जग जास्त जास्त गंभीर होत चाललं आहे. म्हणूनच कर्करोग, हृदयविकार, उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढताहेत, जगातला वेडेपणा वाढतोय. जग एका टोकाकडे ढकललं जातंय. म्हणूनच थोडे मूर्ख व्हा.  थोडं हसा, लहान मुलासारखे व्हा. थोडा आनंद लुटा, सगळीकडे गंभीर चेहरा घेऊन फिरू नका, आणि मग अचानक तुम्हाला जाणवेल तुमच्यात सखोल असं आरोग्य निर्माण होतंय. आरोग्याचे अधिक सखोल स्रोत तुम्हाला सापडतील.

हसू सखोल आणि संपूर्ण असावं, गंभीरपणावर मी हेच औषध देतो. तुम्हाला वाटत असेल की मी एखादं गंभीर औषध द्यावं. त्याचा उपयोग होणार नाही. तुम्ही थोडा मूर्खपणा, वेडेपणा केलाच पाहिजे. खरं तर बुद्धिमत्तेच्या सर्वोच्च शिखरामध्ये थोडासा मूर्खपणा सामावलेला असतोच. जगातील सर्वात शहाणी माणसं सर्वात मूर्खासारखं वागणारीही होती.

समजायला हे कठीण जाईल. तुम्ही या लोकांचा विचार मूर्ख म्हणून करू शकत नाही. कारण, तुमच्या मनाला सवय असते विभागणी करण्याची, शहाणा माणूस कधीच मूर्ख नसतो आणि मूर्ख माणूस कधीच शहाणा असू शकत नाही.  हे दोन्ही दृष्टिकोन चुकीचे आहेत. अशी खूप महान वेडी माणसं होऊन गेली आहेत, जी खूप शहाणीही होती.

पूर्वी, प्रत्येक राजाच्या दरबारात एक विदूषक असायचा- राजविदूषक. अतिविद्वत्ता मूर्खपणाकडे झुकू लागते, खरं तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक मूर्खपणाकडे जातो, त्यावेळी तोल साधण्याचं काम हा विदूषक करत असे. खूप उंच जाणाऱ्या गोष्टी पुन्हा जमिनीवर आणण्यासाठी कोणीतरी आवश्यक होतं. राजाच्या दरबारातला हा विदूषक विद्वानांना हसायला लावण्यासाठीही गरजेचा होता. नाहीतर लोक गंभीर होत जातील आणि हा गंभीरपणा म्हणजे आजारच आहे. गांभीर्यामुळे तुम्ही अनेकदा समतोल हरवून बसता, तुम्ही सर्वागीण दृष्टिकोन हरवून बसता. म्हणूनच प्रत्येक राजाच्या दरबारात एक विदूषक असायचा, महान विदूषक. जो काही गोष्टी सांगायचा, काही गोष्टी करायचा आणि काही गोष्टी पुन्हा जमिनीवर आणायचा.

मी ऐकलं आहे की एका सम्राटाकडे एक विदूषक होता. एकदा तो सम्राट आरशात बघत होता. विदूषक आला, त्याने उडय़ा मारल्या आणि राजाच्या पाठीत लाथ मारली. राजा आरशावर आपटला. अर्थातच तो खूप संतापला आणि म्हणाला, ‘‘तू जर या तुझ्या मूर्ख कृत्याचं, खरं तर गुन्ह्यचं, या कृत्याहूनही मूर्खपणाचं ठरेल असं कारण दिलं नाहीस, तर तुला मृत्युदंड दिला जाईल.’’

तो विदूषक म्हणाला, ‘‘महाराज, मला वाटलंच नाही इथे तुम्ही आहात. मला वाटलं राणीसाहेब आहेत इथे.’’ राजाला त्याला क्षमा करावीच लागली. कारण, त्याने दिलेलं या कृत्याचं कारण आणखी मूर्खपणाचं होतं. मात्र, हे असं उत्तर शोधून काढणारा तो मूर्ख विदूषक खरं तर खूप शहाणा असला पाहिजे.

प्रत्येक महान ज्ञानी माणसात, एक प्रकारचा उदात्त असा मूर्खपणा असतोच. हे असं असावंच लागतं, कारण, नाहीतर ज्ञानी माणूस अगदीच अळणी होऊन जाईल आणि मिठाशिवाय कशालाही चव नाही. म्हणूनच ज्ञानी माणसाला थोडं वेडं असावंच लागतं. आता बघा- एकदा एक प्रेषित गाढवावर बसून जात लोकांना सांगतात, ‘मी परमेश्वराचा पुत्र आहे’. बघा! यात दोन्ही गोष्टी आहेत. लोक हसले असतील नक्कीच : ‘काय म्हणतोहेस तू? म्हणतोहेस एक आणि वागतो आहेस दुसरंच..’

पण मला वाटतं परिपूर्ण शहाणपण असंच असतं. लाओ त्झू म्हणतात, ‘मी सोडून सगळे शहाणे आहेत. मीच मूर्ख वाटतो. प्रत्येकाचं मन स्पष्ट आहे; केवळ माझं मनच अस्पष्ट, विचित्र आहे. काय करायचं आणि काय करायचं नाही हे प्रत्येकाला माहीत आहे : फक्त मीच गोंधळलेलो आहे.’ ते खरं तर म्हणताहेत की, ‘माझ्यात शहाणपणा आणि मूर्खपणाचा संयोग झालेला आहे.’ आणि जेव्हा शहाणपणा आणि मूर्खपणा एकमेकांना भेटतात, तेव्हा तिथे काहीतरी अलौकिक निर्माण होतं.

तेव्हा गांभीर्याबद्दल गंभीर होऊ नका. त्याला हसा, थोडा मूर्खपणा करा. मूर्खपणाला मोडीत काढू नका; त्याचं स्वत:चं असं सौंदर्य आहे. तुम्ही शहाणे आणि मूर्ख असे दोन्ही होऊ शकाल, तेव्हा तुमच्यात अलौकिक गुण असतील. जग जास्त जास्त गंभीर होत चाललं आहे. म्हणूनच कर्करोग, हृदयविकार, उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढताहेत, जगातला वेडेपणा वाढतोय. जग एका टोकाकडे ढकललं जातंय. म्हणूनच थोडे मूर्ख व्हा. थोडं हसा, लहान मुलासारखे व्हा. थोडा आनंद लुटा, सगळीकडे गंभीर चेहरा घेऊन फिरू नका, आणि मग अचानक तुम्हाला जाणवेल तुमच्यात सखोल असं आरोग्य निर्माण होतंय. आरोग्याचे अधिक सखोल स्रोत तुम्हाला सापडतील.

एखादा मूर्ख माणूस वेडा झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? असं कधी घडलंच नाहीये. एखाद्या मूर्ख समजल्या जाणाऱ्या माणसाला वेड लागलंय का याचा मी खूप शोध घेतला. मला एकही उदाहरण सापडलं नाही. अर्थातच मूर्ख माणूस वेडा होऊ शकत नाही, कारण, वेड लागण्यासाठी खूप गंभीर व्हावं लागतं. तथाकथित शहाण्या माणसांच्या तुलनेत मूर्खाचं आरोग्य चांगलं असतं का याचाही मी खूप शोध घेतला. आणि तसं असतं : तथाकथित शहाण्यांच्या तुलनेत मूर्ख निरोगी असतात. ते वर्तमानातल्या क्षणात जगतात आणि ते मूर्ख आहेत हेही त्यांना माहीत असतं, त्यामुळे बाकीचे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याची चिंता त्यांना नसते. ही चिंताच तर शरीर आणि मनाला पोखरून टाकत असते. ते दीर्घकाळ जगतात, कारण त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू असतं.

लक्षात ठेवा, आयुष्य हा एक सखोल समतोल झाला पाहिजे, खूप खोल असा समतोल. मग, अशा वेळी, तुम्ही मधूनच निसटून नाही जाऊ शकत. यासाठी खूप ऊर्जा वापरली जाते, तुम्ही वरवर चढू लागता. परस्परविरोधी टोकांच्या बाबत हे नेहमीच होत राहतं. तेव्हा केवळ पुरुष होऊन राहू नका किंवा केवळ स्त्रीही होऊन राहू नका : हे दोन्ही होण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही या दोन्ही साच्यांतून बाहेर पडाल. तसंच केवळ शहाणेही होऊ नका आणि केवळ मूर्खही होऊ नका: दोन्ही व्हा, म्हणजे तुम्ही या सगळ्याच्या पलीकडे जाऊ शकाल.

ओशो, कम फॉलॉ टू यू,

व्हॉल्यूम १, टॉक #४

सौजन्य: ओशो इंटरनॅशनल

www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे