18 March 2019

News Flash

..तेव्हा कायद्याला बदलावं लागतं

विचित्र किंवा त्रासदायक हा शब्द ज्याला चपखल बसेल अशा कायद्यानं तिचं जगणं असह्य़ केलं होतं.

वेदना दुख:दायी असतेच, परंतु याच वेदनेला शस्त्र बनविलं तर कायदा बदलण्याची ताकदही त्यात असते हे प्रत्यक्ष अनुभवलंय लकिशा ब्रीग्सनं.
विचित्र किंवा त्रासदायक हा शब्द ज्याला चपखल बसेल अशा कायद्यानं तिचं जगणं असह्य़ केलं होतं. मात्र आपल्याला जे सहन करावं लागलं ते इतर स्त्रियांच्या नशिबी येऊ नये म्हणून तिने या कायद्याविरोधात आवाज उठवायचं ठरवलं. त्यामुळे कौटुबिंक छळाविरुद्ध तर तिला न्याय मिळालाच, पण त्या कायद्याचंही उच्चाटन झालं. ही घटना अमेरिकेतली!
पेनसिल्व्हेनिया राज्यातील नॉरिसटाऊनमध्ये भाडय़ाच्या घरात आपल्या पाच वर्षीय मुलीसह रहाणाऱ्या लकिशाला तिचा बॉयफ्रेंड फार छळायचा. मारहाण करायचा. तिने आपल्या सुरक्षेसाठी ९११ क्रमांक फिरवला, पोलिसांना बोलवायला. पोलीस आले खरे पण जाताना सांगून गेले. तक्रार करायची ही तुझी तिसरी वेळ म्हणजे शेवटची. या पुढे जर तू हा क्रमांक फिरवलास तर हे घर तुला सोडावं लागेल. पोलीस नेमकं काय म्हणून गेले हे समजणं तिच्यासाठी कठीण होतं. नंतर कळलं की आपल्या मदतीसाठी ती फक्त तीनदाच पोलिसांची मदत घेऊ शकते. जर तिने जास्त वेळा ती मदत मागितली तर स्थानिक वा म्युनिसिपालटीच्या कायद्यानुसार तिच्या घरमालकाला तिला घरातून हाकलून द्यावं लागणार होतं. हा कसला कायदा? हा तर सरळसरळ स्त्रीवरचा अन्यायच होता.
तिच्या बॉयफ्रेंडलाही याचा सुगावा नक्कीच लागला असावा. कारण नंतर तर शारीरिक मारहाणही नियमितच झाली. एकदा मात्र कडेलोट झाला. त्याने तिला इतकं मारलं की नाकातून रक्त यायला लागलं. त्यातच त्याने तिला मानेत भोसकलं. काही काळ ती बेशुद्ध पडली. रक्तबंबाळ अवस्थेत असूनही ती पोलिसांना बोलवू शकत नव्हती, कारण सरकारी नियम. तिची ही अवस्था शेजाऱ्यांनी पाहिली आणि त्यांनीच पोलिसांत तक्रार केली. हेलिकॉप्टर आलं आणि जखमी अवस्थेतल्या तिला रुग्णालयात दाखल केलं गेलं.
रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवणाऱ्या स्थानिक सरकारला तिच्यावरच्या शारीरिक अत्याचाराचं मात्र देणंघेणं नव्हतं. कारण बरी होऊन घरी आल्याच्या दुसऱ्या दिवशीच तिचा घरमालक नॉरिसटाऊनची कागदपत्रं घेऊन तिच्या घरी आला. तिला १४ दिवसांत घर सोडण्याचा आदेश देण्यात आला होता. खरं तर घरमालकालाही हा नियम अमान्य होता तरीही तिच्याविरुद्ध त्याला केस दाखल करावीच लागली; अन्यथा घर भाडय़ावर देण्याचा त्याचा परवानाच रद्द होण्याची शक्यता होती.
कायदा विचित्र होता खरा, पण अस्तित्वात होता. न्यायालयात दोन सुनावण्या झाल्या. तिचं म्हणणं पटल्यानं न्यायाधीशांनी तिच्या बाजूनं न्याय दिला. नॉरिसटाऊनच्या स्थानिक कायद्याला मात्र ते मंजूर नव्हतं. ते त्यांच्या आदेशावर कायम हेते.
कोणत्याही विवेकी माणसाची मंती गुंग करणारा हा नियम होता. कौटुंबिक छळाविरुद्ध तिला सुरक्षा देण्याऐवजी तिचे छप्परच काढून घ्यायला टपला होता. पण तोच क्षण होता मागे न फिरण्याचा! ते शहर तिच्यावर अन्याय करत होतं आणि त्याविरुद्ध आवाज उठवणं तिच्यासाठी भाग होतं. तिने देशाच्या, अमेरिकेच्या कायद्यालाच साद घातली. नॉरिसटाऊनच्या या आदेशाविरोधात तिनं प्रतिनिधित्व केलं, अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन आणि पेपर हॅमिल्टन लॉ फर्मने!
कोर्टाची पायरी कधीही न चढणाऱ्या किंबहुना अशी वेळ आपल्यावर येऊ शकते अशी कल्पनाही न करणाऱ्या लकिशाला हे पाऊल उचलण्याचं धाडस मिळालं, ते केवळ तिच्यासारखी वेळ दुसऱ्या कुणा स्त्रीवर येऊ नये या प्रामाणिक विचारापोटीच. गेल्या सप्टेंबरमध्ये (२०१४) मध्ये ही घटना घडली. नंतरच्या तिच्या प्रयत्नांना यश आलं. नॉरिसटाऊनने आपला कायदा मागे घेतला इतकंच नव्हे तर पोलिसांना मदतीला बोलवलं तर शिक्षा करणाऱ्या या नियमाला पेनसिल्व्हेनियानेही आपल्या राज्यभरातल्या सगळ्या म्युनिसिपालिटींना कायद्यानेच रद्द करायला भाग पाडलं. लकिशासाठी हा मोठाच विजय होता. एका सामान्य स्त्रीने घडवलेला असामान्य पराक्रम!
गेल्या वर्षभरात या सगळ्या प्रक्रियेतून जाताना तिच्या लक्षात आलंय की तिचं शहरच नव्हे तर अमेरिकेतील अनेक शहरांचे शंभरापेक्षा जास्त स्थानिक कायदे असे त्रासदायक आहेत जे मागे घेणे गरजेचे आहे.
अमेरिकेसारख्या प्रगत देशातही जेव्हा एखाद्या स्त्रीला कौटुंबिक छळ की घरचं छप्पर यामध्ये निवड करावी लागत असेल तर स्त्री-पुरुष भेदभाव आजही किती चिवटपणे रुजलाय, हेच लक्षात येतं. त्याविरोधात स्त्रीलाच आवाज उठवावा लागतोय. कारण कौटुंबिक हिंसाचारातलीच वेदना इतकी भयानक असते की त्यापुढे अशा
वेदना सहन करणं म्हणजे कडेलोटच.
मग एखादी अशी विद्युल्लता वेदनेलाच शस्त्र बनवून त्या विरोधात ठामपणे उभी राहते.. मग विजय अपरिहार्य असतो!

मुलींचं गायब होणं
सध्या मेक्सिको भयगंडात बुडालेला आहे. गेल्या सात-आठ वर्षांत येथे माणसं गायब होण्याचं प्रमाण सातत्यानं वाढतंय. असं म्हटलं जातं की या ७-८ वर्षांत सुमारे २० हजारापेक्षा जास्त माणसं गायब झालीत आणि त्यातल्या फक्त १ टक्के माणसांचा सुगावा लागलाय. अनेकांचे तर मृतदेहच त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचलेत. या गायब माणसांमध्ये सर्वाधिक संख्या आहे ती तिशीच्या आतल्या तरुण-तरुणींची. या गायब होण्यामागे अनेक कारणं आहेत, परंतु एक कारण मानवी तस्करी हेही सांगितलं जातंय. त्यामुळे १७ च्या आतल्या मुलींची संख्या जास्त असणं स्वाभाविक आहे. गायब मेक्सिकोवासी हा आजच्या लेखाचा विषय नाही, तर ही आहे एका आईची गोष्ट!
दरवर्षी इथल्या मुलीही हजारोंच्या संख्येने गायब होत आहेत. एका आईला, एलिझाबेथला जेव्हा हे कळलं की आपली मुलगी घरी नाही, तेव्हा तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ती थेट पोहोचली पोलिसांकडे. मात्र, आम्ही व्यक्ती हरवल्यानंतर ७२ तासाने शोधाला सुरुवात करतो, असं सांगून तिला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. आता मात्र स्वत: हातपाय हलवल्याशिवाय पर्याय नाही हे तिच्या लक्षात आलं. तिची मुलगी कॅरेन अवघी १४ वर्षांची होती. तिने धाव घेतली ती तिच्या फेसबुक अकाऊंटकडे. तिला माहीत नसलेलं कॅरेनचं एक प्रोफाईल त्यात सापडलं, ज्यात तिचे ४००० ‘फ्रेंडस्’ होते. ते पाहत असताना एका माणसाच्या प्रोफाईलने सावध केलं. त्याने कॅरेनवर जणू मोहिनीच घातली होती. तिला स्मार्टफोन घेऊन दिला होता आणि गाण्यात करिअर करण्यासाठी मदतही करणार होता. मग एलिझाबेथ आणि तिच्या नवऱ्याने त्याच्यावरच लक्ष केंद्रित केलं. कॅरेनला तो कधीही देशाबाहेर नेऊ शकत होता. त्यांनी पोलिसांना तक्रार नोंदवून घेण्यास भाग पाडलं. सर्वत्र ‘अंबर अ‍ॅलर्ट’ जारी करायला लावला. रेल्वे टर्मिनस आणि बस डेपोवर तिची मोठमोठी ‘मिसिंग पोस्टर’ लावण्यात आली. इतकंच नव्हे तर खूप धावाधाव करून टीव्ही आणि रेडियोच्या बातम्यांमध्येही याचा समावेश करून घेतला. त्यांच्या प्रयत्नांना फळ आलं आणि १६ व्या दिवशी कॅरन एका बसडेपोजवळ टाकून दिलेल्या अवस्थेत सापडली. तिला म्हणे न्यूयॉर्कला पाठवण्याचा बेत होता, मात्र इतक्या प्रसिद्धीनंतर त्यांनी तो बेत रद्द केला असावा.
एलिझाबेथच्या या ‘कर्तृत्वा’चा बोलबाला झाला आणि तिच्याकडेच अनेक पालकांची रीघच लागली. अशाच प्रयत्नांतून तिने २१ मुलींची त्यांच्या पालकांची गाठ घालून दिली. एका १४ व ६ वर्षांच्या बहिणींना मात्र तिला शोधता आलं नाही. गायब होण्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांचे मृतदेह सापडले. पण आजही तिच्याकडे ‘मिसिंग’ मुलींची जाडजूड फाईल आहे..
कॉम्प्युटरवर सतत ऑनलाइन असण्याबरोबरच एक्सबॉक्सच्या, गेमिंगच्या आहारी जाणाऱ्या लहान मुली या तस्करांच्या सापळ्यात सहज अडकत आहेत. मात्र प्रश्न आहे तो सरकारी यंत्रणेचा. इतक्या मोठय़ा स्तरावर मुलं-मुली गायब होत असताना कोणतेच प्रयत्न केले जात नाहीत की तसा त्यांचा इरादाच नाही?
(संदर्भ – द गार्डियन, बीबीसी न्यूज) 
आरती कदम- arati.kadam@expressindia.com

First Published on September 26, 2015 1:01 am

Web Title: story of lakisha briggs