‘मोकळेपणाच्या मारेकऱ्यांना आवरा!’ हा अभिराम भडकमकर यांचा लेख (२६ नोव्हेंबर) वास्तववादी आहे. मोकळेपणाच्या अभावातून साहित्य अथवा कलाकृतीला विरोध होतो. यास एका दृष्टीने एकांगी साहित्य आणि कलाकृतीच जबाबदार ठरतात. प्रबोधनासाठी तटस्थ मनाची गरज असते. स्तुतिपाठकीय कलाकृतीतून काही गृहीतके मनात पेरली जातात. त्यातून समाज अनेक गोष्टी गृहीत धरतो. या गृहीत धरलेल्या गोष्टींच्या विरोधातील कलाकृतींना स्वीकारण्यास त्याचे मन तयार होत नाही. मन मोकळे असल्यास प्रत्येक कलाकृतीचा आस्वाद घेता येतो. मनात पूर्वग्रह ठेवून कलाकृती पाहिल्यास त्याला मन विरोध करते. चुकीच्या पारंपरिक विचाराला चिकटून बसल्यास नवीन विचार स्वीकारण्यास जागा राहत नाही. प्रबोधनात्मक नवीन विचारांना उथळ मन विरोध करू लागते. धर्मातील पाखंडावर भाष्य करणाऱ्या ‘पी.के.’ किंवा सामाजिक समरसतेवर भाष्य करणाऱ्या ‘बॉम्बे’सारख्या कलाकृतींनासुद्धा विरोध होतो. ‘दशक्रिया’ ही अप्रतिम कलाकृती आहे. तिलाही विरोध झालाच. एकांगी मानसिकतेतून कलाकृती पाहण्याआधीच विरोध केला जातो. विरोधाला विरोध म्हणून अनेकदा समर्थनाचा प्रकारदेखील घडतो. भारतीय समाजात तटस्थतेचा अभाव आहे. स्तुतिपाठक विचार प्रत्येकाला हवे असतात. सांस्कृतिक दोषांवर बोट ठेवल्यास संस्कृतिरक्षणाच्या नावाने उपद्रवी लोक कलाकृतींना विरोध करतात. राजकीय हित डोळ्यासमोर ठेवून याविषयी राजकारण केले जाते. त्यामुळे समाजप्रबोधनास अडथळा निर्माण होतो. अशा विरोधाचा परिणाम म्हणून प्रवाहविरोधी कलाकृतीच्या निर्मितीस निर्माता धजावत नाही व समाजाचा वैचारिक मागासलेपणा वाढत जातो. सरकारी व्यवस्थेत मोकळेपणा आल्यास सामाजिक प्रबोधन करणाऱ्या कलाकृतींमध्ये वाढ होऊन समाजात वैचारिक परिवर्तन होईल, नवीन विचार रुजले जातील.     – सलीम सय्यद, सोलापूर

 

कलावंतांनीही आत्मपरीक्षण करावे

‘लोकरंग’मधील (१० डिसेंबर) दिलीप प्रभावळकर यांचा ‘आपण संवेदनाहीन झालोय?’ हा लेख वाचला. एका कलावंताने वापरलेला शीर्षकातील ‘आपण’ हा शब्द प्रामुख्याने कलावंतांनाच उद्देशून वापरला असेल असे वाटले होते; परंतु लेखाचा सगळा रोख सामान्य रसिक, श्रोते, प्रेक्षक कसे संवेदनाहीन होत आहेत याकडेच दिसतो. दिवाळी आली की ठरावीक धाटणीच्या ‘दिवाळी पहाट’, आषाढी एकादशी आली की ठरावीक कलाकारांचे जुन्याच अभंगांवर आधारित कार्यक्रम, जुनीच नाटके परत रंगभूमीवर ‘नव्या दमात’ आणण्याचा केविलवाणा उद्योग, नवीन चित्रपटांचे विषयही बालगंधर्व, दादासाहेब फाळके आणि ‘कटय़ार’भोवतीच घुटमळणारे.. अशी सध्या परिस्थिती आहे. बदलता काळ असंख्य नवनवे विषय देतो आहे. (जुन्यालाच कल्हई करणे थांबवून) ते टिपण्याची संवेदनशीलता कलाकारांमध्ये तरी किती टिकून आहे हा प्रश्नच आहे. कालसुसंगत काही नवे आणि दर्जेदार मिळाले तर प्रेक्षक ते नक्कीच उचलून धरतात. उत्तम मांडणी असेल तर ‘पिकू’सारखा (बद्धकोष्ठाचा त्रास असलेल्या विक्षिप्त म्हाताऱ्यावरील) चित्रपट आजकालची तरुणाईसुद्धा आवर्जून पाहते आणि ‘लाइक’ही करते.

इंटरनेटच्या आगमनामुळे सर्वसामान्य जिज्ञासू व्यक्तीला कितीतरी उत्कृष्ट माहिती आणि तज्ज्ञांची मते घरबसल्या वाचता येतात. त्यावरून स्वतचे मतही ती बनवू शकते. ते मत व्यक्त करून त्या अनुषंगाने वादचर्चा करण्याकरता समाजमाध्यमांचे व्यासपीठही उपलब्ध आहे. पूर्वी सामान्य रसिकांचे स्वतचे क्षितिज इतके रुंदावलेले नव्हते. त्यामुळे वासरांत मिरवण्याची सोय बऱ्याच लंगडय़ा गायींना उपलब्ध होती. सजग श्रोत्यांना काही वेगळा विचार देऊ शकतील असे किती व्याख्याते सध्या व्याख्याने देतात? याचा परिणाम व्याख्यानमालांवर पडत असेल तर नवल नाही. निष्ठुर स्पर्धात्मक जगात (‘यू हॅव टु प्रूव्ह युअरसेल्फ ऑल द टाइम’ अशा वातावरणात) वावरणारी पिढी एखाद्या बुजुर्ग कलाकाराच्या केवळ नाममाहात्म्याला फारशी किंमत देत नाही. तिकीट काढून कार्यक्रमाला आल्यावर एखाद्या कलाकाराचा ‘मूड वा गळा आज लागलाच नाही’ वगरे सबबी ही पिढी अजिबात ऐकून घेत नाही. या रोखठोक वृत्तीचाही परिणाम कधी तरी दिसतो. रसिक संवेदनाहीन झाले आहेत, असे सुचवताना बदलता काळ लक्षात घेऊन कलावंतांनीही कठोर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.   – प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>