ग शिल्लक आहे.

अन्यथा, प्रत्येक जण वेडा होत चालला आहे.

धिस व्हेरी बॉडी द बुद्धा, टॉक #८ सौजन्य: ओशो इंटरनॅशनल www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे