१९ फेब्रुवारीच्या ‘लोकरंग’ पुरवणीतील गिरीश कुबेर यांचा ‘कोणीतरी आहे तिथं!’ हा लेख वाचला. लोकांचा मतांसाठी अनुनय आणि राज्यकर्त्यांचा कृपेसाठी अनुनय करण्याच्या काळात हे लिहिणे म्हणजे धाडसच म्हणावे लागेल. आम्हा भारतीयांना ऋ१ी या शब्दाचा एकच (म्हणजे ‘फुकट’ हा) अर्थ आवडतो. दुसरा अर्थ ‘मुक्त’! पण त्याचा आमच्याशी असलेला संबंध बहुधा १९४७ सालीच संपला.

‘विद्येविना मती गेली, मतीविना नीति गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले..’  महात्मा जोतिबा फुल्यांचे हे वाक्य आम्ही घोकले, पण विद्येच्या वाटेवर कधीही पाऊल ठेवले नाही. अतिप्रगत तंत्रज्ञान आणि जनसामान्यांचे अज्ञान यांचा वापर करून पूर्वी परकियांनी आमच्यावर राज्य केले. परंतु आता सत्तर वर्षांनंतर आमच्यावर राज्य करण्याचा परकियांचा केवळ मार्ग बदलला आहे असा संशय येतो. अर्थात अविद्येचा मार्ग अनुसरून आम्ही त्यांना प्रोत्साहनच दिले आहे.

ही अविद्या नवे तंत्रज्ञान समजून न घेण्यात आहे. पूर्वीच्या आणि आजच्या तंत्रज्ञानात एक महत्त्वाचा फरक आहे. आजच्या यंत्रणांना (पढवलेली) बुद्धी असते. तिला ‘सॉफ्टवेअर’ म्हणतात. सॉफ्टवेअर लपवता येते. किंबहुना, ते लपवलेलेच असते. (अपवाद फक्त जी. एन. यू. लिनक्ससारख्या मुक्त प्रणालींचा!) ते मानवनिर्मित आहे, म्हणूनच त्यात कुटिलताही असू शकते. कौटिल्याचा उदोउदो  करणाऱ्या आम्हाला ही कुटिलता ओळखू येऊ नये?

लेखात मांडलेला प्रश्न फक्त समाजमाध्यमांचाच नाही; तर सर्वच इलेक्ट्रॉनिक संपर्कमाध्यमांचा आहे. खरे तर जिथे जिथे सॉफ्टवेअर आहे त्या प्रत्येक यंत्रणेचा आहे. त्यात भ्रमणध्वनी येतात. संगणक येतात. मतदान यंत्रे येतात. आधारकार्ड निर्माण करणारी यंत्रणा येते. कॅशलेस व्यवहारांच्या यंत्रणा येतात. या सर्व यंत्रणांनी जमवलेल्या माहितीचे विश्लेषण करून व्यक्तीची मानसिकता (जवळजवळ पूर्ण) अभ्यासता येते. पण लोकांच्या मानसिकतेचा विचार करून त्याप्रमाणे त्यांचे मन वळवण्यात गैर काय आहे? उलट, लोकशाहीत व्यक्ती-व्यक्तीचा विचार करून त्यांचे प्रश्न अशा तऱ्हेने सोडवता येतील, असा युक्तिवाद हे विश्लेषण वापरणारे लोक करू शकतात. पण ही शुद्ध धूळफेक आहे. कारण व्यक्तीने जरी स्वेच्छेने ही माहिती पुरवली असली तरी त्याच्या अशा विश्लेषणाला त्याची स्पष्ट संमती घेतली गेलेली नाही. शिवाय या विश्लेषणाचा वापर त्या व्यक्तीच्या भल्यासाठी होत नसून, त्या व्यक्तवर नियंत्रण ठेवण्यासाठी होतो आहे.. होणार आहे. ही या प्रश्नाची दाहकता आहे.

मूळ प्रश्न असा आहे, की लोक या सापळ्यात का जातात? तो सापळा आहे याचेच अज्ञान, सवलतींची गरज, सत्ताधाऱ्यांविषयीची भीती, भाबडेपणा या गोष्टी त्यामागे आहेतच. शिवाय प्रसिद्धीची इच्छा, स्वत:ला व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य, आकर्षण, व्यसन या आमिषांचा मोह भल्याभल्यांना टाळता येत नाही. मग त्यात अडकल्यावरही आपण भयानक महागात विकत घेतलेल्या या सापळ्याचे ते समर्थन करू पाहतात. ‘माझ्याकडे लपवण्यासारखं काही नाहीच. मग असा बडय़ा दादाचा पहारा जरी असला तरी मी हरकत का घ्यावी? कर नाही, त्याला डर कशाला?’ हे विधान सापळ्यात अडकलेले करत राहतात. पण ‘नाही’ म्हणण्याची त्यांची ताकद संपल्याचे ते लक्षण असते.

लेखातला एक भाग खटकणारा आहे. तो म्हणजे कोसिन्स्की यांनी स्वत:ची मांडलेली बाजू आणि आइनस्टाईन यांचा उल्लेख. त्यांचे समर्थन तर करत नाही ना? अतिउच्च दर्जाचे संशोधन करणारी कोणतीही व्यक्ती आपल्या संशोधनाचे परिणाम काय होतील याविषयी अनभिज्ञ असेल यावर विश्वास का ठेवायचा? शास्त्रज्ञ हा विसरभोळा, भाबडा, एककल्ली आणि मोहापासून अलिप्त असतो अशा शालेय गैरसमजांचे किंवा भाकडकथांचे आपण बळी ठरता कामा नये.

बरं मग पुढे काय? या प्रश्नांची उत्तरे कोणती? या साऱ्या यंत्रणा १०० टक्के वाईटच आहेत का? नाही. इलेक्ट्रॉनिक समाजमाध्यमांत स्वत:ला व्यक्त करून अतिरेकी जीवनशैलीमुळे आलेला तणाव कमी करता येतो. पण त्यापेक्षा जीवनातला अतिरेकच कमी केला तर..? कधीही न पाहिलेल्या फ्रेंडला ‘लाइक’ करण्याऐवजी समोरच्या किंवा शेजारच्या बिल्डिंगमधल्या हाडामांसाच्या माणसाबरोबर गप्पा मारत चहा प्यायलो तर..?

UID सारख्या खाजगी माहितीची मागणी करणाऱ्या यंत्रणेला ठाम नकार देणे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर जनतेच्या देखरेखीसाठी खुली करण्याची मागणी करणे, प्रसिद्ध समाजमाध्यमांऐवजी कोणतीही माहिती विश्लेषणासाठी न देण्याचे जाहीररीत्या मान्य करणाऱ्या, टोपणनावाने या माध्यमात सहभागी होऊ देणाऱ्या माध्यमांतच सहभागी होणे, ई-मेल वापरताना संदेशांचे सांकेतिक भाषेत रूपांतर करणाऱ्या मुक्त प्रणालींचा सर्रास वापर करणे, समाजमाध्यमांच्या व्यसनात अडकलेल्यांसाठी व्यसनमुक्ती केंद्र चालू करणे, व्यक्तिगत आणि नागरी ई-स्वातंत्र्याच्या मुद्दय़ावर  सतत वाद-संवाद सुरू ठेवणे.. अशी काही उत्तरे याकामी सुचतात.

हा लेख वाचायला दिल्यानंतर माझ्या माहितीच्या तीन तरुणांनी माहिती विश्लेषण करू देणाऱ्या माध्यमांना नकार दिला आणि त्यांचा वापर थांबवला. ‘सगळं कसं मस्त चाललंय!’ असं वाटणारे आणि ‘हे असंच चालत राहायचं बरं..’ असं वाटणारे या दोन्ही प्रकारचे लोक या लेखापासून काहीही बोध घेणार नाहीत. मजा अशी आहे की, हे दोन्ही प्रकारचे लोक आपलेच आहेत. म्हणून सतत चर्चा, वाद-संवाद आणि प्रबोधन यांतूनच कृतिप्रवण (proactive) व्यक्ती निर्माण होतील. त्या केवळ स्क्रीनएजर नसतील, तर त्या भासमान जगापलीकडे (virtual world’) एक खरेखुरे जग आहे याचेही भान त्यांना असेल.

– सम्यक उत्कर्षचित्त

डाटा मायनिंग त्रासदायीच

‘कोणीतरी आहे तिथं!’ हा लेख वाचला आणि डोकं सुन्न झालं. दिवसभरात समाजमाध्यमांचा आपण एवढा मुक्तहस्ते वापर करीत असतो; परंतु आपल्या लक्षातसुद्धा येत नाही, की या माध्यमांच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक हालचालींची नोंद होते आहे. कुणीतरी ‘त्याच्या’ स्वार्थासाठी या माहितीचा उपयोग करीत आहे. अशी माहिती- जी फक्त आपल्यालाच ठाऊक असावी- ती कुणीतरी अनोळखी व्यक्ती वाचतेय. ‘डाटा मायिनग’ ही उद्योगपती, राजकीय पक्ष यांच्यासाठी काळाची गरज असेल; परंतु पुढील काळात तिचा अतिवापर सामान्य माणसाला त्रासदायक ठरू शकतो. आपण आपल्या स्मार्ट फोनवरून एखादे नवीन अ‍ॅप डाऊनलोड करताना ते अ‍ॅप बनविणारी मंडळी आपल्या फोनमधील माहिती ‘शेअर’ करण्याची परवानगी मागतात. त्यात तुम्हाला बँकांच्या व्यवहाराचे लघुसंदेश इत्यादी महत्त्वाची माहिती असू शकते व तिचा दुरुपयोगही होऊ शकतो. जेवढय़ा नवीन सुविधा निर्माण केल्या जातात, तितकीच असुरक्षितताही वाढते आहे, हेच खरं!

– शैलेश पुरोहित, मुंबई</strong>

अन्यथा मेंदूवरही नियंत्रण यायचे!

‘कोणीतरी आहे तिथं!’ हा लेख वाचला. आपल्या पाठीमागे कोणीतरी अज्ञात व्यक्ती आपल्या माहितीचा वापर तिचा हेतू साध्य करण्यासाठी अगदी सहजपणे करीत आहे आणि आपण त्याबद्दल अनभिज्ञआहोत, हे या लेखामुळे कळले. मनाची अवस्था समजण्याची ही पद्धत भारीच कमालीची असली तरी तिचा वापर विघातक कामे करण्यासाठी होऊ शकतो. तेव्हा या अनाकलनीय तंत्राचा वापर कमी झालेलाच चांगला. नाहीतर आपल्या मेंदूवर संपूर्णपणे त्यांचे नियंत्रण यायचे.

– महेंद्र सूर्यवंशी, मुरुड (लातूर)

आधारकार्डचा गैरवापरही शक्य!

हा लेख म्हणजे समाजमाध्यमांच्या अस्तराखाली काय काय दडलंय याची झलक आहे. खासगी, वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवली जाते, ही वरकरणी हूल वाटावी इतक्या बेमालूमपणे या माहितीचं सार्वत्रिकीकरण होत आहे. आपल्याकडेही आधार कार्डचा गैरवापर अशाच तऱ्हेने होईल अशी दाट शंका वाटते.

– श्रीकांत कुलकर्णी, पुणे</strong>

सामाजिक आणि राजकीय फसवणूकही आता शक्य!

‘कोणीतरी आहे तिथं!’ हा लेख वाचला. सध्या भारतात सगळीकडे डिजिटलायझेशनचे वारे वाहताना दिसताहेत. पण त्यासोबत येणाऱ्या अनेक गोष्टींकडे (धोक्यांकडे) आपलं कळत-नकळत दुर्लक्ष होतंय. त्यातल्या सर्वात महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे या लेखाने लक्ष वेधले आहे. तो मुद्दा म्हणजे- ‘माहिती’! इंटरनेट, मोबाइल अ‍ॅप्स, समाजमाध्यमं यांच्या वाढत्या वापरामुळे आपल्या रोजच्या जीवनातल्या लहानसहान गोष्टी उघड होतात. आणि त्या माहितीचा वापर कोण कुठल्या थरावर जाऊन करू शकतो, याची आपल्याला जराही कल्पना नसते. त्यामुळे या लेखात दिलेला सहा बिंदूंचा सिद्धांत खूप महत्त्वाचा आहे; ज्यामध्ये आपण स्वत:च एक बिंदू जोडून नकळतपणे या धोक्याला पाचारण करीत आहोत.

काही मोजक्या गोष्टींच्या आधारावर माणसाचं पूर्ण व्यक्तिमत्त्व अचूक सांगणे तसे कठीणच. पण आपण सर्व गृहीतच धरू लागलो तर ते काम काही एवढे अवघड नाहीये, हे या लेखातल्या उदाहरणांवरून दिसून येते. समाजमाध्यमांचा वापर करताना आपली सर्व माहिती सुरक्षित आहे आणि तिचा गरवापर होणार नाही, हे आपण गृहीत धरूनच चाललोय. ब्रेग्झिट आणि ट्रम्प यांची निवड यांवरून असे दिसते, की आपल्या या अशा गृहीत धरण्यामुळेच मिळवलेल्या माहितीचे विश्लेषण करून एक प्रकारे आपल्यालाच गृहीत धरले जात आहे. त्यामुळे खरे मुद्दे बाजूला राहून भावनिक मुद्दय़ांवरच आपले मत वळवले जात आहे व ‘पोस्ट-ट्रथ’ जग साकारण्यासाठी याची मदतच होत आहे. आतापर्यंत असे वाटायचे की, माहितीचा गरवापर करून फक्त आíथक फसवणूक होऊ शकते, पण सध्या तर सामाजिक आणि राजकीय फसवणूकही होताना दिसतेय. असे म्हटले जातेय, की डिजिटलायजेशनमुळे सरकार आणि जनता यांच्यातील अंतर कमी होऊन लोकांना सरकापर्यंत पोहोचणं सोपं झालं आहे. पण उलट, सरकारलाच लोकांपर्यंत पोहोचणे आता सोपं झालंय. कारण लोकांनी आपली बहुतेक वैयक्तिक माहिती सरकारदरबारी जमा केली आहे; म्हणजे एक प्रकारे त्याचा ताबाच दिलाय सरकारला. ‘आधार’ आणि निश्चलनीकरणाच्या काळात सरकारकडे खूप माहिती जमा झालीये. ती अशा ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ वगरेच्या हाती नाही लागली म्हणजे मिळवले.

– चेतन बाविस्कर, मुंबई