20 February 2019

News Flash

होकाराचा अर्थ

तुझ्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे

ओशो,

मला वाटतं की जणू काही मी माझ्याकडचं जवळपास सगळं सोडून देतेय, पण माझा एक छोटासा भाग कसोशीने घट्ट धरून ठेवतेय. घोर लागून राहतो, चिंतेचे ढग जमतात, अपूर्णत्वाची भावना मनात घर करते. तुमच्यासोबतचा एक सुंदर क्षण इतका उत्कट असतो की तो लगेचच टोचू लागतो आणि मग इच्छेचं रूप घेतो. माझा ‘होकार’ अजून पूर्णत्वाला गेलेला नाही म्हणून असं होतंय का? आणि यामुळे अस्तित्वाविषयीच चिंता का निर्माण होतेय का?

उत्तर –

तुझ्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे- पण सगळेच त्याबद्दल अनभिज्ञ असतात. तू लिहिलं आहेस, ‘‘मला वाटतंय मी जवळपास सगळं सोडून देतेय.’’ तुला कळतंय का याचा अर्थ ? मुक्त सोडण्यास जवळपास असं काही नसतं. एक तर ते असतं किंवा नसतं. सोडून देणं काही टप्प्याटप्प्याने होत नाही. मग साहजिकच तुला ताण, चिंता वाटते.

तू विचारतेस, ‘माझा होकार अजून पूर्णत्वाला न गेल्यामुळे असं होतंय का?’ आता तुझ्या होकाराबद्दल आणि त्याच्या पूर्णत्वाबद्दल काय सांगावं? तू तो होकार स्वप्नातही बघितलेला नाहीयेस; केवळ ऐकलं आहेस त्याबद्दल. आणि ‘होकार’ पूर्णत्वाला गेलेल्यांचा आनंद तू बघितला आहेस, त्यांना नाचताना-गाताना बघितलं आहेस आणि म्हणून त्या अवस्थेची इच्छा तुझ्या मनात आहे. ही इच्छा ईष्र्येतून आलेली आहे. अन्यथा, तुला चिंता वाटली नसती. ‘होकार’ म्हणजे पूर्णपणे सोडून देणं.

‘‘मला वाटतं की मी जवळपास सगळं सोडून देतेय पण माझा एक छोटासा भाग कसोशीने घट्ट धरून ठेवतेय.’’ या तुझ्या सांगण्याला काहीच अर्थ नाही. आपण स्वत:चे असे भाग करू शकत नाही. एक हात काही घट्ट धरून ठेवत असेल तर संपूर्ण शरीर तिथेच असेल ना. एका माणसाने राजाच्या खजिन्यातून चोरी केली, म्हणून त्याला राजासमोर हजर करण्यात आलं. त्याला प्रत्यक्ष चोरी करताना कोणी पाहिलं नव्हतं. त्याने चोरी केली हे सिद्ध करणं राजासाठी खूपच कठीण होतं. तरीही चोराने हे नाकारलं नाही. तो म्हणाला, ‘‘मी खजिन्यातून चोरी केली आणि त्यासाठी द्यायची ती शिक्षा तुम्ही मला देऊ शकता पण या चोरीत केवळ माझे हात गुंतलेले आहेत. मी तर केवळ उभा राहून बघत होतो. तुम्ही माझ्या हातांना शिक्षा करू शकता, पण मला नाही. मला शिक्षा करणं अन्याय्य ठरेल.

राजा म्हणाला, ‘‘अरे, तू तर अत्यंत तर्कशुद्ध विचार करणारा माणूस आहेस. ठीक आहे. मी तुझ्या दोन्ही हातांना तीस र्वष तुरुंगात राहण्याची शिक्षा देतो.’’ सगळा दरबार हसू लागला. आता या माणसाचे हात तुरुंगात जाणार तर तो बाहेर कसा राहील? पण तो माणूसही हसत होता. बघता बघता दरबारी हसायचे थांबून स्तिमित झाले. कारण, त्या माणसाने त्याचे दोन्ही हात काढून राजापुढे ठेवले. ते खोटे होते. तो म्हणाला- ठीक आहे, तीस र्वष किंवा तीनशे र्वष, तुम्हाला हवी तेवढी र्वष ठेवा तुरुंगात.

त्या चोराचा होता तसा तुझा भाग तर खोटा नाहीये ना. धरून ठेवू बघणारे हात खोटे असते तर सोपं होतं पण तू एक संपूर्ण व्यक्ती आहेस. तू सोडून देण्याचा प्रयत्न करते आहेस म्हणून घोर लागतोय. इथे प्रयत्न करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण सोडून देण्याच्या अवस्थेत जायचं तर या प्रयत्नांचाही अडथळाच होतो. सोडून देण्याचा प्रयत्न करता येत नाही. ते समजून घेण्याच्या प्रक्रियेचं फलित असतं. तू काही तरी समजून घेतेस, तेव्हा सोडून देतेस.

उदाहरणार्थ, तुला दिसतंय की तुझ्या घराला आग लागलीये. अशा परिस्थितीत आग लागलेल्या घरातून बाहेर कसं पडायचं हे जाणून घ्यायला कोणी एनसायक्लोपीडिया उघडून बसणार नाही. क्षणभरही विचार न करता जागा दिसेल तिथून बाहेर पडेल, अगदी खिडकीतून उडीही मारेल. एका माणसाने त्याच्या घराला आग लागली तेव्हा बाथरूममधून नग्नावस्थेत बाहेर उडी मारली. घराला आग लागली तेव्हा  तो बाथरूममध्ये आंघोळ करत होता, मग त्याने काय कपडे घालावेत आणि पुढल्या दाराने बाहेर पडावं? त्याने नग्नावस्थेत दुसऱ्याच्या घरात उडी मारली. पण कोणालाच त्यात अयोग्य वाटलं नाही. उलट शेजाऱ्यांनी पांघरूण आणून त्याला झाकलं.

प्रयत्न निष्फळ आहेत याचा तत्क्षणी झालेला अर्थबोध म्हणजे मुक्त सोडून देणं. प्रत्येक आकलनात सोडून देणं असतं. यात तुम्ही करावं किंवा प्रयत्न करावा असं काहीच नाही. प्रेमाबाबतही हेच आहे. सोडून देणं, प्रेम, ध्यान, ईश्वर- यातलं काहीच तुम्ही करत नाही. होकाराच्या अवस्थेतल्या लोकांना फुलताना तू बघते आहेस पण तुला हे कळत नाहीये की त्यांचा होकार हा प्रयत्नांनी आलेला नाही, ते खोल अशा अर्थबोधाचं फलित आहे.

तेव्हा या होकारासाठी झगडण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न कर. आपण काय म्हणतोय, आपण कोण आहोत, इथे काय घडतंय हे समजून घे. स्वत:ला मुक्त आणि मोकळी ठेव आणि मग एक दिवस- तो कधी येईल हे कोणीच सांगू शकत नाही, त्याचा अंदाज बांधता येत नाही पण आठवडय़ाचे फक्त सात दिवस आहेत. तेव्हा काळजी करू नकोस.. कोणाला सोमवारी आत्मज्ञान प्राप्त होईल, कोणाला रविवारी.. त्याने काहीच फरक पडणार नाही. यात निवडीला फारशी संधी नाही.. कारण दिवस शेवटी सातच आहेत.

तेव्हा चिंता करू नकोस, आनंद घे आणि आत्मजाणीव, आत्मज्ञान, ईश्वर हे सगळं प्राप्त करायचंय हे विसरून जा. सगळं विसरून जा- आपण इथे काही साध्य करण्यासाठी आलेलो नाही. आपण केवळ आपल्याकडे असलेल्या काही क्षणांचा आनंद घेण्यासाठी आलो आहोत. हा आनंद घेत असताना कधी तरी अचानक तुला जाणवेल की ईश्वरही तुझ्यासोबत नाचतोय, ती गोष्ट वेगळी. तू काही ईश्वरासाठी नृत्य करत नव्हतीस, तू त्याची प्रतीक्षा करत नव्हतीस; तुझं नृत्य इतकं सुंदर होतं, तुझं नृत्य इतकं संपूर्ण होतं, तुझं नृत्य इतकं उत्कट होतं की, ते नृत्य करणारी नाहीशीच झाली.

जगभरात वेगवेगळ्या धर्माचे लक्षावधी उपासक ईश्वराने त्यांच्यासोबत नृत्य करावं म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करतात पण त्यांना कधीच त्याची झलकही दिसत नाही आणि दुसरीकडे ईश्वरासोबत नृत्य करणं म्हणजे काय हे समजलेलेही खूप लोक आहेत. अस्तित्वाला पूर्णपणे ‘होकार’ देणं म्हणजे काय हेही त्यांना समजलेलं असतं.

हा काही प्रयत्न नसतोच; हे असतं केवळ समाजाने तुम्हाला दिलेली प्राप्तीची मानसिकता सोडून देणं. ही मानसिकता महत्त्वाकांक्षांना जन्म देते, पैशाची महत्त्वाकांक्षा, सत्तेची महत्त्वाकांक्षा, प्रतिष्ठेची महत्त्वाकांक्षा, ईश्वरप्राप्तीची महत्त्वाकांक्षा किंवा स्वर्गाची महत्त्वाकांक्षा- पण शेवटी महत्त्वाकांक्षाच. पैसा आणि प्रतिष्ठेसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्यांच्या मनातली ईश्वरप्राप्तीची, आत्मज्ञानाची, निर्वाणाची महत्त्वाकांक्षा काही वेगळी नसते. सगळ्या महत्त्वाकांक्षाच; अहंकाराला सजवणाऱ्या. ईश्वर किंवा आत्मज्ञान कधीही तुमच्या अहंकाराची सजावट होऊ शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही असे नसता, तेव्हा संपूर्ण अस्तित्व तुमच्यावर  प्रत्येक कोनातून पुष्पवृष्टी करत राहते.

( ओशो -‘द रेझर्स एज्’ या पुस्तकातून साभार, सौजन्य -ओशो टाइम्स  इंटरनॅशनल /ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन)

 भाषांतर – सायली परांजपे

First Published on January 20, 2018 12:45 am

Web Title: osho philosophy part 3