13 August 2020

News Flash

भक्तांकडूनच पराभव

राजकीय भूमिका म्हणून वा हिंदुत्वाच्या विचारसरणीला वैचारिक विरोध म्हणून ही मंडळी सावरकरांच्या विरोधात आहेत.

२७ मेच्या लोकरंगमधील सावरकरांवरील लेखांवर आलेल्या निवडक प्रतिक्रिया गेल्या अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या काही उर्वरित प्रतिक्रिया..

सावरकर जयंतीनिमित्ताने अनेक लेख प्रसिद्ध झाले. सावरकरांचे देशप्रेम, त्यांचा त्याग, जाती-निर्मूलनासंबंधी त्यांची कळकळ या गोष्टींची त्यात चर्चा झाली. सावरकरांवर त्यांच्या विरोधकांनी (पक्षी : काँग्रेसवाले आणि सेक्युलरवाद्यांनी) कसा अन्याय केला व खोटे आरोप केले, याचे वर्णनसुद्धा केले गेले. सावरकरांसारख्या प्रखर देशभक्तावर खोटे आरोप करणे हे नक्कीच निषेधार्ह आहे. पण सावरकरांवर हा अन्याय करणारे त्यांचे उघड उघड विरोधक तरी आहेत. राजकीय भूमिका म्हणून वा हिंदुत्वाच्या विचारसरणीला वैचारिक विरोध म्हणून ही मंडळी सावरकरांच्या विरोधात आहेत. पण दुर्दैव असे की, सावरकरांवर मोठा अन्याय करत आहेत ते त्यांचे भक्त म्हणवणारेच! यासंदर्भात सावरकरांच्या एका लेखाचे स्मरण होते आहे. त्या लेखाचे शीर्षक आहे- ‘दोन शब्द, दोन संस्कृती’!

काय म्हणतात सावरकर या लेखात? ते म्हणतात, ‘पाश्चात्त्य संस्कृतीचे वर्णन एका शब्दात करता येईल- अद्ययावत. पाश्चात्त्य समाज सामथ्र्यशाली आहेत, संपन्न आहेत, जेते आहेत, याचे कारण त्यांच्या या मनोवृत्तीत आहे. आपले ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञान सतत अद्ययावत ठेवण्यासाठी ते लोक झटत असतात. जुन्या गोष्टींच्या जंजाळात सापडून ते समाज स्वत:चे नुकसान करून घेत नाहीत.’

दुसरी- संस्कृती! म्हणजे आपली, भारतीय (वा हिंदू म्हणा!). या संस्कृतीचे वर्णन सावरकर एकाच शब्दात करतात. तो शब्द म्हणजे- ‘श्रुती स्मृती पुराणोक्त!’ ‘आपल्या समाजातल्या लोकांची मानसिकता जुन्याला कवटाळून बसण्याची आहे. नव्याचा स्वीकार करायला त्यांची तयारी नसते. जुने तेच सोने असे ते मानत असतात. परिणामी नवे ज्ञान, नवे तंत्रज्ञान यांची वाढ या समाजात होत नाही. म्हणून तो मागासलेला आहे. दरिद्री आहे. पराभूत आहे.’

सावरकर हिंदुत्ववादी होते. परंतु त्यांना समाज हवा होता- नव्याचे स्वागत करणारा, नवे विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञान खुल्या मनाने स्वीकारणारा, नव्याची निर्मिती करणारा!

बिचारे सावरकर! त्यांना काय कल्पना, की इथे असे चतुर लोक निपजतील, समाजाचे नेतृत्व करू लागतील, की जे म्हणतील- जे ‘श्रुती स्मृती पुराणोक्त’ तेच ‘अद्ययावत!’ पुराणे वा वेदातली गणपती जन्माची कथा खरी मानून जे म्हणतील, की आजची आधुनिक प्लॅस्टिक सर्जरी होतीच आमच्याकडे! महाभारताच्या कथांच्या आधारे जे दावा करतील, की ‘आमच्याकडे होतेच जेनेटिक सायन्स आणि इंटरनेट.’ ‘आमच्याकडे होती विमाने आणि अवकाशयाने’, ‘आमच्याकडे हे होते आणि ते होते!’

थोडक्यात, सारे आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान आमच्या वेदांत आणि पुराणांत आहे. मग त्या सर्वापासून दूर कशाला जायचे? जितके त्यांच्या जवळ जाऊ, त्यांचा अभ्यास वाढवू, तेवढे उत्तमच! त्यातूनच तर मिळणार आपल्याला सारे नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान!

बिचारे सावरकर! त्यांना काय कल्पना, की देशाच्या तंत्रज्ञानविषयक शिक्षणाची सर्वोच्च संस्था ए. आय. सी. टी. ई.च्या समारंभात प्रमुख पाहुणा असे बोलेल, की आमच्या विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवा; आपोआपच त्यांना आधुनिक तंत्रज्ञान कळेल!’ अशी कितीतरी वक्तव्ये!

आणि हे बोलणारे कोण? यात आहेत- केंद्र सरकारचे विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री, शिक्षण मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री.. आणि खुद्द पंतप्रधान!

वैज्ञानिकांच्या सायन्स काँग्रेसमध्ये अशी भाषणे दिली जात आहेत. एका सायन्स काँग्रेसमध्ये तर भाषणाची सुरुवात करताना वक्त्याने चक्क दोन मिनिटे शंख वाजवला आणि सांगितले, ‘शंखाच्या आवाजाने वातावरणातील आणि मनातील गोंधळ दूर होतो!’ याला पुरावा काय? तर महाभारतात आणि पुराणात आलेले यज्ञाचे वर्णन!

बिचारे सावरकर! ‘गाय हा एक उपयुक्त पशू आहे!’ असे विधान त्यांनी केले तेव्हा त्यांना कल्पना नसेल, की ‘गोमूत्रामुळे कॅन्सर बरा होतो’, ‘गोमूत्रामुळे फंगस, इन्फेक्शन, चिवट त्वचारोग इ. विकार बरे होतात..’ इतकेच काय, ‘डीएनएमधला बिघाड दूर करण्याचा आणि त्याचे रक्षण करण्याचा गुणधर्म गोमूत्रात आहे!’ असे अचाट दावे करणारे संशोधक भविष्यात निर्माण होतील! ज्या दाव्यांना कोणताही शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेल्या सव्‍‌र्हेचा आधार नसेल, विश्वासार्ह जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेल्या रिसर्च पेपर्सचा पाठिंबा नसेल.

त्यांना असेसुद्धा वाटले नसेल, की अशा अचाट व अवास्तव दाव्यांवर विसंबून सरकार ५०० कोटींचा एक संशोधनाचा राष्ट्रीय प्रकल्प हाती घेईल! जेव्हा खऱ्या संशोधनासाठी सरकारने रक्कम कमी केल्याबद्दल संशोधकांना मोर्चा काढून रस्त्यावर यावे लागेल.

आणि हे सारे करण्यामागे सरकारचा उद्देश काय? तर आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये गाईला जे पवित्र स्थान दिले आहे त्याला वैज्ञानिक सिद्धता प्राप्त करून देणे. (खुद्द विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी जून २०१७ मध्ये बीजिंगला हे विधान केले होते.) शिवाय गोमूत्राचे गुणधर्म तपासायचे तर म्हशीचे मूत्र का नाही? असा तौलनिक अभ्यास नाही. कारण एकच : आपल्या प्राचीन ग्रंथांत फक्त गायीचा उल्लेख आहे. ‘श्रुती स्मृती पुराणोक्त’ तेच अद्ययावत!

या सर्व प्रयत्नांचे, या धडपडीचे एकच उद्दिष्ट असू शकते- भूतकाळाचे उदात्तीकरण करणे! त्यासाठी भूतकाळातील गोष्टींना अवास्तव मोठेपणा देणे, त्यासंदर्भात खऱ्या-खोटय़ा आणि अतिरंजित गोष्टी प्रसृत करणे. सावरकरांचे भक्त म्हणवणारे, त्यांची देशभक्ती आणि त्यागाबद्दल भरभरून बोलणारे आजचे हिंदुत्ववादी भूतकाळाचे उदात्तीकरण करण्याच्या या दिंडीत सामील आहेत.

पण हा दुर्लक्ष करण्यासारखा विषय आहे, गमतीने घेण्यासारखा विषय आहे असे सावरकर मानत नाहीत. म्हणूनच त्यांच्या उपरोक्त लेखात ते ‘श्रुती स्मृती पुराणोक्त’ या विकृतीमुळेच आपल्या समाजाचा नैतिक आणि भौतिक ऱ्हास झाला, असे कळवळून मांडतात. आणि ‘श्रुती स्मृती पुराणोक्त’ हेच अद्ययावत असा भ्रम समाजात निर्माण करण्याची सध्याची मोहीम ही तर अधिकच घातक. भूतकाळाचे उदात्तीकरण करण्याची मोहीम ज्या- ज्या देशात यशस्वी झाली, त्या- त्या देशांची वाताहत झाली. तिथली लोकशाही संपली. आधुनिकता संपली. कट्टरपंथीय धार्मिक संघटनांनी त्या देशांचा कब्जा घेतला.

आपल्या देशात आधुनिकता आणि विज्ञान तंत्रज्ञान यांची मुळे खोलवर रुजली आहेत असा भ्रम बाळगण्याचे कारण नाही. भूतकाळाच्या उदात्तीकरणाची कीड या मातीत  फार झटकन फोफावेल आणि या समाजाच्या आधुनिकीकरणाचे स्वप्न भंग पावेल. सावरकरांच्या जयंतीनिमित्त चिंता व्यक्त करायची तर ती या गोष्टींबद्दल करायला हवी.

सुधीर पानसे

सावरकरांचे हिंदुत्व व्यापक

‘लोकरंग’मधील (३ जून) सावरकरांविषयी प्रतिकूल विचार मांडणारी पत्रे वाचली. आधी विचार, त्यांचे मंथन आणि नंतर निष्कर्ष ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. परंतु सावरकरांच्या टीकाकारांची रीत मात्र उफराटी असते. सावरकर सर्वस्वी वाईट आहेत हे त्यांनी आधीच गृहीत धरलेले असते आणि नंतर आपल्या पूर्वग्रहांच्या पुष्टीसाठी ते विचार करतात. सावरकर संकुचित वृत्तीचे होते असा आरोप करणाऱ्यांनी ‘हिंदुत्व’ हा त्यांचा प्रबंध वाचलेला नसतो. तो वाचल्यास सावरकरांचा विशाल दृष्टिकोन व त्यांना अभिप्रेत असलेल्या ‘हिंदुत्व’ या संकल्पनेची व्यापकता ध्यानात येईल.

आता सावरकरांच्या माफीनाम्याविषयी. सावरकरांनी सुटकेसाठी विनंती अर्ज केले होते ही गोष्ट खरी आहे; पण त्यात वावगे काही नाही. तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा बाहेर काहीतरी करावे असे प्रत्येकच देशभक्ताला वाटत असते. सावरकर त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ बारकाईने वाचले तर लक्षात येईल की त्यांना कुठल्या तरी संधीची प्रतीक्षा होती. आणि ती आलीही होती. पहिल्या महायुद्धाच्या वेळी विशेष सामरिक महत्त्व नसलेल्या अंदमान द्वीपसमूहाभोवती ‘एम्डेन’ नावाची एक जर्मन युद्धनौका घिरटय़ा घालत होती. उद्देश अर्थातच सावरकरांच्या सुटकेचा होता. परंतु ऐनवेळी अंदमानातील अधिकाऱ्यांना तिचा सुगावा लागला. लगोलग कलकत्त्याहून सैन्य बोलावण्यात आले. ‘एम्डेन’ पकडली गेली. एक आखलेला डाव उधळला गेला. सावरकरांना अपयश आले आणि त्याच्या धुरळ्यात त्यांचा प्रखर देशाभिमान, त्यांची  त्रिखंडात गाजलेली उडी, त्यांचा असीम त्याग सर्व काही विस्मृतीत गेले. स्मृतीत राहिला तो त्यांचा माफीनामा!

भालचंद्र काळीकर

आपण गांधीजींना कधी समजून घेणार?

‘आपण सावरकर कधी समजून घेणार?’ आणि ‘सावरकरांचा माफीनामा आणि वास्तव’ हे लेख वाचले. याच अनुषंगाने सावरकरभक्तांना असा प्रश्न कुणी विचारला आहे का, की ‘आपण गांधीजींना कधी समजून घेणार?’ ‘गांधीहत्या आणि मी’, ‘पंचावन्न कोटींचे बळी’ ही गोपाळ गोडसे यांची पुस्तके, तसेच ‘मी नथुराम गोडसे बोलतोय..’ हे नाटक उघड उघड गांधीजींवर अन्याय करणारे आहे. परंतु त्यांचा सावरकरभक्तांनी कधी प्रतिवाद केला आहे का? गांधीजींबद्दल आदर असणाऱ्या लोकांना यामुळे किती दु:ख होत असेल याची त्यांनी कधी कल्पना केली आहे का? अजूनही ‘गांधीजींनी भारताची फाळणी केली’, ‘गांधीजींनी जिनांबरोबर ‘सेटिंग’ केले’ असे युक्तिवाद कोण करत असते? सावरकरांवर अन्याय झाला आहे हे स्पष्ट आहे. परंतु अशी वेळ सावरकरांवर का आली? ब्रिटिशांविरुद्ध असहकार आंदोलन चालू असताना आणि सारा देश त्यात सहभागी झालेला असताना सावरकरांनी सैन्यभरतीस पाठिंबा दिला. त्यामागे त्यांची निश्चित भूमिका होती. परंतु ती समजावून देण्यात ते कमी पडले का? जेथे जेथे हिंसेचा उपयोग करून परकीय सत्ता उलथून टाकण्यात आली (उदा. आग्नेय आशियातील देश) तेथे साम्यवादी वा तत्सम पक्ष प्रभावी झाले आणि त्यांनी स्वजनांवरच अनन्वित हिंसाचार केला. भारतात तसे झाले नाही यामागे गांधीजींची दूरदृष्टी नव्हती का? सावरकरभक्तांनी दोन्ही बाजूंचा विचार केला तर त्यांना असे का होते याचा सहज उलगडा होईल.

डॉ. हेमंत जुन्नरकर, सिडनी (ऑस्ट्रेलिया)

पूर्वग्रह बाजूला सारा

‘सावरकरांचा माफीनामा व वास्तव’ या माझ्या लेखावरील प्रतिक्रिया ३ मेच्या अंकात वाचल्या. लेखावर टीका करणाऱ्या बहुतेकांनी लेखात जे चार प्रश्न मी विचारलेत त्यांना कौशल्याने बगल दिलेली दिसते. सावरकरांची ‘विनंतीपत्रे’ ही ‘क्षमापत्रे’ नव्हती, असे म्हणण्यामागे काही कारणे आहेत : १) क्षमापत्रांत ‘आजवर जे मी केले ते चुकले, त्याबद्दल मला पश्चात्ताप वाटतो, त्याबद्दल मला क्षमा करावी’ या आशयाचे निवेदन असते. सावरकरांनी असे एकाही पत्रात म्हटलेले नाही. २) सामान्यत: जेव्हा एखादा राजबंदी जन्मठेप वा तत्सम बंदिवासाची शिक्षा भोगत असतो तेव्हा त्याला त्याच्या बंदिवासातील चांगल्या वर्तणुकीसाठी काही सवलत वा शिक्षेत सूट दिली जाते. ती सूट मागण्यासाठी ठरावीक नमुन्यात आवेदन द्यावे लागते. त्यात ‘पुढे मी चांगली वर्तणूक ठेवेन’ अशी हमी द्यावी लागते. तीच सावरकरांनी दिली आहे. इतर बंद्यांना मिळणारे मूलभूत हक्क सावरकरांना नाकारण्यात येत असल्याने सावरकरांनी अशी पत्रे वारंवार पाठविली. मूलत: ती ‘मर्सी पिटिशन्स’ अर्थात सरकारी नमुन्यातील ‘दयापत्रे’ होती. अशी दयापत्रे पाठविण्याची संधी फाशी झालेल्या कैद्यांबाबत नसल्याने भगतसिंग आदींनी ती मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ३) या दयापत्रांचा दिनांकवार उल्लेख सर्वप्रथम स्वत: सावरकरांनीच ‘माझी जन्मठेप’मध्ये केलेला आहे; दुसऱ्या कोणी शोधून काढलेला नाही!

मुद्दा गणेश शंकर विद्यार्थीबाबतचा! विद्यार्थी यांनी क्षमा मागितल्याची वार्ता कोलकात्याच्या ‘दै. स्वतंत्र’मध्ये छापून आल्याचा उल्लेख आढळतो. मुख्य म्हणजे विद्यार्थी हे हिंदू-मुस्लीम दंग्यात मारले गेले आहेत. चापेकर, धिंग्रा वा भगतसिंगांसारखे फासावर चढून हुतात्मा झालेले नाहीत. तेव्हा पूर्वग्रह बाजूला सारून सावरकरांचे जीवनचरित्र व वाङ्मय वाचा; मग सारे प्रश्न गळून पडतील. साऱ्या शंका हरून जातील.

डॉ. नीरज श्याम देव

सावरकरांचे हिंदुत्व आजच्या हिंदुत्ववाद्यांना पचेल काय?

स्वा. सावरकरांवरील लेख वाचले. वास्तविक  सावरकरांवर आपला वैचारिक हक्क सांगणारेच त्यांच्या विचारांची सर्वाधिक पायमल्ली करताना दिसतात. खरे तर हिंदुत्ववादी विचारसरणीचे अनुयायीही सावरकरांचे धर्मनिरपेक्ष विचार वाचून थक्क होतील. सावरकरांना हिंदू धर्माबद्दल आस्था होती. मात्र इतर धर्माचा द्वेष त्यांना मान्य नव्हता. एवढेच काय, तर १८५७ च्या उठावावरील आपल्या पुस्तकात सावरकर म्हणतात की, ‘मुसलमान हे हिंदूंप्रमाणेच प्रखर राष्ट्रवादी आहेत.’ सावरकर हे जरी सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जात होते, तरी त्यांनी अंदमान आणि भागानगरच्या (हैदराबाद) आंदोलनात अहिंसा अस्त्राचाच अवलंब केला होता. नंतर १९३७ साली अहमदाबाद येथील हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणात सावरकर म्हणतात, ‘हिंदुस्थान एकजीव व एकात्म झालेला आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. उलटपक्षी या देशात मुख्यत: हिंदू व मुसलमान ही दोनही राष्ट्रे आहेत हे आपल्याला मान्य करूनच चालावे लागेल.’ (संदर्भ : ‘हिंदू महासभेच्या कार्याचा इतिहास’- शंकर रामचंद्र ऊर्फ मामाराव दाते) तसेच अहिंसेच्या विचाराला  ‘पूजनीय-वंदनीय, पण अनुकरणीय मात्र नव्हे’ असेही ते म्हणतात. अशीही परस्परविरोधी त्यांची विधाने व कृती आहे. असो.

सावरकरांविषयी दुर्लक्षित असलेला एक महत्त्वाचा मुद्दा हा की, सावरकर ‘ईश्वरनिष्ठ’ होते असे म्हणून त्यांच्यावर अनेक अभ्यासकांनी अन्याय केला आहे. खरे तर ते नास्तिकतेकडे झुकलेले ‘अज्ञेयवादी’ होते. ‘अज्ञेयांचे रूद्धद्धार’, ‘जगन्नाथाचा रथोत्सव’, ‘सूत्रधारास’ या त्यांच्या कविता वाचून आणि त्यातील विचार पचवून कोणीही ‘निरीश्वरवादी’ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे देवदेवतांचा पुरस्कार करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना विज्ञानवादी सावरकर पचवता येतील का, हाच प्रश्न आहे.

१९७० साली सावरकरांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढून काँग्रेस सरकारनेच त्यांचा गौरव केला होता, ही बाब नजरेआड करून कशी चालेल? तेव्हा नेहरू असोत, गांधी असोत की स्वा. सावरकर-सरदार पटेल; ही माणसेच होती आणि त्यांच्याकडूनही काही चुका झाल्या असतील. तत्कालीन परिस्थितीत त्यांना जे योग्य वाटले ते निर्णय त्यांनी घेतले.

बाळकृष्ण शिंदे, पुणे

काळ व संदर्भाची जाणीव असावी

‘लोकरंग’मधील (२७ मे व ३ जून) स्वा. सावरकरांवरील लेख व त्यावरील प्रतिक्रिया वाचल्या. कांही मंडळीना सावरकरप्रणीत ‘हिंदु-राष्ट्र’ या शब्दाची भीती वाटते. पण ती निष्कारण आहे. आज ‘नेशन’ या इंग्रजी शब्दासाठी ‘राष्ट्र’ हा प्रतिशब्द म्हणून योजण्यात येतो. युरोपमध्ये रेनेसाँच्या काळात ‘नॅशनॅलिझम’ची संकल्पना उदयाला आली. काळ व संदर्भानुसार एकाच शब्दाचा अर्थ व वापर बदलतो, तेच ‘राष्ट्र’ या शब्दाचेही आहे. उदा. ‘महाराष्ट्र’! जर ‘भारत’ हे ‘राष्ट्र’ आहे तर त्याचा एक भाग असलेला भूप्रदेश ‘महा-राष्ट्र’ कसा? भारताचे एक नाव ‘हिंदुस्थान’ हे आहे. परंतु मध्ययुगातील मराठे ज्या भूभागाला ‘हिंदुस्थान’ म्हणत तो भूभाग आहे आजचा ‘उत्तर हिंदुस्थान’! थोडक्यात, काळ आणि संदर्भानुसारच नामांचा विचार व्हायला हवा. ‘हिंदू लोकांचे जे वसतिस्थान, तो भूभाग म्हणजेच ‘हिंदूराष्ट्र’! भारतात वसणारे जे जे जनसमूह आहेत, त्यांच्यात बहुसंख्या हिंदूंची आहे. त्यामुळे भारताला सावरकरांनी ‘हिंदूराष्ट्र’ असे संबोधले व त्यात काहीच गैर नाही. त्यामुळे अन्य धर्मीयांना धोका वाटण्याचे कारण नाही.

सुभाष स. नाईक  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2018 12:38 am

Web Title: letters from lokrang readers 8
Next Stories
1 सावरकरांचे उदात्तीकरण ही हिंदुत्ववादाची निकड!
2 भ्रष्टाचार ही समस्या; काँग्रेस नव्हे!
3 उपलब्ध अधिकार तरी वापरा!
Just Now!
X