‘लोकरंग’मधील (८ एप्रिल) ‘ऐन वसंतात अध्र्या रात्री..’ हा गिरीश कुबेर यांचा लेख वाचला. ज्या शेक्सपीअरच्या नाटकावरून (‘मिडसमर नाइट्स ड्रीम’) हे अत्यंत समर्पक शीर्षक निवडले आहे, त्याच शेक्सपीअरच्या ‘रोमिओ अ‍ॅण्ड ज्युलिएट’ नाटकात ‘नावात काय आहे?’ असा सुप्रसिद्ध प्रश्न आहे. नावातून बरेच काही सूचित होत असते. शीर्षकातील ‘वसंत’ आणि ‘रात्र’ यांचे इंग्लंडच्या सद्य:स्थितीशी असलेले संदर्भ लेखात आले आहेतच. योगायोगाने ‘मिडसमर नाइट्स ड्रीम’ नाटकाचा विषयही लग्नाशी संबंधित आहे. लेखात म्हटल्याप्रमाणे, इंग्लंड आता युरोपशी घटस्फोट घेऊन झाल्यावर भारताशी येनकेन प्रकारे घट्ट  नाते जमवू पाहत आहे. ‘कॉमनवेल्थ’ हे नावसुद्धा मोठे मासलेवाईक आहे आणि ते अनेक प्रश्न निर्माण करते. ‘वेल्थ’ कुणाची आणि ती ‘कॉमन’ कशी, असे प्रश्न सामान्यजनांना नक्की पडत असतील. इतिहासात जगू नये हे खरे, पण इतिहास विसरूही नये. धर्म, वर्ण, जात, भाषा असे सारे काही वापरून ‘फोडा आणि झोडा’ नीती कशी राबवता येते आणि देशांना पारतंत्र्यात ठेवून त्यांची संपत्ती कशी लुटता येते, याचा वस्तुपाठच इंग्लंडने घालून दिला होता. इंग्लंडने फाळणी तर घडवून आणलीच, पण नंतरही भारतातील फुटीर चळवळींच्या सहानुभूतीदारांना अनेकदा राजाश्रय दिला. भारतातून फरार झालेले अनेक गुन्हेगार लंडनमध्ये आश्रय घेतात. (आजही विजय मल्या लंडनमध्येच सुखाने राहतो आहे.) भारतीय कामगारांच्या व्हिसासंबंधीचे नियम तेथे कडक केले जात आहेत. पाकिस्तानच्या बाबतीत इंग्लंड भारताचे मोठेपण मान्य न करता भारत-पाकिस्तान यांना एकाच तागडीत तोलतो.

‘कॉमनवेल्थ’ला नेहरूंनी महत्त्व दिले नाही आणि २०११ पासून भारतीय पंतप्रधानांनी तेथे हजेरीही लावलेली नाही, हे योग्यच आहे. पंतप्रधान परिषदेत स्वत: आले की आणखी कोणाला पाठवले, याच्या प्रतीकात्मकतेतही बरेच काही असते. इंग्लंडमधील ऐन वसंतात अध्र्या रात्री दाटून आलेल्या कुंद वातावरणाचा फायदा भारताने नि:संकोचपणे करून घ्यावा असे वाटते.

– प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>

 

मानहानीकारक प्रसंग टाळावेत

‘लोकरंग’मधील ‘ये है मुंबई मेरी जान!’ या कुलवंतसिंग कोहली यांच्या सदरातील ‘रूपेरी माणूस’ (८ एप्रिल) हा लेख वाचला. कोहली यांचे हे सदर स्मरणरंजनात्मक आहे. त्यातून राजकारण्यांचे, चंदेरी जगतातील कलाकारांचे स्वभाव व माहीत नसलेले किस्से कळतात. मात्र ‘रूपेरी माणूस’ हा लेख वाचून थोडा अस्वस्थ झालो. साधारणत: दिवंगत झालेल्या कोणाबद्दलही (भले तो आपला शत्रू का असेना!) काही वादग्रस्त वक्तव्य करणे, लिहिणे टाळावे असा एक अलिखित संकेत आहे. कारण त्या प्रसंगाचा प्रतिवाद करण्यासाठी किंवा कोणत्या अपरिहार्य कारणास्तव तो प्रसंग घडला, हे सांगण्यासाठी ती व्यक्ती या जगात नसते.

लेखात ‘राजेंद्रकुमारच्या गोऱ्या गालावर पापाजींची पाच बोटे स्पष्ट उमटली.. आजपासून तुझे जेवण बंद!’ अशी राजेंद्रकुमार यांची मानहानी करणारी वाक्ये वापरून काय साधले? पापाजींचा दानशूरपणा जरूर सांगावा; पण तो सांगताना कोणाच्या प्रतिमेला तडा जाईल असे प्रसंग (जरी ते प्रत्यक्षात घडले असले तरी) सांगण्याचे टाळावे असे वाटते. अशा प्रसंगाला साक्षीदार होतो या एकमेव कारणास्तव असे प्रसंग जाहीररीत्या सांगणे योग्य नव्हे. असे मानहानीकारक प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी आलेलेच असतात. सामान्य माणूस ते मोठे उद्योगपती- अगदी देशाचे पंतप्रधानही याला अपवाद नसतात. याचा अर्थ त्या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या व्यक्तीने ते प्रसंग जाहीर करावेत असा नसतो.

– मुकुंद परदेशी, धुळे</strong>

 

सुरक्षेबाबत सतर्कता आवश्यक

‘लोकरंग’मधील (८ एप्रिल) ‘.. पुन्हा उभा राहीन!’ या लेखातून प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी व्यक्त केलेल्या आत्मविश्वासाला रसिक म्हणून सलाम! परंतु एक गोष्ट खटकली, की २००० सालीही कांबळे यांच्या जुन्या स्टुडिओला आग लागून त्यांची बहुमोल चित्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून अतोनात नुकसान झाले होते; तरीही त्या दुर्घटनेतून या प्रथितयश कलाकाराने काहीच कसा बोध घेतला नाही? स्टुडिओचा विमा उतरवणे आणि अग्निप्रतिबंधक व पूर्वसूचना देणारी यंत्रणा बसवणे याबद्दल त्यांना सुचले नाही किंवा तसा योग्य सल्लाही कुणी दिला नाही? कांबळे यांनी स्टुडिओच्या मागील भागातील कचरा उचलण्याबद्दल नगरपालिकेकडे तक्रारही केली होती. मिळणाऱ्या यशाबरोबरच सुरक्षेबाबतही सतर्क राहिले तर नाहक मन:स्ताप व नुकसान टाळता येते. आजच्या युगात ते अत्यावश्यक आहे. तरीही त्यांच्या जिद्दीला पुनश्च सलाम!

– राघवेंद्र मण्णूर, ठाणे