28 January 2020

News Flash

अस्तित्व

मला असं वाटतं की जसं काही माझं अस्तित्व केवळ समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातच आहे.

मला असं वाटतं की जसं काही माझं अस्तित्व केवळ समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातच आहे. मला हे इतकं भ्रामक वाटतं. मी कुठे आहे? मी काय करू शकतो किंवा करू शकत नाही?

पहिली गोष्ट म्हणजे केवळ तुझंच अस्तित्व इतरांच्या डोळ्यांपुरतं मर्यादित आहे असं नाही; प्रत्येकाचंच अस्तित्व तसं आहे. अस्तित्वाचा हाच सामान्य मार्ग आहे. तुम्ही दुसऱ्याला आरशासारखं वापरता. दुसऱ्याची मतं खूपच महत्त्वाची होऊन जातात, त्याला खूप मोठं मूल्य प्राप्त होतं, कारण तेच तुमची व्याख्या करतात. कोणीतरी म्हणतं तुम्ही किती सुंदर आहात; त्या क्षणी तुम्ही सुंदर होऊन जाता. कोणीतरी म्हणतं तुम्ही मूर्ख आहात; त्या क्षणापासून तुम्ही स्वत:बद्दल शंका घेऊ लागता; कदाचित मी असेन मूर्ख. तुम्हाला त्याचा राग येऊ शकतो; तुम्ही ते नाकारूही शकता, पण खोलवर कुठेतरी तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेबाबत साशंक होऊन जाता..

तुम्ही कोण आहात हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्हाला तुमचे स्वत:चे डोळेही बंद करून घ्यावे लागतील; तुम्हाला आतमध्ये जावं लागेल. तुम्हाला सगळं जग विसरावं लागेल, ते तुमच्याबद्दल काय म्हणतं हे तुम्हाला विसरून जावं लागेल. तुम्हाला स्वत:च्या खोलवर आत जावं लागेल आणि स्वत:च्या वास्तवाचा सामना करावा लागेल.

मी इथे हेच शिकवतोय- दुसऱ्यावर अवलंबून राहू नका, दुसऱ्याच्या डोळ्यांत बघू नका. त्यांच्या डोळ्यातून कशाचाही मागमूस लागणार नाही. तेही तुमच्याइतकेच अज्ञानी आहेत- ते कशी काय तुमची व्याख्या करू शकतात? तुम्ही स्वत: कोण आहात हे शोधण्यासाठी एकमेकांच्या डोळ्यांत बघत राहता. हो, तिथे काही प्रतिबिंब दिसतात, तुमच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब दिसतं समोरच्याच्या डोळ्यांत. पण तुमचा चेहरा म्हणजे तुम्ही नव्हे; तुम्ही तर या चेहऱ्याच्या पार मागे दडलेले आहात. तुमचा चेहरा इतका बदलत असतो की तो चेहरा म्हणजे तुम्ही असू शकत नाही.

..चेहरा म्हणजे तुम्ही नाही. तुमच्यातील जागरूकता कुठेतरी खोलवर लपलेली आहे; तिचं प्रतिबिंब कधीच कोणाच्या डोळ्यांत दिसत नाही. हा, काही गोष्टींचं प्रतिबिंब दिसतं: तुमच्या कृती. तुम्ही काहीतरी करता आणि समोरच्याच्या डोळ्यात त्याचं प्रतिबिंब दिसतं. पण ते प्रतिबिंब म्हणजेही तुम्ही नाही. तुमच्या कृती म्हणजे तुम्ही नाहीच. तुम्ही तुमच्या कृतींहून खूप मोठे आहात.

तुमचं अस्तित्वाचं प्रतिबिंब कधीच दुसऱ्यांच्या डोळ्यात पडत नाही. तुमचं अस्तित्व जाणून घेण्याचा फक्त एकच मार्ग आहे.. आणि तो म्हणजे सर्व आरशांपासून डोळे मिटून घेणं. तुम्हाला स्वत:च्या आतल्या अस्तित्वामध्ये प्रवेश करावा लागतो, त्याचा थेट सामना करावा लागतो. याची कल्पना तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही, हे अस्तित्व म्हणजे काय ते सांगू शकत नाही. तुम्ही ते जाणून घेऊ शकता, पण इतरांकडून नाही. हे ज्ञान कधीच उसनं घेतलं जाऊ शकत नाही, हा केवळ एक थेट अनुभव असतो, प्रत्यक्ष अनुभव घेणं असतं.

ओशो, द डिसिप्लिन ऑफ ट्रान्सेण्डन्स, खंड १, टॉक #२

 

आनंदी आनंद

आनंद हा माणसाचा स्वभाव आहे. तुम्हाला आनंदाबाबत चिंता करण्याची गरज नाही, तो आधीपासूनच आहे. तो तुमच्या हृदयात आहे- तुम्ही केवळ दु:खी राहणं थांबवलं पाहिजे, तुम्ही दु:ख निर्माण करणाऱ्या यंत्रणांचं काम बंद केलं पाहिजे.

पण हे करायला कोणीच तयार दिसत नाही. लोक म्हणतात, ‘मला आनंद हवाय.’ हे म्हणजे ‘मला आरोग्य हवंय’ असं म्हणायचं आणि दुसरीकडे आजाराला चिकटून राहायचं असं आहे. तुम्हीच आजाराला जाऊ देत नाही. डॉक्टरांनी औषधं लिहून दिली तरी, तुम्ही ती औषधं फेकून देता; डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचं पालन कधी करत नाही. तुम्ही कधी सकाळी चालायला जात नाही, तुम्ही कधी पोहायला जात नाही, समुद्रकिनाऱ्यावर पळायला जात नाही, तुम्ही कोणताही व्यायाम करत नाही. तुम्ही पछाडल्यासारखे खात राहता, तुम्ही तुमचं आरोग्य उद्ध्वस्त करत राहता- आणि पुन:पुन्हा विचारत राहता की चांगलं आरोग्य कसं मिळेल. पण अनारोग्य निर्माण करणारी यंत्रणा काही तुम्ही बदलत नाही.

आरोग्य ही काही साध्य करण्याची बाब नाही, ती काही वस्तू नाही. आरोग्य म्हणजे जगण्याचा एक पूर्णपणे वेगळा मार्ग. तुम्ही ज्या पद्धतीने जगत असता, ती पद्धत आजार निर्माण करते. तुम्ही ज्या पद्धतीने जगत असता, ती पद्धत दु:ख निर्माण करते.

उदाहरणार्थ, लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की त्यांना आनंदी राहायचं आहे. पण ते त्यांच्यातल्या मत्सराचा त्याग करू शकत नाहीत. तुम्ही मत्सर सोडून दिला नाही, तर प्रेम कधीच फुलणार नाही. मत्सराचं तण प्रेमाच्या गुलाबाला नष्ट करून टाकेल. आणि जोपर्यंत प्रेम फुलत नाही, तोपर्यंत तुम्ही आनंदी होणार नाही. कारण प्रेम फुलल्याशिवाय आनंद कोणाला मिळाला आहे? हा प्रेमाचा गुलाब तुमच्या अंतरात फुलला नाही, त्याचा सुगंध दरवळला नाही, तर तुम्ही आनंदी होऊ शकत नाही.

आता लोकांना आनंद हवा असतो- पण केवळ हवा आहे म्हणून तुम्हाला तो मिळत नाही. हवा असणं पुरेसं नाही. तुम्हाला तुमच्या दु:खाच्या आत डोकावून बघावं लागेल, तुम्ही ते कसं निर्माण केलं- तुम्ही सर्वप्रथम दु:खी कसे झालात, तुम्ही दररोज दु:खी कसे होत राहिलात- तुमचं तंत्र काय आहे?

आनंद हे एक नैसर्गिक वैशिष्टय़ आहे. त्यामुळे जर कोणी आनंदी असेल, तर त्यात काही कौशल्य नाही. आनंदी होण्यासाठी त्याला त्यात निपुण असण्याची गरज नाही.

प्राणी आनंदी असतात, झाडं आनंदी असतात, पक्षी आनंदी असतात. संपूर्ण अस्तित्व आनंदी आहे. माणूस तेवढा अपवाद. दु:ख निर्माण करण्याची हुशारी केवळ माणसाकडेच आहे- बाकी कोणाकडेच ते कौशल्य नाही. तेव्हा तुम्ही आनंदी असाल, तर हे खूप सोपं आहे, निष्पाप आहे, त्याबद्दल बढाई मारण्यासारखं काहीच नाही. उलट तुम्ही दु:खी असाल, तर तुम्ही स्वत:सोबत महान असं काहीतरी करत आहात, तुम्ही काही तरी खरोखर कठीण गोष्ट निभावत आहात.

 

ओशो, झेन: द पाथ ऑफ पॅराडॉक्स खंड २, टॉक #

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

First Published on August 18, 2018 1:02 am

Web Title: osho philosophy part 24
Next Stories
1 रिक्तता..
2 प्रेम द्या!
3 व्यक्तिमत्त्व विषारी आणि पोषक
Just Now!
X