लोकरंगमधील (११ नोव्हेंबर) संघ परिवार : एक मायाजालया दिलीप देवधर यांच्या लेखावरील निवडक प्रतिक्रिया..

‘संघपरिवार : एक मायाजाल’ हा दिलीप देवधर यांचा प्रदीर्घ लेख वाचून ‘गण’ नि ‘गवळणी’नंतर निव्वळ ‘बतावणी’त संपलेल्या तमाशाची आठवण झाली. कारण लेखातील अनेक अतक्र्य घटनांची व विधानांची संगतीच लागत नाही.

Loksatta vyaktivedh Roberto Cavalli Italian fashion design Stretch denim British designer
व्यक्तिवेध: रॉबेर्तो कावाली
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?

उदा. देवधरांनी लेखात डॉ. हेडगेवार यांचे कर्तृत्व सांगताना, त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात वर्षभर कारावास भोगला, असे म्हटले आहे. वास्तविक मिठाचा सत्याग्रह १२ मार्च ते ६ एप्रिल १९३० या कालवधीत झाला आणि यात गांधीजींनी जवळपास २४० मैल पायी प्रवास केला. मग १९२५ साली काँग्रेसच्या प्रादेशिक राष्ट्रवादास त्यागून सांस्कृतिक राष्ट्रवादाचे उद्दिष्ट असणाऱ्या रा. स्व. संघाची स्वतंत्र स्थापना केली असताना हेडगेवारांनी मिठाच्या सत्याग्रहात सहभाग का घेतला आणि खरेच सहभागी झाले होते काय, हा प्रश्नच आहे. परंतु देवधरांनी लेखात मिठाचा सत्याग्रह म्हणजेच ‘जंगल सत्याग्रह’ असे कंसात नमूद केले आहे, जे पूर्णत: चुकीचे आहे. डॉ. हेडगेवार जर मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे वर्षभर कारावासात असतील, तर ते ६ एप्रिल १९३० ते ५ एप्रिल १९३१ या काळात कारावासात होते असे म्हणावे लागेल.

डॉ. हेडगेवार यांच्या जीवनावर व कार्यावर डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले, दादाराव परमार्थ, बाळशास्त्री हरदास आणि आप्पाजी जोशी यांनी केलेल्या लेखनाच्या संदर्भानुसार ३ मे ते १० जून  १९३० या काळात संघशिक्षणाचा उन्हाळी वर्ग नागपुरात चालू होता. विशेष म्हणजे, हेडगेवार आणि डॉ. परांजपे या वर्गास हजर होते! त्यानंतर १२ जुलै १९३० रोजी गुरुपौर्णिमा उत्सवातही ते उपस्थित होते आणि १५ ते २० जुलै दरम्यान वर्धा, पुलगाव धामणगाव, पुसद या ठिकाणी डॉ. हेडगेवारांनी प्रवास केला. मग डॉ. हेडगेवारांना वर्षभराचा कारावास असताना, ते मोटारीने संघ शिक्षा वर्ग घेत कसे मुक्तपणे फिरू शकत होते?

डॉ. हेडगेवारांचे सहकारी आणि चरित्रकार दादाराव परमार्थ यांच्या माहितीनुसार, हेडगेवार यांना पहिला कारावास हा १९ ऑगस्ट १९२१ ते १२ जुलै १९२२ या काळात घडला. मात्र ही शिक्षा राजद्रोहामुळे आणि जातीजातीत वैमनस्य उत्पन्न करण्याच्या कारणावरून झाल्याचे परमार्थ यांनी म्हटले आहे, हे विशेष.

यवतमाळ येथे २१ जुलै १९३० रोजी जंगल सत्याग्रह झाला. त्यात चार हजार लोकांनी सहभाग घेतला, ज्यात प्रामुख्याने आदिवासी बांधव समाविष्ट होते. त्यात एकटे हेडगेवारही होते. यात त्यांना कलम-१९८ अन्वये सहा महिने, तर कलम-३७९ अन्वये तीन महीने, अशी एकूण नऊ महिन्यांची शिक्षा झाली आणि त्यांना अकोला येथील तुरुंगात ‘ब’ वर्ग कोठडीत ठेवण्यात आले. अकोला कारावासात हेडगेवार यांनी कैदी म्हणून कापलेले गवत डॉ. परांजपेंनी संघशाखेवर ध्वजाच्या पायी अर्पण केले म्हणे!

डॉ. हेडगेवार यांची १४ फेब्रुवारी १९३१ रोजी सात महिन्यांत सुटका झाली. याचा अर्थ हेडगेवार यांना झालेल्या दोन्ही शिक्षांचा मिठाच्या सत्याग्रहाशी काहीही संबंध नाही. शिवाय जंगल सत्याग्रहात झालेल्या शिक्षेबद्दलही डॉ. श्रीरंग गोडबोले यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाच्याही लेखनात माहिती आढळत नाही. असे असताना डॉ. हेडगेवार यांनी जंगल सत्याग्रहात सहभाग नोंदवला आणि कारावास भोगला ही बाब सत्य मानली, तरी प्रश्न असा की – देवधर यांनी त्यास ‘मिठाचा सत्याग्रह’ असे का लिहिले? याचे स्पष्ट कारण हेच की, देवधर येनकेनप्रकारे म. गांधीजींच्या कार्याशी हेडगेवारांना जोडून गांधीजींच्या प्रभावळीत त्यांना उजळू पाहताहेत.

देवधर यांनी डॉ. हेडगेवार हे १९२५ पर्यंत काँग्रेसमधील एक प्रमुख व प्रभावशाली नेते असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. हेडगेवार यांनी लो. टिळकांचे नेतृत्व स्वीकारले, असे देवधर म्हणतात. परंतु ज्या लखनौ करारात मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले, त्या काळात त्यांनी काँग्रेस सोडली असती तर त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांना ते साजेसे असले असते. परंतु हेडगेवार १९१५ ते १९२५ काँग्रेसमध्येच असतात, याचे लेखात काहीच विश्लेषण नाही. डॉ. हेडगेवारांनी १९२५ पूर्वी काँग्रेस कार्यकर्ते म्हणून देशकार्यासाठी दिलेले योगदान मान्य करायला हवे. परंतु त्यांनी गांधीजींना स्वीकारले हा दावा म्हणजे जणू काही ‘डॉ. हेडगेवारांनी गांधीजींना काँग्रेसमध्ये जनाधार मिळवून दिला, नाही तर गांधीजींना प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले असते’ अशा प्रकारचा आहे!

नेताजी बोस यांनी हेडगेवार यांची दोन वेळा भेट घेतली असे देवधर म्हणतात. या दाव्याची शहानिशा केली असता तो धादांत खोटा असल्याचे निदर्शनास येते. दोन वेळा भेट झाली असे म्हणणे सपशेल खोटे आहे. एका प्रसंगास ‘भेट झाली’ अथवा ती नेमकी खरेच ‘भेट’ म्हणता येईल का, हा प्रश्न आहे. नेताजींच्या कथित भेटीची वस्तुस्थिती अशी की- मद्रास येथील अधिवक्ता संजीव कामत यांच्या उपस्थितीत संघाच्या उन्हाळी वर्गाचा समारोप ८ जून १९४० रोजी नागपुरात रेशीमबागेत झाला. त्या वेळी डॉ. हेडगेवार अतिशय आजारी होते आणि म्हणून ते या  कार्यक्रमास अनुपस्थित होते. अत्यवस्थ डॉ. हेडगेवारांची भेट घेण्यासाठी सर्व स्वयंसेवक आतुर होते. म्हणून दुसऱ्या दिवशी ९ जूनला त्यांनी झोपूनच स्वयंसेवकांना आणि प्रमुख कार्यकर्त्यांना संदेश दिला. पुढे त्यांची प्रकृती फारच बिघडली आणि १५ जूनला नागपूरच्या मेयो रुग्णालयात त्यांना यादवराव जोशींनी भरती केले. तिथून त्यांना बाबासाहेब घटाटे यांच्या बंगल्यातील खोलीत हलविण्यात आले. डॉ. मुंजे त्यांना भेटण्यासाठी १९ जूनला आले आणि डॉ. हेडगेवारांना नाशिकला हलवावे असा विचार त्यांनी मांडला. परंतु नंतर डॉक्टरांची तब्येत अतिशय खालावली आणि त्यांची अवस्था त्या काळात भ्रांतहीनच असावी. दुसऱ्या दिवशी- म्हणजे २० तारखेला नेताजी बोस ‘फॉरवर्ड ब्लॉक’च्या अधिवेशनाला नागपुरात आले होते. त्या वेळी आवर्जून रामभाऊ  रुईकर बोस यांना घेऊन डॉक्टरांच्या भेटीला आले. परंतु डॉक्टर अस्वस्थ असल्यामुळे ही भेट होऊ शकलीच नाही, असे श्रीरंग गोडबोले यांनी मांडले आहे. याबद्दल असेही म्हटले जाते की, डॉक्टरांनीच मुद्दाम बोस यांची भेट नाकारली. कारण बोस त्या वेळी कट्टर मार्क्‍सवादी विचारांचे म्हणून ओळखले जात होते. परंतु डॉ. हेडगेवारांनी मुद्दाम भेट नाकारली असे कुठेही नमूद नाही. म्हणजे, २० जूनला डॉक्टरांनी बोस यांची भेट नाकारली वा होऊ  शकली नाही आणि २१ जून १९४० रोजी डॉ. हेडगेवारांचे मेंदूत रक्तस्राव होऊन निधन झाले. म्हणजेच बोस आणि हेडगेवार यांच्या भेटीबद्दलचा जो काही कथित प्रसंग घडला, त्यात प्रत्यक्षात भेट झालेलीच नाही हे वास्तव आहे.

देवधर यांनी सावरकरांना संघावरील ओझे म्हटले आहे. याची त्यांनी केलेली कारणमीमांसा अगदीच कृतघ्नतेची आहे. कारण डॉ. हेडगेवार यांच्या चरित्रात- ‘मार्च १९२५ मध्ये रत्नागिरी जवळील शिरगावात विष्णुपंत दामले यांच्या घरी सलग दोन दिवस सावरकरांची व हेडगेवारांची प्रदीर्घ चर्चा झाली आणि त्यातच संघाची स्थापना, नाव, उद्दिष्ट, रचना व कार्यपद्धती ठरवली गेली’ असे म्हटले आहे. असे असेल, तर सावरकर हे संघाचे ओझे कसे काय होऊ शकतात? एवढी घनिष्टता जर संघाची आणि सावरकरांची असेल, तर ‘गांधीजींचा हत्यारा सावरकरांच्या हिंदू महासभेचा होता’ या वक्तव्यास काय अर्थ उरतो? बाळासाहेब देवरस यांच्याबद्दलही असाच कृतघ्नतेचा सूर या लेखात आढळतो, त्याचे कारण समजत नाही.

गांधीजींनी जानेवारी, १९४८ मध्ये काँग्रेसचे रूपांतर ‘लोकसेवा संघा’त करावे असे मत मांडले होते खरे; मात्र गांधीजींनी स्पष्टपणे पं. नेहरू हेच त्यांचा राजकीय वारसदार आणि विनोबा भावे हे त्यांचे आध्यात्मिक वारसदार असतील असे जाहीर केले होते. राजकीय भूमिकांच्या बाबतीत- ‘राजकीय बाबतीत जवाहर जे म्हणेल तेच माझे राजकीय विचार असतील,’ एवढय़ा स्पष्ट सूचना गांधीजींनी केल्या होत्या. त्याबद्दलचा विपुल पत्रव्यवहार ‘गांधी ऑन नेहरू’ या आनंद हिंगोरानी यांच्या पुस्तकात उपलब्ध आहे.

‘महात्मा गांधी यांची हत्या होऊ दिली गेली’ असे एक वाक्य या लेखात आहे. या वाक्याचा अर्थ असा होतो की, गांधीजींची हत्या होणार याची माहिती सरकारमधील लोकांना, अर्थात गृहमंत्री म्हणून पटेल यांना असणे स्वाभाविकच आहे. मग तरीही पटेल यांनी ही हत्या होऊ दिली काय? आणि असे असेल, तर त्याच ‘पटेल यांच्यासोबत देवरस आणि वसंतराव ओक नवीन पक्ष काढणार होते’ – लेखातील या अशा चित्रविचित्र दाव्यांची सुसंगती कशी लावणार?

राज कुलकर्णी

‘विश्लेषणा’चे मायाजाल!

‘संघ परिवार : एक मायाजाल’ हा लेख वाचला. संघाबद्दल लेखात माहिती बरीच असली, तरी ‘विश्लेषण’ या दृष्टीने फारसे काही पदरात पडत नाही. उलट संपूर्ण लेखामध्ये सतत संघाबद्दलच्या बऱ्याच रूढ समजुतींना धक्के बसत राहतात. डॉ. हेडगेवार यांनी सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथावरूनच प्रेरणा, स्फूर्ती घेऊन त्या तात्त्विक पायावरच रा. स्व. संघाची निर्मिती केली, ही अशीच अगदी दृढमूल झालेली समजूत. परंतु लेखक (विश्लेषक?) म्हणतात, की त्या ग्रंथातील ‘हिंदू’ संकल्पना ‘रिलिजिअस’ शैलीने मांडली गेली आणि डॉ. हेडगेवार यांची ‘हिंदू’ संकल्पना ‘सभ्यते’ची होती. त्यामुळे सावरकरांची ‘हिंदू’ संकल्पना हेडगेवारांनी मनोमनी नाकारली. मात्र यास काही पुरावे, आधार (असलेच तर) देण्याची गरज होती.

‘संघ परिवाराला हिंदू समाजाचे सूक्ष्मरूप समजणे या क्षणी वस्तुनिष्ठ ठरेल’ हे एक अजब, अनाकलनीय विधान! या विधानावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे संघ परिवाराला अजूनही ‘हिंदू समाजाचे सूक्ष्मरूप’ समजलेले नाही (निदान लेखकाला तरी तसे वाटते). उणीपुरी ९३ वर्षे हिंदू समाजाच्या संघटनकार्यात घालवल्यावरही ‘हिंदू समाजाचे सूक्ष्मरूप’ अजूनही समजले जात नसेल, तर आश्चर्यच म्हणावे लागेल!

‘‘जनसंघ’ नावाची गाजराची पुंगी नीट वाजली नाही तर खाऊन टाकू, अशी सरसंघचालक गोळवलकर गुरुजींची भूमिका होती’ हे वाक्य ‘गोळवलकर गुरुजी’ या नावाभोवती असलेले आदराचे वलय पार उद्ध्वस्त करून टाकते. ‘स्वामी अखंडानंद यांचे शिष्य आणि संन्यस्त वृत्तीचे आध्यात्मिक साधक, परंतु केवळ डॉ. हेडगेवार यांच्या आग्रहाखातर संघकार्याला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व’ अशी प्रतिमा असलेले गोळवलकर गुरुजी (वरील वाक्यावरून) चक्क एखादे निर्ढावलेले, संधिसाधू राजकीय पुढारी वाटू लागतील. मात्र, हे असले तथाकथित ‘विश्लेषण’ वाचून गुरुजींच्या प्रतिमेस जराही धक्का लागणार नाही, हा भाग वेगळा!

‘भारताचे पंतप्रधान होण्याची बाळासाहेब देवरसांची प्रबळ इच्छा, आशा-आकांक्षा होती’ हे आणखी एक असेच धक्कादायक विधान. यालाही काहीही पुरावा दिलेला नाही. देवरस जर १९४२ पासूनच राजकीय पक्षात जायला उत्सुक होते, तर मग गुरुजींच्या देहावसानानंतर जून, १९७३ मध्ये देण्यात आलेले सरसंघचालकपद विनम्रपणे नाकारून राजकीय पक्षप्रवेशाची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यापासून त्यांना कोणी रोखले? शिवाय एवढा दीर्घकाळ त्यांची ‘नाराजी’ स्पष्ट दिसूनही गुरुजींनी तिकडे साफ दुर्लक्ष करावे?

‘वाजपेयी सरकार ‘लोकमान्य’ होते, तर नरेंद्र मोदींनी सरकारला ‘ओबीसी’ मुद्रा प्रदान केली.. २०२५ साली संघ प्रार्थनेत ‘विश्वमाता की जय’ येऊ  शकते.. आजवर संघनेतृत्व ब्राह्मण-क्षत्रिय यांच्याकडे राहिले, पुढे ते वैश्य-शूद्रांकडे जाईल.. आज संघ परिवार पुरुषप्रधान आहे, उद्या तो महिलाप्रधान व्हायची खात्री वाटते..’ ही सगळी अशीच एकाहून एक नाटय़मय, धक्कादायक, पण अविश्वसनीय विधाने. एकूण लेखात ‘विश्लेषण कमी, आणि ‘मायाजाल’ जास्त असेच दिसते!

– श्रीकांत पटवर्धन, मुंबई

कल्पनेच्या वावडय़ा..

‘संघ परिवार : एक मायाजाल’ या लेखात काही सत्य आणि काही कल्पना यांचे मिश्रण आहे. तत्कालीन राजकारणापासून दूर राहून डॉ. हेडगेवार यांनी रा. स्व. संघाची स्थापना केली. संघाची स्थापना केल्यानंतर पुन्हा त्या अर्थाने ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले नाहीत. राजकारणातील पदांपासून दूर राहिले पाहिजे ही भूमिका त्यांनी संघ कार्यकर्त्यांमध्ये रुजवली. डॉ. हेडगेवार यांचे प्रतिरूप म्हणजे बाळासाहेब देवरस असे गोळवलकर गुरुजी म्हणत. देवरसांना पंतप्रधान होण्याची इच्छा होती हे लेखात कोणत्या आधारे मांडले, ते स्पष्ट होत नाही.

याचबरोबर ‘१९४९ साली बंदी उठवण्यासाठी संघाचे रूपांतर राजकीय पक्षात करू असा बाळासाहेब देवरस यांनी इशारा दिला होता’ हीदेखील अशीच कल्पनेची भरारी आहे. ‘सरदार पटेल, बाळासाहेब देवरस, वसंतराव ओक हे राजकीय पक्ष काढणार होते’ हीसुद्धा लेखकाची स्वत:ची कल्पना आहे. कारण या सगळ्या गोष्टींमध्ये संघ पदांच्या राजकारणात पडणार नाही, हा डॉ. हेडगेवारांनी घालून दिलेला दंडक त्यांचे प्रतिरूप असणारे देवरस मोडणार होते असे ध्वनित होते. ‘२००४ मध्ये सोनिया गांधींना पंतप्रधान पदापासून दूर ठेवण्यात प्रा. राजेंद्र सिंह यांचा हात होता’ हे विधान तर धादांत खोटे आहे. कारण प्रा. सिंह अर्थात रज्जू भय्या यांचे निधन २००३ मध्येच झाले होते.

कल्पनेच्या वावडय़ा, तपशिलाच्या चुका असणाऱ्या या लेखात काही तथ्यदेखील आहे. ते म्हणजे- ‘संघ परिवाराला हिंदू समाजाचे सूक्ष्म रूप समजणे या क्षणी वस्तुनिष्ठ ठरेल’ हे विधान. याचे कारण हजारो गावांत चालणाऱ्या शाखा, लक्षावधी सेवाकार्ये या माध्यमातून हिंदू समाजातील सर्व भेदांवर मात करून संघाने विशाल संघटना निर्माण केली आहे.

– सुधीर गाडे, पुणे</strong>

संघाचा चुकीचा अन्वयार्थ

‘संघ परिवार : एक मायाजाल’ हा दीर्घ लेख ‘If you can not make them understand, confuse them..’  या धारणेवर तोललेला भासतो. म्हणजे एखाद् दुसरा तपशील वगळता तपशील योग्य आहेत; परंतु त्यावरील भाष्य आणि निष्कर्ष काही प्रसंगी भरकटलेले आहेत.

स्वा. सावरकरांचे हिंदुत्व सहजासहजी कोणालाच पचनी पडणारे नव्हते. त्यामुळे हिंदू महासभेच्या अनुयायांची संख्या मर्यादित राहिली व पुढे क्षीण होत गेली. शिवाय हिंदूंच्या राजकीय संघटनेचे त्यांचे स्वप्न पूर्णत्वास गेले नाही. डॉ. हेडगेवारांनी हिंदुत्वाला प्रखर राष्ट्रीयत्वाचा मुलामा दिला; मात्र सातत्याने हिंदू परंपराच जपल्या, राबवल्या व वर्धिष्णू केल्या. ‘हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व व राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व’ हे ठामपणे संघ उपक्रमांना जोडत धर्मनिरपेक्षतेचे हे नवे टोपडे डॉक्टरांनी बाल्यावस्थेतल्या संघाला बहाल केले. त्यामुळेच संघाची पुढची वाटचाल निर्वेध राहिली. लेखात या महत्त्वाच्या बाबीचे अप्रूप शोधूनही सापडत नाही.

‘भाजपचे काँग्रेसीकरण’ हा शब्दप्रयोग अश्लाघ्य नाही; पण त्याचा अन्वयार्थ ‘साधनशुचिता खुंटीला टांगून सत्ता टिकवणे’ असा नसून पक्षाचा पाया अधिकाधिक व्यापक करणे आणि आवश्यकता वाटल्यास दोन पावले प्रति:सर होत कार्यव्याप्ती वाढवणे असा होतो. ‘बाळासाहेब देवरसांची भारताचे पंतप्रधान होण्याची प्रबळ इच्छा होती’ हे वाक्य टाकून देवधर मोठा गौफ्यस्फोट केल्याचा आविर्भाव आणत असले, तरी त्यांचा हेतू असफल झाला आहे.

‘संघ बदलतो आहे’ अशा शीर्षकाचे लेख वाचून संघ स्वयंसेवक कधीच विचलित होत नाही; अधिक अविचल बनतो. संघाने अनेक क्षेत्रांत कार्यकर्ते दिले. प्रत्येक क्षेत्राची गरज अन् धाटणी निराळी. संघाने या मार्गक्रमणेत एक व्यापक चौकट देऊन त्यांना मोकळेपण दिले, स्वातंत्र्य दिले. याचा अर्थ संघाला काहीही चालते असा काढला गेला. त्या-त्या क्षेत्रांत संघ विचारसरणी परावर्तीत झाली नाही असे म्हणणे हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न वाटतो.

– मुकुंद पुराणिक, पुणे