‘लोकरंग’मधील (१४ जानेवारी) अतुल देऊळगावकर यांचा ‘हवामानबदल आणि कुडमुडे संशोधक’ हा लेख वाचला. हवामान खात्यातील परिस्थिती महाराष्ट्रातील जलसंपदा खात्याच्या तुलनेत बरी आहे, असे म्हणावे लागेल. कारण जलसंपदा विभागात अधिकृत जलवैज्ञानिकच नाहीत. जलविज्ञान प्रकल्प असा एक स्वतंत्र विभाग नाशिकला जरूर आहे; पण तेथे सगळ्या महत्त्वाच्या पदांवर स्थापत्य अभियंतेच असतात. जलविज्ञान प्रकल्पात ज्याची बदली होईल तो जलवैज्ञानिक! त्याला जलविज्ञान आले पाहिजे असे काही नाही. जलविज्ञान शाखेतील पदवी/ पदव्युत्तर शिक्षण, त्यातील अनुभव असल्या क्षुल्लक बाबींवर जलसंपदा विभागाचा विश्वास नाही. महाराष्ट्रातील जलविज्ञान ही एक अंधारी जागा आहे आणि तरीही आपण ‘नसलेले पाणी’ गृहीत धरून बिनधास्त ‘कोरडा’ जलविकास करतो आहोत! काय करावे? कोणाला काय सांगावे?

– प्रदीप पुरंदरे, औरंगाबाद</strong>

 

निश्चित व ठोक माहिती कधीच का नसते?

अतुल देऊळगावकर यांचा ‘हवामानबदल आणि कुडमुडे संशोधक’ हा लेख वाचला. अभ्यासू आणि मुद्देसूद लेखनाने देऊळगावकर यांनी भारतीय हवामान विभागाचा बुरखा फाडला आहे. गेली अनेक वर्षे त्याचे अंदाज (?) कधीच खरे ठरलेले नाहीत. हवामान विभाग लोकवैज्ञानिक पद्धत किती अवलंबतो, हेही एक न उमगलेले कोडेच आहे. प्रगत देशांत अतिवृष्टी, वादळ, पूर यांसारखी संकटे कुठे, केव्हा व किती प्रमाणात येणार हे अचूक सांगितले जाते. आपल्या ‘इस्रो’ने एवढे उपग्रह अवकाशात सोडलेले असतानाही आपणास अचूक माहिती सांगण्यास अडचण ती काय, हेच कळायला मार्ग नाही. हवामान विभागाकडे निश्चित व ठोक अशी माहिती कधीच का नसते? ‘ये रे माझ्या मागल्या’ या न्यायाने या विभागाचे काम सुरू असते. यावर कोणाचाही कसलाही वचक नाही. जोपर्यंत जनसामान्यांमध्ये याविषयी सजगता येणार नाही व ते प्रश्न विचारणार नाहीत तोवर हे असेच चालू राहणार याविषयी शंका नाही.

– राजेंद्र डांगे, सोलापूर