28 January 2020

News Flash

असत्याचा विळखा आणि संस्कृतीचा ऱ्हास..

‘लोकरंग’मधील (१ एप्रिल) ‘एप्रिल फूल गुगलताई!’ आणि ‘सत्योत्तरी ‘विप्रलाप’..’

‘लोकरंग’मधील (१ एप्रिल) ‘एप्रिल फूल गुगलताई!’ आणि ‘सत्योत्तरी ‘विप्रलाप’..’ हे अनुक्रमे मंदार भारदे आणि राहुल बनसोडे लिखित लेख वाचले. भारदे यांचा लेख हास्य फुलवणारा, तर बनसोडे यांचा लेख नावीन्यपूर्ण माहिती देऊन मेंदूला गदगदा हलवून अद्भुत आनंद देणारा! बनसोडे यांच्या लेखात संशोधनाद्वारे प्राप्त झालेला खोटे/ असत्य पसरवण्याचा जो वेग सांगितला तो खरोखरच धक्कादायक आहे. खोटे/ असत्य जर एवढय़ा जलदरीतीने सत्यापेक्षा जास्त पोहचत असेल, तर सत्य कळेपर्यंत खोटे/ असत्य यांनी आपल्याला सहजरीत्या विळखा घातलेला असेल ही जाणीव एकदम अस्वस्थ करून जाते. त्यांनी खोटे/ असत्य जलद गतीने पोहोचण्याच्या कारणांमध्ये सांगितलेले नवलाईच्या स्वरूपाचे विश्लेषण एकदम पटते. सत्याच्या ठिकाणी असत्य प्रस्थापित झाल्यावर ‘हे खोटे आहे’ असे सांगणारे काहीजण असले तरी त्यांची हतबलता, अगतिकता मनाला सुन्न करते. खोटे पूर्णत: उघडे पडूनही लोक तसे मान्य करत नाहीत, कारण खोटय़ा / असत्य गोष्टी त्यांच्यापर्यंत वेगाने जलदरीत्या पोहचलेल्या असतात आणि त्यावर त्यांनी विश्वाससुद्धा ठेवलेला असतो. या दरम्यान त्यांनी आपली बौद्धिक, मानसिक शक्ती वा ऊर्जा त्यासाठी वापरलेली असते. त्यामुळे आपले चुकले हे मान्य असूनही लोक सत्याकडे पाठ फिरवतात. कदाचित हा ‘Sunk Cost Fallacy’चा प्रभाव असू शकतो. दरम्यान लोकांना असत्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या जास्त असलेली आढळते. तेव्हा बहुमतासोबत राहावे ही भावना त्यांच्यामध्ये प्रबळ होत असावी. आपण सत्याच्या शोधाच्या बाजूने राहू तेव्हा आपल्यासोबत एकतर कमी लोक राहतील वा कोणीही राहणार नाही, अशी भीती वाटत असावी. त्यामुळे आपल्याला श्रेयस्कर अशा असत्यावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचा कल वाढत असावा.

स्मार्टफोन आणि समाजमाध्यमांचा उदय होऊन मोठय़ा प्रमाणावर पसरत असलेल्या ‘कन्टेन्ट’चे मूल्यांशी, नितीशी वा सत्याशी कसलेच नाते नसते आणि कसा असत्य पसरविण्याच्या कामात त्यांचा हातभार लागतो, हे बनसोडे यांनी व्यवस्थित पटवून दिले आहे. सत्याचा अपलाप, सत्योत्तर परिस्थिती यानंतर काय काय असेल व होऊ शकते याचे ‘मेटा नॅरेटिव्ह’ (कळयुग), चित्रांच्या साहाय्याने संभाषण अशा टप्प्यांमधून लेखकाने सविस्तर सांगितले आहे. तसेच ज्या ज्या वेळेस माणसे लिपी आणि लिखित शब्दांशी फारकत घेऊन चित्रभाषेत संवाद साधतात तो तो काळ त्या त्या संस्कृतीचा अखेरचा काळ होता, हे वाचून तर एकदम धक्काच बसतो.

‘विप्रलाप’ या शब्दाचा इतिहास आणि तो शब्द वापरात आढळून येत नसल्याची केलेली चिकित्सा अद्भुत. खऱ्या-खोटय़ात फरक न करू शकणारी प्रलापाची अवस्था आणि शेवटी दिलेला संस्कृतीच्या ऱ्हासाचा भयावह ईशारा चटका देणारा आहे.

नागेश किवळेकर

First Published on May 6, 2018 1:44 am

Web Title: loksatta readers letter over lokrang articles 11
Next Stories
1 मुक्या प्राण्यांची वासलात कशाला?
2 तर्कशुद्ध विश्लेषण आणि काही अनुत्तरित मुद्दे..
3 नावात काय आहे?
Just Now!
X