‘लोकरंग’मधील (११ फेब्रुवारी) प्रवीण बांदेकर यांचा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाबाबतचा ‘आरते ये, पण आपडा नको!’ हा वास्तवाची जाणीव करून देणारा लेख वाचला. हा लेख अरण्यरुदन न ठरो असा विचार मनात आला. सध्या सगळीकडेच गटबाजी, कंपूशाही दिसत आहे. त्याला साहित्य संमेलन अपवाद का ठरावे? संमेलनात वाचकांना प्राधान्य दिले जावे. त्यासाठी शासकीय ग्रंथालयांनी आपले उत्तम वाचक संमेलनाला पाठवावेत. या वाचकांची तिथे विशेष दखल घेतली जावी. संमेलनात राजकारण्यांचे प्राबल्य नसावे असे वाटणारे अनेक साहित्यप्रेमी असू शकतात. परंतु तसे अपवादानेच घडते, हेही वास्तव आहे. सकस वाचनातूनच उत्तम लेखक घडतो. त्यामुळे बांदेकर म्हणतात तसे सर्वसमावेशक, निर्मळ साहित्यानंद देणारे एक तरी संमेलन संपन्न होवो अशी प्रार्थना!

– मधुकर घारपुरे, सिंधुदुर्ग

 

कलाबहर हवा तर लोकाभिमुख व्हा! 

अभिजीत ताम्हणे यांचा ‘दोन पायांचा घोडा..’ हा कलाबाजार/ कलाव्यवहाराविषयी बरेच काही सांगून जाणारा लेख (४ फेब्रुवारी) वाचला. भारतासारख्या विविध कलाक्षेत्रांच्या पायावर उभ्या असलेल्या देशात कलाबाजाराबद्दल अनास्था वाटणे हीच मुळी दुर्दैवाची बाब म्हटली पाहिजे. यामागची कारणे शोधल्यास ध्यानात येईल, की आपल्या देशात खऱ्या कलागुणांचा प्रचार-प्रसार स्वातंत्र्योत्तर काळापासून केले गेले नाहीत. त्यातील उणिवांचा शोध घेतला गेला नाही. तेव्हा सार्वजनिक उत्सवांतून, खासगी आर्ट गॅलऱ्यांच्या माध्यमातून असे कलाबाजार लोकाभिमुख करून त्यास प्रोत्साहित करून ते प्रभावीपणे राबवायला हवेत. तसे केल्यास ते तरुणाईसह सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून कलाक्षेत्र बहरलेले दिसेल. मात्र यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

– उषा वर्तक, पालघर

 

अंतर्मुख करणारी मिश्किली

नव्या वर्षांत ‘लोकरंग’मध्ये सुरू झालेले ‘मी जिप्सी’ हे संजय मोने यांचे सदर  मिश्किलपणे जीवनातील विसंगती टिपणारे आहे. त्यांचे लिखाण वाचताना हसता हसता अंतर्मुख व्हायला होते. गेल्या काही वर्षांत खूप काही बदलले. जुन्या पिढीची जीवनशैली इतिहासजमा होताना दिसते आहे. तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती होते आहे. परंतु प्रत्येक क्षेत्रातील राजकारण वाढणे, हव्यास-अहंकाराची विविध रूपे, स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणारे लोक या गोष्टी जगणे तणावपूर्ण करीत आहेत. भविष्यकाळातही परिस्थिती लगेच सुधारेल ही खोटी आशा न बाळगता बदलत्या काळाला सामोरे जावे लागणार आहे.

– प्रफुल्लचंद्र काळे, नाशिक