News Flash

मोटार डाव्या विचारांची आणि चालक उजवीकडे पाहणारेच!

‘भाजप : उजवी काँग्रेस?’ हा लेख (१५ नोव्हेंबर) अनेक मूलभूत विषयांना स्पर्श करणारा आहे.

दिनेश गुणे यांचा ‘हे चित्र भारतात कधी दिसणर?’ हा लेख वाचला.

‘लोकरंग’ (१५ नोव्हेंबर) मधील ‘भाजप : उजवी काँग्रेस’ हा लेख वाचला. उजवा अर्थविचार हाच पुरोगामी अर्थविचार आणि डावा अर्थविचार हा प्रतिगामी, याच गृहीतकावर आधारलेला हा लेख आहे. या कथित पुरोगामी अर्थधोरणामुळे देशाला अशा असमान आणि विकृत परिवर्तनाला तोंड द्यावे लागत आहे त्याचे काय? सत्ता हाती आल्यानंतर राज्य करणाऱ्या कोणत्याही पक्षाची मोटार (उजव्या वा डाव्या) विचारांची असली तरी चालक उजवीकडे पाहणारेच असतात हे आपल्याकडचे वास्तव आहे. भयानक विषमतेने ग्रासल्यामुळे मुडदूस झालेल्या बालकाप्रमाणे असलेली आपल्या देशाची अवस्था जोवर सुधारत नाही, तोपर्यंत स्वतंत्र पक्षाचा प्रयोग आपल्याकडे कधीही यशस्वी होणार नाही. त्यामुळे उघडपणे आर्थिक उजवेपण मान्य न करता (देशाची घटना गुंडाळून ठेवून) चोरपावलाने उजवेपण अमलात आणायचे हाच उद्योग राज्यकर्त्यांकडून आजवर केला गेला. नाव ‘खेडय़ाकडे चला!’ असा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींचे घ्यायचे आणि प्रत्यक्षात स्मार्ट सिटीज आणि मॉल्ससाठी दातृत्वाची उधळण करायची.अशा दुटप्पी कारभारामुळे नवश्रीमंत तरुण वर्ग तयार झाला, पण तो संख्येने सत्ता टिकवण्यासाठी पुरेसा नाही.
– प्रमोद तावडे, डोंबिवली

 

औषधाची मात्रा पूर्ण करावी
‘भाजप : उजवी काँग्रेस?’ हा लेख (१५ नोव्हेंबर) अनेक मूलभूत विषयांना स्पर्श करणारा आहे. आर्थिक उजवेपण बाळगत राजकीय पोकळी भरून काढण्याची सोन्यासारखी संधी भाजपपुढे आहे हे खरेच आहे. ते उजवेपण प्रामाणिकपणे आणि सातत्याने जपले तर लेखात मांडलेले इतर दोन पेच (धार्मिक आणि सामाजिक) कालांतराने आपोआपच निष्प्रभ होतील असे वाटते. याचे कारण म्हणजे, प्रामाणिक आर्थिक उजवेपणातून येणाऱ्या आर्थिक प्रगतीचे ‘मेल्टिंग पॉट’ सर्वच टोकेरी मते तासून बरीच बोथट करते. सद्य:स्थितीतून त्या स्थितीत पोहोचण्याचा काळ मात्र कसोटीचा असतो. त्यातही भाजपच्या पथ्यावर पडणाऱ्या दोन गोष्टी आहेत. त्यातली पहिली (धार्मिक) म्हणजे खराखुरा सर्वधर्मसमभाव राबवला तर तोच काहीसा ‘धार्मिक उजवेपणा’ भासेल अशी परिस्थिती देशात आहे. आणि भाजप त्याचा चातुर्याने उपयोग करून घेऊ शकतो. त्यामुळे दोन्ही टोकांवरचे काही नाराज झाले, तरी दोन्हीकडचे मोठे बहुमत भाजपकडे आकृष्ट होऊ शकते. दुसरी (सामाजिक) बाब म्हणजे, समलैंगिकतेसारखे विषय अजूनही भारतात पाश्चात्त्य जगाप्रमाणे कळीचे मध्यवर्ती मुद्दे बनलेले नाहीत. (तसे ते बनलेच तर सर्वच पक्षांची ‘सांकृतिक पंचाईत’ होऊ शकते, त्यामुळे भाजपला काळजीचे कारण नाही!) त्यामुळे केवळ खाण्यापिण्या संबंधातील कर्मठपणा (तोही फक्त गोमांसाच्या बाबतीत) काबूत ठेवला तरी भागू शकते. तशीही हिंदू धर्मात याबाबतीत बरीच विविधता आहे.
आर्थिक डावेपण सातत्याने जपून प्रगती करायची तर सर्वामध्ये केवळ नि:स्वार्थी वृत्ती असावी लागेल, जे अशक्य आहे. आर्थिक उजवेपण सातत्याने जपायला एकमेकांची रास्त असलेली स्वार्थी भूमिका समजून घेण्याची परिपक्व जाणीव असावी लागते, जे कठीण असले तरी अशक्य नाही. प्रतिजैविके घेणे अर्धवट सोडून द्यावे तसा काँग्रेसने हा प्रामाणिक आर्थिक उजवेपणाचा मार्ग मध्येच सोडला, ज्याचे परिणाम तो पक्ष आणि देश भोगतो आहे. भाजपने तशी चूक न करता औषधाची मात्रा पूर्ण करावी. आणि त्यातच सर्वाचे भले आहे.
– प्रसाद दीक्षित, ठाणे.

भाजपने चिंतन करावे..
‘लोकरंग’ मधील ‘भाजप उजवी काँग्रेस?’ हा लेख बिहारच्या भाजपच्या पानिपताचे सर्वागीण व मार्मिक विश्लेषण करणारा व परिस्थितीची अचूक मीमांसा करणारा वाटला. नितीशकुमारनी प्रत्यक्ष विकासाकडे घेतलेली झेप भाजपला मार्गदर्शक ठरावी असे वाटते. भाजपचे नेते चांगले निर्णय घेतात, पण अंमलबजावणीत मागे पडतात. सत्तेचा अनुभव कमी पडतो असे दिसते, तर त्यांचे काही उथळ नेते विकासाला विसरून गाय, धर्म या मुद्दय़ांवरून स्वकीयांनाच अडचणीत आणताना दिसतात. दुर्दैवाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणारे कोणी दिसत नाहीत. हे भाजपला अधोगतीकडे नेतील असे वाटते. भाजपने अंगभूत दोष दूर करावेत व नकळतपणे येणाऱ्या गोष्टी टाळाव्यात.
– प्रदीप करमरकर, नौपाडा, ठाणे.

 

हे घडणे केवळ अशक्य !
दिनेश गुणे यांचा ‘हे चित्र भारतात कधी दिसणर?’ हा लेख वाचला. मला इथे प्रामाणिकपणे आणि परखडपणे या प्रश्नाचे उत्तर, कितीही सकारात्मक व स्वप्नाळू होऊनही ‘कधीच नाही’ हेच अनेक दशके अबाधित राहील यात संशय नाही. आपल्याकडील रस्त्यांवर पदपथच नाहीत. माणसांना रस्त्यावर चालण्याचा मूलभूत हक्क नाही. मग ते सायकल कशी चालवणार? तसेच आपल्याकडील वाहनचालकांचा अति उतावीळपणा पाहिल्यास, वाहतूकदेखील किती दिवस असुरक्षित राहणार? लंडनमध्येच काय, पण सर्वच पाश्चिमात्त्य देशांमध्ये वाहतूक ठप्प झाली, काही कारणांनी काही अडथळे आले तरीदेखील तास- दोन तासदेखील मोटारी व्यवस्थित अंतर सोडून निवांत काहीही न करता, मुख्य म्हणजे हॉर्न न वाजविता शांत असतात, हेच मुळी फार कौतुकास्पद आहे. आपल्याकडे दोन वाहनचालक जरी रस्त्यावरून जात असतील, पुढचा थांबला तर लगेच मागचा हॉर्न वाजवून निषेध व्यक्त करेल. टोकाला जाऊन पुढच्याची बखोटी धरेल. तर मग मैलोन्मैल वाहनांच्या रांगेत स्वयंशिस्तीने ते कसे शांत राहू शकतील?
– डॉ. सी. बी. मगदूम, विटे, सांगली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2015 12:58 am

Web Title: loksatta raiders replay 2
Next Stories
1 आमची पंचविशी आणि ‘घाशीराम कोतवाल’
2 चुकीच्या विज्ञानतत्त्वावरील कथा
3 पडसाद
Just Now!
X