26 September 2020

News Flash

तर्कशुद्ध विश्लेषण आणि काही अनुत्तरित मुद्दे..

विषम तरतुदींचा हा विस्तार पगडा म्हणून रुजला असे म्हणण्यास बराच वाव आहे.

‘लोकरंग’मधील हेमंत राजोपाध्ये यांच्या ‘धारणांचे धागे’ या सदरातील ‘धर्मव्यवस्थांच्या गाभ्याकडे..’ हा लेख (८ एप्रिल) वाचला. राजोपाध्ये यांचे विश्लेषण तर्कशुद्ध तसेच साक्षेपी स्वरूपात असले तरी काही मुद्दे अनुत्तरित वाटतात, ते पुढील प्रश्नांतर्गत नोंदवत आहे.

ऋणकोचे वर्णव्यवस्थेतील स्थान पाहून व्याज रक्कम ठरविण्याचा निर्णय स्मृतिकार देत असले, तरीही पारंपरिक मूलतत्त्ववादी व्यवस्थेचा पाया तेथपासूनच हेतूत: मजबूत अथवा घट्ट झाला, असे नाही का म्हणता येणार? भले मग मन्वादी शास्त्रकार अथवा कौटिल्यही त्याच तरतूदी अन् नियम तयार करोत. विषम तरतुदींचा हा विस्तार पगडा म्हणून रुजला असे म्हणण्यास बराच वाव आहे. पशुपालनासह कृषिव्यवस्था तसेच अन्य लोकवस्तीच्या व्यवस्था साकारताच व्यवहारप्रणालीत ‘ऋण’ संकल्पनेचा उदय झाला, हे राजोपाध्ये यांचे म्हणणे मान्य. मात्र, वंचित ज्ञातिनिहाय गटांबाबत पक्षपाताधारित वसुली ही कालपरत्वे पूर्णत्वास न जाता दृढ होत गेली नाही काय?

प्रणालीतून आकारलेल्या उपशाखा व आचार्याच्या सामाजिक-सांस्कृतिक अधिकारांना मर्यादित राजकीय महत्त्व प्राप्त झाले, ही राजोपाध्ये यांची मीमांसा उचित आहे. आनुषंगिक बाब हीच की, कालांतराने सत्ता आणि सत्ताबाधित्व टिकवण्याचा कल हा उपशाखांच्या माध्यमातून जोरकसपणे स्थिरावू लागला. ऋषी, देव अन् पितृऋणांची वीण खरे तर कृतज्ञता भावाभिव्यक्तिसापेक्ष न राहता पुढे व्यावहारिक स्वरूप धारण करीत अस्तित्वाच्या संघर्षांत लादलेपणाने गुंता वाढवित गेली.

डॉ. सुनील भा. शिंदे, अहमदनगर

पदाची जबाबदारी ओळखा!

८ एप्रिलच्या ‘लोकरंग’मध्ये माधव गोडबोले यांचा ‘नीलकंठाचे हलाहल प्राशन आणि रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया’ हा लेख वाचला. नुकत्याच एका बँकेच्या उघड झालेल्या १३ हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे आरबीआय, सरकार आणि जनता सगळेच हादरून गेले आहेत. त्यानंतर जणू बँकांमधील घोटाळ्यांची मालिकाच सुरू झाली आहे. या बँकांवर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याची जबाबदारी आरबीआयचीच आहे, हे डिसेंबर १९९३ मध्ये संसदेत स्पष्ट झाले आहेच; परंतु बँकांतील घोटाळ्यांच्या निमित्ताने आरबीआयचे अपयश समोर आले आहे. आता गव्हर्नर ऊर्जित पटेल हे आरबीआयला विनाकारण टीकेचे धनी व्हावे लागत असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहेत. तसेच ‘हलाहल प्राशन..’सारखी भावनिक भाषणे करीत आहेत. या घोटाळ्यात आता आरबीआयच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी चालू झाली आहे. तसेच याबाबतीत आरबीआयचे ऑडिटसुद्धा व्यवस्थित झाले नसल्याचे समोर आले आहे. असे असताना पटेल यांनी जनतेला न पटेल असे वक्तव्य न करता आपल्या पदाची जबाबदारी ओळखावी आणि ती कठोरपणे पार पाडावी.

अनंत बोरसे, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 1:11 am

Web Title: loksatta readers letter over lokrang articles 9
Next Stories
1 नावात काय आहे?
2 राष्ट्रीयीकृत बँका : दुसरी बाजू
3 आजारापेक्षा उपाय भयंकर!
Just Now!
X