17 December 2017

News Flash

‘तो’ शोधनिबंध नव्हे, आढावावजा निबंध!

डॉ. क्षीरसागर यांनी ‘टीप क्र. १ ची नोंद’ असा जो उल्लेख केलेला आहे, तो

- डॉ. अविनाश सांगोलेकर | Updated: July 16, 2017 1:29 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

‘लोकरंग’मधील (९ जुल) ‘मराठी विभागप्रमुखांचे मोघम शोधनिबंध!’ हा डॉ. शकुंतला क्षीरसागर यांचा लेख वाचनात आला. या लेखामध्ये ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’च्या दोन वेगवेगळ्या अंकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या व डॉ. सतीश बडवे यांच्या दोन वेगवेगळ्या लेखांविषयी डॉ. क्षीरसागर यांनी आक्षेप नोंदविले आहेत. पकी ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिकेमधील साहित्यविचार व साहित्यसमीक्षा’ (महाराष्ट्र साहित्य पत्रिका, अंक क्र. ३५५, एप्रिल-जून २०१६, पृ. ३७-४३) या माझ्या लेखाविषयी डॉ. क्षीरसागर यांनी जे आक्षेप नोंदविले आहेत, त्याबाबतचा माझा नम्र व प्रामाणिक खुलासा असा-

डॉ. शकुंतला क्षीरसागर या ८६ वर्षांच्या एक ज्येष्ठ अभ्यासक आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात नितांत आदर व आपुलकी आहे. त्यांचा संशोधनाच्या क्षेत्रातील अधिकार मला ज्ञात आहे. ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’मध्ये एक वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या माझ्या लेखावरील आक्षेप त्यांनी समक्ष वा दूरध्वनीद्वारे माझ्याकडे व्यक्त केले असते तर मी त्यांना आनंदाने उत्तर दिले असते. ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’तील लेखाविषयीचे आक्षेप ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’च्याच व्यासपीठावरून त्यांनी मांडले असते तरी ते सयुक्तिक ठरले असते. मात्र, त्यांनी यातील एकही गोष्ट न अवलंबता ‘लोकरंग’ पुरवणीतून आक्षेपांची जाहीर वाच्यता केली, ही गोष्ट त्यांच्या सुसंस्कृत व सौजन्यशील व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत वाटत नाही.

‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’मध्ये प्रसिद्ध झालेला प्रस्तुत लेख शोधनिबंध आहे, असे मी लेखाच्या शेवटी ‘टीपे’मध्ये जरी नोंदविले असले तरी लेखाच्या प्रारंभी मात्र शोधनिबंध न म्हणता ‘लेख’, ‘निबंध’ असा ठळक स्वरूपात उल्लेख केलेला आहे. या दोन्ही उल्लेखांकडे डॉ. क्षीरसागर यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. मुळात हा खराखुरा शोधनिबंध नसून, तो शोधनिबंधाच्या वळणाने लिहिलेला एक आढावावजा निबंध आहे. शिवाय हा आढावा इ. स. १९१३ ते २००० अशा दीर्घ कालखंडातील साहित्यविचारांचा व साहित्यसमीक्षेचा आहे. त्यामुळे साहजिकच तो सूक्ष्म आणि सविस्तर अपेक्षित नव्हता. तसे झाले असते तर एम. फिल.ची प्रबंधिका किंवा पीएच. डी.चा प्रबंध आकारास आला असता. ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’च्या अंकाची पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन प्रस्तुत आढावावजा निबंध थोडक्यातच पूर्णत्वास नेणे गरजेचे होते.

‘प्रस्तुत लेख म्हणजे म. सा. पत्रिकेत आलेल्या लेखांची जंत्री आहे,’ हा डॉ. क्षीरसागर यांचा आक्षेप वस्तुस्थितीस धरून नाही. लेखांची जंत्री देऊनच मी थांबलेलो नाही, तर त्यावर थोडक्यात भाष्यही केलेले आहे, हे त्यांनी लक्षात घेतलेले नाही.

श्री. के. क्षीरसागर यांच्या लेखावर मी जे भाष्य केले आहे, ते डॉ. क्षीरसागरबाईंना समाधानकारक वाटत नाही. कदाचित माझे आकलन चुकले असेल, हे मी प्रांजळपणे मान्य करतो.

‘एके ठिकाणी’, ‘काही अंकांमधून’ अशी मोघम शब्दयोजना शोधनिबंधामध्ये अपेक्षित नसते, हे डॉ. क्षीरसागरबाईंचे मत बरोबरच आहे. मात्र, आधी नमूद केलेल्या विविध कारणांमुळे मला तशी शब्दयोजना नाइलाजाने करावी लागली आहे. अर्थात, हे करताना मी आवश्यक त्या ठिकाणी योग्य तो तपशील ‘संदर्भ व टीपा’ यांमधून दिलेला आहेच. त्याच्या आधारे मोघमपणा बराचसा कमी झालेला आहे.

लेखाच्या शेवटी स्वतचे नाव, पद, पत्ता वगरे माहिती ‘संदर्भ आणि टीपा’ दिल्यानंतर यायला हवी होती, हे मला मान्य आहे. ‘संदर्भ आणि टिपा असे एका मथळ्याखाली कुठेच देत नाहीत,’ हे डॉ. क्षीरसागर यांचे मत वस्तुस्थितीस धरून नाही. कारण अनेक शोधनिबंधांमध्ये, प्रबंधिकांमध्ये, प्रबंधांमध्ये, संशोधनपर ग्रंथांमध्ये ही पद्धत सर्रास वापरली जाते. उदाहरणादाखल डॉ. र. बा. मंचरकर यांचे ग्रंथ सांगता येतील.

डॉ. क्षीरसागर यांनी ‘टीप क्र. १ ची नोंद’ असा जो उल्लेख केलेला आहे, तो मुळात चुकीचा आहे. कारण ही नोंद टिपेची नसून संदर्भाची आहे, हे त्यांनी लक्षात घेतलेले नाही.

थोडक्यात, डॉ. क्षीरसागर यांनी माझ्या लेखातील अत्यल्प उणिवांचे भांडवल करून माझी मराठी साहित्य संशोधनाच्या क्षेत्रातील जी काही प्रतिमा आहे, ती मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाय माझ्या लेखाला ‘थातूरमातूर शोधनिबंध’ असे संबोधून त्यांनी वाचकांची दिशाभूलही केलेली आहे. संशोधनपूर्ण लेखनाचा दर्जा घसरत चालला आहे, हे कुणीही अमान्य करणार नाही. पण म्हणून माझे प्रस्तुत लेखनही डॉ. क्षीरसागर यांनी त्यात अंतर्भूत करावे, हे माझ्यावर आणि माझ्या लेखनावर अन्याय करणारे आहे. माझे स्वतंत्र व संपादित असे १८ ग्रंथ पाहिल्यानंतर हे जाणकारांच्या लक्षात येईलच. शिवाय जाणकारांनी महाराष्ट्र साहित्य पत्रिकेतील माझा लेखही मुळातून पाहावा, म्हणजे काय तो जाणकारांना उलगडा होईल असे माझे नम्र आवाहन आहे.

– डॉ. अविनाश सांगोलेकर

First Published on July 16, 2017 1:29 am

Web Title: loksatta readers response on lokrang articles