17 December 2017

News Flash

झुंडशाही आणि व्यक्ती

‘लोकरंग’मधील (२ जुलै) ‘झुंडशाही- जंगलच्या राज्याकडे’ या मथळ्याचा मकरंद साठे यांचा लेख वाचला.

Updated: July 30, 2017 3:16 AM

‘लोकरंग’मधील (२ जुलै) ‘झुंडशाही- जंगलच्या राज्याकडे’ या मथळ्याचा मकरंद साठे यांचा लेख वाचला. परंतु लेखात कारणाचा सविस्तर ऊहापोह केलेला आढळत नाही. वास्तविक आजचे प्रशासन, सरकार, विधिमंडळे व संसद इत्यादी संस्था सक्षमपणे कार्य करताना का अनुभवास येत नाहीत, आणि न्यायालये कायदे व नियम यांनुसार न्यायनिवाडा करण्यासोबत प्रशासकीय निर्णयांत हस्तक्षेप का करत आहेत, यावर भाष्य होणे आवश्यक होते. आपल्या देशात संघटित लोकांची झुंडशाही आहे का? जनतेची झुंडशाही आहे का? यावर मात्र लेखात भाष्य आढळत नाही. यावर अभ्यासपूर्वक झुंडशाहीच्या स्वरूपावर भाष्य केले गेले पाहिजे. तसेच संघटित दबावाखाली निर्णय घेण्याची पद्धत रूढ केली गेली आहे, ते योग्य आहे का? म्हणजे संप, बहिष्कार, नासधूस व अडवणूक करणाऱ्या संघटित लोकांच्या अवास्तव, अव्यवहारी मागण्या मान्य केल्या जातात. मात्र, एका व्यक्तीची मागणी कितीही योग्य असो; ती मान्य होत नाही, तसेच त्यावर उत्तरही मिळत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीला न्यायालयात दाद मागावी लागते. मगच त्या व्यक्तीची मागणी न्यायालयाच्या आदेशानुसार सरकार मान्य करते. याऐवजी अगोदरच ही मागणी सरकारकडून का मान्य होत नाही? परंतु असा प्रश्न तज्ज्ञ, प्रसारमाध्यमे, लोकप्रतिनिधी यांना पडत नाही. परिणामी हेच पुढेही चालू राहते. थोडक्यात, काही लोकांचेच स्व-राज्य असते, हेच अनुभवास येते. यावर चिंतन व्हायला हवे.
  – दिलीप सहस्रबुद्धे, सोलापूर

..तोच खरा मित्र होय!

मंदार भारदे यांच्या ‘बघ्याची भूमिका’ या सदरातील ‘मित्रपुराण’ हा लेख वाचला. शालेय जीवनात जवळचे जोडलेले अनेक मित्र नंतर दुरावत जातात. परंतु निराश न होता दुसरा मित्र शोधावा; जो आपल्या सुखदु:खांचा भागीदार होण्यास समर्थ असेल. हृदयात अपार सेवाभाव भरलेला असल्यास सर्वच मित्र भासतात. मात्र, त्यातून विवेकी मित्र मिळणे हे जीवनातील मोठे वरदान आहे. ‘प्रसंगी सुमधुर प्रशंसा, धीरगंभीर शब्द, प्रेमळ उत्तेजन, सहानुभूतीमय सांत्वन व चुकांसाठीची कठोर उपदेशवाणी ज्याच्याकडून लाभते, तोच खरा मित्र होय,’ अशी ना. सी. फडके यांनी जातिवंत मित्राची व्याख्या करून ठेवली आहे. ‘जाणारा तोल सावरतो तोच खरा मित्र..’ असे म्हणतात. ‘निष्ठावान मित्र आयुष्यात टॉनिकसारखा असतो..’ हा बायबलमधील संदेश प्रमाण मानून अखेरच्या श्वासापर्यंत मित्रपरिवार सांभाळून ठेवावा. मित्रांबरोबर मनमोकळा संवाद केल्यास सुख दुणावते व दु:ख हलके होते. थोडक्यात, मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दु:खदायक असतो, हे लक्षात ठेवून चांगल्या मैत्रीला खो देणे म्हणजे स्वत:चे मरण स्वत: ओढवून घेण्यासारखे आहे.

– सूर्यकांत भोसले, मुंबई

First Published on July 30, 2017 3:16 am

Web Title: loksatta readers reaction on lokrang article