गेल्या आठवडय़ातील (९ सप्टेंबर) ‘लोकरंग’मधील अतुल पेठे यांच्या ‘मी हिंदू आहे!’ आणि शफाअत खान यांच्या ‘माझी ‘दंत’कथा’ या लेखांवर वाचकांकडून प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला. त्यापैकी काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया..

हिंदू धर्माच्या रक्षणासाठी कुणाला निवडून दिलेले नाही!

अतुल पेठे यांचा ‘मी हिंदू आहे!’ हा लेख वाचला. आमच्यासारख्या सर्वसाधारण हिंदूंची व्यथा त्यांनी आपल्या लेखात मांडली आहे. मी हिंदू आहे. माझे आई-वडील हिंदू होते. माझी मुले हिंदू आहेत. परंतु ‘गर्व से कहो.. हम हिंदू है’ अशी शिकवण आम्हाला आमच्या आई-वडिलांकडून कधी दिली गेली नाही; त्यामुळे आम्हीही आमच्या मुलांना तसे कधी शिकवले नाही. आम्ही हिंदू आहोत म्हणजे काही विशेष आहोत असे आम्हाला कधी वाटले नाही. म्हणूनच शांततेत साजरे होणारे सर्व धर्माचे सण आम्हाला आवडतात. आपण आपला देव घरापुरता मर्यादित ठेवावा, आपले सण, उत्सव, धार्मिक कार्य करताना कोणालाही जराही त्रास होऊ  नये असे संस्कार आमच्यावर झाले. त्यामुळे आम्ही कधीही धार्मिक कार्य करताना दुसऱ्याला त्रास होईल असे वागलो नाही. कारण आम्हाला चांगल्या वर्तणुकीची शिकवण मिळाली आहे. माझ्या मुलांनी दिवाळीतही मोठय़ा आवाजाचे फटाके कधी फोडले नाहीत, कारण त्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो.

आम्ही कुणालाही हिंदू धर्माचे रक्षण करण्याकरिता निवडून दिलेले नाही. आमच्या धर्माच्या रक्षणाकरिता आम्ही कोणीही प्रवक्ता नेमलेला नाही. हिंदू धर्माचे रक्षक म्हणवणारे हे स्वयंघोषित आहेत. भगवी वस्त्रे नेसून, कपाळावर भगवा टिळा लावून ‘मी हिंदू आहे’ हे दाखविण्याची आम्हाला कधीही गरज पडली नाही. ‘आपले विचार एखाद्याला पटले नाहीत तर त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही’ अशी शिकवण हिंदू धर्माची मुळीच असू शकत नाही.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी कितीही नियम केले तरी रस्ते अडवून मंडप घातले जातात, आवाजाची मर्यादा ओलांडून गाणी लावली जातात, मिरवणुकीत दारू पिऊन बेधुंद नाचगाणी केली जातात.. हे सारे पाहून हिंदू असल्याची आता लाज वाटायला लागलेय. कोणी दुखावले जाईल याची भीडभाड न ठेवता अतुल पेठे यांनी हा लेख लिहिला आहे. बहुतांश हिंदू त्यांच्या मताशी सहमत असतील. त्यामुळेच ‘हिंसेने दु:खी होतो तो हिंदू!’ हे त्यांचे म्हणणे मनापासून पटले.

– राजाराम चव्हाण, ठाणे</p>

अजूनही वेळ गेलेली नाही..

अतुल पेठे यांचा लेख वाचला. असे अनेक लेख बुद्धिवंतांनी, विचारवंतांनी नव्वदच्या दशकाच्या प्रारंभी लिहिले असते तर कदाचित आजचे दिवस आले नसते. परंतु उशिरा का होईना, हे लिहिण्याचे धाडस पेठे यांनी दाखवले याबद्दल त्यांचे अभिनंदन! खऱ्या हिंदूंचा आवाज आणखी विस्ताराने मांडण्यासारखे बरेचसे पेठे यांच्या जाणीव-नेणिवेत आहे असे हा लेख वाचल्यावर वाटले. तसे ते त्यांनी विस्ताराने, त्यांना हव्या त्या ‘फॉर्म’मध्ये लिहावेच. कारण अजूनही वेळ गेलेली नाही.

– शाहीर संभाजी भगत

हिंदू आक्रमक का झाले, हेही समजून घ्या..

‘मी हिंदू आहे!’ हा अतुल पेठे यांचा लेख वाचला. खरे तर त्यांनी असे गर्भगळीत होण्याचे काहीही कारण नाही. बहुसंख्य हिंदू सहिष्णुच आहेत. शतकानुशतके तो सहिष्णुच होता ना? म्हणूनच तो हजार वर्षे परकीय सत्तेचा जुलूम सहन करत आला. हा इतिहास आहे. यामुळे सहन न होऊन आता काही लोक आक्रमक झाले आहेत. हिंदू समाजाने किती वर्षे अन्याय सहन करायचा? त्यामुळे हिंदू समाजाला समजावण्यापेक्षा हेच धैर्य इतरधर्मीयांना समजवायला दाखवले तर काही फरक पडतो का, ते पाहावे. आताच हिंदू समाजातील काही गट आक्रमक का झाले आहेत, याची कारणे शोधण्यात कुणालाच रस नाही. आताच का राहुल गांधींना हिंदू धर्मस्थळांचे दर्शन घ्यावेसे वाटते आहे? भाजपचे ‘हिंदू कार्ड’ (जरी ते हिंसक समजले, तरीही!) ते का पळवण्याचा आटापिटा करीत आहेत? ते काँग्रेसच्या सात दशकीय धर्मनिरपेक्षतेला सोडचिठ्ठी का देत आहेत? हिंदू- धर्मीयांच्या व्यथा कुणीच समजून घेत नाहीत, हेच खरे तर दु:ख आहे. हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांना विरोध जरूर करावा, परंतु एकूण धर्मालाच विरोध का? कुणाही हिंदूला हिंसा आवडत नाही हेही नमूद करावेसे वाटते.

– राघवेंद्र मण्णूर, ठाणे

विवेकी, समंजस हिंदू कृती कधी करणार?

अतुल पेठे यांच्या ‘मी हिंदू आहे!’ या लेखात साकारलेला सात्त्विक, सौम्य, नेमस्त हिंदू खरोखरीच प्रातिनिधिक आहे. जे हिंदू मुळात विवेकी, समजूतदार आणि सुसंस्कृत आहेत त्यांना पेठे यांची मांडणी मनोमन पटेल. पण ती मनोमनच राहण्याची शक्यता आहे. अशांचे व्यथित होणे, आक्रमकतेला असलेली त्यांची अमान्यता कुठल्याही कृतीतून.. मुख्यत्वे निवडणुकीत मतदान करताना हिंदुत्ववाद्यांच्या पक्षाला मोठय़ा प्रमाणात फटका बसेल अशा रीतीने व्यक्त होईल असे वाटत नाही. त्यामुळे असे पक्ष वा संघटना पेठेंसारख्यांची भावना अदखलपात्र ठरवण्याचीच शक्यता आहे.

पेठेंच्या मांडणीवरील संभाव्य प्रतिक्रियांपैकी एक नेमकी त्यांनीच आपल्या लेखाच्या शेवटी वर्तवली आहे. ती म्हणजे- ‘असे प्रश्न इतर धर्मातल्या लोकांना का विचारत नाही?’  याव्यतिरिक्त अपेक्षित प्रतिक्रिया म्हणजे-

१) दुर्बल समाजाला कोणीही थारा देत नाही. अगदी देवसुद्धा दुर्बलांचा घात करतो. (अजापुत्रं बलिं दध्यात् देवो दुर्बल घातक:)

२) कुणाला तरी संघाचं एक जुनं गीत आठवेल : ‘हम तो शांति मार्गपर चलते। जग में सब को बंधु समझते। दुर्बल को पर कभी न देता, जगत सहारा है। संकट में है पडा आज प्रिय देश हमारा है। जागो हिंदू वीर शत्रू ने फिर ललकारा है।’

३) ‘हिंदूंना कुणावरही वर्चस्व गाजवायचं नाही..’  हे मोहन भागवतांचं शिकागोमधील ताजं विधानही उद्धृत केलं जाईल. आक्रमक, हिंसक टोळ्यांना आमची मान्यता नाही, त्यांचा बंदोबस्त होईल, असा दिलासाही तोंडदेखला दिला जाईल.

वास्तविक आज उफाळून आल्यासारखी दिसणारी आक्रमक हिंदुत्ववादी मानसिकता कधी सुप्त, तर कधी प्रकट स्वरूपात सुरुवातीपासूनच अस्तित्वात आहे. ‘हिंदु समाज शतकानुशतके असंघटित राहिल्याने परकीय आक्रमणांना सातत्याने बळी पडत गेला. तेव्हा त्याला संघटित केले पाहिजे, त्यात जिंकण्याची आकांक्षा निर्माण केली पाहिजे, म्हणजे (हिंदू) राष्ट्र बलशाली होईल आणि जगावर अधिराज्य गाजवेल..’ हा रा. स्व. संघाच्या विचारांचा गाभा! संघटनेची शक्ती, इतर विचारसरणींचे प्राबल्य, सत्ताधाऱ्यांची (पारतंत्र्यात इंग्रज आणि स्वातंत्र्योत्तर काँग्रेस) प्रतिकूलता हे घटक लक्षात घेऊन ही मांडणी किती प्रखरपणे करायची, सरळपणे करायची की आडवळणाने करायची, हा संघाच्या त्या- त्या वेळच्या रणनीतीचा भाग राहिला. आज संघाची शक्ती वाढली असल्यामुळे आणि त्यांचे ‘आपले’च राज्य असल्यामुळे वरपासून खालपर्यंत सर्व नेत्यांची व ‘मारठोक’ टोळ्यांची हिंमत वाढली असली तरी वैचारिक गोंधळ कायम आहे! संघाचा हिंदू धर्म हा घरातला किंवा मंदिरातला धर्म कधीच नव्हता. तो संतांनी सांगितलेला धर्म नाही. आध्यात्मिकही नाही. संघाचा हिंदू धर्म हा राजकीय धर्म आहे.. स्र्’्र३्रूं’ ूि३१्रल्ली आहे. त्यात इतर धर्मसमुदाय हेही शत्रू आणि स्वधर्मातले टीकाकारही शत्रूच!

मात्र, हिंदू धर्माच्या सहिष्णु पूजकांनी त्यांच्या मनात भिनलेला खराखुरा हिंदू धर्म आणि संघप्रणीत आक्रमक हिंदू धर्म यांतला फरक समजून घेतला आणि द्वेषाची आग ओकणारे मशालधारी तो सहिष्णु हिंदू धर्म नासवू शकणार नाहीत याची खात्री बाळगली तर ते व्यथितही होणार नाहीत आणि भयभीतही!

– श्याम पांढरीपांडे

बाधित नागरिकाचा प्रश्न

अतुल पेठे यांचा लेख संयमित, नेमका आणि वास्तवदर्शी आहे. परंतु थोडासा ‘खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे’ या पठडीतला! लेखक म्हणतात, ‘घरातील रेडिओही अगदी हळू आवाजात आपल्यापुरता लावण्याची सवय आम्हाला लागली. सायकलची घंटीही हळुवार, दुसऱ्याला त्रास न देणारी!’ परंतु मोठेपणी शिंदे पुलावरील पादचाऱ्यांचा रस्ता महिन्यातून एकदा अडवून तिथे पथनाटय़ करताना, पुस्तक प्रकाशित करताना, भाषणे देताना दुसऱ्याला त्रास न देण्याची शिकवण कुठे गेली असेल, हा प्रश्न माझ्यासारख्या बाधित नागरिकाला पडतो.

– शुभा परांजपे, पुणे

मीही हिंदूच; पण रागावलेला!

मी हिंदू आहे.. जन्माने आणि वृत्तीनेही! माझे आजोबा सेवानंद बाळूकाका कानिटकर (जे काँग्रेसचे पुण्यातील पहिले कार्यकर्ते होते.) यांच्या राहत्या वाडय़ात त्यांच्या व सेनापती बापट यांच्या तसबिरीकडे बघत मी लहानाचा मोठा झालो. आप्पा पेंडसे यांच्या ‘ज्ञान प्रबोधिनी’त मी मोठा झालो. आप्पा पूर्वी संघात जायचे, पण मी कधी शाखेत वा विद्यार्थी परिषदेतही गेलो नाही. त्रिवेंद्रम- तीन वर्षे, नागालँड- दोन वर्षे, आणंद- गुजरात- अहमदाबाद- चार वर्षे आणि देशाची राजधानी दिल्ली येथे तब्बल १४ वर्षे पोटापाण्यासाठी स्वत:च्या मनाचा कल घेत घेत वावरत राहिलो. मराठी-अमराठी, उत्तर भारतीय-दक्षिण भारतीय, भारतीय-परदेशी, शाकाहारी-मांसाहारी, दारू पिणारे- चहालाही स्पर्श न करणारे, अगदी उजवे-अगदी डावे, अतिरेकी-मध्यममार्गी, स्त्री-पुरुष-तृतीयपंथीय अशा विविध रंगांना स्पर्श करीत, आनंदाने आयुष्यातील चढउतार पार करीत इथपर्यंत पोहोचलो. स्वत:विषयी हे लिहिण्याचे कारण म्हणजे मी(ही) अतुल पेठे यांच्याप्रमाणे जन्माने व वृत्तीने हिंदू आहे, होतो!

मात्र, गेल्या काही वर्षांत आजूबाजूला होणाऱ्या आत्यंतिक टोकाच्या चर्चामुळे मी पेठेंसारखा व्यथित तर आहेच; पण रागावलेलोही आहे. हा राग त्यांच्या व त्यांच्या कंपूतील- ‘कंपू’ हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो आहे- अनेकांच्या ठरावीक चष्म्यातून बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल आहे. देशात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल ते व त्यांचा कंपू आणि त्यांच्याबरोबरीने दुसऱ्या टोकाकडील अमुकतमुक व त्यांचाही कंपू यांचा दृष्टिकोन ठरलेला आहे. जणू काही शीर्षक वाचूनच पुढे काय पट उलगडणार याची चाहूल लागावी! कारण त्यांनी ‘जग कसे दिसणार?’ याची जगाकडे निकोप नजरेने बघण्याआधीच ‘ते विकृत असणार!’ अशी व्याख्या करून ठेवलेली आहे. त्यामुळे मोदी सरकार भाषणस्वातंत्र्याची गळचेपी करतेय, आणीबाणीची नांदी असा तक्रारयुक्त सूर ऐकण्यास येतो. मी तर मोदी, त्यांचा पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावरही यथेच्छ विनोद समाजमाध्यमांवर प्रकटपणे करत असतो. आवडेल त्याला दाद देणे व जे खटकते त्यास टोकणे असे माझे ‘मध्यममार्गी’ धोरण आहे. परंतु जेव्हा पेठे व त्यांच्यासारखे काही मोजके सतत मला व माझ्यासारख्या अनेक सरळमार्गी हिंदूंना कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात, डिवचतात, शेलकी विशेषणे वापरून नामोहरम करतात तेव्हा विषाद तर वाटतोच; पण रागही येतो. म्हणजे कसे ते पाहा.. ह्य़ांच्या संस्थांना आंतरराष्ट्रीय संस्थांकडून भरघोस निधी व वर्षांनुवर्षे पैशाचा ओघ येतो. पण हेच रा. स्व. संघप्रणीत संस्थांना एनआरआयनी मदत केली की तो ठरतो सीआयएचा कट! मला राग या दुटप्पीपणाचा येतो. आम्हाला झोडताय, कारण आम्ही सहन करतोय. मग खऱ्या बुद्धिवंतांप्रमाणे तरी वागा.

– अजित नारायण कानिटकर

हिंदुराष्ट्रात भीती कसली?

अतुल पेठे यांचा लेख वाचला. हिंदूंच्या सहिष्णु वर्तनाबद्दल त्यांनी लिहिले आहे. बहुसंख्य हिंदू कुटुंबांतील मुलांना सहिष्णुतेबद्दल धडे दिले जातात. परंतु आजूबाजूच्या प्रखर आणि विखारी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पेठे यांना काय नमूद करायचे आहे, ते समजले नाही. जगात फक्त दोन राष्ट्रे हिंदुराष्ट्रे म्हणून गणली जातात. त्यापैकी भारत एक आहे. त्यात राहताना, बहुसंख्याक असताना भीती वाटणे हे समजण्यापलीकडे आहे.

– अमेय दळवी

हिंदूंनी उग्रपणा नाकारलाच आहे

‘मी हिंदू आहे’ हा लेख थेट आतपर्यंत पोचला. याचे कारण पेठे यांचे लिहिणे अभिनिवेशरहित आणि त्यांच्या अनुभूतीवर आधारित आहे. विद्वत्तापूर्ण चिकित्सेपेक्षा अशा सहज अभिव्यक्तीची यावेळी नितांत गरज होती. भारतीय उपखंडातील लोकसंस्कृतीला कडेकोट धर्माची चौकट घालून वेळोवेळी तिचा जीव गुदमरून टाकण्याचा काही लोकांचा उद्योग जुना आहे. मोकळ्याढाकळ्या समूहजीवनावर कर्मठ धर्मबंधनांचे रोपण करून सामान्य लोकांचे, विशेषत: स्त्रियांचे शोषण विनासायास करत राहणे ही जुनीच गोष्ट आहे. या बंधनांना धर्मसिंधु, मनुस्मृती वगैरे ग्रंथांमध्ये पवित्र रूप देऊन गौरविण्यातही आले. पण याचा आणखी एक इतिहास आहे. तो म्हणजे- जनसामान्यांनीच या कर्मठ, क्रूर, अविवेकी धार्मिक सत्तेचा अनेकदा जो पराभव केला त्याचा इतिहास! याच्या खुणा आपल्याला संतपरंपरेमध्ये दिसतात. या संतांच्या आणि अलीकडे डॉ. दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे यांच्या पदरात कर्मठ लोकांनी काय घातले हे आपण प्रत्यक्षच पाहिले. तरीही आधुनिक काळात पराभवाचे हे लोण अनेक लेखक, सुधारक, कवी, सिनेकलावंत, संगीतकार यांनी निर्भयपणे सर्वत्र पोहोचवले. कर्मठ धर्माधतेच्या  पराभवाची ही उज्ज्वल परंपरा स्वातंत्र्यानंतर नव्वदीच्या दशकापर्यंत सुरू होती. पण गेल्या काही वर्षांत ‘अवघा भगवा रंग एक’ इथल्या अवकाशात जबरदस्तीने दिसू लागला. अहिंसक, विवेकी लोकांच्या लेखणीमुळे झालेल्या पराभवामुळे, त्या आठवणीने काहींचा उग्रपणा वाढतो आहे. त्यांच्या हत्या करूनही त्यांचा विचार पसरतो याचा मनस्वी संताप या उग्रतेत दिसून येतो. परंतु हिंदू संस्कृती मनापासून मानणाऱ्या आणि ती जगणाऱ्या बहुसंख्य लोकांनी हा उग्रपणा स्वत:च्या जीवनात अतिशय संयतपणे, सभ्य रीतीने नाकारला आहे.

– डॉ. मोहन देस, पुणे

दृष्टिकोन बदलण्याची गरज

अतुल पेठे यांचा ‘मी हिंदू आहे!’ हा लेख प्रत्येकानेच वाचून आत्मसात करणे आणि तो आचरणात आणणे ही काळाची गरज आहे. आज सर्वच माध्यमांतून या धर्माविषयी प्रखर, जहाल, विखारी मते मांडून देशातील वातावरणात कटुता निर्माण केली जात आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक जशी आहे तशीच अतिशय सहिष्णु असलेल्या या धर्मावर अशी वेळ का आली, याची कारणेदेखील शोधण्याची वेळ आली आहे. मात्र, हिंदू धर्मात सांगितलेली सामाजिक, सांस्कृतिक, विज्ञान आणि आरोग्यविषयक तत्त्वे आपण नीट जाणून घेतली पाहिजेत. धर्माचरण करताना ‘हिंदू धर्म’ या संकल्पनेचे चिंतन, संशोधन करून धर्माचे मक्तेदार, ठेकेदारांनी आपल्या मर्यादा पाळणे तितकेच आवश्यक आहे. त्याचबरोबर या मंडळींनी आपले जहाल आणि विखारी विचार बाजूला सारून देशात पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे इतर धर्मीयांनाही यातून योग्य तो संदेश पोहोचून सर्व धर्म देशात सुखासमाधानाने, खेळीमेळीने, आनंदी वातावरणात नांदू शकतील. मात्र, यासाठी प्रत्येक देशवासीयाने आपला दृष्टिकोन कटाक्षाने बदलावयास हवा!

– कीर्तिकुमार वर्तक, पालघर

भगवा : त्याग, विरक्तीचा!

‘हिंदू’ असण्याबाबत कमालीचा अहंकार आणि तो व्यक्त करण्याचा तितकाच उग्र मार्ग निवडण्यात धन्यता मानण्यात येत असताना इतक्या सहजपणे अतुल पेठे यांनी हिंदू असण्याची आपली भूमिका मांडली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. शिवाय, पेठे यांच्यासारख्या रंगकर्मीवर ‘आपण हिंदू आहोत’ हे सांगण्याची वेळ आली याबद्दल खेदही वाटतो. सध्याच्या हिंदुत्वाचा विखारी अजेंडा राबविण्यास निघालेल्या संघटनांकडून ‘जाती जाती विसरून हिंदू म्हणून एकत्र येण्याचे’ आवाहन इतके सोपे आणि सहज झालेले नाही. त्यांचे दाखवायचे दात नेहमीच वेगळे आहेत. त्यांच्यासाठी ‘हिंदुत्ववादी असणे’ केवळ एक टॅगलाइन आहे. या देशाला भगव्या रंगात बुडवून काढण्याची त्यांना घाई झाली आहे. परंतु विवेकवाद व माणुसकीवर निष्ठा असलेली भारतीय जनता त्यांचा हा डाव यशस्वी होऊ  देणार नाही. या देशाच्या विशाल कॅनव्हासवरील निळे, पिवळे, हिरवे, पांढरे आणि लाल ठिपके कायम असण्यात देशाचे सौंदर्य आहे. ते केवळ भगव्यात नाही. कारण जनतेच्या मनात आणि जडणघडणीतही ‘भगवा’ आहे. परंतु तो त्याग व विरक्तीचा प्रतीक म्हणून! भगवा झेंडा हाती घेऊन दुसऱ्यांच्या जिवावर उठणे त्यांना कदापि मान्य नाही. म्हणूनच लिंगायत धर्म असे ‘हिंदुत्व’ नाकारतो. ‘नसेल भगवा शिरावर, तर बसेल परका उरावर’ या पद्धतीने ‘परक्या’ची भीती दाखवत ज्यांना सत्ता गाजवायची आहे, अशांचे हे सारे खेळ आहेत. महात्मा बसवण्णांच्या शब्दांत- ‘हा कोण हा कोण हा कोण न म्हणता हा आमुचा हा आमुचा हा आमुचा असे म्हणणे कूडलसंगमदेवाला प्रिय आहे..’ हीच जीवननिष्ठा असावी.

– चन्नवीर भद्रेश्वरमठ

संशय आणि भीतीचा रंग..

‘मी हिंदू आहे!’ हा लेख वाचला आणि मला थोडंसं माझं बालपण आठवलं. साधारणत: १९५० ते १९७० दरम्यानचा काळ होता तो. आईनं विणलेल्या टोपल्या, सुपं, रोवळ्या अशी आयदानं विकायला मी लोकांच्या दारात जात असे तेव्हा शेंडीची गाठ बांधणारे काही कर्मठ लोक आणि ओचा-पदर आवरून-सावरून उंबरठय़ात अडखळलेल्या, आयदानाचे पैसे दुरूनच हातावर टाकणाऱ्या बायका वगळल्यास बाकीची माणसं थोडंसं मोकळं वागायला लागलेली जाणवत होतं. शाळेतही एखाद् दुसरे शिक्षक वगळता इतर शिक्षकांच्या मनातले जातीयतेचे पीळ सैलावून ते तळातल्या विद्यार्थ्यांना वर आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. माणसाच्या मेंदूला जसजसं खतपाणी मिळेल तसतसा तो प्रगल्भ होत आकाशाला गवसणी घालील, या सत्यावर विश्वास बसू लागला होता. माणुसकी, मानवता यांसारख्या शब्दांचे अर्थ अनुभवाला येत होते. हे वातावरण अगदी जागतिकीकरणाने १९९० ला भारतात पाऊल ठेवीपर्यंत सुधारत असल्याचंही बऱ्यापैकी जाणवत होतं. वर आकाशाची निळाई आणि धरतीवर वनस्पतींची हिरवाई याखेरीज कोणता रंग फारसा लक्षात येत नव्हता. पण.. नव्वदीनंतर भगवा रंग हळूहळू आजूबाजूची जागा आणि मनं व्यापू लागला. आपलं वेगळेपण अट्टहासाने जपणारी आणि दुसऱ्यावर थोपणारी मानसिकता तयार होऊ लागली. त्यातून आता सर्वत्र एकच रंग पसरत आहे.. तो आहे संशयाचा आणि भीतीचा! घराबाहेरच्याच नाही, तर घरातल्या माणसांचीही आता खात्री राहिलेली नाही. अशा वातावरणात अतुल पेठे यांचा लेख गढुळलेल्या पाण्यात तुरटी फिरवल्यासारखा वाटला. असं सर्वानीच मनात आणलं तर पाणी स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. प्रश्न आहे तो मनात आणण्याचा. बाकी म्हणण्यासारखं आहे काय?

– उर्मिला पवार

वर्तमान परिस्थितीत

निकडीचा लेख

अतुल पेठे यांचा लेख वाचला. आज मला जगताना धर्म आणि जात या गोष्टी आवश्यक वाटत नाहीत. परंतु माझं लहानपण हिंदू सणवार, व्रतवैकल्यांच्या वातावरणात गेलं. घरी कर्मकांडं केली जायची, पण त्यातून ‘आमचा धर्मच श्रेष्ठ आहे’ किंवा ‘गर्व से कहो..’ अशी शेखी मिरवली जायची नाही. उलट, कळत्या वयात काही परंपरांवर मी प्रश्न विचारल्यावर त्याची सुसंगत उत्तरं न मिळाल्याने त्या परंपरा पाळणं आम्ही थांबवलं. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये धर्म व जातींबद्दलचा जो विखार वाढत जातो आहे आणि तो पद्धतशीरपणे समाजमाध्यमांमार्फत थेट लोकांच्या खासगी आयुष्यात ‘घुसवला’ जातो आहे, ते पाहिलं की मला या समाजाचा एक घटक म्हणून फार दु:ख होतं. माझ्या दु:खाला अतुल पेठे यांनी ‘मी हिंदू आहे!’ या लेखातून योग्य शब्दांत वाचा फोडली आहे. हा लेख गरजेचा आहे, कारण ‘एकतर तुम्ही डावे व्हा, नाहीतर उजवे व्हा’ अशा ‘बायनरी’ तर्काचा पुरस्कार करणारी सध्याची परिस्थिती आहे. परंतु प्रत्यक्षात कोणताही माणूस हा असा पांढरा-काळा नसतो. त्याला अनेक रंगछटा व बाजू असतात, हेच आपण विसरत चाललो आहोत. त्यामुळेच एकांगीपणातून राजकीय, शैक्षणिक, सामाजिक अशा सगळ्याच पातळ्यांवर विसंवाद वाढत जाताना दिसतो आहे. विचारवंत-लेखकांना थेट मारून टाकलं जात आहे आणि त्याचा तपास करत असताना अजून काही विचारवंत-लेखक ‘हिट लिस्ट’वर होते असं बाहेर येतं आहे. एक शांतताप्रिय, कष्ट करून नवनिर्माण करण्याची आस बाळगून असलेला तरुण नागरिक म्हणून मला हे सगळं संतापजनक

आणि दु:खद वाटतं. आणि म्हणूनच

पेठे यांच्यासारख्या रंगकर्मीने हा लेख लिहून ‘हो.. मी हिंदू असलो तरी सध्या जे काही चाललं आहे ते मला पटत नाही’ असं ठामपणे सांगणं मला अत्यावश्यक वाटतं.

– प्रणव सखदेव, पुणे

मुस्कटदाबीचे वास्तव मांडणारे लेख

अतुल पेठे आणि शफाअत खान यांचे लेख वाचले. पेठे यांनी बहुसंख्य हिंदूंच्या भावनांना अचूक शब्दांत मांडून वास्तव आपल्यासमोर ठेवले आहे. तसेच खास शफाअत खान शैलीतील ‘माझी ‘दंत’कथा’ हा लेख आजच्या ‘मुस्कटदाबी’चे वास्तव मांडणारा आहे.

– जयंत पोंक्षे

अस्वस्थ वर्तमान, संभ्रमित अवस्था

‘माझी ‘दंत’कथा’ हा शफाअत खान यांचा लेख मार्मिक आहे. अस्वस्थ वर्तमानात सारेच संभ्रमित अवस्थेत आहेत. मी प्राध्यापक आहे. विद्यार्थ्यांमध्ये होत असलेले नकारात्मक बदल आणि स्वत:ची हतबलता मी अनुभवतेय. आपले तोंड बंद होणे व उघडणे हे यांत्रिक होतेय हे जाणवतेय.

– जयश्री कापसे-गावंडे, चंद्रपूर</p>

हास्य आणि उद्विग्नता

‘माझी ‘दंत’कथा’ हा लेख वाचला. देशातील समग्र स्तरांतील व्यक्ती, वृत्ती आणि प्रवृत्तींचे भीषण सत्य लेखात विनोदी शैलीत मार्मिकपणे सांगितले आहे. लेख वाचताना हास्य आणि उद्विग्नता एकाच वेळी अनुभवायला आली.

– प्रवीण मोरे, धुळे

विसंगतीवर भाष्य; परंतु परिणाम काय?

‘माझी ‘दंत’कथा’ हा शफाअत खान यांचा लेख आणि त्यातील ‘तोंड बंद करून जगण्याची चटक लागण्याअगोदर काहीतरी करायला हवं’ हा विचार योग्यच वाटला. परंतु त्याचे परिणाम काय असतील, हे सांगणे कठीण आहे. उपरोधिक लेखातून सामाजिक विसंगतीवर भाष्य होत असते. पण त्याचा परिणाम होतो आहे का? सर्वसामान्य माणूस वाढत्या महागाईत आणि तणावग्रस्त जीवनात कसातरी जमाखर्चाचा मेळ जुळवत आहे. तेव्हा जे काही सुरू आहे त्यात कशीतरी सुसंगती आणताना, मनातले विचार आणि परिस्थितीचा ताळमेळ जुळवण्यात आयुष्य घालवताना चांगल्या जाणिवा जपण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे वाटते.

– प्र. मु. काळे, नाशिक