डॉ. अंजली सोमण यांनी त्यांच्या हाती पडलेल्या बहुमूल्य पत्रांच्या खजिन्यातल्या वरदा नायडू आणि माधव पटवर्धन यांच्यातील पत्रकल्लोळावर ‘वरदा : एक पत्रकल्लोळ’

(२ डिसेंबर) या लेखातून  टाकलेला प्रकाश प्राथमिक संदर्भशोधनाला धरून केलेल्या लिखाणाचा चांगला प्रयत्न म्हणून पोहचला. या लेखाच्या संदर्भात दोन मुद्दे उपस्थित करावेसे वाटतात- १) भाषेचा वापर कधी कधी ठरावीक अर्थाकडेच घेऊन जातो. २) भाषा आणि तिचे वापरकर्ते कळत-नकळतपणे अर्थाचे संमिश्र पदर निर्माण करतात.

लेखाच्या शेवटाकडे ‘वरदा प्रकरणाचा तडाखा बसला नसता तर..’, ‘वरदा प्रकरण घडलं तेव्हा..’ असे शब्दप्रयोग आले आहेत. वरदा ‘प्रकरण’ का? फक्त ‘वरदा’च ‘प्रकरण’ का? ‘वरदा-माधव’ प्रकरण का नाही? स्त्रिया पुरुषांच्या आयुष्यात वादळं उठवतात, त्यांना ध्येयापासून विचलित करतात या दृष्टिकोनातून वरदा नायडूंना वा त्यांच्यासारख्या इतरांना १९२४-२५ साली ‘प्रकरण’ म्हणलं जाणं समजण्यासारखं आहे. मात्र, माधव पटवर्धन यांची कविता आर्त, हळवी, स्त्रीपूजक होती असं लेखात इतरत्र म्हटलं आहे आणि सर्वश्रुतही आहे. मग आता तरी, लेखात अजून एका ठिकाणी आलेल्या उल्लेखाप्रमाणे हे ‘वरदा-माधवराव प्रकरण’ नाही का? मराठी रसिकांसाठी थोर असणाऱ्या माधव जूलियनांविषयी हळहळ वाटणाऱ्या वाचकाला वरदाला ‘प्रकरण’ म्हणण्यात वावगं वाटणार नाही. मात्र, वरदाचेही कोणी आप्त हे वाचतील, तर आपल्या नाळेशी जोडलेल्या संवेदनशील, कदाचित प्रतिभावंत स्त्रीचा उल्लेख ‘प्रकरण’ म्हणून येणं ठीक आहे का, शोभनीय आहे का, असा विचार त्यांच्या मनात येईल काय? जर पुढे चालून वरदा नायडू माधव पटवर्धनांपेक्षा जास्त गाजत्या, तर त्यांच्या चरित्रकारांनी या साऱ्याचा उल्लेख ‘माधव प्रकरण’ म्हणून केला असता काय? समाजाच्या त्या-त्या काळच्या नीती-अनीतीच्या संकल्पना आपल्यापरीने चुकतमाकत हाताळणाऱ्या किती जणींची ‘प्रकरणं’ झाली असणार, होत असतात.

भाषा ही अर्थाचे असे गुंते निर्माण करते. स्त्रियांबद्दल भाषा फारशी सहिष्णू नसते. त्यामुळे भाषा स्त्री-पुरुषांच्या सारख्याच कृतींचे मूल्यमापन सारखे करत नाही. आपल्याला जाणीवपूर्वक स्त्रियांबद्दल व पुरुषांबद्दल वेगळा विचार करायला भाग पाडते. हा झाला पहिला मुद्दा. शिवाय, ज्या स्त्रियांच्या बाबतीत हे धोरण जवळपास सर्वच भाषा कायम राबवत आल्या आहेत, त्यांनाही हे भाषिक दुय्यमत्व लक्षात येतंच असं नाही. इतका त्या गुंत्याचा गुंता जास्त आहे.

– अपर्णा दीक्षित, पुणे</p>