19 July 2018

News Flash

शिक्षणाच्या वाटेवर..

‘‘एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन.. बस्स. संपूर्ण जग बदलून टाकण्याची ताकद त्यात आहे.

आपल्या विद्यार्थिनीसोबत अकिला असीफी.

आज सगळ्याच विकसनशील देशात शिक्षणाचं महत्त्व वाढत चाललं आहे, विशेषत: मुली शिक्षण घेण्यासाठी, देण्यासाठीही दहशतवादाचाही सामना करत आहेत. निर्वासित अफगाणी मुलींना शिक्षण देणाऱ्या अकिली असीफी असो किंवा तालिबान्यांच्या गोळ्या खाऊनही शिक्षणासाठी आपल्या नोबेल पुरस्काराची सारी रक्कम देणाऱ्या मलाला युसूफझाईचा आदर्श या मुलींपुढे आहे.
आज सगळ्याच विकसनशील देशात शिक्षणाचं महत्त्व वाढत चाललं आहे, विशेषत: मुली शिक्षण घेण्यासाठी, देण्यासाठीही दहशतवादाचाही सामना करत आहेत. निर्वासित अफगाणी मुलींना शिक्षण देणाऱ्या अकिली असीफी असो किंवा तालिबान्यांच्या गोळ्या खाऊनही शिक्षणासाठी आपल्या नोबेल पुरस्काराची सारी रक्कम देणाऱ्या मलाला युसूफझाईचा आदर्श या मुलींपुढे आहे.

‘‘एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन.. बस्स. संपूर्ण जग बदलून टाकण्याची ताकद त्यात आहे. आज जगभरातल्या ६६ लाख मुली शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी लढेन, जगातलं प्रत्येक मूल शाळेत जाताना मला बघायचंय.’’ नोबेल पुरस्कार मिळवणारी सर्वात लहान मुलगी (आजही ती १७ वर्षांची आहे.) मलाला युसूफझाई हिचे हे उद्गार. शिक्षणाचा झरा आता दहशतवादाने तुंबलेल्या साचलेपणावर मात करत अखंडपणे वाहात राहील याची साक्ष देणारा. ‘ही नेमड् मी मलाला’ या अमेरिकेच्या माहितीपटातील तिचं हे वाक्य, तिच्या कार्यकर्तृत्वाची ओळख पटवून देणारं. नुकताच हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आलाय.

ch07शिक्षणाचं महत्त्व सगळ्यांनाच पटत चाललेलं आहे, मात्र आशियातील मुलींना, स्त्रियांना याची जास्त जाणीव होतेय आणि त्यासाठी त्या धोका पत्करूनही पुढे जात आहेत, ही जगासाठीही महत्त्वाची गोष्ट. काही देशांत दहशतवादाने, हिंसाचाराने थैमान घातलेलं आहे तर काही देशात गरिबी, कुपोषण यांनी. त्या अभावग्रस्त देशातही आता शिक्षणाच्या वटवृक्षाने पाळमुळं पसरायला सुरुवात केली आहे, हे सुचिन्हच! त्यातल्याच एक अकिला असीफी. अफगाणिस्तानातून विस्थापित झाल्यानंतर गेली २० वर्षे पाकिस्तानात निर्वासित म्हणून राहणाऱ्या अकिलांना ‘युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजी’तर्फे दिला जाणारा ‘नानसेन रेफ्युजी अ‍ॅवॉर्ड’ हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. तो त्यांना दिला गेलाय निर्वासित अफगाणी मुलींना शिक्षणाच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या त्यांच्या धाडसी आणि अविश्रांत मेहनतीसाठी. आज ४९ वर्षांच्या असणाऱ्या अकिलांना चार मुली. मात्र अफगाणिस्तानातला कट्टरवाद, तिथली सामाजिक मानसिकता, त्यांच्या प्रातांत उच्च शिक्षणाची व्यवस्थाच सोयीची नसल्याने त्यांच्या तीनही मुलींना अर्धवट शिक्षण घ्यावं लागलं. शिक्षिका असलेल्या अकिलांना ही बाब खंतावत होती. रीतिरिवाजांमुळे मोठय़ा मुलीचं आज लग्न झालंय, पण तिला प्रत्येक गरजेच्या वेळी नवऱ्यासमोर हात पसरावा लागतोय ही त्यांची खंत आहे. ती शिकली असती तर तिनेही पैसे कमवले असते. कुटुंबाला हातभार लावू शकली असती. आज प्रत्येक मुलीने स्वत:च्या पायावर उभं राहायलाच हवं, अशी इच्छा असलेल्या अकिलांच्या अफगाणिस्तानात नागरी युद्धाने हाहाकार माजला आणि अकिलाचं कुटुंब निर्वासित झालं. त्यांनी आश्रय घेतला तो पाकिस्तानचा. पाकिस्तानमधल्या मियानवाली येथील कोट चंदना रेफ्युजी गावात त्यांना आश्रय मिळाला. मुलींना शिक्षण देणं ही सर्वाधिक चांगली गुंतवणूक हे मानणाऱ्या असिफी यांनी विखुरलेले अफगाणवासी त्या परिसरात एकत्रित आल्यानंतर शिक्षणाचा ध्वज उंच उभारायला सुरुवात केली. अर्थात त्यांना जितकं शिक्षणाचं महत्त्व वाटत होतं तितकं इतरांना नाही. त्यांनी प्रत्येक घरचे दरवाजे ठोठावायला सुरुवात केली. मुलींना माझ्याकडे पाठवा. मी शिकवते त्यांना, या त्यांच्या आर्जवाचा उपयोग होऊ लागला. हळूहळू २० मुली त्यांच्याकडे येऊ लागल्या आणि एका तंबूत शाळा सुरू झाली. आर्थिक अडचण होतीच. त्या प्रत्येक नोट्स स्वत:च्या हस्ताक्षरात कॉपी करून मुलींना वाटत. त्यांची ही शिक्षणाची ओढ लक्षात घेऊन पाकिस्तान सरकारने त्यांना आर्थिक मदत केली आणि त्यांच्या तंबूतल्या शाळेने विस्तारायला सुरुवात केली. त्यांचं शिकवणं पाहून स्थानिक मुलीही त्यांच्या शाळेत येऊ लागल्या. नंतर आर्थिक मदतही मिळू लागली आणि आज त्यांची शाळा एका कायमस्वरूपी इमारतीत रूपांतरित झाली आहे आणि मुलींची संख्या १००० वर गेली आहे. अकिला म्हणतात, या हुशार, बुद्धिमान मुलींना मी पाहाते. त्यांचं उज्ज्वल भवितव्य मला दिसत असतं, परंतु उच्चशिक्षण घेण्यास अनेक मुली आजही मागे पडतात आणि काहीही न करता घरी बसून राहतात. आज पाकिस्तानातही अफगाणी निर्वासितांची संख्या खूप आहे आणि तीही गेल्या ३५ वर्षांपासून. त्यातलीअसंख्य मुले शिक्षणापासून वंचित आहेत. निर्वासितांच्या खाण्याचा आणि निवाऱ्याचा प्रश्नच बिकट असतो त्यामुळे शिक्षण तर फारच नंतरच्या प्राधान्यपायरीवर असतं.

४ कोटींची रक्कम शिक्षणासाठीच

कोणत्याही देशाची प्रगती ही तुम्ही किती शिक्षित आहात यावर आहे म्हणून शिकलेल्यांनी इतरांना शिकवा, असं अकिलांचं म्हणणं आहे. त्यांनी आपल्याला पुरस्कार म्हणून मिळालेले एक लाख डॉलर्स आपल्या मायदेशी काबूलमध्ये असलेल्या विस्थापितांच्या शिक्षणासाठीच खर्च करायचे ठरवले आहेत. मलाला युसूफझाईनेही तेच जाहीर केलं होतं, तिला नोबेल पुरस्कार म्हणून मिळालेले ४ कोटी ५५ लाख रुपये तिने आपल्या ‘मलाला फंड’ला दिले असून या पुढचं आयुष्य मुलींच्या शिक्षणासाठीच वेचायचा तिचा निर्धार आहे. ‘मुलींना शिकवलंच पाहिजे,’ याचं समर्थन करणाऱ्या १४ वर्षीय मलालाला तालिबान्यांनी गोळ्या घालून ठार मारायचा प्रयत्न केला होता. मलाला, तिच्या मैत्रिणी वाचल्या, पण वाचलेलं आयुष्य सार्थकी लावत तिने आपला आवाज अधिक बुलंद केलाय. नोबेल पुरस्कार घेतानाचे तिचे भाषण काय किंवा विविध चॅनल्सवरच्या तिच्या मुलाखती काय किंवा आताच्या तिच्या ‘ही नेमड् मी मलाला’ या माहितीपटातील अस्खलित इंग्रजीतून मांडलेले तिचे विचार हे आजच्या बदलत्या जगातल्या, आधुनिक मुलीचे आहेत हे जाणवतं. ‘दहशतवादाची गोळी मला ठार करू शकलेली नाही, यातच सारं काही आलं.’ असं सांगत मलाला म्हणते, ‘‘इस्लाम काय किंवा कुराण या दहशतवाद्यांना कळलेलाच नाही. इस्लामने कधीच हिंसाचाराला प्रोत्साहन दिलेले नाही. इस्लाम समजून घ्यायचा असेल तर कुराण वाचायला हवं आणि कुराण वाचायचं असेल तर शिक्षण घेणं अपरिहार्य आहे. कुठलाच धर्म असहिष्णुता शिकवत नाही म्हणूनच ‘शिका आणि शिकू द्या.’’

जगभरातील मुलीही शिक्षणाच्या वाटेवर..

आणि हेच म्हणताहेत इतर देशातल्या मुलीही. युगांडाची अवाझी सोफिया, लेबेनॉनची झैनाब, तानझेनियाची इव्हा, बांगलादेशची शर्मिन, जॉर्डनची रनीम या सगळ्या १४-१५ वर्षांच्या मुली एकवटल्या आहेत, मुलींच्या शिक्षणासाठी. नुकत्याच झालेल्या कन्या दिनाच्या निमित्ताने ‘गार्डियन’ वृत्तपत्राने जागतिक व्यासपीठावर या मुलींना बोलतं केलं होतं. बालविवाह, बालमाता या विषयापासून ते शिक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षांपर्यंत विविध विषयांवर या मुली बोलल्या आहेत. कुणी आपल्या देशातल्या हिंसाचाराने, कुणी स्त्री-पुरुष असमानतेमुळे तर कुणी गरिबीमुळे तर कुणी लोकांच्या मागास विचारसरणीमुळे निराश आहेत. या सगळ्यावरच एकच उपाय म्हणजे शिक्षण घेऊन मोठं पद मिळवणं, असं त्यांना वाटतंय. इव्हाला ‘पोलीसवूमन’ होऊन आपल्या समाजाची काळजी घ्यायची आहे. रात्री वीज नसल्याने तिला दिवसा अभ्यास करावा लागतोय. तो वेळेत संपावा म्हणून ती तहानभूक हरवून अभ्यास करतेय. अवाझीला अकाऊंटंट व्हायचंय. पैसे कमवून तिला आपल्या घरची आर्थिक स्थिती सुधारायची आहे. युगांडामधील मुलींनी शिक्षण घेतलं तर त्यांचा बालविवाह तरी टळेल असं तिला वाटतंय. तर शर्मिनला डिटेक्टिव्ह होऊन मुलींची तस्करी करणाऱ्यांना रंगेहाथ पकडायचं आहे. तिच्या देशातल्या तिच्यासारख्या अनेक मुलींना लैंगिक छळाला आणि बालविवाहाला तोंड द्यावं लागतंय, तिला हे बदलायचंय. तर जॉर्डनमध्ये निर्वासित म्हणून आलेल्या सीरियामधल्या रानीमला पुढचं शिक्षण कसं घ्यायचं, हा प्रश्न पडलाय. तिचं आयुष्य पूर्ण बदलून गेलंय पण तिला फार्मसिस्ट व्हायचंय. आपल्या देशात परत गेलं की हा काळाकुट्ट इतिहास लिहून काढायचाय. ग्वाटेमलची इमेलीन, बालमाताचं प्रमाण या देशात खूप आहे. तिला ते बदलायचंय. शिक्षण घेतलं तरच लोक बालविवाह करणार नाहीत आणि मग बालमाता होणार नाहीत. अनेक मुलींची आयुष्ये वाचतील. अनेकींना चांगलं आयुष्य मिळेल, असं तिला वाटतंय.
या सगळ्या मुली आज बोलताहेत, त्यांच्या डोळ्यांत स्वप्ने आहेत. उद्याच्या उज्ज्वल भविष्याची! शिक्षणाने प्रश्न सुटतील असं त्यांना वाटतंय.. त्या स्वप्नांच्या दिशेने त्यांची पावले पडताहेत.. त्या वाटेवरच्या काटय़ांची त्यांनाही कल्पना आहे तरीही त्या निघाल्या आहेत.. ती पावले त्यांना मुक्कामी पोहोचवतील यासाठी आपण प्रार्थना करू या.. तेवढं तर आपण नक्कीच करू शकतो!
(संदर्भ : बीबीसी, गार्डीयन वृत्तपत्र)
आरती कदम -arati.kadam@expressindia.com

First Published on October 24, 2015 1:01 am

Web Title: importance of girls education